Home > News Update > कोविड १९ आणि स्ट्रोक पेशंट

कोविड १९ आणि स्ट्रोक पेशंट

कोविड १९ आणि स्ट्रोक पेशंट
X

कोविड १९ विषाणूने सगळ्यांना लॉकडाऊन करून टाकले आहे. ह्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू केला आहे. या तिसर्या टप्प्यात अनेक कामांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे काहीशा प्रमाणात दैनंदिन कामे सुरू ठेवण्यास दिलासा मिळाला आहे. समाजातील सर्वच घटकांना याचा जबरदस्त फटका बसला आहे. अनेक हॉस्पिटल, छोटे क्लिनिक बंद असल्यामुळे जनसामान्याचे हाल होत आहे. राज्य सरकार, लोक प्रतिनिधी यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे की, डॉक्टरांनी त्यांचे क्लिनिक सुरू करावे.

कोविड १९ च्या विषाणूमुळे सर्वच प्रकारच्या रोगांच्या उपचार लाबंणीवर पडली आहेत. लॉकडाऊन असल्यामुळे ग्रामीण भागातील लोक शहरात येऊन उपचार घेऊन शकत नाहीये. परिणामी अंगावर दुखणं काढण किंवा जी तात्पुरती सोय उपलब्ध आहे, जे औषधी सुरू आहेत त्याचे पुढे घेणे सुरू ठेवले आहेत. याचा परिणाम हा स्ट्रोक / पॅरालिसिस किंवा अर्धांगवायुच्या पेशंटवर होताना दिसून येत आहे.

स्ट्रोकचे पेशंट आधीच आपल्या शरीराचा एक भाग किंवा बाजू निकामी झाल्यामुळे त्रस्त असतात. काहीजण पूर्णपणे अंथरुणावर पडून असतात. त्याची काळजी घेण्यासाठी कुटुंबातील एक व्यक्ति पुर्णपणे गुंतलेला असतो. अर्थात या कामाची जबाबदारी ही स्त्रीचीच आहे हे अलिखित नियम समजून गृहीत धरले जाते. लॉकडाऊनपूर्वी हे पेशंट नियमित तपासणीसाठी आणणे, त्याचे बीपी, शुगर वेळोवेळी चेक केले जाणे, स्ट्रोकच्या उपचाराचा फॉलोअप केला जात होता. पण लॉकडाऊन हे पेशंट पूर्णपणे घरात बंदिस्त झाले आहेत. त्यामुळे शरीराला फारशी हालचाल नाही. ज्यांना फेशियल पाल्सी आहे त्यांना त्याचे म्हणणे व्यक्त करण्यासाठी बोलण्यात अडथळे येतात. ब्रेन स्ट्रोकच्या पेशंटला बोलण्यासाठी शब्द सुचत नाही. काही वेळेला एक गोष्ट बोलायची असते पण दुसरीच बोलली जाते. ह्या काळात ज्येष्ठांचे घरात अपघात होण्याचे प्रमाणही समोर येत आहे. आधीच स्ट्रोकसारख्या आजाराने त्रस्त असताना शरीराचा तोल जाऊन पडल्यामुळे हाड मोडण्याचे प्रमाण वाढले आहे असे अनेक डॉक्टर मित्रांनी सांगितले आहे.

कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही आशा केंद्राच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम करत आहे. गेल्या चाळीस वर्षात ब्रेन स्ट्रोक (पक्षाघात / अर्धांग वायु / ब्रेन अटॅक ) आणि आरोग्य म्हणून पाहिल्यास ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. स्रोेनक आजाराच्या बाबतीत लोकांना पुरेशी माहिती नसल्यामुळे उपचारासाठी उशीर होतो. स्ट्रोकचे रुग्ण आशा केंद्रात उपचारासाठी येतात तेव्हा बराच उशीर झालेला असतो. गेल्या दहा वर्षापूर्वीची स्थिती पाहिली तर उपचारासाठी येणार्यास रुग्णांमध्ये साधरणपणे 55-60च्या वयोगटातील व्यक्तीचा समावेश असायचा. अलीकडच्या काळात युवकांचे आणि स्त्रियांचे प्रमाणही वाढलेले दिसून येते. कुटुंबात एका व्यक्तीला आजार झाला तर संपूर्ण घर आजारी पडते असे दिसून येते. जेव्हा ब्रेन स्ट्रोक सारखा आजार होतो तेव्हा रुग्णाचे नातेवाईक अजून हतबल, निराश झालेले दिसून येतात. यातून जर रुग्ण महिला असेल तर परिस्थिती अधिकच गंभीर होते.

बहुतांश वेळा ब्रेनस्ट्रोकची लक्षणे समजत नाही. त्यामुळे उपचार मिळण्यासाठी विलंब होतो. जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार भारतात हृदय रोग, कॅन्सर नंतर ब्रेन स्ट्रोक हा सर्वात गंभीर आजार आहे. यामुळे अनेक रुग्ण वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याचे आरोग्य अधिक जटील बनते तर काही रुग्ण अकाली आपला प्राणही गमवतात.

