Home > मॅक्स ब्लॉग्ज > "जोहार माय-बाप जोहार......"

"जोहार माय-बाप जोहार......"

जोहार माय-बाप जोहार......
X

(कमरेवर हात ठेऊन उभारेललं तुझं रूप बघितलं की तू आमच्याकडे येणाऱ्या संकटांसमोर भिंत बनून उभा आहेस वाटायचं पण या वर्षी तू संकटाकडे नाहीतर भक्तांकडे पाठ फिरवलीयस...तू आमच्याच भेटीसाठी "युगे अठ्ठावीस" उभा आहेस हे आता आम्ही कसं सांगायच रे.... माय बापा..

श्वासात खंड पाडला रे.... तू काळ्या....श्वासात खंड..!!)

12 जून 2020, पहाटचे 5 वाजले तरीही डोक्यातले विचार थांबत नव्हते. कसाबसा उठलो आवरलं आणि देहूच्या दिशेने प्रवास सुरु झाला, हा तुकोबांच्या पालखी प्रस्थानाचा दिवस, एरव्ही या दिवशी पिंपरी ते देहू दरम्यानचे रस्तेच नाहीतर चराचर टाळ मृदुगांच्या तालावर हरिनामाच्या गजरात तल्लीन झाल्याचं बघायला मिळायचं यंदा मात्र फक्त शांतता होती, मनाला सतत बोचणारी शांतता....!!!

देहूत दाखल होताच सकाळी 8:30 ला LIVE लिंक देण्यासाठी उभा राहिलो, उपस्थितांच्या भावना जाणून घेत असतानाच माझी नजर बंद असलेल्या महाद्वारावर खिळली आणि देहूत दाखल होण्या आधीच्या एका रात्रीपासून धरून ठेवलेला धीर सुटला... शब्द अडखळले, मी गहिवरलो.. तेव्हा माझा कापरा झालेला आवाज स्टुडिओत असलेल्या अँकर मनालीच्या Manali Pawar (manali gaikwad) लक्षात आला असावं तिने लगेचच मला सावरलं live संपलं, पालखी प्रस्थान सोहळा पार पडला, आम्ही घरी परतलो पण मला त्या दिवशी हंबरडा फोडता आला नाही..

दुसऱ्या दिवशीही अशीच अवस्था, 13 जून 2020 हा माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस ,"आळंदिला देवाची आळंदी का म्हणायचं याचा प्रत्यय या दिवशी येतो..."

मात्र त्या दिवशी, माऊलींच्या दारातून वाहणारी "इंद्रायणी" आपल्या पात्रातून पाणी नाहीतर लाखो वारक-याचं अश्रु वाहुन नेतीय असा भास होत होता...!!!

घाटावरच्या त्या परिस्थितीचा आढावा घेऊन मंदिर परिसरात प्रवेश केला, 4 वाजता माऊलींची पालखी प्रस्थान ठेवणार होती, माझे डोळे मंदिराच्या कळसाकडे लागले, कारण कळस हालला की पालखी गाभाऱ्यातून बाहेर येते असा समज आहे, मंदिराच्या प्रांगणात शेकडो वारकरी हरिनामाचा गजर करतात त्यावेळी कळसच काय तर मंदिराची वीट न् वीट हलत असते कारण तो क्षण... निर्जीव सजीव होण्याचा क्षण असतो ...

या वर्षी मात्र हा क्षण अनुभवता आला नाही, मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर पडलेल्या पादुकांची प्रदक्षिणा झाली,

त्या विसावल्या, सोहळा पार पडला पण तरीही माझे डोळे काहीतरी शोधत होते... कान अतृप्त होते, मन, मेंदू आणि मुद्रा खिन्न पडले होतें... एखाद्या देहाची अशी अवस्था एकतर मरणासन्न असतांना होते किंवा तुम्ही ज्यांना भेटायला गेले त्याची अर्धवट भेट झाल्यामुळे होते.. मी त्या दिवशी मरणासन्नही होतो आणि अतृप्तही ..!!

