Home > News Update > उतरता आलेख...!

उतरता आलेख...!

उतरता आलेख...!
X

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे माझे खूप आवडते नेते होते. अगदी त्यांनी गुपचूप शपथविधी केला तेव्हाही मी त्यांचा खूप मोठा समर्थक होतो. कुणालाही खबरबात न लागता जेव्हा त्यांनी अजित पवारांशी संधान साधत सकाळीच शपथविधी उरकला. त्यादिवशी मी फडणवीस यांच्या बुध्दीचातुर्याची स्तूती करताना लिहिलेली पोस्ट अशी होती...

"शांत डोक्याने घेतलेले निर्णय कधीही चूकत नाहीत"

मला फडणवीस यांनी घेतलेला तो निर्णय अतिशय विचारपूर्वक आणि थंड डोक्याने विचार करून घेतलेला वाटला होता. अर्थातच तो निर्णय त्यांच्याच पायावर धोंडा मारून घेणारा ठरला. हे वेगळं सांगायला नको.

खरंतर फडणवीस यांना 2014 पासून पाहत आलोय. तरूण तडफदार आणि प्रत्येक मुद्द्याचे उत्तर मुद्देसुद आणि विचारपूर्वक देणारा अभ्यासू नेता अशी त्यांची ओळख. बोलण्यात पटाईत असल्याने माध्यमांच्या तर ते गळ्यातील ताईत. महाराष्ट्रचे भावी मुख्यमंत्री हेच असावे. हे तेव्हाच मनोमन वाटायचं. झालंही अगदी तसंच. शिवसेनेच्या साथीनं भाजपने सरकार स्थापन करून देवेंद्र फडणीस यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची दिली. मराठा समाजाचे वर्चस्व असलेल्या महाराष्ट्राला ब्राम्हण मुख्यमंत्री देण्याची हिंमत दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या रूपाने दाखवली होती. तीच हिंमत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवत फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली.

पाच वर्षाच्या काळात फडणवीस यांनी काहीच केलं नाही. असं त्यांचे विरोधकही म्हणणार नाहीत. अनेक चांगल्या योजना त्यांनी पारदर्शक पणे राबवल्या. फडणवीस चुकले कुठे? याचं जर विश्लेषण करायच झालं तर माझ्या मते, केंद्रात ज्याप्रमाणे मोदी म्हणतील तीच पूर्वदिशा असते. तसेच महाराष्ट्राचे मोदी आपण व्हावे. हा हव्यास त्यांना महागात पडला असावा.

भाजपातील आपल्याच सहकार्यांचे पाय खेचण्याचे उद्योग फडणवीस अतिशय चाणाक्षपणे करत राहिले. कदाचित अभ्यासू नेता ही मीडियाने रंगवलेली छबी त्यांना चाणाक्ष नेता होण्यासाठी प्रवृत्त करणारी ठरली असावी. पण फडणवीस ज्या गोष्टीला चाणाक्षपणा समजत होते. तो त्यांचा गैरसमज होता.

एखाद्याचे महत्व, पत कमी करून कोणालाच मोठं होता येत नाही. हे फडणवीस विसरले. सत्तेच्या खूर्चीची उबच अशी असते की, भलेभले तिच्या मोहात अडकतात. त्याला फडणवीस अपवाद ठरतील. असं वाटलं होतं. पण इथेही अपेक्षाभंग झाला.

पाच वर्षात एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे हे आणि यांसारख्या असंख्या प्याद्यांचे पंख छाटण्याचे पुरेपुर प्रयत्न फडणवीस यांनी केले. आणि यालाच ते आपली हुशारी समजू लागले. खरंतरं मिडीयानेही तसंच प्रोजेक्ट केलं.

2019 च्या विधानसभा निवडणूकीआधी कांग्रेस राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याला आपला पक्ष सत्तेत येईल. याचं स्वप्नही पडू नये एव्हढी वाताहत झाली होती. हे दोन्ही पक्ष शिल्लकच राहतील की नाही. हाच अनेकांपुढील प्रश्न होता. पण काळाची चक्रे फिरली. भाजपा एकहाती सत्ता स्थापन करेल. शिवसेनेची गरजही भासणार नाही. असं वाटत असताना कॉग्रेस राष्ट्रवादीने पक्षापेक्षा खूपच चांगली कामगिरी केली. शरद पवारांचा झुंजार प्रचार लक्षवेधी ठरला. अन् त्यानंतर झालेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडी तर आपल्यासमोरच आहेत.

या सर्व घडामोडी घडल्यानंतर महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत असणारे (निदान माध्यमं तरी तसं भासवत होती) फडणवीस हल्ली ट्रोल का होतात..? हा प्रश्न पडणं सहाजिक आहे. खरंतर जेव्हा फडणवीस यांनी अजित पवार यांच्या साथीने नवा संसार थाटण्याचा जो अनैतिक प्रकार केला. तोच फडणवीस यांच्या चढत्या कारकिर्दीला लागलेला काळा डाग ठरला. असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यानंतर कोरोना सारख्या संकटाच्या काळात फडणवीस यांच्यासारखा परिपक्व नेता इतकी कुत्सित भुमीका (महाराष्ट्राला न करता केंद्राला मदत) घेऊ शकतो. यांचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

पाच वर्ष शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर अत्यंत गलिच्छ भाषेत ट्रोल गॅग कडून हल्ले होत असताना त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणारे फडणवीस जेव्हा स्वतः ट्रोल होतात. तेव्हा ते ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करावी. यासाठी Commissioner of police भेट घेतात. तेव्हाच नवल वाटतं.

फडणवीस अभ्यासू नेते आहेत. चाणाक्ष बुध्दीचे आहेत. हे सर्वांना मान्य आहेच. फक्त त्यांनी त्यांच्या बुध्दीमत्तेचा वापर फक्त स्वतःच्या, परिवाराच्या (अमृता वहिनी) फायद्यासाठी किंवा इतरांचे पाय खेचण्यासाठी करू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचे मोदींचा जी हूजूरी त्यांनी जरूर करावी. (उपकाराची परतफेड) पण महाराष्ट्राला डावलून किंवा महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावून नाही. तर मराठी बाणा जपत.

सध्या फडणीस यांच्या केविलवाण्या अवस्थेची कीव येतंय म्हणून हा लेखन प्रपंच. खूप लांबलय पण वाचणारे वाचतील.

नारायण काळे

Updated : 5 May 2020 2:30 AM GMT
Next Story
Share it
Top