Home > मॅक्स ब्लॉग्ज > महामारी आणि कलावंत

महामारी आणि कलावंत

महामारी आणि कलावंत
X

“अहो, दादासाहेब, हसता काय? अहो केस झालीय आमच्या वाड्यात केस! आता ते डिसइन्फेक्शन आणखी ते सेग्रेगेशन आणि तो सगळा त्रास आम्हाला होणार. बायकोन् आम्ही सगळे आता धिंडका काढल्याप्रमाणे डोक्यावर सामानसुमान वाहून स्वाराच्या गेटाकडे जाणार. आणखी या माडितून तुम्ही आमची मौज पाहाणार…”

हरि नारायण आपटे यांच्या ‘कसे गेले दिवस’ या कथेतील हे उद्धरण. ही कथा १९२८ साली आर्यभूषण छापखान्याने प्रकाशित केली. मात्र, या कादंबरीच्या अर्पण पत्रिकेवर ४ नोव्हेंबर १८९९ ही तारीख हरिभाऊंनी टाकली आहे. या कादंबरीचं कथानक पुण्यातील प्लेगच्या साथीभोवती रचलेलं आहे. कनिका कपूर असो की करोना विषाणूची लागण झालेले तबलिगी असो सर्वांनाच क्वारंटाईन वा विलगीकरण नकोसं वाटतं. त्यामुळे ते आपला रोग लपवून ठेवतात. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सनी आपल्या कॉलनीत राहू नये. अशी मागणी मुंबईतील काही वस्त्यांमध्ये रहिवाशांनी केली. महामारीची दहशत आणि विलगीकरणाचं भय वा नकोसेपणा आपल्या देशात सुमारे शंभर वर्षं आहे. असं हरिभाऊंच्या कथेवरून ध्यानी येतं.

प्लेग हा रोग स्पर्शजन्य आहे की, संसर्गजन्य, डॉक्टर वा नर्सेसना वा वॉर्डबॉईजना का होत नाही, काही रोगी बरे कसे होतात, असे प्रश्न कथेतील एका पात्राला पडतात. शंभर वर्षांपूर्वी आधुनिक वैद्यकशास्त्राची माहिती आपल्या फारच कमी लोकांना होती. साक्षरतेचं प्रमाण कमी होतं. रेडियो वा टिव्ही सारखी प्रसारमाध्यमं नव्हती. वर्तमानपत्रांचा खप काही हजारात असेल. वर्तमानपत्रांत बातम्या व वृत्तांतापेक्षा लेख—अग्रलेख यांना मानाचं स्थान होतं.

केसरी असो की सुधारक किंवा अन्य नियतकालीकं मतपत्रं होती. प्लेगचे रोगी हुडकण्यासाठी त्यांचं विलगीकरण करण्यासाठी सरकारी यंत्रणेला पोलीसांची अर्थात दमनयंत्रणेची गरज भासली. या दमनाच्या विरोधात लोकांमध्ये असंतोष होता. लोकमान्य टिळक, आगरकर, गोपाळकृष्ण गोखले यांनी या असंतोषाला वाचा फोडली होती. पुण्याचा प्लेग कमिशनर, डब्ल्यू. सी. रँण्ड याचा खून २२ जून १८९७ रोजी चापेकर बंधूंनी केला. पुण्यातील प्लेग, प्लेगच्या निर्मूलनासाठी ब्रिटीश सरकारने केलेली कारवाई यातून राष्ट्रवादी चळवळीला पाठिंबा मिळाला. एका महामारीचं राजकारणात रुपांतर झालं. हरिभाऊंची कथा १८९८ साली पूर्ण झाली परंतु त्या कथेत प्लेगच्या राजकारणाची दखलही घेण्यात आलेली नाही. किंबहुना ब्रिटीश सरकारने केलेली उपाययोजना आणि न्यायपालिका यांची प्रशंसाच या कथेत आहे.

