कशा मुळे होतो कॅन्सर?

3159

ग्लोबोकॉन 2012 आणि NCRP यांनी कॅन्सरबाबत पॉप्युलेशन बेस रिपोर्ट तयार केलाय. त्यात कँसर होण्याच्या पॅटर्नमध्ये बदल पाहायला मिळालाय. शहरी भागांमध्ये फुफ्फुस, तोंड, अन्ननलिका आणि पोटाच्या कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. तर ग्रामीण भागात तोंडाच्या कॅन्ससरचे प्रमाण सर्वाधिक आहे. महिलांमध्ये छातीच्या कॅन्सरचं प्रमाण सर्वाधिक आहे. ग्रामीण महिलांमध्ये गर्भपिशवीच्या कॅन्सरचं प्रमाण सर्वाधिक आहे. महत्त्त्वाचं म्हणजे येणाऱ्या प्रत्येक पिढीमध्ये कॅन्सरबाधीत होण्याचं वयोमान खालावत आहे. तसंच गेल्या पंचवीस वर्षात पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्त आढळून आलंय.

कॅन्सर होण्यामागची कारणे

तंबाखूचे कोणत्याही प्रकारे सेवन हे 30-35% कॅन्सर होण्यामागचे सर्वात मोठे कारण आहे. तर ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा हे दुसरे महत्वाचे कारण आहे. दारूमुळे 5%, विषाणू संसर्गामुळे 5%, वांशिकतेमुळे 2.5% कॅन्सर होण्याची शक्यता आहे. याशिवाय वातावरणामुळे , रेडीयेशनमुळेही काही प्रमाणत कॅन्सरचा धोका संभवतो. दुर्दैवाने आपण वांशिकतेतून येणाऱ्या कॅन्सरबद्दल जास्त चिंतीत असतो त्यावर मंथन करतो, पण त्याची इतर कराणं म्हणजेच तंबाखू सेवन किंवा अन्नातील अतिरिक्त मेदामुळे येणारा स्थूलपणा या कारणांकडे दुर्लक्ष करतो. कॅन्सर होण्या मागची कारणमीमांसा केली तर असे लक्षात येते की 60 ते 70 टक्के कारणं आपल्याला नक्कीच टाळता येतात.

तंबाखू आणि कॅन्सर

सध्या जगात सत्तर प्रकारच्या तंबाखूच्या वनस्पती अस्तित्वात आहेत. यापासून खैनी, मावा, गुटखा, सिगारेट, मशेरी असे प्रकार बनवले जातात. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरनं तंबाखूमधील कॅर्सिनोजेंस आणि तंबाखूचा फ्लेवर किंवा वास यावरून १९ प्रकारच्या तंबाखूच्या जाती ठरवल्या आहेत. त्यानुसार १९ कॅर्सिनोजेंस वेगवेगळ्या गटांमध्ये विभागण्यात आलेले आहेत. पुरेश्या संशोधनातून आता कोणत्या जातीच्या तंबाखूचा शरीराच्या कुठल्या भागावर म्हणजे किडनी, मुत्रनालिका, आतडे, अन्ननलिका, फुफ्फुस, रक्त वाहिन्या, पित्ताशय, पोट आणि तोंड यावर काय परिणाम होतो हे सिद्ध झालंय. त्यामुळे आता त्याचं निदान करणे सुद्धा सोपं झालं आहे.
फूड आणि फूड स्टँडर्ट अँड सेफ्टी ऍक्ट 2006 च्या अंतर्गत, 2012 मध्ये आपल्या राज्यात गुटख्याला बंदी घालण्यात आली होती. त्याच्या पुढच्या वर्षी राज्य सरकारनं ही बंदी खैनी (सुगंधी तंबाखू ), सुगंधी सुपारी, मावा किंवा खर्रा ( तंबाखू, चुना आणि सुपारीचे एकत्रित मिश्रण) यांच्यावर सुद्धा घातली. सुप्रीम कोर्टानं देखील सिगारेटच्या पाकीटावर 85% भागात ‘सिगारेट आरोग्यास हानिकारक आहे’ हे छापण्याची सक्ती केली. पण तंबाखू उद्योगानं त्याविरोधात कायद्याची लढाई लढली.
जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या एका अहवालानुसार राज्य सरकारच्या या बंदी आणि सक्तीनंतर देखील 35% लोकांना गुटखा, सुगंधित तंबाखू सहज उपलब्ध होत आहे. मध्यम वर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय जनतेची खरेदी क्षमता उत्पादन किंमतीनुसार मर्यादित असते. भारतीय मानसिकता लक्षात घेता जर या उत्पादनांवर कर वाढविले गेले तर माझ्या मते हे व्यसन कमी न होता उलट वाढेल. कारण अशावेळी लोकं स्वस्त आणि निकृष्ट दर्ज्याच्या तंबाखू उत्पादनाकडे आकर्षित होतील.

स्थूलपणा, व्यायाम आणि कॅन्सर

बॉडी मास इंडेक्स (BMI) हा जर 30 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ते स्थूलत्व मानले जाते. साथीच्या आजारांच्या शास्त्रांनुसार शारीरिक हालचाली आणि संसर्गजन्य रोगांच जवळच सख्य आहे. तर स्थूलत्व हे ब्रेस्ट, अन्ननलिका, किडनी, मुत्रनालिकाचेच्या कॅन्सरकडे घेऊन जाणारं आहे.

रोग निवारणाकडे दुर्लक्ष

वय, लिंग, जात समूह, कुटुंब किंवा व्यक्तिगत इतिहास, पाळी, ऋतूचक्र हे घटक स्थायिक आहेत आणि बदलले जाऊ शकत नाहीत. पण. ध्रुम्रपान, दारू, स्थूलपणा वाढविणारा आहार, शारीरिक हालचालींचा अभाव, गर्भनिरोधक गोळ्या, वंध्यत्व, ब्रेस्ट फीडिंग न करणे, हार्मोनल बदलावरील औषधी हे सर्व घटक नक्कीच बदल करण्या जोगे आहेत. त्यावर लक्ष केंद्रीत केलं तर नक्कीच कॅन्सर टळता येऊ शकतो.

कॅन्सरला ‘कॅन्सर’च का म्हणतात ?

ख्रिस्त जन्म पूर्व 470 ते 370 च्या दरम्यान ग्रीक औषधी शास्त्राचे जनक हिपोक्रेटसनं ट्युमर चा उल्लेख करतांना ‘कार्सिनोस’ किंवा ‘कॅर्सिनोमा’ या शब्दाचा पहिल्यांदा उल्लेख केला. ग्रीकमध्ये कॅर्सिनोस म्हणजे विंचू आणि त्याच्या पसरलेल्या नाग्या म्हणजेच पेशींचे जाळे या अर्थाने हा शब्द वापरला गेला. रोमन फिजिशियन सेल्सस यानं देखील विंचवाला लॅटिनमध्ये कॅन्सर म्हटले आहे. तर ‘गलान‘ या ग्रीक फिजिशियननं ओंकॉस हा शब्द वापरला. (ग्रीक मध्ये ओंकॉस म्हणजे सूज ) यातूनच पुढे या आजाराला कॅन्सर हे नाव प्रचलित झालं. तर त्याच्या शास्त्राला आँकोलॉजी असं म्हणतात.

डॉ. दिलीप निकम
(लेखक स्वतः मुंबईतील कामा रुग्णालयात कॅन्सर तज्ज्ञ म्हणून काम करत आहेत)