Home > मॅक्स ब्लॉग्ज > जेव्हा मी रमाबाईतून हाथरस पाहते...

जेव्हा मी रमाबाईतून हाथरस पाहते...

जेव्हा मी रमाबाईतून हाथरस पाहते...
X

आमच्या रमाबाई मध्ये सुशांत सिंह राजपूत च्या आत्महत्येची चर्चा नाही... तर हाथरसच्या मनिषा वाल्मिकीची चर्चा आहे. अर्णब गोस्वामी नावाचा पत्रकार गळा काढून मोठ मोठ्यानं ओरडत असताना मुंबईतील रमाबाई मध्ये उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील बलात्कार पीडितेची चर्चा सुरु आहे. तुम्हाला ते जरा ऑड वाटत असेल ना? तसं तर अशा चर्चा माझ्या बालपणापासूनच मी ऐकत आले आहे.

रमाबाई आंबेडकर हत्याकांड ते आत्ता दोन वर्षापुर्वी झालेली कोरेगाव भिमा येथील दंगल असो. रमाबाईत दलित अत्याचाराबाबत नेहमी चर्चा होत असते. आपण काहीतरी करायला हवं. असं समाज नेहमी बोलत असतो. मात्र, काय करायला हवं? कॅंडल मार्च की निषेध सभा की, मशाल यात्रा... हे करुन काय होणार?

हाथसरमध्ये 19 वर्षीय तरुणीचा बलात्कार होतो. याची बातमी कोणत्या स्थानिक वृत्तपत्रात देखील छापून येत नाही. तिची मृत्यूशी झुंज सुरु असताना देखील कोणताही मीडिया आवाज काढत नाही. दुर्दैवाने तिची मृत्यूशी झुंज संपते आणि तिचा मृत्यू होतो. त्यानंतर माध्यमांना थोडी जाग येते. मात्र, तेव्हा सगळं काही संपलेलं असतं. हे फक्त दलित समाजाबाबतच का घडतं? हा राहून राहून पडणारा प्रश्न प्रत्येक दलित समाजाला काट्यासारख्या बोचत राहतो.

ज्या पद्धतीने एका बलात्कार पीडित मृत तरुणीवर तिच्या पालकांना न सांगता... अंत्यसंस्कार केले जातात... अगदीच त्या पद्धतीने पोलिस इतर जातींमध्ये करु शकतात का? योगी सरकारची इतर जातींसोबत असं करण्याची हिम्मत होऊ शकते का?

तसं तर उत्तर प्रदेश ची कमान एका योगी व्यक्तीच्या हातात आहे. मात्र, बलात्कार पीडितेला मरनानंतरही यातना भोगाव्या लागल्या... कवी सुरेंद्र शर्मा म्हणतात...

कोई फर्क नहीं पड़ता इस देश में राजा कौरव

हो या पांडव

जनता तो बेचारी द्रौपदी है

कौरव राजा हुए तो चीर हरण के काम आयेगी

और पांडव राजा हुए तो जुए में हार दी जाएगी।

त्यामुळे मुख्यमंत्री योगी असो अथवा दुसरं कोणी काही फरक पडत नाही... दलितांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आहे तसाच आहे...

‘महारडे, दलित, नीच’ जातीचे असं म्हणून जे सतत हिणवलं जातं. ते थांबणार आहे का? आणि भविष्यातही चित्र बदलेलं याची खात्री नाही. मी जेव्हा माझ्या आजुबाजूला घडणाऱ्या दलित अत्याचाराच्या घटना पाहते. त्या संदर्भात चर्चा ऐकते. तेव्हा त्या सर्व घटना मला हाथरसच वाटतात...

मुंबईतील दलितांची वस्ती म्हणून ओळख असलेल्या माता रमाबाई आंबेडकर नगर मध्ये 25 तारखेला दिपाली बुकाणे नावाची 23 वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता होते. तीन दिवसांनी तिचा मृतदेह एका गल्लीतल्या गटारात सापडतो... आणि तिचा मृत्यू गटारात पडून झाल्याचे तोंडी वृत्त सगळीकडे पसरवलं जातं. या घटनेनं रमाबाई परिसरातील घरा-घरात नेहमीप्रमाणे अनेक प्रश्नांचा कल्लोळ सुरु होतो. पण प्रत्यक्षात काय घडलं, कसं घडलं? याची कुणीही वाच्यता करताना दिसत नाही. एकाही माध्यमांना ही बातमी महत्त्वाची वाटली नाही. एक घटना घडली आणि त्या घटनेची पोस्टरबाजी करुन श्रद्धांजली वाहणं एवढचं आपलं काम आहे का? दलित समाजातील मुली मुली नाहीत का?

आज काल वृत्तपत्राची आतली पान पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की..

‘दलित महिलेवर अत्याचार’ पोलिसांची तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ...

