Home > News Update > सांगली-कोल्हापुरच्या पुरात नंदुरबारला विसरू नका!

सांगली-कोल्हापुरच्या पुरात नंदुरबारला विसरू नका!

सांगली-कोल्हापुरच्या पुरात नंदुरबारला विसरू नका!
X

महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. ज्याचा मोठा फटका कोल्हापूर, सातारा आणि नंदुरबार जिल्ह्याला बसला आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या परिसरात नद्यांना आलेल्या पुरामुळे तर तेथील परिस्थिती अधिकच बिकट आहे. परंतु नंदुरबार जिल्ह्यात पूर सदृश्य परिस्थिती नसली तरी या जिल्ह्यात विशेषतः पहाडी क्षेत्रात शेती, घरे, रस्ते यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुर्दैवाने याकडे मिडीयाचे फारसे लक्ष नसल्याने या जिल्ह्यातील आदिवासींना कोणी वाली नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने या बाबतीत कारवाई सुरु केली असली तरी गावागावात अजूनही मदत किंवा पाहणी करण्यास कोणी पोहचलेले नाही.

अक्कलकुवा व धडगांव तालुक्यात आदिवासींच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यात मोठा फटका भात आणि तुवर या पिकांना बसला आहे. अतिवृष्टी आणि संतत धार पावसामुळे तुवर पिक नष्ट झाले असून भाताच्या खाचरांमध्ये गाळ वाहून आल्याने भाताची रोपे वाहून गेली किंवा बुजली गेली आहेत. अनेक शेतात ओढे व नाले यांनी प्रवाह बदलल्याने पूर्ण माती वाहून गेली असून शेतात दगड गोटे भरून गेले आहेत. ज्वारी व मक्याची अवस्थाही बिकट असून अजून २ दिवस असाच पाऊस राहीला तर ही पिकेही पूर्ण नष्ट होतील. कपाशीचे ही असेच नुकसान झाले आहे. परिणामतः यावर्षी या भागात शेतीतून काहीच हाती लागणार नसल्याने सर्व आदिवासी कुटुंबांना रोजगारासाठी व उपजीविकेसाठी मोठ्या प्रमाणात शेजारील राज्यात मजुरीसाठी स्थलांतरित व्हावे लागेल अशी भीती आहे.

याच बरोबर आदिवासी गाव पाड्यांमध्ये घरांचेही मोठे नुकसान झाले असल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. गावात गाळ, चिखल यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची भीती आहे. गुरांनाही साथीचे रोग होतील.

याकडे वेळीच लक्ष पुरवण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासन याबाबतीत संवेदनशील आहेच, जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार-रविवार च्या सुट्या रद्द करून स्थानिक कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे ही अभिनंदनीय गोष्ट आहे. मात्र आता तातडीने याबातीत गावागावात पोहचून ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करून त्यांना मदत पोहोचवणे गरजेचे आहे. तसेच शेतीच्या बाबतीत शासनाकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत अहवाल पाठवणे आवश्यक असल्यामुळे लोकसंघर्ष मोर्चा या बाबतीत शासनाकडे पुढील मागण्या करीत आहेत.

- जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.

- अक्कलकुवा व धडगांव तालुक्यात शेतीतील माती वाहून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. या बाबतीत अशा गावांमध्ये मृदू संधारण व पाणलोट क्षेत्र विकासाची कामे विशेष बाब म्हणून सामुहिक वन समित्यांच्या मार्फत किंवा जिथे अशा समित्या नाहीत तिथे ग्रामपंचायत मार्फत तातडीने सुरु करण्यात यावीत.

- तुवर, ज्वारी, मका ही पिके नष्ट झाल्यामुळे या बाबतीत नुकसान भरपाई दिली जावी.

- ज्यांची घरे पडली आहेत त्यांचे पंचनामे करून तात्काळ त्यांना मदत दिली जावी.

- यावर्षी १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये गावातील आवश्यक कामांचा कृती आराखडा बनवून रोजगार हमीतून मोठ्या प्रमाणात कामांचे नियोजन केले जावे.

- या बाबतीत सर्व समाजाने पुढे येवून जिल्ह्यातील शेतकरी व आदिवासी यांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज असून कोल्हापूर व इतर पूरग्रस्तांना मदत पाठवाच मात्र आपल्याच जिल्ह्यातील अतिवृष्टी व संततधार पाऊसाने हवालदिल झालेल्यांना ही मदतीचा हात पुढे करावा असे आवाहनही लोकसंघर्ष मोर्चा करीत आहे.

- प्रतिभा शिंदे

Updated : 16 Aug 2019 8:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top