Home > मॅक्स ब्लॉग्ज > पर्यावरण प्रेमी ठाकरे पुत्र सर्पमित्रांच्या समस्यांकडे लक्ष देतील का?

पर्यावरण प्रेमी ठाकरे पुत्र सर्पमित्रांच्या समस्यांकडे लक्ष देतील का?

पर्यावरण प्रेमी ठाकरे पुत्र सर्पमित्रांच्या समस्यांकडे लक्ष देतील का?
X

( तेव्हा सागर मंथनातून निघालेलं विष महादेवाने पचवलं आताचे महादेव (सर्पमित्र) सरकारी आणि सामाजिक अनास्थेचं विष पचवतायत.)

"पूर्वी प्रत्येक दगडाखाली साप सापडायचा, आता दगड काढला की सर्पमित्र निघतो"

"सापांपेक्षा सर्प मित्रांचा सुळसुळाट जास्त झालाय"....

साधा साप बघितला तरी ज्यांची पाचावर धारण बसते असे अनेकजण सर्प मित्रांवर टवाळक्या करत बसतात अर्थात अशा "भुई-धोपट्याकडे" सर्पमित्र लक्ष देत नाहीत आणि आपलं कार्य सुरू ठेवतात हे बरय.

नवरा सर्पमित्र आहे हे माहीत होतं पण घरात साप पाळतो हे माहीत असतं तर लग्नच केलं नसतं मात्र आता सापांबरोबर जगायची सवय झालीय, मुलगी खूप लहान आहे. गरीब असल्याने तिचे सगळेच हट्ट पुरवता येत नाही खेळणी देता येत नाहीत. मग बापाने आणलेला एखादा सर्पच तिचा विरंगुळा होतो, मलाही सर्प मैत्रीण व्हायचं असं ती सांगत असते, ऐकतांना हे बरं वाटतं पण या शहरात आल्या पासून 7 वर्षात आम्हाला 12 वेळा घर बदलावं लागलं. कुणीतरी घर मालकांना सांगत हे गारुडी आहेत. सापांची तस्करी करणारे आहेत.जादूटोणे वाले आहेत, सापांना पाळतात मग घरमालक येतो आणि आम्हाला घरातून हाकलतो, घरात साप असतात त्यामुळे सत्य लपवताही येत नाही, मात्र आणलेले साप जखमी असल्याने, कातीवर आल्याने किंवा अंडज - जारज अवस्थेत असल्याने त्यांना काही काळ घरात ठेवावं लागतं हे कुणी एकूणच घेत नाही.

सापांचा आणि माझा मित्र....(थोडं हसून बोललेलं वाक्य) असलेल्या राजू कदमची पत्नी तिचे अनुभव मला सांगत होती.

एखाद्या माणसाने आपल्या कामाप्रती किती समर्पित असावं याचं राजू बद्दलचच एक उदाहरण सांगतो. एकदा एका माणसाला सापाने दंश केला, उपचारसाठी त्याला दवाखान्यात दाखल केलं गेलं आणि नेमक्या कोणत्या सापाने चावलं हे दाखविण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी मारलेला सापही सोबत आणला मात्र डॉक्टरांचं सापांविषयीच ज्ञान कमी असल्याने साप विषारी का बिनविषारी? हे त्यांना समजेना तेव्हा कुणीतरी राजुला फोन केला आणि दवाखान्यात दाखल होताच त्याने आधी तो मेलेला साप बघितला साप बिनविषारी असल्याचं कळल्याने त्याने त्या रुग्णाला सांगितलं मात्र तो पर्यन्त त्या रूग्णांचा BP हाय झाला होता. राजू त्याला वारंवार सांगत होता साप बिनविषारी आहे पण त्याची पल्स काही नॉर्मल होईना शेवटी राजुने स्वतःकडे असलेला त्याचा जातीचा साप काढला. (सुदैवाने तो त्याच्याकडे होता) आणि त्याच्या समोर स्वतःला चावून घेतला तेव्हा कुठं तो रुग्ण नॉर्मल झाला आणि त्याचा जीव वाचला.

2017 मध्ये त्याच्या लहान मुलीची सर्वात लहान सर्प मैत्रिण म्हणून बातमी करायला गेलो होतो, तेव्हा सर्प मित्रांच्या कुटुंबाची खरी व्यथा कळली, खरंतर सापांविषयी जनजागृती हा बातमी करण्या मागचा उद्देश होता त्यानुसार बातमी प्रसिद्ध झाली मुलीचं राज्यभर कौतुकही झालं मात्र कुणीतरी वनविभागाला डिवचलं आणि त्यांनी राजू विरोधात कारवाई केली अर्थात काही दिवसांनी चूक लक्षात आल्यावर त्यांनी राजूवरील आरोप मागे घेतले. पण हे सगळं गुपचूप झालं राजू मागील 15 वर्षांपासून सर्प मित्र म्हणून काम करतोय त्याने सुमारे दहा हजार सापांचे प्राण वाचवले पण सर्प दंश झालेल्या अनेकांनाही जीवदान दिलं त्याच्या कामाचं मोल नाही.

मात्र राजू प्रमाणेच पोटासाठी विषाची परीक्षा घेणारे सुमारे तीन हजाराहून जास्त विषपुरुष/सर्पमित्र राज्यभर सापांना वाचविण्यासाठी अविरत प्रयत्न करतायत सर्वांची परिस्थिती कमी अधिक प्रमाणात राजुच्या कुटुंबा सारखीच आहे. अर्थातच सरकार, वनविभाग आणि समाजाच्या विखारी वृत्तीला ते बळी पडतायत, महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयात अॅनिमल केयर टेकरच्या अनेक जागा रिक्त आहेत, मात्र सर्पमित्रांकडून टक्केवारी मिळत नाही. म्हणून त्या भरल्या जात नाहीयत, वनविभागातही हीच परिस्थिती आणि अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे शासकीय कर्मचारी म्हणून अनेक अधिकारी खुर्चीवरच कुंडली मारून बसलयेत ह्यांना जाब विचारावा तर खोटे सर्प मित्र म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आपल्यावरच ते फणा काढतात.

