Home > मॅक्स ब्लॉग्ज > शापित 'गंधर्व'

शापित 'गंधर्व'

शापित गंधर्व
X

आज बालगंधर्वांचा स्मृतीदिन...हा दिवस नाट्यक्षेत्रात मोठा साजरा केला जातोय........आणि हा माणूस पोटाची खळगी भरायला... कुटुंबाचा गाडा हकायला... ही चहाची टपरी रंगवत बसलाय... दोन पैसे मिळाले तर आजचा दिवस तरी पार पडेल या विवंचनेत....तुम्ही ओळखता का या फोटोतील माणसाला....नसाल ओळखत कारण या माणसाची ओळख कधी समाजा पुढे आलीच नाही....हे आहेत प्रसाद दुर्गाराम खेडेकर...बालगंधर्वांचे सख्खे नातू ....हो बरोबर वाचलात तुम्ही....

नारायण श्रीपाद राजहंस यांच्या सख्या मुलीचा मुलगा....आश्चर्य वाटले ना....आणि मनात प्रश्न ही आला असेल अरे बालगंधर्वांचा नातू आणि हे असले काम का करतोय...

नारायण श्रीपाद राजहंस यांनी नाट्यसंगीतात स्त्री वेशाची भूमिका पार पाडून त्याकाळी मराठी मनावर राज्य केलं किंबहुना आज ही करतायत.....लोकमान्य टिळकांनी नारायण श्रीपाद राजहंस याना बालगंधर्व ही पदवी दिली आणि पुढे ते याच नावाने ओळखले जाऊ लागले....

बालगंधर्वाना नलिनी आणि पद्मावती या दोन मुली.....नलिनी वाभळे या पुण्यात स्थायिक झाल्या तर पद्मावती या लग्नानंतर दुर्गाराम खेडेकर यांच्या बरोबर कोल्हापुरात संसारात रमल्या...कोल्हापुरात सीबीएस स्टँड वर प्रभात रॉयल टॉकीज चे मालक रुईकर यांच्या चाळीत... आता सध्या या चाळीच्या जागेवर रेव्यलुशन नावाची मोठी कमर्शियल बिल्डिंग उभी आहे थ्री लिव्हज् हॉटेल आहे ना तीच बिल्डिंग...संसाराच्या खेळात दुर्गारामांच्या अर्धवट साथी नंतरही न खचता पदामावती बाईनी आपला संसाराचा गाडा मुलांच्या शिकवण्या घेऊन पुढे रेमटायला सुरवात केली....त्यामुळं या भागात त्या बाई म्हणूनच परिचित होत्या....बाई अगदी दिसायला बालगंधर्वांच्या सारख्याच ...स्त्री वेशातील बालगंधर्वांच्या ऐवजी बाई ना उभे केले तर कोणी ओळखुच शकणार नाही इतकं कमालीचं साधर्म्य ...स्वच्छ पांढरी अंग झाकून नेसलेली नऊवारी साडी, स्पष्ट आणि खणखणीत आवाजात बोलणं याच बरोबर दैवी देणगीत मिळालेला गोड गळा आणि बापाकडून मिळालेला गायकीचा वारसा ....बाई रोज न चुकता संध्याकाळी रियाज करायच्या आणि पेटी तर अप्रतिम वाजवायच्या.....त्यांचा रियाज ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो.....काही वर्षां पूर्वी बालगंधर्व यांच्या स्मरणार्थ मोठा कार्यक्रम घेतला पुण्यात..आणि बालगंधर्वांच्या वारसांचा सन्मान करण्याचे ठरवले पण बाई ना मात्र डावलले ..अगदी भांडून बाई नि आपला हक्क मिळवला....त्याच पद्मावती बाईचा हा मुलगा प्रसाद...आम्ही मित्रमंडळी त्यांना बंडा म्हणूनच हाक मारतो...शिक्षण असून ही बंडाला नोकरी मिळाली नाही ...शेवटी साधा सरळ मार्गी जगणारा कधी ही कोणाला न दुखावणारा बंडा बिल्डिंग रंगवण्याचं काम करू लागला

आईना मिळालेली कलाकारांच्या तुटपुंज्या रकमेची पेन्शन हाच घराचा मुख्य आधार होता पण आई गेल्या आणि ते ही बंद झालं आता वयाचं भान राखत जमेल तसं बंडा संसार चालवण्याचा प्रयत्न करतोय ...बिल्डिंग,घरं रंगवत जगण्याचा प्रयत्न करतोय पण आता ही कामं हळूहळू मिळेनात....मग अशी छोटी मोठी कामं करण्याशिवाय बंडा कडे उतार वयात पर्यायच उरला नाही...बालगंधर्वांचा चित्रपट आला त्यावेळी निर्मात्यांनी बालगंधर्वांची सगळी माहिती बंडा कडून घेतली आणि जाताना चित्रपट प्रदर्शन झाल्यावर भरगोस मदत करु असं आश्वासन दिलं..चित्रपट रिलीज झाला बॉक्स ऑफिस वर तुफान चाललाही पण परत बंडा कडे कोणीच फिरकले नाही.ना शासनाने बघितलं ना बालगंधर्वांच्या नावावर बक्कळ पैसा मिळवणार्यांनी बघितलं...

बालगंधर्वांच्या या वंशाला मात्र हातावरच पोट संभाळण्या साठी शापित गंधर्वाच आयुष्य जगावं लागतंय...हे दुर्दैव....

Updated : 15 July 2019 8:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top