Home > मॅक्स ब्लॉग्ज > "दिवाळखोरी कशी केली जाते ( आणि बँकांची कर्जे कशी बुडवली जातात ! )"

"दिवाळखोरी कशी केली जाते ( आणि बँकांची कर्जे कशी बुडवली जातात ! )"

दिवाळखोरी कशी केली जाते ( आणि बँकांची कर्जे कशी बुडवली जातात ! )
X

होळीचा नमस्कार !

काही समाजांमध्ये फक्त दहा - बारा वर्षांत तब्बल तीन वेळा दिवाळखोरी जाहीर केलेले महाभाग भाव खाऊन जातात. अशा दिवाळखोरीचा त्या समाजातील प्रचलित अर्थ म्हणजे "कितना माल जमाया होगा !" अशा महाभागांची दिवाळखोरी निभवून नेणाऱ्या वित्तीय सल्लागाराचाही मग भाव वधारतो. अर्थात या लोकांना सिस्टीमची भिती वाटत नाही, ह्यांचा समाज ह्यांच्याकडे घ्रुणेने वा संशयाने पहात नाही, कायद्याचा कल्पक पण अनैतिक वापर करून देणारे सल्लागार उपलब्ध असतात, ह्यांची राजकीय क्षेत्रात प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष उठबस असते, ह्यांना बऱ्याचदा काही अनैतिक नि तितकेच धाडसी बँकर्स सामील असतात, कष्ट न करता लफड्यांची जोखीम उचलणारे हुशार भागीदार व व्यवस्थापक ह्यांच्या टीमचे सदस्य असतात आणि दिवाळखोरीतून जमविलेल्या धनाची चपखल गुंतवणूक करुन देणारे दलालही उपलब्ध असतात.

मुळात अशा ठरवून केलेल्या दिवाळखोरीचा प्रारंभ "प्रकल्प नियोजन आणि वित्त उभारणी" च्या टप्प्यापासूनच सुरु होतो. बऱ्याचदा बँक अधिकाऱ्याच्या सहभागाने प्रकल्पाची एकूण किंमतच वाढवली जाते. वित्तीय सल्लागार इथे मोठी भूमिका निभावतो. मग यंत्रे, जमीन, तंत्रज्ञान इ. ची खरेदी ही बिले वाढवून घेत केली जाते. वाढीव फरक काळ्या पैशात वा देशाबाहेर प्रवर्तकाला म्हणजे उद्योजकाला मिळतो.

काही वेळा पुढील दहा वर्षांच्या विक्रीचे आकडे वाढवून दाखवत प्रकल्पाला आकर्षक बनविले जाते. इथे बऱ्याचदा दोष नसतानाही काही बँकर्स फसतात. अनिश्चितता व जोखमीच्या आकड्यांचा मस्त खेळ खेळला जातो. बेमालूमपणे भविष्यात प्रकल्प अयशस्वी दाखविण्यासाठी व पळवाट काढण्यासाठी या आकड्यांचा व शक्यतांचा उपयोग केला जातो.

उद्योग तोट्यात दाखविण्यासाठी मग वेगवेगळे हातखंडे वापरले जाऊ लागतात. दिवाळखोरीच करायची आहे असं ठरल्यावर मनाचा निर्लज्जपणा व कोडगेपणाही वाढत जातो. उद्योजक आता म्हणू शकतो कि मी चुकीचे निर्णय घेतले पण गुन्हे नाही केले. मला फार तर निर्बुद्ध म्हणू शकता पण अपराधी नाही! अर्थात तो असं म्हणू शकतो कारण भोवतालचा समाजही तेवढाच निर्ढावलेला असतो. चलाखीने हा उद्योजक नामांकित अशा धार्मिक व सामाजिक संस्थांना देणग्या देत रहातो. याचे काही कुटुंबीय या संस्थांचे कार्यकर्ते असण्याचा आवही आणत असतात. हे सगळं स्वतःची सोज्वळ प्रतिमा तयार करण्यासाठी! सामाजिक संस्थांच्या भाबड्या कार्यकर्त्यांना वाटत राहते कि "शेठ तोट्यात असूनही देणग्या देतात!" बाकी धार्मिक संस्था सर्टिफिकेट देत राहतात कि "शेठ किती अध्यात्मिक आहेत!" राजकारण्यांसोबतची उठबसही आता वाढवली जाते, दरारा उत्पन्न करण्यासाठी. दिवाळखोरीची पेरणी करण्यासाठी अशी जमिनीची मशागत केली जाते!

