Home > News Update > कोरोनाचा शिरकाव होऊ न देणाऱ्या देशांकडून शिकण्याची गरज- कुमार केतकर

कोरोनाचा शिरकाव होऊ न देणाऱ्या देशांकडून शिकण्याची गरज- कुमार केतकर

कोरोनाचा शिरकाव होऊ न देणाऱ्या देशांकडून शिकण्याची गरज- कुमार केतकर
X

कोरोनाने जगभरात जो हाहाकार माजवला आहे, त्यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं असं म्हटलं आहे की, अशा प्रकारचा हाहाकार हा पहिल्यांदाच होतोय. तो साधारणपणे १८० देशात किमान अतिशय भयंकर पद्धतीने उद्भवलेला आहे. इतका काळ आपण आफ्रिका, दक्षिणपूर्व आशिया यांची नावं ऐकत नव्हतो. आपला मीडिया जो आहे तो प्रामुख्याने युरोप-अमेरिकेवर लक्ष ठेवून असतो. त्यातही मुख्यतः अमेरिकेमध्ये आणि विशेषतः न्यूयॉर्कमध्ये किती माणसं प्रत्यक्षात करोनाबाधित होतायेत आणि मरतायेत याच्या उदंड चर्चा आपल्या टेलिव्हिझन, वृत्तपत्राच्या माध्यमातून चालू आहेत. मध्यमवर्गामध्ये अमेरिकेबद्द्लचं आकर्षण पाहता ते स्वाभाविकच आहे. अमेरिकेमध्ये या हजारो माणसे मृत्यूमुखी पडली असून ८ लाखांच्या आसपास कोरोनाबाधित झालेली आहेत.

इतका मोठा हाहाकार अमेरिकेत झालेला असताना अमेरिकेच्याच दक्षिणेला एक लहानसं राष्ट्र आहे त्याचं नाव आहे क्युबा, म्हणजे भारताच्या दक्षिणेला खाली श्रीलंका आहे तसाच. अमेरिकेतील फ्लोरिडाच्या जवळ क्युबा हा अतिशय लहानसा देश आहे. क्युबाची लोकसंख्या मुंबईपेक्षाही कमी आहे. मुंबईची म्हणजे एमएमआरडीए परिसराची लोकसंख्या जवळजवळ २ कोटी एवढी आहे. क्युबाची लोकसंख्या साधारण १ कोटी १० लाख एवढीच आहे. अशा क्युबामध्ये हा कोरोना रोगाचा शिरकाव झालेला नाही. एवढंच नाही तर, सगळीकडे जेव्हा सीमा बंद केल्या जात आहेत, आमच्या देशात, आमच्या राज्यात, जिल्ह्यात कोणी येऊ नये अशाप्रकारची धारणा असताना क्युबाच्या सरकारने आणि मेडिकल डिपार्टमेंटने मात्र क्युबामध्ये कोणीही, कधीही यावं असं म्हटले आहे.

आम्ही कोरोनाबाधीत रुग्णांना सर्वप्रकारच्या सुविधा देऊ आणि उपचार करु असं या देशाने म्हटलं आहे. इतकचं नव्हे तर क्युबाने त्यांच्याकडचे २०० डॉक्टर जगात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पाठवले आहेत. पण हा इतका लहानसा क्युबा देश अमेरिकेचा भाग नाही. खरतरं अमेरिकेने तसा प्रयत्नही केला. या क्युबाचे अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांच्यावर १९६०पासून ते त्यांच्या मृत्यूच्या चार वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्यावर २७ ते २८ प्राणघातक हल्ले करण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला. फिडेल कॅस्ट्रोंचा पट्टशिष्य किंवा सहकारी चेक गोईवरा याला तर अमेरिकेने आपली गुप्तचर यंत्रणा सीआयएमार्फत ठार मारलं. म्हणजे क्युबाला नामोहरम करण्याचाच नव्हे तर त्यांना आपल्या अंकित करण्याचा अमेरिकेचा कायम प्रयत्न होता. पण क्युबा त्यांचा अंकित तर झालाच नाही आणि हवालदिलही झाला नाही.

