Home > मॅक्स ब्लॉग्ज > जिकडेतिकडे चोहीकडे दिसतात गडे मोबाईल वेडे

जिकडेतिकडे चोहीकडे दिसतात गडे मोबाईल वेडे

जिकडेतिकडे चोहीकडे दिसतात गडे मोबाईल वेडे
X

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की आपण त्याला व्यसन किंवा एडिक्शन म्हणतो. आपल्यापकडे अगोदरच दारू,गांजा, तंबाखु, ड्रग्स, अश्या वेगवेगळ्या प्रकारची भरपूर व्यसनं आहेत, आता त्यात पुन्हा फेसबुक, व्हाट्स अप, इन्स्टाग्राम, गेम्स अश्या वेगवेगळ्या डिजिटल व्यसनांची भर पडली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

अलीकडच्या काळात सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम उपलब्ध झालं आहे. आजघडीला एखादा माणूस जर व्हाट्स-अप किंवा फेसबुक वापरत नसेल तर तो कोणत्या जमाण्यात वावरतोय असा प्रश्न प्रत्येकाला पडेल. सोशल मीडियाचे अनेक फायदे आहेत. यामुळे एक नवी क्रांतीच झाली आहे. एवढं मोठं जग हे अगदीच जवळ आल्यासारखं झालंय पण शेजारी बसलेला माणूस दूर गेला आहे. नात्या-नात्यातला सवांद हरवत चालला आहे. आपण अमेरिकेतल्या माणसाशी बोलतोय पण शेजारच्या खोलीतल्या माणसासोबत आपला सवांद खुंटत चाललाय !!

खरं तर "सोशल मीडिया - शाप की वरदान" हा तसा

वाद-विवादाचा विषय होऊ शकतो.

तसं पाहिलं तर योग्य अन यथोचित पद्धतीने वापर केल्यास सोशल मीडिया नक्कीच वरदान आहे. पण सोशल मीडिया मुळे अनेक गंभीर प्रश्न देखील उभा राहीले आहेत. मग ते अफवांचा प्रसार, मानसिक शारीरिक (डोळे, मेंदू च्या समस्या), बौद्धिक समस्या, नात्यातला दुरावा, शंका-कुशंका, एकमेकांवर चिखलफेक, आरोप-प्रत्यारोप, ऑनलाईन फसवाफसवी...., या सह 'सायबर क्राईम' ही नवी डोकेदुखीच सरकार, पोलीसासमोर वाढली आहे.

खरं तर हा लेखनाचा स्वतंत्र विषय आहे.

पण सोशल मीडियाचं, मोबाईलचं 'व्यसन' ही प्रामुख्याने गंभीर समस्या बनत चालली आहे. लहान-मोठ्यासह मुख्यत्वे तरुणाई ही सोशल मीडियाच्या आहारी जात आहे. आता तर पाच पन्नास रुपयात पाहिजे तेवढा डाटा मिळत असल्याने प्रत्येकजण "ऑनलाईन 24 तास" झालाय.

अस्तित्वात नसलेलं एक 'काल्पनिक जगचं' सोशल मिडियाद्वारे तयार झालं आहे. यामुळे कधी कधी वास्तवात जगण्याचा खरा आनंद हरवत चालला आहे की काय अशी शंका येते. त्यात मग सतत ऑनलाईन राहणे, फोटो, स्टेटस अपलोड करून त्यावर येणाऱ्या लाईक कमेंट मोजत बसण्याच्या नादात, त्यांना उत्तरे देण्यात आपल्या बहुमूल्य वेळ अक्षरशः वायाला जात आहे. लाईक, कमेंट हा सामाजिक प्रतिष्ठेचा विषय बनतोय की काय ?? अशी परिस्थिती बनत चालली आहे.

गरज नसताना सतत दर दोन मिनिटाला मोबाईल मध्ये डोकावुन बघण्याची सवय आपल्यापैकी अनेकांना लागली आहे. बरं उघडून बघणं का होईना पण त्यात विशेष काहीच नसतंय !! अहो इतकंच काय !! सकाळी सकाळी उठल्याबरोबर हातात मोबाईल घेऊन शौचालयात बसण्याचा पायंडाच पडतो की काय असा प्रश्न पडतोय.

जेवताना मोबाईल, चालताना मोबाईल, बसताना मोबाईल, उठताना मोबाईल, अगदी झोपताना सुद्धा कित्येक माणसाचं मुंडकं मोबाईल मधेच असतंय.

मनोरंजनाबरोबरच शारीरिक स्वास्थ्यासाठी

खो-खो, बॅडमिंटन, विटी दांडू, कब्बडी ,कुस्ती असे खेळ खेळणारे सगळया लहानथोरांची टीम मोबाईल कडे वळली आहे.

हल्ली खेळ सुद्धा मोबाईल मधेच खेळले जात आहेत. जवळपास प्रत्येक घरातलं लहान मूल हे मोबाईल गेमच्या अन मोठी मंडळी फेसबुक व्हाट्स अप च्या आहारी जात आहे.

माझ्या पाहुण्यातील जवळपास सगळी लहान लहान मुलं भेटले की खायच्या अगोदर मोबाईल हातात घेतात. मामा मला पतंग बनवून दे म्हणणारे छोटे भाचे आता मामा मला व्हिडीओ गेम खेळायला द्या म्हणतात. घरातलं लहान मुल सगळा मोबाईल हाताळतं हे काही पालक अभिमानाने सांगत असले तरी त्याचे काही छुपे विपरीत परिणाम आहेत.

एकंदरीत जो-तो डिजिटल, स्मार्ट झालाय ही चांगली गोष्ट आहे पण गैरवापर अन अतिवापर ह्या गोष्टी अनेक नवीन नवीन प्रश्न जन्माला घालतायेतं !!

© चांगदेव गिते

Updated : 4 Aug 2018 9:52 AM GMT
Next Story
Share it
Top