Home > मॅक्स ब्लॉग्ज > सांस्कृतिक राजकारणः महाराष्ट्र आणि तमिळनाडू

सांस्कृतिक राजकारणः महाराष्ट्र आणि तमिळनाडू

सांस्कृतिक राजकारणः महाराष्ट्र आणि तमिळनाडू
X

सुजय डहाके यांनी महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजकारणाचा विषय ऐरणीवर आणला आहे. मराठी सिनेमातील बहुसंख्य अभिनेत्री ब्राह्मण आहेत. या आशयाच्या त्यांच्या विधानामुळे समाजमाध्यमांवर घमासांग चर्चा सुरू आहे. याआधीही मराठी सिनेमातील पाटील या पात्राच्या चित्रणाविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. परंतु मराठी विचारविश्वात सांस्कृतिक राजकारणाबाबत उदासीनता आहे. या संदर्भात तमिळनाडू राज्यातील सांस्कृतिक राजकारणाचा आढावा उद्बोधक ठरेल.

तमिळनाडू राज्याचं अधिकृत राज्यगीत आहे. प्रत्येक सरकारी कार्यक्रमात ते म्हटलं जातं. समुद्राने वेढलेल्या भारतभूमीवर दख्खन ही भिवई आहे आणि तिच्यावरील तिलक म्हणजे द्रविडभूमी आहे, असं तमिळनाडूचं वर्णन या गीतात आहे. आजचा आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक आणि केरळ यांचाही समावेश द्रविड भूमीत करण्यात आलाय. तमिळ ही केवळ भाषा नाही. ती एक देवी आहे आणि तिची पूजा केली जाते. संस्कृतप्रमाणे तमिळ ही मृत भाषा नाही तर जिवंत सळसळती भाषा आहे, असंही त्या गीतात म्हटलंय. संस्कृत आणि ब्राह्मण्य यांचा निषेध तमिळनाडूच्या राज्यगीतातच करण्यात आलाय.

पेरियार (महात्मा) रामस्वामी नायकर यांनी १९२५ साली सुरु केलेल्या आत्मसन्मान आंदोलनात या राज्यगीताची मुळं आहेत. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरांना समान प्रतिष्ठा मिळायला हवी. ही या आंदोलनाची प्रमुख मागणी होती. मात्र, ही केवळ राजकीय चळवळ नव्हती. तिचे सांस्कृतिक पदर अधिक बळकट होते आणि त्याचं श्रेय पेरियार यांना जातं.

या काळात मद्रास प्रेसिडेन्सीमधील ब्राह्मणेतरांमध्ये अभिजन वर्ग निर्माण होऊ लागला होता. मुदलियार, नाडर, नायडू, चेट्टीयार, नायर, नंबियार यासारख्या शेतकरी आणि व्यापारी जाती आत्मसन्मान आंदोलनाच्या पाठिशी उभ्या राहात होत्या. राष्ट्रीय स्वातंत्र्याचं आंदोलनही आकार घेत होतं. स्वातंत्र्य केवळ ब्राह्मणांनाच नाही तर ब्राह्मणेतरांनाही हवं आहे, अशी या आंदोलनाची धारणा होती. भारतातील ब्रिटीश राजवटीला आमचा पाठिंबा आहे असा ठरावच जस्टीस पार्टीने केला होता. या सुमारास अनी बेझंट यांनी होमरुल लीगची (वसाहतीचं स्वातंत्र्य) मागणी केली होती. या मागणीतून देशामध्ये ब्राह्मणशाही अवतरेल म्हणून तमिळनाडूतील ब्राह्मणेतर पुढार्‍यांनी या मागणीला विरोध केला. अनी बेझंट आयरीश ब्राह्मण आहेत. अशी टीका या काळात त्यांनी केली. या ब्राह्मणेतर पुढारी आदि द्रविडांच्या (दलित वा पूर्वास्पृश्य) आत्मसन्मानाची बूज राखत नाहीत ही तक्रार होतीच. म्हणून तर एम. सी. राजा (गांधी-आंबेडकर यांच्यातील येरवडा करारावर एम. सी. राजा आणि पी. बाळू यांनी काँग्रेस वा गांधीजी यांचे प्रतिनिधी म्हणून सह्या केल्या) यांनी जस्टीस पार्टीचा राजीनामा दिला होता.

