Home > मॅक्स ब्लॉग्ज > कोव्हिड काळातील केदारनाथ: भाग १

कोव्हिड काळातील केदारनाथ: भाग १

प्रचंड महापुरातून उभं राहिलेलं केदारनाथ कोव्हिड च्या काळात नक्की कसं आहे? कोव्हिड काळात जर तुम्हाला केदारनाथला जायची इच्छा असेल तर कोणकोणती कागदपत्र सोबत घ्यावीत? वाचा मॅक्समहाराष्ट्रवर उदय जोशी यांच्या सोबत केदारनाथ ची सफर

कोव्हिड काळातील केदारनाथ: भाग १
X

गेली दोनेक वर्षे मला you tube वर वेगवेगळ्या लोकांचे vlogs बघण्याचे खूळ लागले आहे. त्यातही moto vlogs मी प्रचंड प्रमाणात पाहतो. एकेका घुमक्कडाचे बाईक वरून केलेले प्रवास मला प्रचंड भुरळ घालतात. परवांच, म्हणजे १८ तारखेला असाच सकाळी एका ‘बायकर’चा केदारनाथ वरचा moto vlog पाहत होतो.

केदारनाथाचा जबरदस्त ‘बुलावा’ गेली दोन वर्षे येतच होता. त्यात हा vlog पाहिला आणि आतून ताबडतोब प्रवासाला निघायची जबरदस्त उर्मी आली. मी अट्टल चित्पावन असल्याने माझा एक आटा जन्मत:च सटकलेला आहे. माझ्यासारखे आटा सटकलेले लोक अशा उर्मी मनात दाबून टाकू शकत नाहीत. त्या पूर्ण करण्यासाठी प्रचंड धडपड करतात. या वेळी देखील मी माझ्यातल्या त्या वृत्तीला जागलो. उतलो नाही मातलो नाही आणि घेतला वसा टाकला तर अजिबात नाही. तर, त्या vlog मध्ये सध्याच्या कोविड काळात उत्तराखंड मध्ये प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या, अटी वगैरेची पूर्ण माहिती होती.

एकदा मनात आल्यावर बायकोला सांगितले (आमच्यात सांगतात. परवानगी वगैरे विचारत नाहीत) आणि त्वरित कोविड टेस्टची व्यवस्था केली. दुपारी लॅबवाल्याने घरी येऊन नाका घशात नळी कोंबून नमुना घेतला. दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस तारखेला दुपारी साडे तीन वाजता निगेटिव्ह रिपोर्ट आला आणि एका अचानक ठरलेल्या प्रवासाच्या पूर्वतयारीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

उत्तराखंड सरकारच्या नियमानुसार कोविड टेस्टचा रिपोर्ट फक्त ७२ तासांसाठी ग्राह्य धरला जातो. याचा अर्थ तीन दिवसांत म्हणजे २० तारखेपर्यंत मला उत्तराखंड राज्यात प्रवेश करणे गरजेचे होते. दोन ‘ई-पास’ काढावे लागणार होते. एक डेहराडून स्मार्ट सिटीचा आणि दुसरा चारधाम यात्रेचा. त्यासाठी आधी विमानाचे तिकीट काढणे आणि हॉटेल बुकिंग करणे गरजेचे होते. ते केले. ‘ई-पास’ साठी अर्ज करतांना पुष्कळ गोष्टींची माहिती भरायची होती. शिवाय काही कागदपत्रे ठराविक MB लिमिट मध्ये अपलोड करायची होती. ही संपूर्ण पद्धत साधारणपणे व्हीसा सारखी वाटली. तंत्रज्ञान सराईतपणे वापरण्याच्या बाबतीत मी अशिक्षित असल्याने गुगलमातेच्या सहकार्याने ते सगळे झेंगट आटोपायला मला तब्बल दोन अडीच तास लागले. शेवटी एकदाचे सगळे नीट झाले आणि दोन्ही ‘ई-पास’ हातात आले.

केदारनाथला जाण्यासाठी आधी सोनप्रयाग गाठावे लागते, जे ऋषीकेश पासून नेहमीच्या रस्त्याने साधारण २०० किमी वर आहे. तथापि सध्या गेले काही महिने हा रस्ता दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी पूर्णपणे बंद असल्याने टिहरी जलाशयाच्या काठाने जाणाऱ्या रस्त्याने जावे लागते, ज्यामुळे साधारण ७० किमी जास्तीचा वळसा पडतो. लक्षात घ्या, हे सत्तर किमी डोंगरातल्या वळणावळणाच्या रस्त्यांवरचे आहेत. जिथे सरासरी ताशी वेग ३० किमी एवढाच पडतो.