उंदरांपासून सुरू होणाऱ्या या महामारीला ब्युबॉनिक प्लेग म्हणत. तो आजही पूर्ण नाहीसा झालेला नाही. आल्बेर काम्यू या फ्रेंच लेखकाची प्लेग ही कादंबरी १९४७ साली प्रसिद्ध झाली काम्यूच्या कादंबरीत एका शहरातील प्लेगचा उद्भव, कहर आणि विलय यांचं चित्रण आहे. कादंबरीच्या अखेरीस प्लेग संपुष्टात येतो. शहराची दारं उघडली जातात. लोक आपआपल्या प्रियजनांना, आप्तांना भेटून आनंदित होतात. महामारीमुळे माणसांतील चांगुलपणा आणि सहृदयतेचं दर्शन घडतं. त्यामुळे माणूस या प्राण्याबद्दल तिरस्कार नाही तर प्रेम वाटू लागतं, असं निवेदक म्हणतो. प्लेगच्या विरोधातील संघर्षात सत्तेचं गौरवीकरण काम्यू कटाक्षाने टाळतो. कादंबरीतली पात्रं कोणत्याही विचारधारेच्या नावाखाली समाज उद्ध्वस्त करत नाहीत. तर एकमेकाला मदत करण्याची, वाचवण्याची पराकाष्ठा करतात. माणसांतील चांगुलपणा, आनंद आणि एकमेकातील ऋणानुबंध यांना या कादंबरीत मध्यवर्ती स्थान आहे.

इंगमार बर्गमनचा सेव्हन्थ सील हा चित्रपट १९५६ साली प्रदर्शित झाला. जेरूशलेममधील ख्रिश्चन धर्माची पवित्र स्थळं ताब्यात घेण्यासाठी युरोपातील ख्रिश्चन राष्ट्रांनी जे धर्मयुद्ध पुकारलं होतं, त्या युद्धातील एक योद्धा—नाईट, आपल्या राज्यात परततो आहे. त्यावेळी ब्युबॉनिक प्लेगच्या साथीने नष्ट झालेलं एक गाव त्याला वाटेत भेटतं. मृत्यूशी म्हणजे काळाशी आपण बुद्धिबळ खेळतो. खेळाचा शेवट निश्चित असतो. खेळाचा काळ तुम्ही किती लांबवता आणि उत्तम खेळता हेच जीवन असतं. खेळणं म्हणजे देहावर, ऐहिक जगावर प्रेम करणं. ख्रिश्चन धर्मानुसार देहाचा आणि ऐहिक जगाचा तिरस्कार करणं, येशूशी लीन होणं म्हणजे जीवन, या आशयसूत्राभोवती हा चित्रपट रचला आहे.

दुष्काळ, महामारी हे विषय आधुनिक भारतीय कलाकृतींमध्ये अपवादानेच चित्रीत झाले आहेत. अशनी संकेत या सत्यजित राय यांच्या चित्रपटासारखे सन्माननीय अपवाद अर्थातच आहेत.

आजवर माहीत नसलेल्या विषाणूचा उद्भव होणं, वेगाने तो जगाच्या कानाकोपऱ्यात पसरणं, संपूर्ण देशात नाही तर जगात टाळेबंदी होणं, देशाचीच नाही तर जगाची अर्थव्यवस्था ठप्प होणं, नाही रे वर्गाची फरफट होणं, महामारीला आटोक्यात आणण्यासाठी जगभरातील सरकारांना दमन यंत्रणा राबवणं भाग पडणं, त्यातून सरकार नावाच्या संस्थेचं गौरवीकरण होणं, महामारीच्या राजकारणाला हिंदु-मुस्लिम, शहरी—ग्रामीण, श्रीमंत-गरीब असे अनेक पदर आहेत. पोलिसांवर दगडफेक झाली आहे, पोलिसांनी नागरीकांना बडवलं आहे.

महामारीमुळे देशापुढचे अन्य सर्व प्रश्न झाकोळून गेले. अशा अभूतपूर्व घडामोडी आपल्या देशात घडत आहेत. या संबंधात मराठी लेखकांचे (प्रवीण बांदेकर, प्रणव सखदेव, आसाराम लोमटे, अशोक नायगांवकर) अनुभव, निरीक्षणं, आकलन आणि भाष्य आजच्या लोकसत्तेत (दिनांक ५ एप्रिल २०२०) प्रसिद्ध झालं आहे. हरिभाऊंच्या कथेपेक्षा या लेखकांचं लिखाण नक्कीच कसदार आहे. परंतु काम्यू वा बर्गमन वा सत्यजित राय यांच्याप्रमाणे संपूर्ण मानवी जीवनाला कवेत घेणारं भाष्य यापैकी कुणालाही करता येत नाही. मराठी साहित्य परपुष्ट होण्याची नितांत गरज आहे.

सुनील तांबे,

Independent Journalist

9987063670

Updated : 5 April 2020 10:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top