Home > मॅक्स ब्लॉग्ज > कठीण समय येता...

कठीण समय येता...

कठीण समय येता...
X

करोनाच्या निमित्ताने कट्टर भाजपाईंनी हिंदूमुस्लिम वाद उकरून काढला आणि कट्टर मुस्लिमांनी त्याला खतपाणी घातले ही भारतातील मोदीयुगाचीच स्पष्ट परिणती आहे.

दिल्लीतील तबलिघी जमातच्या इज्तेमाला परवानगी नाकारणे आवश्यक होते. पण इकडे आदित्यनाथ रामनवमी करणारच म्हणून उड्या मारत होते. त्यामुळे परवानग्या नाकारण्यात समान नियम लागू करावा लागू नये. म्हणून ही परवानगी दिली की काय? असा प्रश्न आहे. महाराष्ट्रात अशी परवानगी थेट नाकारण्यात आली होती. हे उदाहरण आहे. पण मोदींच्या देशभर पसरलेल्या टोळीला गर्दीचे कार्यक्रम एकंदरीतच प्रिय आहेत हे लपलेले नाही.

लॉकडाऊन आवश्यक होता, पण त्याचे नियोजन अत्यावश्यक होते. टाळीप्रिय पंतप्रधानांनी जे काही केले. ते टाळ्या मिळवण्यापुरतेच केले हे आता स्पष्ट होते आहे. मंदिरेही बंद करण्यात उशीर लावण्यात धर्मवेडी हिंदू प्रजा जबाबदार होती. आणि तबलिघी जमात सारख्या संघटनेच्या धुरीणांनीही बेजबाबदार वर्तन केलेच.

आता तबलिघी काय आहे. वगैरे चर्चा जोरात रंगत आहेत. त्यांच्यात दहशतवाद्यांना आश्रय दिला जातो. या टोकापासून पासून ते अतिशय पुरोगामी आहेत. या टोकापर्यंत चर्चा आंदोलत आहेत.

मी कालच म्हटले- आम्ही सांस्कृतिक संघटना आहोत, आम्ही राजकीय नाही. हे तबलिघी जमातीचे म्हणणे कुठेतरी ऐकल्यासारखे वाटते. होय- अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणेच हे बोलणे आहे. धर्माभोवती गरगरणाऱ्या साऱ्याच संघटनांचे हेच आहे. रोमन कॅथलिक चर्चसुद्धा आम्ही राजकीय नाही, धार्मिक सांस्कृतिक उन्नयनासाठी काम करतो म्हणत दुनियाभरातील सर्व राजकीय खेळांत, कारवायांत भाग घेत आले आहे. सगळे एकाच माळेचे वर्ख उडालेले मणी आहेत.

धर्म ही गोष्टच कालबाह्य झाली आहे. हे आपल्याला रुचत नसले तरीही पचवावे लागेल. कारण अनेक रोगांतून बरे होण्यासाठी अफूची गोळी नव्हे कडू औषधाचीच गोळी खावी लागते.

आपल्याकडचे हिंदुत्ववादी, मागास मनोवृत्तीचे, साक्षर मूर्ख परवापासून टुणटुण उड्या मारत आहेत. त्यांचा रोख असा की बघा. हे पुरोगामी मुसलमानांची बाजू घेत होते, त्यांचे कसे तोंड फुटले. या उड्या त्यांच्या मठ्ठपणाला साजेशाच आहेत. पुरोगामी, विवेकी विचारसरणीचे आम्ही लोक कुठल्याच धर्माच्या मठ्ठपणाचे समर्थन करीत नाही.

धर्मश्रेष्ठत्वाच्या मस्तीत माणसे मारण्याचा, छळण्याचा निषेध करतो. उद्या कुठल्या इस्लामी देशात मठ्ठ हिंदुत्ववाद्यांना किंवा मठ्ठ ख्रिश्चनांना छळायच्या, कापायच्या, पेटवायच्या, गोळ्या मारायच्या किंवा त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार करण्याच्या घटना घडल्या तरीही पुरोगामी विवेकी त्यांचाही निषेधच करतील. कारण मठ्ठ असली तरीही ती माणसे आहेत. आणि सर्वप्रथम माणुसकीला काळीमा लागू नये हेच ध्येय बाळगले पाहिजे.

