Home > मॅक्स ब्लॉग्ज > इम्तियाज जलील यांना हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाचं वावडं का आहे?

इम्तियाज जलील यांना हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाचं वावडं का आहे?

इम्तियाज जलील यांना हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाचं वावडं का आहे?
X

१९३८ साली मजलिस इत्तेहादुल मुस्लिमिन या पक्षाचे अध्यक्ष झालेल्या बाहादुर यार जंग यांनी

"आपण मुसलमान आहोत, म्हणजे शासक आहोत आणि आपला जन्म इतरांवर अधिसत्ता गाजवण्यासाठी झाला आहे"

असे तत्वज्ञान मांडले. त्यानंतर डिसेंबर १९४६ साली या पक्षाचा अध्यक्ष झालेल्या कासिम रझवीने या तत्वज्ञानाच्या आधारे आपली सशस्त्र फौज बनवली. त्या फौजेला रझवीच्या नावावरून रझाकार म्हणून ओळखले जाऊ लागले. या रझाकारांनी हे संस्थान भारतात विलीन होऊ नये म्हणून येथील गैरमुस्लिम नागरिकांवर अत्याचार सुरू केले. त्यांच्याविरोधात पोलीस ऍक्शन करून मराठवाडा व हैदराबाद प्रांत भारतात विलीन झाला.

पोलिस ऍक्शननंतर कासिम रझवीला देशसोडून जावे लागले. नंतर मजलिस इत्तेहादुल मुस्लिमिनचे सध्याचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचे आजोबा अब्दुल वाहेद ओवेसी यांनी हा पक्ष चालवला.

"हा पक्ष कासिम रझवीचा नसून अब्दुल वाहेद ओवेसीचा पक्ष आहे, आम्ही कासिम रझवीच्या विचारांशी सहमत नाही"

अशा शब्दात असदुद्दीन ओवेसी यांनी स्पष्टीकरणही दिले आहे.

परंतु मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादचे सध्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी आजच्या मुक्तिसंग्रामाच्या झेंडावंदनाचा शासकीय कार्यक्रमाला दांडी मारली. ते गेले ५ वर्ष हा कार्यक्रम जिथे होतो त्या औरंगाबाद मध्य मतदारसंघाचे आमदार होते. तेव्हाही ते अश्याच प्रकारे मुक्तिसंग्रामाच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला जाणे टाळायचे. त्यांची या कार्यक्रमाला ही सलग पाचव्या वर्षी दांडी आहे. विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी मुंबईत आल्याने झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला आले नसल्याचं इम्तियाज जलील यांच्याकडून सांगण्यात आलं. त्यांना झेंडावंदनापेक्षा पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात खरच ते इतके व्यस्त होते की झेंडावंदनासाठी अर्ध्यातासाचाही वेळ काढू शकले नाहीत?

पण यातून पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित झाला आहे की एमआयएम पक्ष व इम्तियाज जलील कासिम रझवी, रझाकार व निजामशाहीची अस्मिता बाळगतात का? इम्तियाज जलील एकट्या एमएमआयच्या बळावर निवडून आलेले नसुन ते बाबासाहेबांचे नातू बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या ठाम पाठिंब्यावर निवडून आलेले आहेत. इम्तियाज जलीलला सेक्युलर समजून या मतदारांनी मतदान केलं होत, त्यांच्या प्रचारसभेत त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी ठणकावून सांगितलं होत की

"आम्ही रझाकारांच्या विचारांचे मुळीच असू शकत नाही."

त्याला प्रमाण मानून मतदारांनी मतदान केलं होतं. पण जर इम्तियाज जलील निजामशाहीची अस्मिता बाळगत असतील तर आपल्यासोबत विश्वासघात झाला अशी भावना आंबेडकरी मतदारांमधे येऊ शकते.

Updated : 17 Sep 2019 9:04 AM GMT
Next Story
Share it
Top