Home > मॅक्स ब्लॉग्ज > "येड्यांची मोजदाद"

"येड्यांची मोजदाद"

येड्यांची मोजदाद
X

टाळ्या आणि थाळ्या वाजवून, देशात दिवे बंद करुन केंद्र सरकार येड्याची मोजदाद करत आहे का? संकटाच्या काळातही मोदीइमेज मेकिंग, प्रचार, प्रसार, प्रोपोगंडा कसा राबवत आहेत वाचा Adv. विवेक ठाकरे यांचा लेख "येड्यांची मोजदाद"

एकदा अकबर बादशाह बिरबलाला विचारतो, "आपल्या देशात येडे किती आहेत?" बिरबलच तो..!! थोडा वेळ विचार करतो आणि सांगतो, "महाराज, आपण एक इव्हेंट करूयात... तसेही देशातील जनता सध्या घराघरात निवांत बसलेली आहे. त्यांच्यासाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवायची स्पर्धा ठेवू ... जितकी जास्त लोक टाळ्या आणि थाळ्या वाजवतील तितकी देशातील येड्यांची संख्या आपण समजायची.... अकबर बादशाहला आयडिया जबरदस्त आवडली.... झाले ... आदेश सुटले... "या दिवशी या - या वेळी देशात सगळ्यांनी घराघरात टाळ्या व थाळ्या वाजवायच्या आणि सेलिब्रेशन करायचे...."

राजाज्ञाच ती...!! आणि देशातील जनताही एकदम साधी, सरळ आणि देवभोळी...!! बादशहाने सांगितलेय म्हणजे खरोखरच जनतेच्या आणि देशाच्या कल्याणासाठीच ते असेल अशी जनतेची ठाम समजूत..!! देशाच्या कल्याणासाठी घराघरात जोरजोरात टाळ्या - थाळ्या वाजवल्या गेल्या... रस्त्या - रस्त्यावर थाळ्या, डब्बे व ढोल वाजवत लोक बेभान होऊन नाचू लागले... इव्हेंट मोठा जबरदस्त झाला.. देशाचे हित साधल्याचे एक जबरदस्त समाधानही जनतेच्या चेहऱ्यावर दाटले....

इकडे बादशाह आणि बिरबल मात्र, ऐका वेगळ्याच टेंशनमध्ये आले... इतके करूनही देशात येडे किती आहेत. याची निश्चित संख्या सांगता येत नव्हती... सगळेच रस्त्यावर बेभान होऊन नाचायला लागल्याने त्यांची मोजदाद करणेही शक्य झाले नाही… अकबर बादशाह मनोमन दुःखी झाले.. काय करावे त्यांना सुचेना.. त्यांनी पुन्हा बिरबलाला विचारले, "बिरबला, तुझी आयडिया चांगली होती, जबरदस्त इव्हेंट झाला… जनताही डीजेच्या तालावर नाचावी तशी बेभान होऊन नाचत होती… पण या गोंधळात आपल्याला येड्यांची संख्या मोजता आली नाही...

" यावर बिरबल गालातल्या गालात हसत म्हणाला, "काळजी करू नका महाराज, अजून एक उपाय आहे यावर." बादशाह अधीर होऊन म्हणाला, "सांग बिरबला, सांग.. माझे कान आसूसलेत ऐकायला". यावर बिरबल म्हणाला, "महाराज, आपण आणखी एक इव्हेंट करू, लोक घराघरात बसून आता कंटाळली असतील. आपण त्यांना रात्री एका विशिष्ट वेळी लाईट बंद करून मेणबत्त्या पेटवायला सांगू, प्रत्येक शहर, सोसायटी आणि गावांमध्ये आपली माणसे असतील. सोसायटीमधील किंवा गावांमधील ज्या घरांमध्ये लाईट बंद केली जाईल त्याची आपली माणसे तातडीने नोंद घेतील. प्रत्येक घरात किमान 4 माणसे आहेत असे समजूयात. जितक्या घरांमध्ये लाईट बंद होईल त्याला 4 ने गुणायचे.... यातून जो आकड़ा येईल ती आपल्या देशातील येड्यांची खात्रीशीर संख्या असेल. घराघरात बसून कंटाळलेल्या जनतेलाही एक नवा इव्हेंट मिळाल्याबद्दल तेही खुश होतील आणि आपल्याला दुवा देतील. आपलेही काम होईल..!!

