EVM : काही उत्तरं, काही अनुत्तरीत प्रश्न !

561
image

EVM मशीनमधील ऐकण्या/वाचण्यात आलेल्या हेराफेरीबाबत खात्रीशीर माहिती ऐकण्या/पाहण्याला मिळावी, अशी बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा होती, ती काल पूर्ण झाली. याबाबतचा रविशकुमारांचा एनडीटिव्हीवरील शो काल पाहिला. ज्यात के. जे. राव हे निवडणूक आयोगाचे मुख्य सल्लागार यांनाच त्यांनी बोलावलेलं होतं.

‘मोदी ने नही मशिन ने हराया’ या केजरीवाल, मायावती यांच्या आरोपाबाबत के. जे. राव म्हणाले की मागच्या वर्षी स्वत: बनवून घेतलेल्या EVM मशिनसह अमरिंदर सिंग निवडणूक आयोग कार्यालयात आलेले. त्यांचं म्हणणं असं होतं की, EVM मशिन टेंपर करता येतं. आम्ही त्यांना आमच्याकडचं EVM मशिन दिलं आणि सांगितलं की, हे टेंपर करून दाखवा. त्यावर अमरिंदर सिंगांचं म्हणणं असं होतं की EVM मशिन खोलल्याशिवाय ते टेंपर कसं करणार? EVM मशिन कुणाच्याही हाताला लागू शकत नाही. इतकं त्याला संरक्षण दिलेलं असतं. त्यामुळे ते खोलता येणं शक्यच नाही हे निवडणूक आयोग कार्यालयाने सांगितलं. शिवाय पुढे जावून के. जे. राव म्हणाले की, पंजाबमधे बहुमत मिळवणारे हेच अमरिंदर सिंग आता EVM मशिनबद्दल का नाही काही बोलत? आता केजरीवाल शंका उपस्थित करताहेत. पण मागच्या वेळी ‘आप’ला दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ६८ जागा मिळाल्या. म्हणजे तेव्हा ‘आप’ने EVM मशिन टेंपर केलेल्या, असं म्हणायचं का? निवडणूक हरलेले पक्ष, नेते असे आरोप करणारच हा के. जे. राव यांचा मुद्दा बिनतोड आहेच. पण मग EVM मशिन हाताला लागली, खोलली तर त्यात फेरफार करता येणं शक्य आहे की, नाही हा प्रश्न गुलदस्त्यातच राहिला.

 

EVM मशिनमधील मायक्रो चीप जपानहून येतं. यात किती तथ्य आहे? या प्रश्नावर के. जे. राव म्हणाले की चीप कुठून येते यापेक्षा त्यातलं प्रोग्रामिंग महत्वाचं आहे. ते प्रोग्रामिंग एकदाच व भारतातच केलं जातं. त्यामुळे त्यात काही फेरफार होवू शकत नाही. तंत्रज्ञानात अग्रेसर असणारे जपान, अमेरिका इथे EVM मशिन निवडणूकीत का वापरलं जात नाही? ते पारदर्शी नसल्याचा स्पष्ट निर्वाळा जर्मनीच्या न्यायालयाने का दिला? ज्या नेदरलॅंडने EVM मशिन निवडणूकीत पहिल्यांदा वापरात आणलं तिथेच EVM शिवाय निवडणुका का होतात? या सगळ्या प्रश्नांबाबत के. जे. राव यांचं म्हणणं एवढंच होतं की, आपण वापरत असलेल्या EVM मशिनमधील सुरक्षेचे सगळे तंत्रज्ञान जगात कुठेही वापरले जात नाही इतके ते अव्वल आहेत. त्याची पोचपावती बाकीच्या देशांनीही दिलेली आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. भारतीय सॉफ्टवेअर्स इंजिनिअर्सबाबत शंकेचं काहीच कारण नाही आणि निवडणूक आयोगाने तसा दावा करणंही स्वाभावीकच आहे. पण मग असा विश्वास तिथल्या इंजिनिअर्सबाबत त्या त्या देशांना का वाटत नाही हा ही प्रश्न उरतोच.

EVM मशिनमध्ये हेराफेरी झाली आहे याचे कोणते पुरावे संबंधीत उमेदवारांनी निवडणूक आयोगाला द्यायला हवेत. मुंबई मनपा निवडणूकीत एका अपक्ष उमेदवाराला शून्य मतं पडली, हा EVM मशिनमधील हेराफेरीचा पुरावा होत नाही का? याबाबत के. जे. रावांचं म्हणणं असं होतं की EVM मशिनमधे जर का हेराफेरी झाली असं वाटत असेल तर मतमोजणीच्या वेळेसच आक्षेप घ्यायला हवा. निवडणूक आयोग तात्काळ मतमोजणी थांबवू शकतं, फेरनिवडणुका घेवू शकतं. मात्र एकदा मतमोजणी झाली, निकाल घोषित झाले की, त्यानंतर निवडणूक आयोगही काही करू शकत नाही. शिवाय प्रत्यक्ष निवडणुकांआधी EVM मशिनची चाचणी घेतली जाते. आजवरच्या एकाही चाचणीत एकही EVM मशिन टेंपर केलं गेल्याचं एकही उदाहरण समोर आलं नसल्याचा दावा के. जे. राव यांनी केला. थोडक्यात EVM मशिन टेंपरबाबत निवडणूक आयोग काही करू शकत नाही. संबंधीतांनी न्यायालयातच जावे असेच के. जे. राव सुचवत होते.

VVPAT (voter verified paper audit trail) अर्थात ज्यांना मत दिले त्याची खात्री देणारी पावती याबाबत बोलताना के. जे. राव म्हणाले की, गोव्यामधे हा प्रयोग आता आपण केलाय. २०१९ च्या निवडणूकांआधी संपूर्ण भारतभर ही यंत्रणा राबवायचे निवडणूक आयोगाचे प्रयत्न आहेत. त्यासाठी लागणाऱ्या चार हजार कोटींकरता केंद्र सरकारशी अनेक वेळा पाठपुरावाही केला आहे. थोडक्यात VVPAT बाबत निवडणूक आयोग काहीच करत नाही या आरोपात काहीही तथ्य नाही. किंबहुना VVPAT बाबत निवडणूक आयोग प्रयत्नशील आहेच फक्त राजकीय इच्छाशक्ती हवी, असं के. जे. रावांनी म्हटलंय.

एकीकडे मुंबई मनपाचे ६१ हजार कोटी वापराविना बॅंक खात्यात पडून आहेत तर दुसरीकडे निवडणूकांसारख्या महत्वाच्या प्रक्रियेतील अनेक शंकांचं निरसन करणारी VVPAT यंत्रणा केवळ चार हजार कोटींकरता केंद्राकडे डोळे लावून बसली आहे ! केंद्र सरकारने पाच हजार कोटी याकरता मंजूर केल्याचं किरीट सोमैय्यांनी रात्री उशिरा ट्विट केलं अशी नुकतीच माहिती मिळालीय. खरं खोटं लवकर कळेलच.

थोडक्यात कालच्या वीस पंचवीस मिनिटांच्या कार्यक्रमातून EVM मशिनमधील हेराफेरीबाबतच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली, तर काही अनुत्तरीतच राहिली.

आनंद भंडारे