Home > मॅक्स ब्लॉग्ज > वसुधैव कुटुम्बकमची भूमिका निभावणारा डॉक्टर

वसुधैव कुटुम्बकमची भूमिका निभावणारा डॉक्टर

वसुधैव कुटुम्बकमची भूमिका निभावणारा डॉक्टर
X

कोरोना विषाणू जगभरात थैमान घालत आहे. या विषाणूचा नायनाट करण्यासाठी अद्याप कोणतीही लस, औषध तयार करण्यात आलेलं नाही. अशा या वैश्विक महामारीत जगभराचा या विषाणूशी सुरु असलेला संघर्ष किंवा लढाई कधी संपेल याची कल्पना नाही. मात्र, गेल्या 3 महिन्यांपासून कोरोनाशी लढा देणाऱ्य़ा डॉक्टरांच्या कार्याचा आभार मानण्याचा आजचा दिवस... आज १ जून राष्ट्रीय डॉक्टर दिन.... या दिनानिमित्त जगभरात कोरोनाशी लढा देणाऱ्या डॉक्टरांना एक मानाचा सॅल्युट तो बनता है...

डॉक्टर म्हणजे देवाचे दुसरे रुप असं म्हटलं जात...! एखाद्या गंभीर आजारातून आपले प्राण वाचवणारा आणि मरणाच्या दारातून बाहेर काढणारा एकमेव दुत म्हणजे डॉक्टर. खरं तर डॉक्टर जात, धर्म, पंथ, देश याच्या पलिकडे जाऊन मानवतेची सेवा करत असतात.

जगावर ओढवलेल्या वैश्विक महामारी संदर्भात सर्वात अगोदर स्वत:च्या देशाच्या विरोधात जाऊन सर्व जगाला एका चायनीज डॉक्टरने धोक्याची सूचना दिली. वसुधैव कुटुम्बकमची भूमिका निभावणारा हा चायनीज डॉक्टर म्हणजे ली वेनलियांग...

जगातील अनेक देश कोरोनाच्या काळात स्वत:च्या देशातील नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, डॉक्टर सर्व जगाला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. वसुधैव कुटुम्बकम हे जग एक कुटूंब आहे. आणि या जगाला वाचवण्यासाठी हे डॉक्टर अविरतपणे एकत्र येत करोनाच्या संकटाशी लढत आहे.

कोणत्याही देशामध्ये कुठलंही संशोधन झाल्यास, एखादं मेडिसीन परिणामकारक काम करत असल्यास एकमेकांना कळवत आहेत. देश, धर्म याच्या पलिकडे जाऊन जगाला वाचवण्यासाठी या डॉक्टरांची धडपड सुरु आहे. वसुधैव कुटुम्बकम हा विचार समोर ठेवून ली वेनलियांग याने देखील या व्हायरस पासून जगाला वाचवण्यासाठी सावध केले. यासाठी त्याला चीनी सरकारच्या रोशाला सामोरं जावं लागलं...

कोरोना व्हायरस कसा समजला जगाला?

डॉ. ली वेनलियांग हे चीनमधील वुहान शहरातल्या रुग्णालयात कार्यरत होते. त्यांना डिसेंबर २०१९ ला कोरोना बाबत माहिती मिळाली. वुहान च्या मासळी बाजारात ३० डिसेंबरला सार्स आजाराचे सात रुग्ण आढळले होते. त्या रुग्णांना वेगवेगळ्या रुम मध्ये ठेवण्यात आले होते. या रुग्णांच्या लक्षणांचा अभ्यास करुन डॉ. ली वेनलियांग यांना कोरोना या भयानकरित्या संसर्ग होणाऱ्या विषाणू शोध लागला.

हा विषाणू झपाट्याने पसरत असून लवकरच यावरील खबरदारी घ्यायला हवी असा अहवाल डॉ. वेनलियांग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चीन सरकारला दिला होता. मात्र, या अशा प्रकारच्या अफवा पसरवल्याचा आरोप चीन पोलिसांनी करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. तसेच त्यांना माफी देखील लावण्यास भाग पाडले होते.

फेब्रुवारी २०२० ला करोना विषाणूने डॉ. वेनलियांग यांना आपल्या विळख्यात अडकवलं आणि त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. डॉ. ली वेनलियांग यांनी या महामारीची सूचना देऊनही त्यांना खोटं ठरवलं गेलं. हे आपल्या समाजाचे दुर्देव आहे. त्यांच्या मृत्यूनंतर समाजाला आणि तेथील सरकारला या चुकीची जाणीव झाली.