बादशाहला हर्षवायूच व्हायचा बाकी होता आता..!! त्यांनी बिरबलाला घट्ट मिठी मारली..!! आणि तातडीने आदेश काढले..... " सर्वांनी घराघरातील लाईट घालवायच्या आणि मेणबत्त्या पेटवून उत्सव साजरा करायचा...."

अशीच काहीशी अवस्था सध्या आपल्या देशात सुरु आहे. कोरोनामुळे देश प्रचंड संकटात आहे. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये जीवन - मरणाची लढाई सुरु आहे. अशा वेळी देशासाठी निर्णायक लढाईची वेळ असताना पंतप्रधान मात्र, देशाला थाळी - थालीचा आणि लाईट विझवून मेणबत्त्या - दिवे लावण्याचा जालिम उपाय सूचवत आहेत.

कोरोना विरोधात आरपारची लढाई लढण्याची आवश्यकता असताना पंतप्रधान देशाला संबोधित करून टाळ्या वाजवून, मेणबत्त्या - दिवे लावण्याचे आवाहन करत आहेत. त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. देशाचे ऊर्जा मंत्री राज्याच्या ऊर्जामंत्र्यांशी बोलून या तयारीचा आढावा घेत आहेत. रविवारी रात्री 9 वाजता देशात एकाच वेळी लाईट घालवून मेणबत्त्या - दिवे लावले की, त्याच्या प्रखर प्रकाशात करोना नावाचा विषाणू जळून भस्मसात होईल आणि देशावर आलेले घोर संकट दूर होईल. त्या दृष्टीने सरकारने कंबर कसली आहे. देशातील डॉक्टर्स, नर्स आणि वैज्ञानिक मात्र, फुकट आपली सर्व ताकद आणि जीव टांगणीला लावत आहेत. आता त्यांनाही जास्त वाट पहावी लागणार नाही अशीच परिस्थिती आहे.

संपूर्ण जग एकीकडे करोनाविरोधात लढण्यासाठी आपली ताकद पणाला लावत आहेत. प्रचंड तंत्रज्ञान आणि वैद्यकीय सुविधा असतानाही हे देश हतबल झाले आहेत. सुदैवाने अजूनही Covid 19 आपल्या देशात तिसऱ्या स्टेजला पोहोचलेला नाही. मात्,र त्याने आता गुणाकार सुरु केला आहे आणि दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र सध्या यामध्ये क्रमांक एक वर पोहोचला असून पाठोपाठ दिल्लीचा दूसरा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत 77 बळीही गेले आहेत. रोज क्रिकेटचा स्कोर मोजावा तसा टिव्हीच्या स्क्रीनवर आणि घरोघरी कोरोनाचा स्कोर मोजला जात आहे. याचाच अर्थ हे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत आहे हे स्पष्ट आहे.

यावर आपले देशाचे पंतप्रधान दर 8 दिवसांनी जनतेसमोर येवून जनतेने या संकटाचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करून देशाला विविध इव्हेंट देत आहेत. तसेही रोज संध्याकाळी आपण घरोघरी दिवे लावत असतोच. मात्र लाईट घालवून दिवे - मेणबत्त्या लावण्याची शास्त्रीय कारणेही आदरणीय पंतप्रधानांनी देशाला सांगायला पाहिजेत. पण तसे होत नाही. भक्तगण नंतर विविध स्टो-या तयार करून पाठवत असतात. खरे तर या गंभीर प्रसंगी पंतप्रधानांनी जनतेसमोर येवून आधार देत सरकार करोनाचा प्रतिबंध करण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना करत आहे, वैद्यकीय तपासणी यंत्रणा कशा प्रकारे राबवली जात आहे, विषाणूसंदर्भात कशा प्रकारे संशोधन सुरु आहे, डॉक्टरांसाठी व जनतेसाठी कशा प्रकारे सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत, आता आणि भविष्यात कोणत्याही संकटाशी सामना करण्यासाठी देश कशा प्रकारे उभारणी घेणार आहे. अशा प्रकारचा निर्णायक आणि ठोस कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना द्यायला पाहिजे होता. मात्र ते देशवासियांना देतायेत टाळ्या- थाळ्या - ढोल वाजवण्याचा आणि मेणबत्त्या - दिवे लावण्याचा कार्यक्रम..!!

