Home > मॅक्स ब्लॉग्ज > जगण्यावर प्रभाव पाडणारा सिनेमा- द प्लॅटफॉर्म

जगण्यावर प्रभाव पाडणारा सिनेमा- द प्लॅटफॉर्म

जगण्यावर प्रभाव पाडणारा सिनेमा- द प्लॅटफॉर्म
X

कोरोनामुळे आपल्या देशात जी परिस्थिती आहे, ती पाहता हा सिनेमा आणि त्यातला 'मेसेज' समजून घ्यावाच लागेल. सिनेमाचा प्लॉट काहिसा असा आहे, एक तुरुंग आहे. एखाद्या टॉवर सारखं उभंच्या उभं. प्रत्येक मजल्यावर दोन व्यक्ती. किती मजले आहेत, हे नेमकं कुणालाच ठाऊक नाही. सिनेमाचं नाव प्लॅटफॉर्म आहे. कारण एक प्लॅटफॉर्म पहिल्या मजल्यापासून शेवटच्या मजल्यापर्यंत अन्न पोहोचवतो. प्लॅटफॉर्मावर जेवण ठेवलेलं असतं.दिलेल्या वेळात ज्याला जितकं खाता येईल, तितकं खावं आणि प्लॅटफॉर्म पुढे सरकेल. अर्थातच वरच्या मजल्यावर असणारे लोकच सुखी आहेत, असं तुम्हाला वाटेल. पण ट्विस्ट पुढे आहे. वरचा मजला हा काही कुणाला कायमचा मिळालेला नाही. महिन्याभरात ते कोणत्या मजल्यावर फेकले जातील, हे कुणालाच माहीत नाहीये. हे सगळं पचनी पडणं कठीण आहे. मलाही असला फाल्तुपणा आवडत नाही. पण आपण सिनेमातल्या या तुरुंगातून समाजव्यवस्था समजून घ्यायला हवी. जगणं समजून घ्यायला हवं. आणि ते समजून घेण्यासाठी या सिनेमाचा प्लॉट हाच खरा प्लॅटफॉर्म आहे.

तर अशा या तुरुंगात सिनेमाचा नायक शिरतो. आणि कथा सुरु होते. तुरुंगात येताना तुम्हाला एकच वस्तू सोबत घेऊन येण्याची मुभा असते. नायक पुस्तक सोबत घेतो. म्हणूनच तो 'नायक' ठरत असावा. कारण इतर कैदी हे चाकू सुरे, दोरघंड, वगैरे घेऊन आलेले असतात. सिनेमा तसा किळसवाणा आहे. बकासुरासारखे त्या एकाच प्लॅटफॉर्मवर जेवणारे लोक, जेवून झाल्यावर त्यावरच थुंकणं, वाईन पिऊन मुतणं, जेवण मिळालं नाही तर एकमेकांचं मांस कापून खाणं, वगैरे वगैरे. पण हे सगळं का घडतंय हे समजून घेण्यासाठी आपण सिनेमा पाहत राहिलो तर सिनेमा किळसवाणा वाटणार नाही. तर इतकं सगळं सुरु असताना नायकाला बदल घडवण्याची खुमखुमी येते. प्रत्येकापर्यंत जेवण पोहोचलं पाहिजे, असा विचार तो सातत्याने करत राहतो. त्याच्या सोबतचे लोक अर्थातच त्याला कम्युनिस्ट समजतात. हिणवतात. पण शेवटच्या मजल्यावरच्या कैद्याची भूक त्याला अस्वस्थ करत राहते.

आता तो काय-काय करतो, हे सगळं लिहीत नाही. तो नायक आहे, तर लढा देऊन जिंकेल असं तुम्ही गृहीत धराच. तर हा सिनेमा प्रभाव पाडणारा का वाटला? खरं तर मी हा सिनेमा लॉकडाऊनमध्ये पाहिला. म्हणजे उद्योग धंदे बंद पडत होते. लोक बरोजगार होत होते. जेवणाला तरसत होते, इत्यादी इत्यादी बातम्या सुरु असताना. त्या बातम्या आताही अर्थातच थांबलेल्या नाहीत.

तर या सगळ्याचा इथे काय संबंध? तर कसंय की, प्रत्येकाचा लॉकडाऊन वेगळा आहे. त्या सिनेमातही आणि आता प्रत्यक्षातही. उच्च मध्यमवर्गीय दोन वेळचं जेऊ शकतायत. टिव्ही बघून, गाणी ऐकून, सोशल नेटवर्किंग करुन, व्हिडीओ कॉलिंग करुन दिवस ढकलू शकतायत. श्रीमंताचं तर बरं चाललंय आणि ते अजून पुढे काही महिनेही चालू शकेल, याबद्दल शंका नाही. मजुरांचं, कष्टकऱ्यांचं, गोर गरिबांचं काय चाललंय यावर आता नव्याने गळा काढायची आवश्यकता नाही. काल परवा तर एक माणूस रस्त्यावर मेलेलं कुत्रं खात असल्याचंही पाहिलं. सिनेमातला जो प्रकार किळसवाणा वाटला होता. तो तितकाही खोटा किंवा अशक्य नव्हता, हे पटवणारं ते दृश्य.

भूक आणि परिस्थिती माणसाला काहीही करायला लावू शकते. हे आपण आता दरदिवशी पाहतोय. आणि याच्या मुळाशी आहे, एक प्लॅटफॉर्म. जिथे आपण सगळेच बकासूर आहोत. निर्दयी आहोत. अविचारी आहोत. आपण या सिनेमाचा मेसेज आजच नाही तर आयुष्यभरासाठी समजून घेणं आवश्यक आहे. आपली गरज भागवत असताना, आपण ओरबाडत तर नाहीयोत ना? हा प्रश्न स्वतःला विचारला गेला पाहिजे. प्रत्यक्षात कुणाला काही देता आलं नाही, तरीही हरकत नाही. फक्त आपण अवास्तव गिळत नाहीयोत ना, याची जाणीव असायला हवी. दिवसकठीण आहेत, पुढे अजून कठीण होतील. पण शेवटच्या माणसापर्यंत अन्न पोहोचवण्याचा मानवतावाद आपल्यात रुजला, तर आपण कोरोनाविरोधात नाही पण स्वतःतल्या अविचारी, अप्पलपोटी माणसाविरोधात नक्की जिंकू.

या सिनेमानं काय दिलं? तर पुढ्यात पडेल ते खाण्याची शिकवण दिली. भूक ही माणसाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. याची जाणीव करुन दिली. या सिनेमाचा कॅनव्हास खूप मोठाय. दिग्दर्शकानेही शेवट अगदी प्रेक्षकांवर सोडलाय. पण ज्या वातावरणात हा सिनेमा पाहिला. त्यातून मला झालेलं हे आकलन. सिनेमाला समाज कळायला हवा आणि समाजाला सिनेमा. मला हे वाक्य या अशा सिनेमांसाठी परत परत म्हणावंसं वाटतंय. सिनेमा बघू. सिनेमा जगू. मज्जानी लाईफ!

गुरुप्रसाद

(लेखक साम टीव्ही वृत्तवाहिनीचे वृत्तनिवेदक आहे)

Updated : 28 May 2020 4:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top