मी डेहराडूनला उतरून तिथून ऋषीकेश वरून बाईक भाड्याने घेऊन सोनप्रयाग पर्यंत जाण्याचे ठरवले होते. परतीचे विमानाचे तिकीट मुद्दाम काढले नव्हते. कारण या हिमालयीन रस्त्यांवर केव्हाही दरड कोसळण्याचा आणि त्यामुळे अनेक तास वाहतूक बंद पडण्याचा संभव असतो. अशा परिस्थितीत विमान हमखास चुकू शकते.

एकट्याने प्रवास करणे मला फार आवडते. आपण आपल्या मनमर्जी प्रमाणे वागू शकतो. कुणाचे बंधन नसते. शिवाय माझा असा अनुभव आहे की, आपण कुणाला सोबत येण्याविषयी विचारले की, त्याला हमखास जमणारे नसते. त्यामुळे कुणाला विचारताना देखील माझ्या मनात आपल्याला एकटेच जायचे आहे. हे अगदी पक्के असते. खरं तर सोबत कुणीतरी कंपनी पाहिजे वगैरे आपल्या मनाचे खेळ आहेत. एकदा प्रवासाला निघालात की वाटेत ‘लोग मिलते गये, कारवां बनता गया’ या उक्तीप्रमाणे चिक्कार लोक भेटतात.

त्यातल्या साध्यासुध्या लोकांशी संवाद साधणे हा माझा छंद आहे. मी त्यांच्यात रमतो. त्यांचे अनुभव, त्यांची आयुष्याशी चाललेली कश्मकश मला भावते. त्यांच्याशी गप्पा मारण्यात वेळ कसा जातो कळत नाही. या वेळचा प्रवास भीषण अशा कोरोना काळातला होता. लोक बेरोजगारीमुळे, धंदा काही महिने बंद पडल्याने त्रस्त असणार हे उघड होते. अशा वेळी आपल्याकडून जास्त पैसे उकळण्याचा प्रयत्न होणार हे देखील ठाऊक असल्याने जेव्हा असा प्रसंग येईल. तेव्हा अजिबात तक्रार करायची नाही. हे ठरवून ठेवले होते. पुढे तसे एक दोन प्रसंग अपेक्षेप्रमाणे आले सुद्धा, परंतू फसवले गेल्याचे दु:ख बिलकुल झाले नाही.

Travel light हा आपला पहिल्यापासूनचा मूलमंत्र आहे. मी प्रवासाला जाताना जुने टाकून देण्याच्या लायकीचे झालेले कपडे घेऊन जातो. आणि एकेक दिवस घालून हॉटेलात ‘विसरतो’. त्यामुळे दिवसागणिक कपडे कमी होवून पाठीवरचे वजन आपोआप उतरत जाते. या वेळी प्रवासासाठी दोन सॅक नेण्याचे ठरवले. कारण केदारनाथचा ट्रेक करताना आवश्यक तेवढे कपडे नेऊन बाकीचे कपडे व वस्तू खाली सोनप्रयागला हॉटेलात ठेवायच्या होत्या. त्यात बाईकचा प्रवास असल्याने एक सॅक मागच्या सीट वर ‘बंजी रोप’च्या सहाय्याने बांधून दुसरी पुढे टाकीवर ठेवून आरामात नेता येते.

अशाप्रकारे प्रवासाला निघतांना तुमची कुठेही राहण्याची आणि खाण्याची मानसिक तयारी हवी. चोचले चालत नाहीत. त्याच बरोबर शारीरिक फिटनेस देखील चांगला हवा. माझे लायसन्स १९८३ सालचे आहे. गेली जवळपास पस्तीस वर्षे मी स्कूटर, बाईक किंवा गाडी घेऊन लांबलांब फिरतोय. राहण्याखाण्याचे कोणतेही लाड न बाळगल्याने माझे कुठेही कधीच अडले नाही. कमी खर्चात बरेच काही बघून झाले.

आदल्या रात्री सर्व तयारी करून सामान पॅक करून ठेवले, आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स काढून ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी निघण्यासाठी सिद्ध झालो.

क्रमश:

-उदय जोशी

Updated : 25 Sep 2020 5:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top