कोरोनाची महामारी…सर्वत्र स्मशान शांतता आणि मी

दुपारी एक वाजण्याची वेळ. नेहमीप्रमाणे बटन स्टार्ट करून गाडी सुरू केली. तोंडाला रूमाल, खिशात सॅनिटायझर आणि मनात भितीचे काहूर घेऊन ऑफिसची वाट धरली. येरवडा जेलसमोरून जाताना स्मशान शांतता आणि गर्द झाडांची सावली होती. इतर वेळी नेहमी कैद्यांना भेटणारे नातेवाईक रस्त्याच्या पलिकडील बाजूस बसलेले चित्र असते. आज त्या पैकी काहीही दिसत नव्हते. रस्त्यावरील अंतर कापत पुढे जाऊ लागलो. रस्त्यावरून जातात तोंडाला बांधलेल्या रुमालाची कानाजवळ होणारी फडफड अन होता तो फक्‍त माझ्या गाडीचा आवाज. हा आवाज परिसराची शांतता भंग करत होता. एरव्ही नियमित सवयीचे झालेले हॉर्न, इतर वाहनांचे आवाज, माणसांचे आवाज, किलबिलाट असले काहीही कानावर येत नव्हते. मी, माझी गाडी आणि मनातील धाकधुक सुरू होती.

खडकी बाजारपेठ तशी मोठीच. इथे बस थांबा, कपड्यांपासून सर्व वस्तू बर्‍यापैकी स्वस्त दरात मिळणारी बाजारपेठ. नेहमी माणसांची गर्दी, वाहतुक कोंडी, रिक्षा चालकांकडून गिर्‍हाईक मिळविण्यासाठी चाललेली धडपड असे चित्र येथे असते. हे सर्व मनातल्या मनात चित्रण उभे करून मी पुढे जात होतो. कारण आज पहिल्यांदा ही बाजारपेठ अगदी शांत झालेली पहायला मिळाली.

जुन्या पुणे मुंबई महामार्गावर गेल्यानंतर पिंपरी पर्यंतचा प्रवास प्रश्‍नांनी धुमाकुळ घातलेला होता. माणूस समाजशील प्राणी असल्याचे शाळेच्या अभ्यासात शिकलेलो. ते प्रत्यक्षात अनुभवत होतो. माणूस समाजात नसेल तर जगूच शकणार नाही असे चित्र आहे. रस्त्यावर कोणीच नसताना केवळ एकटेच असलो तर नेमके जगणार कसे? सतत मित्र, नातेवाईक, प्रिय व्यक्‍ती, नोकरीसाठीच्या धडपडीत जगणारा माणूस एकट्यात नेमका कसा जगेल? आपल्याला अडचण आलीच तर मदत कोण करणार, अशा अनेक प्रश्‍नांनी मन विषण्ण होत होते. सर्वांमध्ये असताना मानसिक चढ उतारातून आलेला एकटेपणा भयानक वाटतो. मात्र प्रत्यक्ष काही गोष्टींमुळे रस्त्यावर एकही माणूस नसणे, घरे-दारे बंद असणे, माणसांचा आवाजच न येणे अशा परिस्थिती केवळ आपणच रस्त्यावरून जाताना आलेला एकटेपणा तर फार भयानक. तो अनुभवतही होतो. सर्व चौक, कार्यालये, बस, चहाच्या व पानटपर्‍या, अगदी सर्वच बंद होते. मध्येच एखादा माणूस दिसत होता. त्यावेळी हायसे वाटत होते. अर्ध्या तासाच्या या एकारेपणानंतर ऑफिस मध्ये पोचलो आणि मोठा ऊसासा घेतला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जनता कर्फ्युला सगळ्या देशासह पुणे आणि पिंपरी-चिंचवडने दिलेला प्रतिसाद आणि आलेला हा अनुभव आगळावेगळा होता.

– प्रदीप लोखंडे, रिपोर्टर, दै. पुढारी, पुणे.