रस्त्यावर आलेल्या रोजंदारीच्या मजुरांमध्येही बुद्धीचा वापर न करणारी, मागास मनोवृत्तीची, विविध धर्मपंथांची माणसे असतीलच. पण त्याबाबतची चर्चा, जोवर त्यांची भूक भागत नाही, निवारा मिळत नाही तोवर गैर आहे. तबलिघींच्या वैचारिक जाळ्यात अडकलेली अनेक ‘माणसे’ केवळ मुसलमान आहेत म्हणून मारून टाकायची, त्यांना गोळ्या घालायची आवाहनं करायची, केवळ त्यांच्याच मुळे देशात करोना पसरला असा कांगावा करायचा हे दुष्प्रवृत्तांचेच काम आहे. त्यांचा वैयक्तिक धर्म आधीच चिखलात रुतला आहे.

देशात गेल्या दोन महिन्यांत पंधरा लाख माणसे विदेशांहून आपापल्या घरी आली. करोनाचा सुप्ततेचा काळ चौदा ते अठ्ठावीस दिवसांचा आहे, कदाचित अधिकही असू शकेल. या काळात कित्येक गर्दीचे कार्यक्रम झाले. कुठल्याही धर्माच्या साक्षात्कारी पुरुषाला किंवा स्त्रीला असले संकट येणार याची आगाऊ वर्दी मिळाली नव्हती. सारेच लोक निःशंकपणे आपापले ठरलेले कार्यक्रम पार पाडत होते. त्यातच डोलांड ट्रम्पच्या स्वागताचाही कार्यक्रम झाला. दिल्ली पेटली, दंगल झाली तीही त्याच दिवसांत. निदर्शनेही झाली त्याच काळात. विषाणू विविध रुपात होते. करोनाचा विषाणू वुहानमधून जगात पसरत चालला होता. पण फेब्रुवारी महिन्यापर्यंत सारेच बेसावध होतो. याच हेतुपुरस्सर काहीही नव्हते.

जानेवारी फेब्रुवारी महिन्यांत अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा विद्यापीठांत होत असतात. देशभरातील अनेक विद्यापीठांतून असे पाहुणे आले, मग पर्यटनासाठी फिरले हे घडले आहे. हे सत्र मार्च महिन्याच्या पूर्वार्धापर्यंत सुरू होते. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा कुठे माग लागणार आहे? संसर्ग तेव्हाही झालेला असू शकतो. किंवा नसू शकतो. साराच जुगार.

तेव्हा घरी बसून काही नाही जमत तर द्वेषाची पेरणी करणारे फॉर्वर्ड्स टाकणे बंद करा. जमेल तितकी आर्थिक मदत गरजूंना करा. आपल्या संबंधात असलेल्या गरीब घरकामगारांना किंवा कुणालाही मदत करा. अनेक मिरवसोस नसलेले कार्यकर्ते प्रत्यक्ष मदतवाटपात उतरले आहेत. मानवी नीतीमूल्यांचे संरक्षण खऱ्या अर्थाने हेच लोक करीत आहेत. ते कुठल्याही धर्माचे असतील, मनातून देवभोळे, धर्मभोळेही असतील, अविवेकीही असतील- पण तेच महत्त्वाचे आहेत.

केरळ, महाराष्ट्र आणि इतरही काही राज्ये या संकटाशी लढताना या गोष्टींकडे लक्षही न देता ‘आत्ता काय करायला हवं‘ एवढाच विचार घेऊन राबत आहेत. सुधीरचौधरी, अर्णब गोस्वामीच्या पंथांतल्या लोकांना केराच्या टोपलीत टाकल्यासारखे दुर्लक्ष करा. आणि पुढे चला. दिवे लावणारे नेतृत्व असले तरीही तुम्हाआम्हाला जगायचं आहे, जगवायचं आहे.

Updated : 5 April 2020 5:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top