कॅस्ट्रोच्या खुनाचे सगळे प्रयत्न त्याने फोल ठरवले. एवढं बलाढ्य शस्त्र सामर्थ्य असतानाही अमेरिकेला क्युबावर विजय प्राप्त करता आला नाही. त्याच्यामुळेच अमेरिकेचा आडही प्रचंड जळफळाट होत असतो. त्यामुळेच क्युबा हा देश इतर कोणत्याही कोरोनाबाधीत देशांपेक्षा वेगळा वागतोय. त्यांच्याकडे कोरोनाबाधीत रुग्ण नाहीत, याची साधी चर्चाही आपली मराठी, हिंदी किंवा इंग्रजी माध्यमं करत नाही, असं का होतंय? मुंबईत, पुण्यात इतके मृत्यू झाले, दिल्लीमध्ये इतके कोरोनाबाधित आहेत, ही सगळी चर्चा करतो आपण पण आपल्या महाराष्ट्रापेक्षा एक दशअंश लोकसंख्या असलेला हा क्युबा हा इतका सुरक्षित कसा राहिलेला आहे, याची साधी चर्चाही करत नाही, इतके आपण अमेरिकेला, अमेरिकन माध्यमांना, अमेरिकन माध्यमशाहीला आणि आपल्या मध्यमवर्गाला लाचार झालेलो आहोत.

व्हिएतनम हा देश अमेरिकेने बॉम्ब वर्षाव करुन बेचिराख केला होता. त्या व्हिएतनममध्ये कोरोना रुग्ण आहेत पण एकाचाही म़ृत्यू झालेला नाही. त्यांनीसुद्धा कोरोनावर विजय प्राप्त केला आहे. दक्षिण कोरियाने कोरोना आटोक्यात आणला असून त्यांनी तिकडे सहज निवडणुक घेतल्या. त्यांच्या निवडणुकांमुळे कोरोनावर विजय प्राप्त करता येतो आणि राजकीय विजयही प्राप्त करता येतो, हे आता सगळ्या जगभर सिद्ध झालं आहे. थोडक्यात काय आपल्या देशामध्ये सुद्धा चांगली व्यवस्था कुठेय तर ती केरळमध्ये आहे. “Communist Kerala shows a way to Indian corona crisis” अशी हेडलाईन वॉशिग्टन पोस्टने दिली आहे. म्हणजे केरळचं अनुकरण करायला पाहिजे. व्हिएतनम, क्युबा आणि केरळ कम्युनिस्ट आहे. क्युबाच्यावर असलेला अमेरिका एवढा समर्थ, एवढी भांडवलशाही, एवढी लोकशाही, एवढी चर्चा असणारा देश…पण त्याला मात्र कोरोनावर विजय मिळवता आलेला नाही.

अमेरिकेत सध्या हॉस्पिटलसमध्ये कोरोनबाधीतांना ठेवण्यासाठी जागा नाही. तसेच कोरोनामुळे जे मृत्यूमुखी पडलेत त्यांना पुरण्यासाठीदेखील जागा नाही. ही जगातली अवस्था असताना चीनने जाहीर केलंय की वुहानमध्ये मृत्यू झालेल्यांचा आकडा ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

कोरोना विषाणूचा कुणालही संसर्ग होत असला तरी सुद्धा काही विशिष्ट भूराजकीय ठिकाणीच त्याचा प्रार्दुभाव आणि प्रसार जास्त असल्याचं पाहायला मिळतंय. अमेरिकेत आणि वैज्ञानिकांमध्ये विचार चाललाय की चीनच्या प्रयोगशाळेत हा विषाणू तयार करण्यात आला आहे. अमेरिकेला नामोहराम करण्यासाठी हा विषाणू तयार केला आहे. पण तसा कोणताही पुरवा नाही. परंतु चीनला बाजूला टाकायचं असा प्रयत्न जगभर सुरु झालाय. तसेच अमेरिकेत, युरोपात प्रचंड अशी बेकारी पसरल्यामुळे लोकांनी कुठे जायचं, काय करायचं कारण कंपन्या बंद पडत आहे. यामुळे अराजक माजेल की काय, अशी परिस्थिती युरोप -मेरिकेत स्थिती असताना तुलनेने अमेरिकेनं ज्या व्हिएतनमला उद्धवस्त केलं त्या व्हिएतनमची परिस्थिती स्थिर आहे. यासंदर्भात आपल्याला भारताची चर्चा करायला हवी. भारताचे चित्र अजून पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.

Updated : 26 April 2020 2:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top