मानवाच्या आधी सुमारे 3 कोटी वर्षांपूर्वीपासून धरतीवर सापांच वास्तव्य होतं, सापांचा मेंदू फार विकसित नसल्याने त्यांना प्रेम किंवा शिक्षा कळत नाहीत, अर्थात कानच नसल्याने ऐकू सापांना ऐकू येण्याचा संबंधच नाही मात्र साप पकडतांना आपली पकड (घट्ट ) त्याच्यासाठी घातक आहे… की सुरक्षित आहे हे तो जाणतो, त्या शिवाय विषकन्या विषपुरुष ह्या केवळ कल्पना नाही तर अशी लोकं वास्तवात होते हे सदोहारण सांगणारे राज्यातले प्रख्यात सर्पतज्ञ राजेश_ठोंबरे सर जेव्हा सापांबद्दल बोलतात. तेव्हा वाटतं सर्पमित्र होणं किती चांगलं आहे कारण ठोंबरे सरांच्या मते जीव वाचविणे या सारखं दुसरं पुण्य कुठलंच नाही, राजेश मागील 35 वर्षांपासून या क्षेत्रात काम करतात. सुरवातीच्या काळातच त्यांना नागाने दंश केला आणि त्यांचं बोटं तोडाव लागलं. तरीही हा माणूस मागे हटला नाही आज जगभरात या माणसाचे किमान 15 लाख समर्थक आहेत किंवा त्यांना आपण ठोंबरे सरांनी तयार केलेले सर्परक्षकही म्हणू शकतो, राजेश ह्यांनी किती साप मुक्त केले आणि किती जणांचे प्राण वाचवले याची गिणती करता येणार नाही मात्र (सरकारच्या) दुर्दैवाने एव्हढा मोठा माणूस शासन दरबारी नगण्य आहे.

ठोंबरे सर म्हणतात साप आधीही होते आणि पुढेही राहतील मात्र आता सापांना वाचवणं गरजेचं आहे. कारण त्यांचं विष मानवासाठी जीवदान ठरतंय. कँसर आणि हृदयविकारासारख्या आजारांसाठी ते उपयोगात येतं, साप निसर्ग साखळीतला मुख्य घटक आहेच मात्र त्यांच्याविषयीच्या अज्ञानामुळे ते मारले जातायत.

सापांच्या चमडी आणि विषाची आंतरराष्ट्रीय स्तरावर तस्करी होते नशा आणि मादक पदार्थ बनविण्यासाठी त्यांचं विष वापरलं जाते हे माहीत असून देखील यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करतात डॉक्टरांच्या MBBS अभ्यासक्रमात सापांचा अभ्यास केवळ दीड पानात संपतो, शालेय शिक्षणातही सापांची मर्यादित माहिती दिली जाते, साप चावला तर लस उपलब्ध आहे. मात्र गावखेड्यात सतत लोडशेडिंग होतं राहत आणि योग्य तापमानात न साठवल्याने त्या लसी एक्सपायर होतात महावितरणचा हा भोंगळ कारभारही अनेकांच्या जीवावर बेततोय.

दुसरकिडे ज्यांना साप चावतो ते शेतकरी किंवा अगदीच गरीब व्यक्ती असतात अशांकडून किती पैसे मिळणार असा विचार करत एकही डॉक्टर आज पर्यंत ‘सापरोगतज्ञ’ झाला नाही. ही सर्व सरकारी अनास्थेचीच उदाहरण आहेत.

खरतर ह्या सर्व बाबी आत्तापर्यंतच्या पर्यावरण मंत्र्यानी अभ्यासणं गरजेच होतं मात्र तसं झालं नाही सरकारच्या लेखी साप आणि वाघ एकाच शेड्युल मध्ये येणारे प्राणी आहेत, मात्र वाघांबरोबर सापांच संवर्धन होणं गरजेचं आहे. याकडे कुणी लक्षच द्यायला तयार नाही मात्र ह्यावेळी सुदैवाने वाघाच्या घरातला (ठाकरे) एक पुत्र (तेजस ठाकरे) हा पर्यावरण प्रेमी आहे. तर दुसरे पुत्र (आदित्यठाकरे) राज्याचे पर्यावर्णमंत्री आहेत त्यामुळे ते साप आणि सर्पमित्र दोघांचही संवर्धन करतील अशी अपेक्षा आहे. अर्थातच त्यांना हे काम सरकारी नाहीतर मानवतेच्या दृष्टीकोनातून करावं लागेल त्यातून साप आणि सर्पमित्रांना अच्छे दिन येतीलच मात्र त्यांच्या आजूबाजूला असलेल्या सापांच्या चाली, विषारी, अर्धविषारी, बिनविषारी साप आणि अस्तिनातले सापही त्यांना ओळखता येतील. (स्वानुभवातून सांगतोय)... हेही नसे थोडके तेव्हा आदित्यजी हे कार्य लवकर उरकाच...!!

नागपंचमीच्या शुभेच्छा...!!

-गोविंद अ. वाकडे

सर्पमित्रांचा मित्र

Updated : 26 July 2020 9:57 AM GMT
Next Story
Share it
Top