Home > मॅक्स ब्लॉग्ज > जनतेचे माध्यम मॅक्स महाराष्ट्र

जनतेचे माध्यम मॅक्स महाराष्ट्र

मॅक्स महाराष्ट्र इतर मुख्य प्रवाहातील माध्यमांपेक्षा वेगळे कसे आहे? मॅक्स महाराष्ट्र आपलेसे का वाटते? याविषयी साहित्य जागर परिवाराचे संस्थापक हर्षद जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जनतेचे माध्यम मॅक्स महाराष्ट्र
X

२०१४ पर्यंत प्रस्थापित वृत्तपत्रांची संकेतस्थळे आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमांतून माझ्यासारख्या अंध व्यक्तीचे ज्ञानरंजन आणि वैचारीक भरणपोषण व्हायला काही प्रमाणात सुरुवात झाली होती. आजची गोष्ट आजच ऐका-वाचायला मिळणे शक्य झाले होते. पण मे २०१४ मध्ये लोकशाही मार्गाने एक हुकुमशाही राजवट भारताच्या मानगुटीवर बसली आणि तिने माध्यमांवर अप्रत्यक्ष आणिबाणी लादायला सुरुवात केली. यामुळे स्वतंत्र पत्रकारिता करणारे पत्रकार या सत्ताकारणाच्या माध्यमांतून बाहेर पडले. आणि ज्या सकस पत्रकारीतेच्या माध्यमातून माझ्यासारख्याचे वैचारीक भरणपोषण नुकतेच कुठे सुरू झाले होते, त्याला खीळ बसली.

२६ जानेवारी २०१७ रोजी मॅक्स महाराष्ट्र सुरू झाले आणि माझ्यासारख्या अनेकांच्या ज्ञानरंजन आणि वैचारीक भरणपोषणाला पुन्हा एकदा उभारी मिळाली. रविंद्र आंबेकर हे नाव ई-टीव्ही मराठीपासूनच कानावर होते. पुढे आयबीएन-७, जय महाराष्ट्र आणि मी मराठीवरील त्यांचे कार्यक्रमही ऐकले जायचे. त्यामुळे निखिल वागळे सरांच्या फेसबुक भिंतीवरून जेव्हा रवींद्र आंबेकर मॅक्स महाराष्ट्र हे वेब पोर्टल सुरू करताहेत समजले तेव्हा खूप समाधान वाटले.

पुढे फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनेलही सुरू झाले आणि अक्षरांसोबतच दृकश्राव्य स्वरुपातही मॅक्स महाराष्ट्रचे कार्यक्रम ऐकायला मिळू लागले. सामान्यांच्या प्रश्नांना पुन्हा एक हक्काचे व्यासपीठ मिळाले. सुरुवातीस निखिल सरांचे कॅलिडोस्कोपमधील लेख, फेसबुक लाईव्ह आणि नंतर विविध विषयांवर विविध मान्यवरांच्या मुलाखती, स्वतंत्र ब्रॉडकास्ट यास्वरुपात वर्तमानातील घडामोडींचा अन्वयार्थ लावण्यासाठी भुतकाळाचे संदर्भही सहज उपलब्ध होऊ लागले. महाराष्ट्रातच नव्हे तर देश आणि दुनियेतील महत्वाच्या घटना प्रसंगांचे प्रक्षेपण तर इथे होत असतेच पण दुर ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न आणि समस्यांचे ग्राऊंड रिपोर्टिंग सुद्धा हे मॅक्स महाराष्ट्रचे एक महत्वाचे कर्तृत्व आहे.

माझ्या दृष्टीने विशेष महत्वाचे हे की, मुख्य धारेतील माध्यमामध्ये एका विशिष्ट दिवसापुरते व तेही एखाद्या अपवादात्मक सकारात्मक स्टोरीपुरते अंध-अपंगांना स्थान दिले जाते. पण मॅक्स महाराष्ट्रने अंध-अपंगांचे जमिनीवरचे खरे प्रश्न आपल्या मुख्य अजेंड्यावर घेऊन त्यांना आपल्या मंचावरून शक्य तितके अधिकाधिक स्थान दिले आहे.