पेरियार रामस्वामी नायकर यांनाही या अंतर्विरोधाची कल्पना होती. मात्र त्यांच्यावर १९१७ च्या रशियन राज्यक्रांतीचा खोल परिणाम झाला होता. ते स्वतःला बोल्शेविक म्हणू लागले होते. त्यामुळे सोशल जस्टीस पार्टीच्या ब्राह्मण विरोधी जाहीरनाम्यात वैज्ञानिक विचारपद्धतीचा पुरस्कार करण्यात आला, सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांचा बीमोड करण्याची भूमिका मांडण्यात आली. स्त्रीमुक्तीचा समावेश करण्यात आला. १९४४ साली रामस्वामी नायकर यांनी जस्टीस पार्टीचं रुपांतर द्रविड संघात केलं. उत्तरेच्या म्हणजे गंगा-यमुना खोर्‍यातील हिंदी म्हणजे ब्राह्मण राष्ट्रवादाच्या विरोधात द्रविड वा तमिळ राष्ट्रवादाची पायाभरणी करण्यात आली.

या राष्ट्रवादाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी लोककलावंतांची प्रशिक्षण शिबिरं घेण्यात आली. लोकनाट्यांद्वारे हा राजकीय विचार समाजाच्या कानाकोपर्‍यात पोहोचवणारे लोकनाट्यांचे गट तयार झाले. अण्णा दुराई हे नाटककार आणि अभिनेते या आंदोलनातून पुढे आले. त्यांची भाषा आणि संवादांची फेक यामुळे ते तमिळनाडूतील बहुजनांमध्ये कमालीचे लोकप्रिय झाले. राजकीय विचारधारा समाजात रुजवायची असेल तर त्यासाठी सिनेमा हे माध्यम वापरायला हवं हे पेरियार यांनी अचूक हेरलं.

लोकनाट्यांच्या यशाच्या जोरावर द्रविड आंदोलनाने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. पेरियार यांच्या अनुयायांनी गावोगावी सिनेमाची थिएटरं उभारण्यात आणि सिनेमा निर्मितीमध्ये भांडवल गुंतवणूक केली. १९४९ मध्ये अण्णा दुराई यांनी द्रविड मुनेत्र कळघम ची स्थापना केली. आणि सिनेमे काढायला सुरुवात केली. १९४८ ते १९५७ या काळातील द्रविड म्हणजे तमिळ सिनेमांमध्ये लंबेचवडे संवाद, स्वगतं असायची. अण्णा दुराई आणि एम. के. करुणानिधी हे पटकथा आणि संवाद लिहायचे.

शिवाजी गणेशन, एन. एस. कृष्णन, एस. एस. राजेंद्र, के. आर. रामसामी हे लोकप्रिय कलावंत या चित्रपटांमध्ये नायकांची भूमिका करायचे. तमिळनाडूमध्ये त्यावेळी काँग्रेस सरकार होतं. या सरकारच्या विरोधातला जहाल ब्राह्मण विरोध या सिनेमांमध्ये ठासून भरलेला होता. हा तमिळ सिनेमाचा पहिला टप्पा होता. त्यानंतरच्या टप्प्यात एम. जी. रामचंद्रन हा नायक तमिळ सिनेमात लोकप्रिय झाला. एम. जी. आर. यांची मातृभाषा मल्याळम होती. पण त्यांना तमिळ जनतेने डोक्यावर घेतलं. तोपावेतो द्रविड मुनेत्र कळघम (द्रमुक) निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याची तयारी करू लागला.

