Home > मॅक्स ब्लॉग्ज > नैतिक पत्रकारितेची ऐशीतैशी आणि फेक न्यूज

नैतिक पत्रकारितेची ऐशीतैशी आणि फेक न्यूज

नैतिक पत्रकारितेची ऐशीतैशी आणि फेक न्यूज
X

करोना व्हायरसविरोधी लढ्यात संपूर्ण जग चटके खात आहे. भारतात देखील या विषाणूने थैमान घालायला सुरुवात केली. परंतु काल मुंबईच्या वांद्रे येथील आकस्मित घटनेने वृत्त वाहिन्यांचा संपूर्ण discourse बदलून टाकला. लॉकडाऊनमुळे घरात अडकलेला प्रत्येकजण बाहेरच्या जगातील माहितीचा स्त्रोत म्हणून वृत्तवाहिन्यासमोर बसला होता. वांद्रे परिसरात उत्तर भारतीय मजुरांची गर्दी झाली आणि अचानक वृत्तवाहिन्यांवर एकच झुंबड उडाली.

गर्दी कशाची, का झाली, यामागे कोण आहे वगेरे मीडिया ट्रायल सुरु झाली. यथावकाश समाज माध्यमांवर देखील ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्याचसोबत एबीपी माझाच्या एका बातमीची लिंक, व्हिडिओ, स्क्रीनशॉट सैराभैरा पसरू लागले. त्यात प्रामुख्याने नाव समोर आलं ते एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच. त्यांनी १४ तारखेला सकाळी देशाच्या विविध भागात अडकलेल्या मजुरांसाठी विशेष रेल्वेसेवा सुरु होणार असल्याची बातमी दिली. पत्रकारितेच्या मूल्यांमध्ये माहितीचा वा बातमीचा स्त्रोत तपासणे अधिक महत्वाचे समजले जाते. यासाठी त्यांनी बातमीचा स्त्रोत म्हणून रेल्वे प्रशासनाच्या एक पत्राचा उल्लेख केला आणि रेल्वे मधील खास ‘सूत्रांच्या’ माहिती नुसार ही बातमी दिली.

या बातमीमुळेच वांद्रे येथे गर्दी जमा झाल्याचे अनेकांनी समाज माध्यमांवर म्हटले. पाहता पाहता एबीपी माझा पुन्हा एकदा ट्रोल होऊ लागला. अनेक पोस्ट, कॉमेंटचा पाउस पडू लागला. प्रसंगी अनेकांच्या फेसबुक भिंतीवर शिव्यांची लाखोली वाहिली गेली. अगदी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्यावर देखील बोलणे सुरु झाले. दरम्यान रेल्वे मंत्रालयाने अशी कोणतीही रेल्वे सेवा सुरु करणार नसल्याचा खुलासा केला. पाहता पाहता राहुल कुलकर्णीवर तक्रार दाखल झाली आणि सकाळपर्यंत त्यांच्यावरील कारवाईची बातमी सुद्धा पसरली. तपास सुरु असल्याने त्या घटनेमागील सत्य कालांतराने सर्वांसमोर येईलच. तो जमाव या बातमीमुळेच तिथे आला की आणखी कोणी त्यामागे आहे, विनय दुबेची अटक अशा अनेक गोष्टी समोर येत राहतील. याचीच संधी शोधत त्यावरून सुरु झालेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांची किळसवाणी प्रवृत्ती लाज आणणारी आहे. त्यामुळे आता इथे त्यावर बोलण्यात अर्थ नाही.

राहुल कुलकर्णी यांचा आजवरचा पत्रकारितेतील बातम्यांचा प्रवास पाहता, अशी अर्धवट माहितीवर बातमी कशी दिली याबद्दल सर्वत्र चर्चा आहे. त्यांनी आजवर महाराष्ट्रातील अनेक सामाजिक समस्यांचा, गंभीर प्रश्नांचा आढावा आपल्या पत्रकारितेमध्ये तो देखील अत्यंत काळजीपूर्वक घेतल्याचं अनेक वेळा दिसलं आहे. शेतमजुरांचे प्रश्न, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न हे अत्यंत कुशल व गंभीर पद्धतीने मांडले. एकेकाळी एबीपी माझावरच दुष्काळी भागातल्या रेल्वेडब्यातील पाण्यावर निर्भर असलेल्या लोकांची मन विषन्न करणारी संवेदनशील बातमी देणारा पत्रकार आणि कालचा अपुऱ्या माहितीवर बातमी देणारा पत्रकार एकच आहे का? असा प्रश्न पडू लागलाय. येणारा काळच उत्तर देईल राहुल राजकारणाचा बळी ठरतोय की ब्रेकिंग न्यूजचा.

