Home > मॅक्स ब्लॉग्ज > नागरी नियोजन – करो वा मरो

नागरी नियोजन – करो वा मरो

नागरी नियोजन – करो वा मरो
X

नागरी नियोजनाला आपल्या देशात फार महत्व दिले गलेले नाही. जागा दिसली की विकास करायच्या या भूमिकेतून झालेल्या विकासामुळे आपलं जिवीतच धोक्यात आलंय. आता या क्षेत्रात करो वा मरो ची स्थिती निर्माण झालीय. काही गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत. या संदर्भात अर्थशास्त्राचे अभ्यासक संजीव चांदोरकर यांचा चिंता जागवणारा लेख

महाराष्ट्रातील अनेक छोट्या मोठ्या शहरांची नावे तुंबई, तुंबापुर, तुंबाबाद, तुंबातूर, तुंबगाव पुढच्या काही वर्षात बदलतील. ही शहरे तुंबली की सर्वात जास्त जीवघेणा फटका बसतो तो त्यातील नागरिकांना. आयुष्यभरात कमावलेले एका फटक्यात डोळ्यासमोर नष्ट होते. काहीवेळा काहीजणांचा जीव देखील जातो. असे असले तरी या शहरातील नागरिकांनी जणू पणच केलाय. आम्ही आमच्यातच चूर राहणार आहोत ! आम्ही क्षमता असून देखील कॉमन सेन्सवर वापरून साधा विचार देखील करणार नाही !

आम्हाला आमच्या मालकीचे घर हवे आहे; ते करण्यासाठी आम्ही नवरा बायको दिवसाचे बारा तास काम करू; आमच्याकडे असलेले किडुक मिडूक सोने विकून स्वतःचा मार्जिन मनी उभी करू; काही दशलक्ष रुपयांचे कर्ज काढून त्याचे ईएमआय आयुष्यभर फेडत राहू पण आम्ही हे लक्षात घेणार नाही की ते सुंदर घर बाहेरून या शहरातील रस्ते, उंच सखल जागा, नागरी वाहतूक, स्वच्छ पाणी पुरवठा, सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्याच्या सोयी, घनकचरा या सर्व सुविधांशी जैवपणे बांधलेले आहे. की या बाह्य गोष्टी आपला, आपल्या लहान मुलांचा प्राण कंठाशी आणू शकतात. आपण वर्षातून कितीवेळा आजारी पडणार ते ठरवणार असतात की हे सारे असण्यासाठी “नागरी नियोजन (अर्बन प्लॅनिंग)” म्हणून काहीतरी लागते आणि त्या अर्बन प्लॅनिंग मध्ये आपल्या दैनंदिन आयुष्याची गुणवत्ता अडकलेली आहे, मग आपण घेतलेले घर महालासारखे सुंदर असुदे की, मुख्य म्हणजे या साऱ्या गोष्टी आपल्याकडे कितीही पैसे असले तरी आपण विकत घेऊ शकत नाही. बिल्डर्स, राजकीय नेते, नोकरशहा यांना कितीही दूषणे दिली तरी नुकसान आपले स्वतःचे होते, प्राण आपला स्वतःचा जातो,

घरासाठी नागरी नियोजन म्हणजे जणूकाही झाडांसाठी जमीन आणि पर्यावरण पण सर्वसामान्य लोकांचा नागरी नियोजनात / नागरी सुविधांच्या व्यवस्थापनात शून्य सहभाग आहे. काही मूठभर वेडे मध्यमवर्गीय प्रोफेशनल्स आणि कार्यकर्ते आपल्या परीने जीव तोडून नागरी नियोजनाच्या प्रश्नांवर काहीबाही करीत असतात. पण त्यांना सामान्य नागरिकांची साथ अजिबात मिळत नाही.

स्वतःच्या नोकरीत, संसारात चूर राहा. ठीक आहे. आम्ही नाही म्हणत देशातील इतर नागरिकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नात लक्ष घाला. पण आपल्या जीवन मरणाच्या प्रश्नात तरी लक्ष घाला. जी लोक त्या प्रश्नांवर काम करत आहेत त्यांना साथ द्या .हे फक्त घरांचे व नागरी नियोजनाचे नाहीये. मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा, सार्वजानिक वाहतुकीचा अनेक जीवघेण्या प्रश्नांवर सामान्य नागरिकांना असे ब्रेनवॉश केले गेले आहे की,प्रत्येकजण स्वतःचा प्रश्न स्वतः सोडवू शकतोय; अट एकच विचारक्षमता वापरायची नाही आणि आयुष्यभर गुरांसारखे राबराब कष्ट करायचे !

संजीव चांदोरकर

Updated : 30 July 2019 3:56 AM GMT
Next Story
Share it
Top