एकीकडे केंद्र सरकार इव्हेंटच्या मानसिकतेत अडकली असताना महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा यांसारखी सगळीच राज्ये अत्यंत काळजीपूर्वक आणि ताकदीने या संकटाचा सामना करत असून आपापल्या राज्यात प्रभावी उपाययोजना करत आहेत. केंद्राच्या तुलनेत महाराष्ट्र सरकार चांगली कामगिरी करत असून,

"आपल्याला लाईट बंद न करता अंधाराशी लढायचे आहे आणि कोरोनारूपी राक्षस गाडायचा आहे," असे मुख्यमंत्र्यांनी जे वास्तववादी आवाहन केले आहे ते जास्त आश्वासक आहे. रोज मुख्यमंत्री राज्याच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून जनतेबरोबर संवाद साधत आहेत आणि जनतेला आश्वस्त करत आहेत.

महाराष्ट्रात करोनाची संख्या वाढतेय ये लक्षात येताच मुंबईतील निम्म्यापेक्षा जास्त सोसायटया सील करण्यात आल्या आहेत. तसेच जागोजागी निदान केंद्र सुरु करण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्यात स्पेशल कोरोना रुग्णालय सुरु करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री अतिशय संयमाने परिस्थिती हाताळत असल्याता जनताही साथ देत आहे.

या संकटाच्या काळात तरी, सर्व राज्ये आपापल्या सुरक्षेसाठी झटत असताना पंतप्रधानांनी "इव्हेंच्या मानसिकतेतून" बाहेर पडून किमान देशातील जनता किती अडचणीत आहे आणि भविष्यात देशासमोर कोणती संकटे आ वासून उभी आहेत, याचा विचार करणे आवश्यक होते व आहे....

1) कोरोनाचे संकट पुढील काही दिवसात अधिक गडद होण्याची शक्यता आहे. देशात मास्क, वेंटिलेटर्स, औषधे यांचा प्रचंड तुटवडा आहे. 135 करोडच्या जनतेत देशात फक्त 1 लाख वेंटिलेटर्स आहेत. हे आपण समजून घेतले पाहिजे. त्या दृष्टीने सरकारने काय उपाययोजना करायला लावल्या आहेत. हे केंद्र सरकारने सांगणे आवश्यक आहे.

2) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये प्रचंड भीती असून साधा ताप - खोकला आला तरी त्याचे निदान व उपचार कुठे करायचे? यांची अजूनही संपूर्ण यंत्रणा उभी राहिलेली नाही. राज्य आपल्या पद्धतीने उपाययोजना करत असताना केंद्रानेही व्यापक ऐक्शनरी प्लान राबवून प्रत्येक तालुका स्तरावर करोना चाचणी व उपचार केंद्र सुरु करणे आवश्यक आहे.

3) अजूनही देशातील सर्वच ठिकाणी हॉस्पिटल आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉक्टरांना सुरक्षा किट, मास्क, पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्यामुळे डॉक्टर रुग्णांवर उपचार करायला घाबरत आहेत.

4) इटलीपाठोपाठ अमेरिकेमध्येही दर दिवशी एक हजाराहून अधिक बळी जात आहेत. इतकी झपाट्याने ही संख्या वाढत आहे. जर्मनी - अमेरिकेमध्ये आठवडयाला 5 लाख, ब्रिटन- इटलीमध्ये 2 लाख कोरोना निदान चाचण्या होत आहेत. मात्र, भारतात हा कोरोना चाचण्यांचा स्पीड अत्यंत कमी असून आतापर्यंत एक लाख चाचण्याही आपण करू शकललो नाही. त्यामुळे केंद्राने तातडीने अत्यावश्यक चाचणी किट देशभरात उपलब्ध करून द्यायला पाहिजेत.

5) लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योगधंदे बंद आहेत. भविष्यात हे उद्योगधंदे प्रचंड अडचणीत येणार आहेत. तसेच बंद असलेले कारखाने आणि मशिनरी सुरु करण्यास प्रचंड मेन्टेनन्स येणार आहे. त्यादृष्टीने सरकार काय उपाययोजना करणार आहे?