आशा केंद्रात जेव्हा स्ट्रोकच्या रुग्णांशी बोलतो तेव्हा 90 % लोकांना लक्षणेच माहीत नसतात. नेहमी प्रमाणे व्हायरल इन्फेकशन किंवा तत्सम आजार आहे असे वाटते. परिणामी योग्य उपचार मिळत नाही. काही वेळेला जनरल डॉक्टरकडे उपचार केला जातो.

जेव्हा रुग्णामध्ये गंभीर परिणाम दिसू लागतात तेव्हा उपचारासाठी धावपळ सुरू होते. स्ट्रोक हा गंभीर आजार आहे. हा आजार कोणालाही, कोणत्याही वयात आणि केव्हाही होऊ शकतो. मात्र मेंदुमधील कोणत्या भागात गाठ झाली आहे यावरून लक्षणांमध्ये फरक असू शकतो. त्यामुळे अनेकदा स्ट्रोक झाल्याचे लवकर लक्षात येत नाही. शरीरात मेंदू अनेक प्रकारच्या क्रिया करत असतो. हालचाल, संवादातील समन्वय, शरीराअंतर्गत अवयवातील समन्वय यापैकी एक किंवा अनेक क्रियावर स्ट्रोकमुळे परिणाम होऊ शकतो.

काहीवेळा हातापायातील त्राण जाणे किंवा लुळे पडणे, बोलतांना अडखळणे, चालताना तोल जाणे, चेहरा एका बाजूला पडणे, अचानक डोळ्यासमोर काही न दिसणे अशी लक्षणे दिसू शकतात. याबाबत आकडेवारीमध्ये प्रमाण पहायचे झाले तर भारतामध्ये दर तीन मिनिटाला 1 व्यक्ती स्ट्रोकची बळी पडते तर जागतिक स्तरावर दर सहा पैकी एक व्यक्ति या आजाराने ग्रस्त आहे. वास्तविक पाहता स्ट्रोक हा सर्वसाधारणपणे उतारवयात होण्याची शक्यता अधिक असते. हल्ली मात्र तरुण वयातही स्ट्रोक येण्याचं प्रमाण वाढलं आहे.

जंक फूड, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, उच्च कोलेस्ट्रॉल, धुम्रपान, मद्यसेवन आणि तणाव, वेळी अवेळी जागरण या कारणांमुळे स्ट्रोक येण्याची शक्यता वाढत आहे. स्ट्रोक आजाराची लक्षणे ही सर्वसामान्य आजारासारखी दिसून येत नाही. जर कधी रुग्णाने सांगितले की, मला काही दिसत नाही किंवा खूप डोक दुखत तर रूग्णाला डोखेदुखीवरील गोळी किंवा चष्म्याचा नंबर बदला असेल असे सांगितले जाते. परिणामी या आजारावर वेळेत उपचार न केल्यास कायम स्वरूपी अपंगत्व येऊ शकते.

स्ट्रोकचा झटका आल्यावर पहिले तीन ते चार तास अत्यंत महत्वाचे असतात. स्ट्रोकचा हा गोल्डन अवर असतो. या आजाराचे आशा केंद्रात प्रत्येक बॅच (उपचार कोर्स ) किमान 200 रुग्ण उपचारासाठी अॅडमिट होतात. मात्र यातील एखादाच रुग्ण हा स्ट्रोक अॅ टॅक आल्यानंतर पहिल्या तीन तासात रुग्णालयात पोहोचतो. या काळात मेंदूमधील गाठ विरघळण्यासाठी योग्य औषधांचा वापर केला गेला तर बहुतांश रुग्णांमधील मेंदूचे कार्य 24 तासात सुरळीत होऊ शकते.

सध्या लॉकडाऊन वाढला आहे.

जिल्ह्याच्या सीमाबंदी आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. त्यामुळे ह्या पेशंटला त्याची ट्रिटमेंट ज्या डॉक्टरकडे सुरू आहे तिकडे जाण्यासाठी अडचणीचे होऊन बसले आहे. ग्रामीण भागात ज्यांना हा आजार नुकताच समोर आला आहे त्यांना वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासही अडचण निर्माण होत आहे. परिणामी उपचाराला विलंब आणि बळावणारे आजारपणाचे प्रमाण वाढत आहे. अशा पेशंटसाठी शासनाने किमान सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जिल्ह्याच्या बाहेरही तातडीने सुरू करणे गरजेचे आहे.

ग्रामीण व शहरातील गरीब लोकांसाठी खासगी वाहन करून पेशंटला दवाखान्यात घेऊन जाण्याचा खर्च परवडणारा नाहीये. स्ट्रोक सारख्या आजाराचे निदान होण्यासाठी कराव्या लागणार्याज टेस्टचा खर्चही मोठा आहे. त्यामुळे कोविड १९ लॉकडाऊन काळात शासनाने स्ट्रोक आणि अन्य आजारांच्या संदर्भात मार्गदर्शक सूचनासोबत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थचे सूचना पत्रकही जाहीर करणे गरजेचे आहे.

सुरेश शेळके

(लेखक हे कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टचे, कार्यकारी विश्वस्त विश्वस्त असून आशा केंद्र हे अर्धांगवायूचे पर्यायी उपचार केंद्र मागील ३६ वर्षापासून चालवतात.)

Updated : 6 May 2020 5:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top