मूलतः कालच्या बातमी मधील ते रेल्वेचे पत्र हे अधिकाऱ्यांचे ‘अंतर्गत संवादाचे’ पत्र आहे. त्यात देखील हा स्पष्ट उल्लेख आहे की मजुरांच्या स्थलांतराच्या प्रस्तावावर विचार सुरु आहे आणि त्याबद्दल विविध विभागांनी आपले मत कळविण्यास सांगितले आहे. प्रस्ताव आणि निर्णय यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. पत्रकारितेच्या शिक्षणात मथळ्यांचे प्रकार शिकवले जातात, यातच प्रश्नार्थक मथळा हा प्रकार असतो.

मथळ्याच्या पुढे केवळ प्रश्नचिन्ह दिल्यास त्या मथळ्याचा आणि एकूणच बातमीचा अर्थ बदलतो. कालची ती रेल्वेची बातमी चालवतांना हाच प्रकार समोर आला. ‘रेल्वे सुरु होणार?’ अशा मथळ्याखाली ही बातमी दिली गेली. परंतु सर्वसामान्यांना बातमीतले प्रश्नाचीन्हांचे बारकावे कितपत माहिती असतात हे देखील एक प्रश्नचिन्हच आहे. तो केवळ प्रस्ताव होता, झालेला निर्णय नव्हे. हे सर्व मुद्दे राहुल कुलकर्णी यांना माहित नसतील असे म्हणणे धाडसाचे ठरेल. परंतु वृत्तवाहिन्यांमधील ब्रेकिंग न्युजची जीवघेणी स्पर्धा याला सर्वाधिक जबाबदार वाटते.

पत्रकारितेचा प्रवास हा ‘मिशन टू प्रोफेशन आणि प्रोफेशन टू बिझनेस’ या मार्गाने होत राहिला. माध्यमांच्या अर्थकारणात बिझनेसला आलेलं प्रचंड महत्व भल्याभल्या पत्रकारांना जेरीस आणत. टीआरपीसाठी माहितीचा चोळागोळा करून भडक, खुसखुशीत, एक्सक्लुझिव्ह असे आवरण चढवून दाखवले जातात. बऱ्याच वेळा नसलेली माहिती, चुकीची माहिती देखील बातमी स्वरूपात दर्शकांच्या समोर येते. यालाच फेक न्यूज असे नामकरण आहे. अर्धवट माहिती देखील फेक न्यूजच गणली जाते. मुळात अश्या खोट्या माहितींना ‘न्यूज’ म्हणणे चुकीचे आहे, बातमी म्हणजे जी सत्य आहे, जे अस्तित्वात आहे. मग जे खोटेच आहे ती बातमी कशी असेल किंवा फेक न्यूज तरी कशी म्हणावी असा देखील प्रश्न पडतो.

काल १४ तारखेला मजुरांसाठीची रेल्वे बद्दलची अशी खोटी अथवा अर्धवट बातमी दिल्याबद्दल या पत्रकाराला कारवाईला सामोरे जावे लागलं आहे, मात्र अगदी अशीच बातमी टाईम्स ऑफ इंडिया या इंगजी वृत्तपत्राने १२ तारखेलाच प्रसारित केली होती. मग त्याच न्यायाने त्यांच्यावर देखील अशीच कारवाई अपेक्षित आहे. शिवाय एकवेळ ही गोष्ट देखील छोटी म्हणावी असे काही कारनामे हिंदी वृत्तवाहिन्यांनी काल केले आहेत.

आप की अदालत चालविणाऱ्या रजत शर्मांच्या इंडिया टीव्हीने तर हद्दच पार केली. ‘२०००-३००० मजूर मस्जिद समोर का जमले’ अशा मथळ्यांनी आपल्या टीव्हीचा स्क्रीन भरून ‘धार्मिक’ करून टाकला. अशीच बातमी एबीपी हिंदी वृत्तवाहिनीने सुरु केली. न्यूज नेशन या वृत्तवाहिनीच्या अँकरने त्याच्या पलीकडे जाऊन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण फोन-इन वर असतांनाच त्यांना विचारले की ‘एकाच ठराविक धर्माचा जमाव मस्जिद समोर एवढ्या मोठ्या संख्येने का आला?’ पृथ्वीराज चव्हाण वारंवार त्या अँकरला समजावत राहिले की तो धार्मिक जमाव नाही, तर ते सामान्य मजूर आहेत. परंतु तो ऐकेल तर खरं.

