नरेंद्र मोदींची गफलत…

Courtesy Social Media

भारतीय जनता पक्षाला स्थापना दिवसाच्या शुभेच्छा. दोन खासदार ते तीनशे पार असा अचंबित प्रवास करणाऱ्या या पक्षाचं खऱ्या अर्थाने कौतुक केलं पाहिजे. अवघ्या 40 वर्षांत सातत्य आणि परिश्रम याच्या बळावर भारतीय जनता पक्षाने हे यश मिळवलं आहे. या यशाचं विश्लेषण करायचं झालं तर अनेक गोष्टींवर बोलावं लागेल. कधीकाळी घराणेशाही, अंतर्गत लोकशाही अशा विषयांवर भोंगा घेऊन बोलणाऱ्या या पक्षात जे बदल झाले, ते बदल भारतीय जनता पक्षातील अनेकांना पचलेले नाहीत.

मात्र पक्षात जी शिस्त आहे, त्या शिस्तीमुळे कोणीही यावर बोलायला तयार नाही. याला शिस्त नाही तर लोकशाहीच्या कोंदणात बसवलेली हुकूमशाही बोलायला हवं खरं तर. मात्र जे काही आहे, त्या बळावर भाजपा आज यशस्वी आहे. या सर्व प्रवासात एक गोष्ट लक्षात येते की नरेंद्र मोदींनी जाणीवपूर्वक देशापेक्षा पक्षाला जास्त महत्व दिलं आहे. नरेंद्र मोदींनी गफलत केलीय आणि ही राष्ट्रवादाचं कव्हर चढवल्यामुळे गफलत देश ही करतोय.

कोरोनाचा कहर वाढत चाललाय. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासमोर येऊन सहकार्य मागतील, देशाला परिस्थिती सांगतील, तयारी सांगतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्या राष्ट्र के नाम झालेल्या तिन्ही संबोधनांमध्ये याचा अभाव दिसला. पंतप्रधानांनी जी गोष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगीतली पाहिजे ती देशाला सांगितली आणि जी गोष्ट देशाला सांगायची ती पक्ष कार्यकर्त्यांना सांगितली. यावरून नरेंद्र मोदींचा अजेंडा स्पष्ट होऊन गेलाय.

नरेंद्र मोदींनी पक्ष स्थापना दिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना जे संबोधन केलं ते नीट ऐकलं तर लक्षात येतं की त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना व्यवस्थित पणे जगात काय चाललंय, भारत सरकार काय काम करतंय, देशाला कशाची आवश्यकता आहे याची माहिती करून दिली. या परिस्थितीचा राजकीय लाभ घेण्यासाठी पोलींग बूथ पातळीवर त्यांनी कार्यकर्त्यांना कार्यक्रम ही दिला. मोदींच्या एकूण कार्यप्रणालीप्रमाणे त्यांनी पंचसूत्री कार्यकर्त्यांना दिली.

त्यात राशनचं वितरण, सेवा देणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी त्यांना प्रत्येक घरातून पत्र लिहून घेणं आणि पोलींग बूथ मधून त्याचं वितरण करणं, आरोग्य सेतू ऍप कमीत कमी 40 लोकांच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून देणं, पीएम केअर्स फंडामध्ये जास्तीत जास्त निधी गोळा करणे असे कार्यक्रम दिले. खरंचर हे कार्यक्रम त्यांनी देशातील जनतेला द्यायला पाहिजे होते. मात्र, याचा राजकीय फायदा पक्षाला व्हावा असा त्यांचा स्पष्ट हेतू दिसतोय.

दुसरीकडे देशाला काय कार्यक्रम त्यांनी दिला. थाळी वाजवा, घंटा नाद करा आणि दिवे लावा. म्हणजे एकीकडे देशाला रिकामटेकड्या उद्योगांमध्ये अडकवायचं आणि दुसरीकडे आपत्तीच्या वेळीही आपला राजकीय अजेंडा पुढे रेटत न्यायचा. खरंतर थाळी नाद आणि दिवेलावणी असे निर्बुद्ध कार्यक्रम पक्षाच्या कार्यकर्त्यांना देता आले असते. मात्र, अत्यंत चालाखपणे त्यांनी देशाला निर्बुद्धपणाचा कार्यक्रम दिला आणि पक्षाला राजकीय बांधणीचा.

संपूर्ण देश लॉकडाऊन असताना, लोकांना घरामध्येच राहा असं सांगताना देशातील पोलीसांना व्हिलन बनून नागरिकांच्या पार्श्वभागावर रट्टे द्यावे लागले, त्याच वेळी देशाच्या पंतप्रधानांनी मात्र पोलीसांचं टेन्शन वाढवणारे कार्यक्रमच दिलेयत. पंतप्रधानांच्या दोन्ही कार्यक्रमांसाठी त्यांचे भक्त मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आलेले दिसले. आता त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आभार पत्रे लिहून घेणं आणि त्याचं बूथ पातळीवर सार्वजनिक सेवा पुरवणाऱ्यांना वाटप करण्याचा दिलेला कार्यक्रम असो किंवा राशन-मास्क वाटपाचा कार्यक्रम असो किंवा 40 लोकांच्या मोबाइईल मध्ये ऍप डाऊनलोड करून देण्याचा मुद्दा असो किंवा पीएम केअर मध्ये निधी संकलन असो.. या सर्व कार्यक्रमांसाठी कार्यकर्ते जर रस्त्यावर उतरले तर गोंधळ उडेल. देशाच्या पंतप्रधानांचाच असा आदेश असेल तर त्यावर यंत्रणा काय बोलणार आहेत हे राज्य सरकारांनी स्पष्ट केलं पाहिजे.

एकीकडे राज्याची सरकारे गरीब, बेरोजगार-उपाशी मजूरांना त्यांच्या गावी जाऊ देत नाही, अन्नधान्याची सोय करायला बाहेर पडू देत नाही दुसरीकडे एका पक्षाच्या कार्यक्रमासाठी हजारों कार्यकर्ते रस्त्यावर उतरू देणार आहे का हा सगळ्यात मोठा सवाल आहे. नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रम देताना अधिक जबाबदारीने दिले पाहिजेत. नाहीतर येत्या काळात तुमचा पक्ष राहायचा जीवंत आणि देश आयसीयु मध्ये असायचा.