6) भविष्यात येणाऱ्या जागतिक मंदीमुळे पुढील काही महिने आयात -निर्यातीवर परिणाम होणार आहे.

7) उद्योग अडचणीत आल्यामुळे भविष्यात मोठी बेकारीची कु-हाड़ देशावर व तरुणाईवर कोसळणार आहे. त्यादृष्टीने देश कसा उपाययोजना करणार आहे. कोरोनामुळे अमेरिकेत एकाच आठवड्यात तब्बल 7 लाख लोकांच्या नोक-या गेल्या आहेत. तर लाखो नोकऱ्या संकटात आल्या आहेत. हॉटेल, रेस्टोरेंट, हॉस्पिटयालिटी, पर्यटन यांसारख्या विविध क्षेत्रात लाखो नोकऱ्या संकटात येणार आहेत. त्यावर सरकार काय उपाययोजना करणार आहे?

8) भविष्यात परदेशातून मायदेशी आलेल्या भारतीयांच्या नोकऱ्यांचाही मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.

9) एका रात्रीत लॉकडाऊन केल्यामुळे जागोजागी अड़कून पडलेल्या असंघटित आणि स्थलांतरीत कामगारांचे हाल कायम आहेत. त्याचा भविष्यातील रोजगाराचाही प्रश्न गंभीर होणार आहे.

10) शेती व्यवसाय अत्यंत अडचणीत आला असून पिकवलेला भाजीपाला, फुले - फळे शेतातच सडत आहेत. शेतकरी उध्वस्त होत आहे. देशभरात अडकलेल्या स्थलांतरित नागरिकांची अत्यंत वाईट अवस्था असून करोनामुळे मीडियाला मर्यादा आल्याने सर्वच बातम्या जनतेपर्यंत पोहोचू शकत नाहीत.

11) आधीच संकटात असलेला आपला देश भविष्यात प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणीत सापडणार आहे. त्यावर आपल्याकडे काय उपाययोजना असणार आहेत?

असे एक ना अनेक प्रश्न देशासमोर उभे ठाकत आहेत. मात्र, पंतप्रधान खुबीने यावर बगल देत देशासमोर "ताळी बजाव, थाली बजाव, लाईट बुझाव - मोमबत्ती - दिया जलाव" यांसारखे उपाय देशाला देत आहेत आणि त्याला इव्हेंटचे स्वरूप देण्यात येत आहे. या संकटाच्या काळातही मोदी अत्यंत खुबीने आपली इमेज मेकिंग, प्रचार, प्रसार, प्रोपोगंडा करत आहेत आणि डोळ्यावर पट्टी बांधलेली जनता - तरुणाई त्यांचे जोरदार समर्थन करत आहेत. यामुळे मोदींचा कायम चर्चेत राहण्याचा हेतू साध्य होत आहे. मोदी उत्तम "इव्हेंट मॅनेजर" आहेत हे माहिती होतेच. पण ते उत्तम "गारुडी"ही आहेत याचा नव्याने प्रत्यय येत आहे. जर भविष्यात टाळ्या - थाल्या वाजवून आणि मेणबत्त्या- दिवे पेटवून करोनावर आपण नियंत्रण मिळवू शकलो तर भारत हे जगासाठी खुप मोठे उदाहरण असेल आणि पंतप्रधान मोदी केवळ भारताचेच नव्हे तर जगाचे नेते असतील. ही आपल्या सर्वांसाठीच अत्यंत आनंदाची गोष्ट असेल. मात्र इतके करूनही करोना नियंत्रणात आला नाही आणि भविष्यात केवळ वैद्यकीय सुविधांअभावी, नियोजनाअभावी, बेजबाबदारपणामुळे देशात शेकडो - हजारो बळी गेले तर ती केवळ अकबराच्या कथेप्रमाणे "येड्यांची मोजदाद" नसेल तर दु:खाची आणि बेजबाबदारपणाचीच मोजदाद असेल..!! त्यामुळे श्रध्देने या "मेणबत्ती इव्हेंट"मध्ये सामिल होणाऱ्या भारतीयांची दुवा लागो आणि देश सुरक्षित राहो इतकीच अपेक्षा..!!

[email protected]

Updated : 5 April 2020 12:23 PM GMT
Next Story
Share it
Top