Home > मॅक्स ब्लॉग्ज > भिमांजली : डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त जगप्रसिद्ध कलावंत 'महामानवाला' शास्त्रीय संगीतातून आदरांजली वाहणार...

भिमांजली : डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त जगप्रसिद्ध कलावंत 'महामानवाला' शास्त्रीय संगीतातून आदरांजली वाहणार...

भिमांजली : डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त जगप्रसिद्ध कलावंत महामानवाला शास्त्रीय संगीतातून आदरांजली वाहणार...
X

मुंबई : औरंगाबाद येथील भव्य जागतिक बौद्ध धम्म परिषदेनंतर राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक डॉ. हर्षदीप कांबळे (आयएएस) यांच्या मार्गदर्शनाखाली ६ डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त 'भीमांजली' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी 'भिमांजली' कार्यक्रमात प्रतिभावंत जगप्रसिद्ध कलाकार आपल्या शास्त्रीय संगीताच्या सुरमय सप्तस्वरांतून बुद्धं शरणं गच्छामिची सुमधुर धून तसेच बाबासाहेबांवरचे एक गीत सादर करून आदरांजली अर्पण करतात.

२०१६ साली पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित विश्वमोहन भट, उस्ताद दिलशाद खान, पंडित भवानी शंकर, पंडित मुकेश जाधव यांच्या सप्त स्वरांतून 'भीमांजली' कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दरवर्षी ६ डिसेंबर रोजी 'भीमांजली'चे आयोजन रवींद्र नाट्य मंदिर येथे सकाळी ६ वाजता करण्यात येते.

यापूर्वी 'भीमांजली'च्या कार्यक्रमात दिग्गज कलावंतांनी महामानवाला स्वरांजली अर्पण केली आहे. यामध्ये २०१७ साली उस्ताद शाहिद परवेझ, सुश्मिता व देबूप्रिया सिस्टर्स, पंडित प्रभाकर धाकडे, पंडित मुकेश जाधव, तर २०१८ मध्ये अमेरिकन संगीतकार बासरी वादक नॅश नेबर्ट, उस्ताद रफिक खान, उस्ताद शफिक खान, डॉ.संगीता शंकर आणि पंडित मुकेश जाधव या मान्यवर कलावंतांच्या स्वरातून अभिवादन करण्यात आले.

यंदा चौथे वर्ष :

तालविहार प्रस्तुत 'भीमांजली' हा कार्यक्रम ६ डिसेंबर २०१९ रोजी पहाटे ६ वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे घेण्यात येणार आहे. यंदा या उपक्रमाचे चौथे वर्ष आहे. कार्यक्रमात पंडित रोनू मुजुमदार हे सुप्रसिद्ध बासुरी वादक, शाकीर खान, तेजस उपाध्य, पंडित मुकेश जाधव यांच्या सुरमय सप्त स्वरांतून महामानवाला स्वरांजली अर्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

संगीताला जात धर्म नसतो.. तर ते लोकांच्या आंतर मनात जाऊन एक खूप चांगल्या लहरी, विचार निर्माण करतात. आणि म्हणूनच ही आदरांजली शास्त्रीय संगीताद्वारे देण्याचे डॉ. कांबळे सरांनी सुरु केले आहे. 'भीमांजली'च्या निमित्ताने ह्या जगप्रसिद्ध कलाकारांच्या मनांत सुद्धा बाबासाहेबांबद्दल किती प्रेम आहे हे पं. हरिप्रसादजी चौरासिया, पं. विश्वमोहन भट्ट ह्या सारख्या नामवंत कलाकारांनी व्यक्त केले आहे.

या आगळ्या वेगळ्या अभिवादन सभेला सकाळीच खूप लोक हजर राहून बाबासाहेबांना अभिवादन करतात.

'भीमांजली' का?

बाबासाहेबांना आपणास चांगले गायन , वादन यावे असे वाटे. सकाळी ऑफिसला जाण्यापुर्वी बाबासाहेब वैद्य यांच्याकडून फिडल वाजवण्याचे धडे घेत असत. बाबासाहेबांनी मुंबईत नाना व बाळ साठे या बंधूद्वयांकडून व्हायोलिनचे धडे ( १९५१ ते १९५४ ) घेतले होते.त्यांना तबला वादनाचीही आवड होती . बाबासाहेबांकडे संगीताच्या एलपी रेकॉर्डचा संच होता. बाबासाहेबांच्या अखेरच्या क्षणापर्यंत असणारा एलपी रेकॉर्डचा संच नागपुरातील शांतीवन स्मृती संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.

या सर्व बाबी लक्ष्यात ठेवून 'भीमांजली'च्या माध्यमातून बाबासाहेबांना सुरेख वाद्यांच्या स्वरलहरीने बुद्धं शरणं गच्छामिच्या स्वरात आदरांजली वाहण्यात येते.

संगीत हे जाती धर्माच्या पलीकडे आपल्याला घेऊन जाते. मानसिक शांततेसाठी संगीताची आवशक्यता असते, शास्त्रीय संगीत हे भारतीय संस्कृती असून तिला जपणे हे कुशल कम्म आहे. या सर्व बाबी लक्ष्यात ठेवून 'भीमांजली'च्या माध्यमातून बाबासाहेबांना सुरेख वाद्यांच्या स्वरलहरीने आदरांजली वाहण्यात येते.

Updated : 5 Dec 2019 3:43 AM GMT
Next Story
Share it
Top