परंतु डॉ. ली यांच्या सांगण्यानुसार वेळीच काही प्रतिबंधक उपाय केले असते तर आज अख्या जगाला या यातना सहन कराव्या लागल्या नसत्या. आज अख्या जगातील डॉक्टर्स या विषाणूचा सामना करत आहेत. रुग्णांचे प्राण कसे वाचवावे. याचा अभ्यास करुन त्यांच्यावर उपचार करत आहेत. खरंतर ज्यावेळेला एखादा व्यक्ती डॉक्टर बनतो. त्यावेळी त्याचा धर्म एकच रुग्णांची सेवा करणं. जात, धर्म, देश, प्रांत असा विचार बाजूला ठेवून तो रुग्णाला वाचवण्याचा प्रयत्न करतो.

समाजातील प्रत्येक घटकांवर अशी वेळ येते की, कधीतरी जग, देश आणि समाजहितासाठी प्रत्येकाला पुढं यावं लागतं. तेच डॉ. ली यांनी केलं. डॉ. ली मुळेच चीन मधील या व्हायरस ची माहिती सर्व जगाला झाली. चीन आज अडचणीत सापडला आहे. मात्र, डॉ. ली यांनी जेव्हा ही माहिती जगाला सांगितली. तेव्हा त्यांनी आपल्या देशाला याचं किती नुकसान होईल याचा विचार केला नाही. तर त्यांनी जगाचा विचार केला. आपल्याकडे एखाद्या डॉक्टरने असे केले असते तर... तो देशद्रोही ठरला असता..

महाराष्ट्राचे सुपुत्र डॉ. संग्राम पाटील हे सध्या इंग्लंड मधील कोरोनाच्या रुग्णांची सेवा करत आहेत. डॉ. संग्राम पाटील मॅक्समहाराष्ट्राच्या प्रेक्षकांची फेसबूक लाईव्ह द्वारे उत्तर देत असतात. जगामध्ये नवनवीन कोणते संशोधन समोर आले आहेत. याबाबत माहिती देत असतात.

डॉ. संग्राम पाटील इंग्लंडमधील ग्वेनेड हॉस्पिटल मध्ये करोना आयसीयूमध्ये कनंस्ल्टंट म्हणून रुजू आहेत. रुग्णांच्या सेवेसोबत ते आपल्या देशातील लोकांना कोरोना बाबत माहिती देत असतात. करोना व्हायरससंदर्भात सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमांतून जनतेशी संवाद साधून त्यांना माहिती देत असतात.

एकदंरित करोनाच्या संकटाला तुम्ही कसे पाहता तुमचा अनुभव कसा आहे. यावर मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना डॉ. संग्राम पाटील यांनी सांगितले की, वैश्विक महामारी या शब्दातून आपल्याला असे दिसते की महामारीसाठी देश, प्रांत, भाषा हे वेगळे नाहीत. कोरोनाला जात धर्म नाही. याचा पुन्हा प्रत्यय येतो. खरं तर पृथ्वी ही विश्वाचा लहानसा भाग आहे.

कोरोना निमित्ताने साऱ्या पृथ्वीवासीयांना अनेक धडे मिळाले आहेत. हा अनुभव मानवाला नवीन नसला तरी 21 व्या शतकाच्या संदर्भात या महामारीपासून मिळालेले धडे काहीसे नवीन आहेत.

समस्या वैश्विक असल्याने उपाय योजना देखील वैश्विक आहेत. एकीकडे करोना समस्येने मानवाला आपले अस्तित्व टिकवण्याकाठी एका कॉमन शत्रूशी लढण्यास एकत्र आणलंय. दुसरीकडे मानव जमात पुन्हा पूर्वीच्याच चुका करताना दिसते आहे, जसे की सांप्रदायिक, वांशिक, राजकीय आणि आर्थिक रस्सीखेच मानवाने सुरूच ठेवलीय. तेव्हा करोनापासून काय धडा घ्यावा हा आपापल्या विवेकावर अवलंबून आहे.

असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. मात्र, आजच्या डॉक्टर दिनाच्या निमित्ताने इथल्या सर्व जनतेने ज्या पद्धतीने वैश्विक स्तरावरील सर्व डॉक्टर कोरोनाशी लढा देत आहेत. त्याच पद्धतीने आपण सर्वांनी एकत्र येत कोरोनाशी आणि कोरोना सारख्या प्रवृत्तीच्या विरोधात दोन हात करायला हवे. अन्यथा डॉ. ली सारख्या विश्वाचा विचार करणाऱ्या डॉक्टरांचे बलिदान वाया जाईल...

Updated : 1 July 2020 1:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top