एवढेच नव्हे तर गौरव मालक सारख्या होतकरू अंध युवकास पत्रकारीता करण्याची संधी देऊन माझ्या मते मॅक्स महाराष्ट्रने एक क्रांतीकारी पाऊलच उचलले. आज आपल्या अंधत्वाच्या मर्यादांवर मात करून गौरव केवळ लेखकच नाही तर डोळस मित्र-मैत्रिणींच्या सहकार्याने व्हिडिओ रिपोर्टींगही करतो आहे आणि विविध विषयांवर चर्चांचे संचालनही करतो आहे. हे सगळे तो करू शकतोय कारण मॅक्स महाराष्ट्र आणि त्यातही रविंद्र आंबेकर यांनी त्याच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच...अर्थात आपल्या तरूण वयात काही अंध व्यक्तींशी रविंद्र आंबेकर यांची जी मैत्री झाली. त्यांच्यासोबत राहून त्यांनी जे ताडले. त्या अनुभवांमुळेच रविंद्र आंबेकर यांनी गौरववर हा विश्वास ठेवणे शक्य झाले.

तरी, अपंगांवर हुकुमशाही पद्धतीने लादलेल्या दिव्यांग शब्दाचा वापर मॅक्स महाराष्ट्र सारख्या पुरोगामी माध्यमाने करणे, मात्र माझ्यासारख्या मॅक्स महाराष्ट्रच्या चाहत्यांना आणि त्यातही रविंद्र आंबेकरांसारखे संपादक असताना अजिबातच रुचत नाही हे ठामपणे सांगावेसे वाटते.

मॅक्स महाराष्ट्र सारख्या पुरोगामी माध्यमाची लोकप्रियता वाढू लागताच प्रतिगामी सत्ताधाऱ्यांना पोटशूळ उठू लागला आणि कधी वेबसाईट हॅक कर, कधी युट्यूब चॅनेल हॅक कर, कधी फेसबुक पेज रिपोर्ट कर अशी नाना कारस्थाने करून ते मॅक्स महाराष्ट्र बंद करण्यासाठी प्रयत्न करत राहिले. पण रविंद्र आंबेकरांच्या नेतृत्वाखालील मॅक्स महाराष्ट्रच्या सर्व मंडळींनी अत्यंत धैर्याने या सगळ्या विघ्नेश्वरांशी सामना करायचे ठरवले. आणि त्यांच्या या संघर्षात आमच्यासारखे अंध-अपंग तर सोबत होतोच आणि कोणतीही दिव्य शक्ती नसतानाही कायमच सोबत राहणार आहोत. मागे मॅक्समहाराष्ट्रचं युट्यूब चॅनेल बंद करण्यात आले होते. तेव्हा एका अंध विद्यार्थिनीने रवी सरांना जी पोस्ट लिहिली होती त्यावरून अंध-अपंगांच्या जीवनात मॅक्स महाराष्ट्र सारख्या माध्यमांचे स्थान किती महत्वाचे आहे. हे लक्षात यायला हरकत नसावी.

तेव्हा अशा या आमच्या लाडक्या मॅक्स महाराष्ट्रचा आज ७ वा वर्धापनदिन आहे, यानिमित्ताने मॅक्स महाराष्ट्रला माझ्याकडून अगदी मनापासून सदिच्छा!

फक्त जाता जाता एवढंच सांगावसं वाटतं की, युट्यूबवरील व्हिडीओजच्या डिस्क्रिप्शनमध्ये कार्यक्रमासंदर्भातील सगळी माहिती नीट दिली जावी, असे फार वाटते. त्याचा एक सारखा फॉर्मॅट असायलाही हरकत नसावी. अनेकदा व्हिडिओच्या शिर्षकात आणि डिस्क्रिप्शनमध्येही वक्त्यांचे नावच नसते.

तसेच, विविध विषयांवर मान्यवरांशी होणारा संवाद हा अधिक नेमका, संदर्भसंपन्न आणि टू द पॉईंट होण्याची आवश्यकता वाटते. व हेच बातम्यांचे वाचन किंवा वृत्तपत्रांचा आढावा घेतानाही व्हायला हवे असे वाटते. सोबत संगीतात्मक कार्यक्रमांवेळी साऊंड कॉलिटीमध्ये सुधारणा होऊ शकली, तर त्या कार्यक्रमांचा आनंद संपूर्णपणे घेता येऊ शकेल.

पण हे सगळे हवे तसे व्हायचे असेल तर अत्यंत कमी साधनसामुग्री आणि तुटपुंज्या अर्थबळावर सुरू असलेल्या मॅक्स महाराष्ट्रला आर्थीकदृष्ट्या सबळ करणे ही आपल्यासारख्यांचीच जबाबदारी आहे. हे ही आपण विसरता कामा नये. म्हणूनच आज मॅक्स महाराष्ट्रच्या वर्धापनदिनी वाढदिवसाची एक छोटीशी भेट तरी आपण सगळे या आपल्या लाडक्या मॅक्स महाराष्ट्रला नक्की देऊया...

Updated : 28 Jan 2023 9:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top