त्या अँकरचे आपले ठरलेले प्रोपोगंडा पसरवणे चालूच राहिले. अखेर कडक शब्दात चव्हाणांनी त्याला, ‘तुम्ही याला धार्मिक रंग द्यायचा प्रयत्न करू नका’ म्हटल्यावर त्याने प्रश्न बदलला. अशा खोट्या बातम्यांची भरमार याच करोना व्हायरस युद्धा दरम्यान मुस्लीम समाजाचे ‘फेक व्हिडीओ’ आणि बातम्या व्हायरल झाल्या होत्या. निवडणुकांच्या काळात देखील अश्या खोट्या बातम्यांचा प्रचंड उद्रेक होतो. प्रश्न हा उरतो की अशीच बातमी देणाऱ्या इतर वृत्तपत्रांवर, वाहिन्यांवर आणि याच मजुरांच्या बातमीला धार्मिक रंग चढवून ‘धार्मिक अशांतता’ माजविण्याचा एजेंडा चालविणाऱ्या इंडिया न्यूज, एबीपी हिंदी न्यूज, न्यूज नेशन यांच्यावर कारवाई का करायला नको? ते तर यापेक्षा अधिक मोठा गुन्हा करतायत. मजुरांच्या जमाव बातमीला या वृत्त वाहिन्या धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न कुणाच्या सांगण्यावरून करतायत, कोण आहे यांच्या पाठीशी हा सर्वाधिक गंभीर प्रश्न आहे. अशा ‘धार्मिक अशांतता’ माजविण्याचा एजेंडा चालविणाऱ्या खोट्या बातम्यांनी आपण समाजात किती मोठी दरी निर्माण करतोय आणि आपल्याच देशाचे पर्यायाने आपल्या भविष्यातील पिढ्यांचे भविष्य ‘विषमय’ करतोय याची जाण आपल्याला असलीच पाहिजे. भविष्यात मागे वळून पाहतांना इतिहासाशी डोळे मिळवता येतील की नाही काय माहित? माध्यमे ही समाजमन तयार करत असतात, तेव्हा त्यात किती विष ओतावं हे ज्याने त्याने ठरवावं.

वृत्तवाहिन्यांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये त्यातील मजकुराबद्दल संपादकांना जबाबदार धरले जाते आणि ती त्यांची जबाबदारी देखील असते. खरं पाहायला गेलं तर हल्ली संपादकांच्या हातात काहीही उरलेलं नाही, हल्ली माध्यमांचे मालक आणि व्यवस्थापन या बद्दलची पॉलिसी ठरवत असतं. केवळ पत्रकाराने बातमी दिली की ती लगेच लावली जाते या भ्रमात जनतेने राहू नये. काय बातमी लावायची आणि काय नाही हे ठरवणारे तिसरेच असतात. पत्रकाराला यात कुठेही स्थान नसते. त्याला फक्त बातमी देण्याची डेडलाईन दिलेली असते, तीच तो पाळत असतो. पत्रकाराने दिलेली प्रत्येक बातमी माध्यमांनी लावली असती तर अनेक चांगल्या पत्रकारांची रोजची घुसमट झालीच नसती. पण पुस्तकातली आणि अभ्यासक्रमातली ‘नैतिक पत्रकारिता’ बिझनेस बनलेल्या पत्रकारीतेपुढे छोटी पडू लागलीय. कुठलाच पत्रकार त्याचे शिक्षण घेताना फेक न्यूज कशी बनवायची हे शिकत नसतो. ही माध्यमांची स्पर्धा त्याला हंटर घेऊन मागे लागलेली असते, जीव मुठीत घेऊन झटणाऱ्या आणि पत्रकारिता करणाऱ्या अनेक पत्रकारांमध्ये असा एखादा ‘राहुल कुलकर्णी’ अडकून पडतो.

पत्रकारिता करतांना किमान थोड्या संयमाची नेहमीच गरज असते. त्यांच्यावर ब्रेकिंग न्यूजच्या स्पर्धेचा ताण असतो हे मान्यच आहे, परंतु आपल्या एखाद्या बातमीने खूप मोठी हानी होणार नाही याची काळजी सुद्धा घ्यायला हवीच. तेच आपलं नैतिक कर्तव्य असतं. डॉक्टर, नर्स, पोलीस यांच्यासारखे पत्रकार देखील जीवावर उदार होऊन आपले कार्य करत आहेतच. आजच्या या व्यावसायिक पत्रकारितेमध्ये नैतिक मूल्यांना विनोदासारखे पहिले जाते. नैतिकतेला आज काहीच स्थान नाही, अशी आवई सारखीच उठवली जाते. परंतु काळोखात अडकलेल्या बाजारीकरण झालेल्या अश्या अंधकारमय, बदनाम झालेल्या या माध्यम व्यवसायाला कदाचित केवळ ‘नैतिक पत्रकारिता’ या चिखलातून बाहेर काढेल. आज-नाहीतर उद्या पुन्हा पत्रकारितेला उभारी आणण्यासाठी नव्या पिढीच्या पत्रकारांना आणि माध्यमांना देखील ‘नैतिक पत्रकारिता’ हेच एकमेव उत्तर असेल यात शंका नाही.

- जयेंद्र राणे

(लेखक बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील 'मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज' विभागात प्राध्यापक आहेत)

Updated : 16 April 2020 12:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top