ख्यातनाम फोटोग्राफर देवदत्त Devdattaa Kashalikar ने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेली माझी ती स्तब्ध अवस्था बघतांना एकीकडे मी बैचेन होतो.... कारण अशी अवस्था करून घेण्यापलीकडे माझ्याकडे त्या देवाला देण्यासारखं काहीच राहिलेलं नाही आणि कधीच नव्हतं याची सतत जाणीव होतीय...

Dehu on foot, carrying the Palkhi of Saint Tukaram blog by Govind Wakade

पादुका प्रस्थान सोहळ्याचा हा अनुभव आयुष्यातलं नैराश्य वाढविण्यासाठी पुरेषा होता मात्र, पंढरपूरकडे दोन्ही पादुका एकत्रित प्रस्थान ठेवतील तेव्हा दोन्हीही पादुकांच दर्शन घेऊन मनाला पुन्हा उभारी येईल अस वाटायचं शेवटी तेही घडलं नाही आणि आता तर साक्षात भगवंत जरी अवतरला तरीही दोन्ही पालखी सोहळे एकत्रित जाणार नाहीत ह्या आणखी एका नैराश्याने आयुष्यात भर घातलीय...

आज 1 जुलै 2020 आषाढी एकादशी...हा चैतन्याचा दिवस, संतांच्या भूमीवर घडणाऱ्या देव भेटीचा दिवस,

काय बहरत नाही या दिवशी म्हणून सांगू... अख्खी सृष्टी हिरावा शालू पांघरून नटलेली असते, आकाशातील ढग ताल धरत अगणित आकार बदलण्याच्या शर्यतीतून सुर्या पुढे नाचत नाचत पृथ्वीवर छाया धरतात, सूर्य किरण हळूच आपल्या सप्त रंगांची उधळण करत भु-वैकुंठात येणाऱ्या भक्तांच्या स्वागतासाठी इंद्रधनुषी कमान तयार करतात, वरूणराजा आनंदाची वृष्टी करतो आणि माणुसकीचे-संस्काराचे बीज पुन्हा या मातीत रोवले जातात

मात्र यंदा सगळं बंदिस्त झालं... घोडे, पताकाधारी, अब्दागिरी, करना, टाळ-मृदुगांच्या तालावर लाखो वारक-यां सोबत, फुलांनी सजलेल्या रथातून जाणाऱ्या माझ्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराजाला आणि जगद्गुरू तुकोबांना बस मधून बंदिस्त प्रवास करावा लागला.

कुठल्या तरी मानवरुपी राक्षसांनी त्यांच्या मर्यादा ओलांडल्या आणि जन्माला घातलेल्या कोरोनामुळे ही वेळ आली..

खरतर एव्हढे वर्ष त्या मानवापर्यंत संत विचार पोहचविण्यात आम्हीच कमी पडलो.. विश्व कल्याणाच मागणे मागणाऱ्या माऊलींचं पसायदान विसरून आम्ही स्वतःचा साधलेला स्वार्थ आज आमच्या पथ्यावर पडला

आपल्यामुळे इतरांचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून निर्गुण वारी करा असे सल्ले दिल्या गेले, संतांच्या अभंगाचे प्रमाण दिले गेले हे सगळं मनाला मुरड घालण्यासाठी ठीक होतं.पण देवभेटीचा सोहळा प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवता येत नसेल तर ते कायमचे बंद झालेले बरे अस वाटतंय...

बा-विठ्ठला....अशी वेळ पुन्हा आणु नको दोन्ही कान पकडून गिरक्या मारत जोहार मागतो खरंच अशी वेळ पुन्हा येऊ देऊ नको

"जोहार माय-बाप जोहारं......"

उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन ।

रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन ।

-गोविंद अ. वाकडे

Updated : 1 July 2020 10:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top