Home > News Update > श्रद्धा.. अंधश्रद्धा आणि नातं ..!

श्रद्धा.. अंधश्रद्धा आणि नातं ..!

श्रद्धा.. अंधश्रद्धा आणि नातं ..!
X

मला एक विषय मांडायचा आहे. आता तशी बरीच वर्ष झाली. म्हटलं तर जाउदे म्हणून हा विषय सोडून देता येईल. पण काही विषय जाऊ देत म्हणून जात नाहीत. कारण तोतापुरी च्या कोई मध्ये जशी कीड असते. तशी अशा विषयात एक शंका असते. जी स्वस्थ बसू देत नाही. माझी एक बहीण आहे. म्हणजे होती...

म्हणजे ती हयात आहे. पण आता नातं उरलं नाही. म्हणजे मनापासुन च काही वाटत नाही.

भांडण वाद दुष्मनी असं काही च झालं नाही पण संवाद संपला.

मग नातं... आधी आम्ही रेग्युलर संपर्कात होतो. हसी मजाक फोना फोनी सगळं काही व्यवस्थित अगदी मनापासुन... मग तिच्या गावात आमचा कार्यक्रम ठरला.

रीतसर तिने आम्हाला जेवायला बोलावलं आणि ते साहजिक होतं, सहसा आम्ही कुणाचं निमंत्रण स्वीकारत नाही. पण हिच्या कडे जायला काही अवघडल्या सारखं वाटलं नाही

तिने बोलावलं आम्ही गेलो. रिकाम्या हाताने कसं जायचं म्हणून तेव्हा बाऊल मध्ये पाण्यात ठेवलेली बांबू ची रोपं हा नवीन प्रकार होता.

तेव्हा शंभर रुपयांना मिळायचा.

आम्ही तो उचलला आणि कार्यक्रम झाल्यावर तिच्या कडे जेवायला गेलो, आगत स्वागत छान झालं आम्ही नेलेल्या गिफ्टचंही कौतुक वगैरे झालं. आणि तुम्हाला खोटं वाटेल पण जेऊन आल्यावर आमचा संवाद च संपला. म्हणजे मी एक दोनदा तिन दा फोन केला. पण ती फोन वर येईचना.

तिच्या वाढदिवसाला फोन केला. तेव्हा पडेल आवाजात जेवढ्यास तेव्हढं बोलून तिने फोन ठेवला. मी काय झालंय विचारलं? पण तिने उत्तर दिलं नाही.

मग मी ही फोन केला नाही. आणि अचानक बारा वर्षानी फोन आला. अर्थात मी काही हरखून गेलो नाही, कोरडाच राहीलो आणि ते स्वाभाविक होतं. आणि मग ती जे बोलायला लागली ते इतकं धक्कादायक होतं. स्वतः ला लेखिका म्हणवणारी ती आपली बुरसटलेली खुजी प्रतिमा माझ्या समोर उभी करत गेली.

म्हणाली ‘अरे तुम्ही येउन गेलात ना? त्या नंतर मी आजारी च झाले. आजाराचं काही निदानच होईना. पण जस जसं तू भेट दिलेल्या झाडाचं एक एक पान गळत गेलं तशी माझी तब्येत सुधारत गेली’

या मागे पेशा ने शिक्षिका असलेली माझी बहिण काय लॉजीक लावत होती. तिचं जाणे

पण पुढचं तिचं वक्तव्य आणखीनच हलकट पणाचं आणि नात्याला न शोभणारं होतं.

म्हणाली वाढदिवसाला तुझा फोन आला ना तेव्हा माझी सुन गरोदर होती. मग हे तुला कसं सांगणार? म्हणून मी गप्प होते. आता माझा नातू दहा वर्षांचा झाला. त्याची मुंज पण झाली.

‘म्हणजे आमच्या पासून त्याला काही धोका राहीला नाही असं तुला म्हणायचं आहे का?’

मी टोकेरी स्वरात विचारलं

पेशा ने शिक्षिका होती ना म्हणून ती गप्प बसली नाही

म्हणाली ‘हे बघ प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात.’ दुसरी बाजू तिला माहित नाही

उमा समोर हे घडलं असतं तर उमाने दोन थोबाडीत लगावल्या असत्या आणि तिचा दाढा काढायचा खर्च वाचवला असता. पण तेव्हा पासून मनात एक शंका येते.

आपण प्रामाणिकपणे केवळ चांगल्या मनाने एखाद्या ला सप्रेम भेट देतो ती स्विकारताना तो नक्की काय विचार करत असेल?

माझा एक मित्र साईचरित्रा शिवाय कुणाला दुसरं काही देतच नाही. पण मला हे पटत नाही. आपली भेट त्यांच्या वर थोपवल्या सारखी वाटते. प्रत्येक वेळी जाणं टाळता येत नाही.

रिकाम्या हाताने जाणं बरं दिसत नाही. त्या ही पेक्षा मनापासुन कौतुक करावसं वाटत असतं

मग करायचं काय?

चंद्रशेखर गोखले यांच्या फेसबुक वॉलवरुन साभार

Updated : 10 March 2020 4:06 AM GMT
Next Story
Share it
Top