दलितांवर अत्याचार आरोपी अजुनही मोकाटच...

नवीन गाडी घेतल्याचा मनात राग आला म्हणून दलिताला मारहाण...

पेपर मधील आतल्या पानावर असलेल्या या बातम्या पहिल्या पेजवर का येत नाही? पेपरच्या आतल्या पानात आलेल्या या बातम्या पाहिल्यानंतर कशाची जाणीव होते. या सगळ्या घटना मला हाथरसच वाटतात.

माजला काय रे?

जास्त शहाणे झाले काय रे?

लै माज चढला वाटतं...

ही सर्व गरळ ओकून बोलणाऱ्याचं पोट भरत का?

हे शब्द ग्रामीण भागातील दलितांना अजुनही ऐकावेच लागतात... हे सगळं सहन करण्यापलिकडे दलित बांधवाना कोणता पर्याय आहे का? हे फक्त दलितांसोबतच का होतं? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेत दलितांवर अत्याचार केल्यास सवर्णांना सुट देण्यात आली आहे का?

या घटनेनं देशामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र या असंतोषातून दलित समाजाला कधीच न्याय मिळू शकला नाही. ज्या पद्धतीने हाथरस येथील तरुणीला जीवंतपणी न्याय मिळाला नाही. त्याच पद्धतीने अशा अनेक घटना आहेत... ज्या हाथरस प्रमाणे मानवी संवेदना बोथट झाल्याचं उदाहरण सांगतात....

खैरलांजी: दलित कुटुंबातील चौघांची अमानुष हत्या

29 सप्टेंबर 2006 ला भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातल्या खैरलांजी गावात भोतमांगे यांच्या कुटुंबातील चौघांची अमानुष हत्या झाली होती. या हत्याकांडाचे पडसाद विधिमंडळापासून संसदेपर्यंत उमटले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेण्यात आली. घटनेनंतर राज्यभर आंदोलनांचे लोण उसळले होते. घटनेनंतर सुमारे सात महिन्यांनी दाखल झालेल्या आणि पंधरा महिने चाललेल्या खटल्याचा निकाल 15 सप्टेंबर 2008 रोजी लागला. न्यायालयाने आठ आरोपींना दोषी ठरवले.

खैरलांजी गावात घडलेल्या या हत्याकांड प्रकरणाला गेल्या 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या या प्रकरणात एका दलित कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती (सुरेखा भोतमांगे, प्रियांका भोतमांगे, रोशन भोतमांगे आणि सुधीर भोतमांगे) सुरेखा यांचे पती म्हणजेत प्रियंका आणि रोशन, सुधीर यांचे वडील भैय्यालाल भोतमांगे हे एकटे या हत्याकांडातून बचावले होते. हत्येपूर्वी दोन पीडितांवर सामुहिक बलात्कार झाल्याचेही समोर आले होते.

या हत्याकांड प्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने सहा आरोपींना फाशी आणि दोघांना जन्मठेप सुनावली होती. मात्र, हायकोर्टात या निर्णयात बदल झाला. हायकोर्टाने फाशी रद्द करत सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली होती. सध्या या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

मात्र, या सर्व हत्याकांडातून वाचलेले, आणि या सर्व प्रकरणात न्याय मिळावा म्हणून सतत प्रयत्न करणारे भैयालाल भोतमांगे यांचा 2017 लाच ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्या आप्तजनांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फासावर लटकलेलं त्यांना पाहायचं होतं. मात्र, आपल्या न्यायव्यवस्थेचा वेग इतका कमी आहे की, पुढची तारीख येईपर्यंत आयुष्य संपुन जातं. त्यातच दलित केस असेल तर विचारायलाच नको…

एकंदरित गेल्या काही वर्षात शिरसगाव, खैरलांजी, सोनई, खर्डा, नामांतर दंगल, कोरेगाव भीमा दंगल अशा अनेक घटनेमध्ये दलित समाजावर अन्याय झाला. किती प्रकरणात न्याय मिळाला? दलितांसाठी विशेष कायदे करण्यात आले आहेत. मात्र, जे कायदे समाजाला न्याय मिळून देत नाही. ते कायदे काय कामाचे?

त्याचा उपयोग काय?

जोपर्यंत कायदा आपलं काम करत नाही. तोपर्यंत मला रमाबाईतून बाहेर पाहताना कधी खर्डा दिसते तर कधी खैरलांजी... आणि आता हाथसर!

गावाची नाव बदलत जातात. समाजमन सुन्न करणाऱ्या दलित अत्याचारांच्या घटना देशाच्या कानाकोपऱ्यात घडतच राहतात. रमाबाईच्या बाहेर डोकावताना या वेदना मनाला एकच प्रश्न विचारतात... दलित असणं गुन्हा आहे का?

प्रियंका आव्हाड

Updated : 3 Oct 2020 1:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top