त्यामुळे देव आणि धर्म विरोधाचा म्हणजे नास्तिकतेचा आग्रह सौम्य झाला. रॉबर्ट एल. हार्डग्रेव यांनी त्यांच्या ग्रंथात नोंदवलं आहे की एमजीआर दक्षिण भारतातील गरीबांचे आशास्थान बनले होते. त्यांनी अनेक अनाथ मुलांचं पालकत्व घेतलं. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये एमजीआर सढळ हस्ताने मदत करत. शाळा, अनाथालयं यांना ते देणग्या देत असत.

मद्रासमधील झोपडपट्टीला आग लागली त्यावेळी एमजीआर यांनी त्या काळात एक लाख रुपयांची मदत गोरगरीबांना केली होती. अण्णा दुराई म्हणायचे, प्रचारसभेला एमजीआर यांनी व्यासपीठावर हजेरी लावली की चाळीस हजार मतांची बेगमी होते आणि त्यांनी भाषण केलं तर चार लाख मतं मिळतात. एमजीआर हे अण्णा दुराई यांच्या गळ्यातले ताईत होते. म्हणून तर अण्णा दुराई यांच्या निधनानंतर एमजीआर यांनी अण्णा द्रविड मुनेत्र कळहम या नावाचा पक्ष काढला. त्याच पक्षाचं नामकरण पुढे ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळहम (एआयएडिएमके) असं करण्यात आलं. १९७७ साली एमजीआर तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले.

एमजीआर यांनी सर्वहारांच्या भूमिका आपल्या चित्रपटांमधून साकारल्या. तमिळ चित्रपटांचा पुढचा टप्पा एमजीआर यांच्या कारकिर्दीत सुरू झाला. पटकथा, संगीत, चित्रण यामध्ये खास तमिळ शैलीचा विकास त्यातून होऊ लागला. एनटी रामाराव असो की अन्य तेलुगू सिनेमांवर हा प्रभाव स्पष्टपणे दिसतो.

एमजीआर यांनी साकारलेल्या सर्व भूमिका रजनीकांत या महानायकानेही केल्या आहेत. एमजीआर यांच्याप्रमाणेच त्याने सिनेमातील आपल्या प्रतिमेचं ब्रँडिंग केलं नाही. एमजीआर, जे. जयललिता, रजनीकांत वा कमल्हासन कोणत्याही उत्पादनाच्या जाहिरातीत क्वचितच दिसतील. किंबहुना नाहीच. कारण आपला सिनेमा हे राजकारण आहे याची सुस्पष्ट जाण त्यांना आहे. त्यामुळे सिनेमातली आपली प्रतिमा गोरगरीबांचा पक्ष घेणारी, जनतेच्या कल्याणाचीच असेल याची ते काळजी घेतात. कबाली या चित्रपटात रजनीकांत, एमजीआर यांच्या एक पाऊल पुढे जातो. या चित्रपटात रजनीकांत एका पूर्वास्पृश्याची भूमिका करतो. या पूर्वास्पृश्याला मलेशियातील तमिळ आपला नेता म्हणून स्वीकारतात. तमिळ चित्रपट हा द्रविड राजकारणाचा वाहक नाही तर चित्रपट हेच राजकारण आहे. याची सुस्पष्ट जाण प्रत्येक तमिळ नायकाला आहे. त्यामुळे ब्राह्मणविरोध (कितीका सौम्य असेना), तमिळ राष्ट्रवादाचा पुरस्कार, आर्य संस्कृतीपेक्षा द्रविड संस्कृती श्रेष्ठ आहे, गोरगरीबांची कैवारी आहे. या बाबी हे महानायक अधोरेखित करत असतात.