दिवाळखोरीची प्रक्रिया राबविताना अर्धेअधिक उत्पादन व विक्री दाखवली जात नाही. म्हणजे मागणीच नसल्याने उद्योग पुरेसा होत नसल्याची बतावणी करता येते! विविध प्रकारचे खर्च वाढवून दाखविले जातात. प्रवर्तक व त्याचे कुटुंबीय आणि गुन्ह्यातले साथीदार स्वतःसाठी भरपूर पगार घेत राहतात. हे लोक स्वतः चे खाजगी खर्चही उद्योगाच्या माथी मारतात. अर्थात पुन्हा तेच सिस्टीमची भिती नाही आणि कल्पक सल्लागार सोबतीला. दिवाळखोरी सिद्ध करण्यासाठी व पचविण्यासाठी नामांकित वकील लागतात, त्यांच्या फी ची तरतूद, राजकारण्यांचा वाटा, प्रशासकीय अधिकाऱ्यांची लाच, मीडियाला हाताळण्याचा खर्च इ. गोष्टी प्रकल्पाच्या खर्चातच नियोजिलेल्या असतात.

(सामील बँकरचा रतीब टप्प्यानुसार चालू असतोच!)

महत्वाच्या सेवा व यंत्र सामग्री , बांधकाम इ. गोष्टी जवळच्या नातेवाईक - मित्रांच्या कंपन्याद्वारे खरेदिल्या - आयोजिल्या जातात. जुनी यंत्रसामग्री चढेल भावाने आयात केली जाते. (जाणकारांना याबाबतीत इथल्या एका महान कंपनीचा इतिहास माहीत असेलच!) बऱ्याच कंत्राटांमध्ये राजकारणी, भूमीपुत्रांच्या संस्था व सरकारी अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या संस्था सामील असतात. जेवढी दिवाळखोरी मोठी, तेवढा हा लाभधारकांचा ऑक्टोपस मोठा!

बरेच प्रवर्तक स्वतःचं भांडवल "आवश्यक असल्यास कर्ज" म्हणून दाखवतात. म्हणजे दिवाळखोरी जाहीर केल्यानंतर इतर कर्जांसोबत याही भांडवलाची वसुली व्हावी. नुकसान व मोठे खर्च दाखवून केलेली कमाई बेनामी जमीन- जुमल्यात, सोने - हिऱ्यांच्या दागिन्यात, नातेवाईकांच्या उद्योगात वा परदेशी गुंतवली जाते. परदेशी गेलेले हे काळे भांडवल तेथील कंपन्यांद्वारे पुन्हा पांढरे करून स्वदेशी आणले जाते.

आस्तेकदम बँका रूपयात दहा - वीस पैसे वसुली दाखवतात नि मग फाईल बंद केली जाते. "मर्यादितच देणं देण्याच्या" तत्वावर चालणाऱ्या कंपन्यांच्या (limited liability company) प्रवर्तकाकडून कर्जाची वसूली करणे आणखीच अवघड होते. (आमचा दिवाळखोरीबाबतचा नवा कायदा किती प्रभावशाली ठरतो ते पाहुयात.) दिवाळखोर उद्योगपतीची उत्तम जीवनशैली निर्लज्जपणे चालू असतेच. (मानसशास्त्रीय दृष्ट्या किती अवघड काम असतं हे! मध्यमवर्गीय सरळमार्गी उद्योजकांना हे जमणार नाही. तसा डीएनए असावा किंवा बदलावा लागतो. अन्यथा आपल्याच शहरी तुरुंगात रवानगी होते!)

जेवढा समाज ढोंगी तेवढी दिवाळखोरी जास्त. "बिझनेसमें चढाव - उतार होते रहते हैं" असं म्हणत दिवाळखोर उद्योजकांची बायका - मुले या ' गुपचुप ' संपत्तीचा भरपूर आनंद घेत राहतात. सोबतीला देवधर्म - समाजसेवा चालू असतेच. देशभक्ती दाखविणाऱ्या उपक्रमांमध्येही हे पुढं पुढं करतात, आणि हो , भाबड्या मित्रांसमोर या दिवाळखोरांचं रडण्याचं नाटक चालू असतंच ! सहानुभूतीचं कवचही आपल्याकडे आवश्यक असतंच !!

डॉ. गिरीश जाखोटिया

Updated : 1 March 2018 8:39 AM GMT
Next Story
Share it
Top