Home > मॅक्स ब्लॉग्ज > पंकजा ला पुन्हा शह!

पंकजा ला पुन्हा शह!

पंकजा ला पुन्हा शह!
X

भाजपने राज्यात 21 नोव्हेबरला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करताना धक्का तंत्राचा वापर करत खडसे, तावडे, पंकजा मुंडे, बावनकुळे यासारख्या दिग्गज आणि निष्ठावंतांचा पत्ता कट केला आणि वंचित बहुजन आघाडीमधून आलेल्या गोपिचंद पडळकर आणि राष्ट्रवादीतून आलेल्या रणजित सिंह मोहिते पाटील यांना संधी दिली. तसंच राज्याला फारसे परिचित नसलेले आणि गडकरी यांचे निकटवर्तीय प्रविण दटके यांना उमेदवारी दिली. मात्र, डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी देताना हातचा राखत वेगळा डाव खेळला.

पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले रमेश कराड यांचा डमी असलेला अर्ज पक्षाने अचानक अधिकृत केला का? की यामागे अगोदरच राज्यातील भाजपच्या नेत्यांनी काही प्लानिंग केलं होतं. राज्यातील भाजप नेतृत्वाने भाजपवर वंजारी समाजाचा रोष होऊ नये. म्हणून रमेश कराड यांना उमेदवारी दिली का? की पंकजा यांच्या सांगण्यावरुनच रमेश कराड यांना उमेदवारी देण्यात आली असं भासवण्याचा प्रयत्न केला जातो आहे का? जर हे सर्व पुर्वनियोजित होतं तर पंकजा यांनी स्वत:च्या उमेदवारीची तयारी का केली? हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

त्यामुळं शह-कटशह यांच्या राजकारणात आज रमेश कराड यांची विधानपरिषदेवर निवड करुन राज्यातील भाजप नेतृत्वाने पंकजा मुंडे यांना मात दिली आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

या संदर्भात साम टीव्हीचे संपादक निलेश खरे यांच्याशी आम्ही बातचित केली असता, त्यांनी हा फक्त पंकजा मुंडे यांना शह आहे असं म्हणता येणार नाही. जे जे पक्षनेतृत्वाचं ऐकणार नाही. त्यांच्यासाठी हा शह आहे. मग ते खडसे, तावडे किंवा बावनकुळे असो. त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. थोडक्यात केंद्रीय अथवा राज्यातील नेतृत्वाला जे जे चॅलेंज देतील त्यांना घरी बसवलं जाईल. पक्ष नेतृत्वाचं ऐका अन्यथा त्यांचा अडवाणी केला जाईल... असा संदेश या निमित्ताने पक्षानं दिला आहे.

अशी प्रतिक्रिया निलेश खरे यांना मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना दिली आहे.

आम्ही काही बीड जिल्ह्यातील स्थानिक पत्रकारांशी देखील चर्चा केली. बीड मधील स्थानिक ‘प्रजापत्र’ या वृत्तपत्राचे संपादक संजय मालानी यांच्याशी जेव्हा आम्ही या संदर्भात बातचित केली. तेव्हा त्यांनी हे पक्षाअंतर्गत राजकीय कटकारस्थान असल्याचं सांगितलं. बहुजनाचे नेत्यांना डावलण्याचा हा प्रयत्न आहे. हा कट रमेश कराड यांचा नसून हा भाजपच्याच पक्षातील नेत्यांनी केलेला राजकीय कट आहे. असं त्यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितलं.

लोकसत्ता या वृत्तपत्राचे बीड जिल्ह्याचे प्रतिनिधी वसंत मुंडे यांनी या संदर्भात बोलताना म्हणाले, की गेली 5 वर्ष पंकजा मुंडे यांना पक्षानं संधी दिली होती. त्या संधीचं पंकजा यांना सोनं करता आलं नाही. विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला. या पराभवाचं खापर पक्षाच्याच काही नेत्यांनं वर फोडले. त्यामुळे पक्षनेतृत्वाची नाराजी वाढली. परिणामी पंकजा मुंडेंनी विधान परिषदेचे लढवली. मात्र, मुंडे समर्थकांचा रोष कमी करण्यासाठी भाजपने रमेश कराड यांना तिकिट दिलं असल्याचं स्पष्ट होतं. एकंदरीत अलिकडे पंकजा यांचं पक्षातील वजन कमी झाल्याचं दिसून येतं. कारण एकेकाळी ज्या रमेश कराड यांनी पंकजा यांच्या सांगण्यावरुन राष्ट्रवादीची विधानपरिषदेची उमेदवारी मिळवूनही निवडणूकीतून माघार घेतली होती. आज त्याच रमेश कराड यांना पंकजा मुंडे यांना डावलून भाजपने उमेदवारी दिली आहे.

एकंदरीत वरील प्रतिक्रियांचा विचार करता पंकजा मुंडे यांची ताकद कमी केली जात आहे का? केली जात असेल तर का? या संदर्भात मागील काही घटनांचा आढावा घेतला तर आपल्या काही बाबी लक्षात येतात.

पंकजा यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न...?

पंकजा यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न वारंवार केला जात असल्याचं स्वत: त्यांनी बोलून दाखवलेले आहे. मग ती भगवान गडावरील सभा असो की, त्यांचे राजकीय विरोधक धनंजय मुंडे यांना तत्कालीन राज्याच्या नेतृत्वाकडून पुरवली गेलेली रसद असो. पंकजा मुंडे यांनी या संदर्भात गोपिनाथ गडावरील भाषणात स्पष्टपणे याचा उल्लेख केला आहे.

मुख्यमंत्री पद आणि देवेंद्र फडणवीस...

राजकारणात कोणतीही गोष्ट उगाच घडत नाही. भाजपच्या ज्या ज्या लोकांनी आपण मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहोत. किंवा ज्यांनी मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अथवा गडकरी गटातून देवेंद्र फडणवीस यांना शह देण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला. त्यांना भाजपमध्ये सध्यातरी अडगळीत पडण्याची वेळ आली आहे. त्यामध्ये खडसे, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं आहे.

एकंदरीत केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील भाजपच्या इतर नेत्यांना देवेंद्र फडणवीस हेच भविष्यात तुमचे नेते असतील हा मेसेज द्यायचा आहे.तसा त्यांनी तो दिला आहे. त्यामुळं भविष्यातही जे जे फडणवीस यांना शह देण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यासोबत असंच होईल. असा संदेश आत्ताच्या घडामोडीतून तरी दिसून येतो.

Updated : 13 May 2020 8:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top