द्रविड संस्कृतीचं राजकारण द्रविड वा तमिळ चित्रपटांमध्ये आहे. म्हणूनच तिथे नटांचे फॅन क्लब हे राजकीय संघटन असतं. हे फॅन क्लब केवळ चित्रपटांचे प्रेक्षक वाढावेत म्हणून नाहीत तर राजकीय, सांस्कृतिक उद्दिष्टांसाठी आहेत. तमिळ वा द्रविड सिनेमाची अशी धारणा आहे की त्यांचा सिनेमा वैश्विक आहे. करुणानिधी असोत की जयललिता यांनी प्रसारमाध्यमांमध्ये—सुरुवातीला नियतकालिकं नंतर सिनेमा निर्मिती त्यानंतर उपग्रह दूरचित्रवाणी कंपन्या त्यानंतर मोबाईल फोन कंपन्यांमध्ये प्रचंड गुंतवणूक केली. त्यासाठी आपल्या राजकीय सत्तेचाही वापर केला. तमिळ सिनेमासृष्टीत आपल्याला ऑस्कर पुरस्कार का मिळत नाही. याची चर्चा अपवादानेच होते. कारण आपला सिनेमा हे सांस्कृतिक राजकारण आहे, त्यातून भरपूर उत्पन्नही मिळतं याची निश्चिंती त्यांना आहे.

मराठी प्रसारमाध्यमांमध्ये अब्राह्मणांनी गुंतवणूक केलेली नाही. महाराष्ट्र असो की बंगाल वा हिंदी भाषिक प्रदेश इथे सांस्कृतिक राजकारण नहीं के बराबर आहे. त्यांच्या निर्मितीमध्ये—सिनेमा असो की उपग्रह वाहिन्या, यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक मारवाडी वा विदेशी गुंतवणुकदारांची आहे. त्यामुळे या सर्व भाषकांना ग्लोबल होण्याचे, ऑस्कर पुरस्काराचे डोहाळे लागलेले असतात. असा न्यूनगंड तमिळ सिनेमामध्ये नाही. तिथे नायक वा नायिका ब्राह्मण आहेत की, अब्राह्मण असा वाद नाही. कारण सिनेमा असो की दूरचित्रवाणी वाहिन्या वा मोबाईल फोन कंपन्या यांची सूत्रं ब्राह्मणेतर तमिळींच्य हाती आहेत.

महाराष्ट्राला द्रविड संस्कृतीपेक्षा आर्य संस्कृतीचं आकर्षण आहे. त्यानुसार मराठी लोकांची अभिरुची घडवली जाते. त्यामध्ये प्रसारमाध्यमांचे मालकी हक्क महत्वाची भूमिका निभावतात. द्रविड संस्कृतीची टिंगल-टवाळी करण्यात मराठी प्रसारमाध्यमं धन्यता मानतात.

महाराष्ट्रातील ब्राह्मणेतरांना केवळ राजकीय सत्ता हाती ठेवण्यात रस आहे. सांस्कृतिक राजकारणाबाबत ते उदासीन आहेत. सांस्कृतिक राजकारणाची सूत्रं ब्राह्मणांच्या हाती ठेवण्यात आपले हितसंबंध आहेत अशी त्यांची प्रामाणिक धारणा आहे. महाराष्ट्रातील सहकार महर्षी, शिक्षण महर्षी यांनी प्रसारमाध्यमांमध्ये, मनोरंजनाच्या बाजारपेठेत फारशी गुंतवणूक केलेली नाही. ज्यांनी केली त्यांनी ब्राह्मण वर्चस्वाला मान्यता दिली. म्हणून तर कुसुमाग्रजांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

महाराष्ट्रातील सत्ताधारी ब्राह्मणेतर असतीलही परंतु सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी ब्राह्मणांचं वर्चस्व मान्य केलं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात आपल्या पक्षातर्फे कोणा ब्राह्मणाचा समावेश होऊ नये एवढीच खबरदारी ते घेतात. सांस्कृतिक राजकारणाबाबत आपण बेपर्वा आहोत. याची त्यांना जाणीवही नसते. त्यामुळे सुजय डहाके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर केवळ ब्राह्मण-ब्राह्मणेतर याच परिप्रेक्ष्यात चर्चा झडते. सांस्कृतिक राजकारणापर्यंत ही चर्चा पोचणार नाही याची काळजी घेतली जाते, तीही अनावधनाने.

Updated : 8 March 2020 4:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top