अरुणास्त !

अरुणास्त !
X

जगण्याची श्रीमंती ज्यांच्या वर्तणुकीतून जाणवू लागते, असे नेतेही क्वचित असतात. अरुण जेटली हे या पाऊलखुणा सोडणारे नेते होते.

राजकारणावर छाप सोडण्यासाठी सत्तेचे सूत्रसंचालन करण्याची हातोटी असावी लागते. ती फारच कमी नेत्यांमध्ये बघायला मिळते. कष्ट, श्रद्धा आणि सबुरीच्या बळावरच ती छाप उमटू शकते. शिवाय जगण्याची श्रीमंती ज्यांच्या वर्तणुकीतून जाणवू लागते, असे नेतेही क्वचित असतात. अरुण जेटली हे या पाऊलखुणा सोडणारे नेते होते. चार दशकांहून अधिक काळ त्यांची राजकीय मुशाफिरी भारताने अनुभवली.

वकिली करता करता राजकारणात आलेल्या अरुण जेटलींचा भाजपच्याच नव्हे, तर राष्ट्रीय राजकारणातील दिग्गज नेत्यांमध्ये समावेश होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास मित्र अशी त्यांची सर्वपरिचित ओळख असली तरी ती मैत्री जेटली यांच्या सरकारी बंगल्यातून अधिक गहिरी झाली. पस्तीस वर्षे ती दोघांनीही टिकवली. मैत्रीचे रूपांतर राजकारणात मोदी यांचे 'चाणक्य' असे झाले. कैकदा ते संकटमोचक ठरले. पुढे-पुढे ती मैत्री 'अमूल्य हिरा' म्हणण्याइतपत बहरत गेली. आणि आज अखेरीस 'अत्यंत जवळचा मित्र गमावला..' हे मोदी यांचे शब्द मैत्रीची हळवी लकेर उमटवून गेले.

जेटली भाजपच्या दुसऱ्या फळीचे नेते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. पण त्यांची राजकीय मुत्सद्देगिरी ठसली ती मोदी यांच्या मंत्रिमंडळात! ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राष्ट्रीय राजकारणात आले. त्यांच्या आईने त्यांनी वकील व्हायचे स्वप्न पाहिले होते, ते त्यांनी सुवर्णपदकासह पूर्ण केले. प्रारंभी दिल्ली उच्च न्यायालयात आणि पुढे सर्वोच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली. २००९ नंतर त्यांनी वकिलीला गुडबाय केला. जेटली यांचे वडील महाराज कृष्ण वकिली करत होते. ते विभाजनानंतर लाहौरहून भारतात परतले होते. आता तिसरी पिढी हा पेशा सांभाळते. अर्थात, हे माहीत असलेले पैलू!!

पण, जगण्याचा थाट श्रीमंत करण्याचा छंद त्यांना होता. ते जगात फिरले. पण भारतात जे-जे अव्वल असेल ते आपल्याकडे हवे असे त्यांना वाटे. हा हव्यास नक्कीच नव्हता. त्याला आनंदाची जोड होती. कुटुंबवत्सलतेची छटा होती. खरेतर त्या गोष्टी खूप साध्या होत्या. देशातील सर्वात आलिशान चारचाकी आपल्याकडे असावी. नजर पडताच बघतच राहावे, असे घड्याळ मनगटावर दिसावे, चकाकी असलेली पेन... आणि तेवढीच जीव देणारी उमदी मैत्रीही असावी! त्यांचा हा शौक उत्तरोतर वाढतच गेला. त्यांचे हे शौक भाजपातील बड्या नेत्यांना ठाऊक होते. अटलजींच्या मंत्रिमंडळात असताना त्यांच्या दालनात सर्व प्रकारची घड्याळे आणि पेन्स भेट म्हणून येत. त्या वस्तू ते जवळच्या मित्रांना भेट देत.

नरेंद्र मोदींचा राष्ट्रीय राजकारणातील उदय जनतेला सर्वार्थाने २०१४ मध्ये अथवा २०१३ च्या मध्यास जाणवू लागला. पण जेटलींना 'मोदी के आदमी' ही ओळख दिल्लीत राम जन्मभूमी आंदोलनापासून मिळू लागली. मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते, तेव्हा त्यांना ९०च्या दशकाअखेरीस भाजपच्या महासचिवपदाची जबाबदारी सोपवली गेली. त्या काळी मोदी हे दिल्लीत ९, अशोक रोड या जेटली यांच्या सरकारी बंगल्यात मुक्कामी होते. या बंगल्याच्या आवारात एक स्वतंत्र क्वार्टर होते, तिथे मोदी राहत असत. त्यावेळी वाजपेयी सरकारमध्ये जेटली मंत्री होते.

काळ बदलत गेला. केशुभाई पटेल यांच्या राजीनाम्यानंतर मोदी यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी भाजपात मंथन सुरू झाले. पण एकमत होत नव्हते. त्या क्षणी मोदींसाठी जेटलींनी मैत्री निभावली. दिल्लीच्या राजकारणातील उभ्या- आडव्या आणि सरळ चाली तेव्हा जेटली यांनी फेकल्या.

इतिहास असे सांगतो की गुजरातमध्ये दंगली उसळल्यानंतर भाजपात मोदीबद्दल वेगळा सूर आळवला गेला. पण दिल्लीचा मोर्चा सांभाळायला जेटली अत्यंत खंबीरपणे मोदींच्या पाठीशी होते. त्याच वेळी म्हणजे २००२ मध्ये जेटली गुजरातमधून राज्यसभेवर निवडून आले. गुजरातचा राजकीय अनुभव पाहून, पक्षात जेटली नावाचा 'नवा चाणक्य' दिसू लागला. नंतरच्या वर्षी मध्य प्रदेशात भाजपात खळखळ सुरू झाली. २००४ मध्ये उमा भारतींच्या जागी शिवराजसिंह चौहान यांना बसविण्याची किमया जेटलींनी पार पडल्याचे बोलले गेले. जुने- नवे-मध्यम आणि नवखे असे सगळेच राजकीय पदर जेटली यांनी नीट सांभाळले.

सर्वमान्य पण धूर्त चाली तर राजकारणाचा पाया असतो. तिथून जेटली यांची सुरुवात व्हायची. अटलजी-अडवाणी-महाजन.. असे सगळेच तेव्हा जोरात होते. तीत जागा करून जेटली खेळी खेळत. स्वत:चा राजकीय गट त्यांनी तयार केला. संघटनेत, बाहेर आणि प्रशासनातही!

अनपेक्षित पण कायद्याचा बडगा दाखविणाऱ्या अशा अनेक चाली जेटली खेळत. निर्मला सीतारामन, पीयूष गोयल व धर्मेंद्र प्रधान हे मंत्री जेटली यांचे खास आहेत. दिल्लीत त्यांच्यावर ‘अपना’ असा शिक्का आहे. अर्थमंत्रिपद सीतारामन यांना देताना त्यांनीही जेटली स्कूलचा दाखला जाहीरपणे दिला आहे. संघटनेत अडचणीच्या काळात फक्त जेटली, हाच मार्ग शिल्लक ठेवला. त्यामुळेच कितीही हुशार पक्ष प्रवक्ता असला तरी कठीण विषयावर जेटली यांच्या सल्ल्याशिवाय कुणीच बोलत नसत. प्रकाश जावडेकर यांनी एकदा त्यांना ‘सुपर स्ट्रॅटजिस्ट’ म्हटले होते.

विषय कोणताही असो, जेटलींना वगळून तो पुढे जात नाही. सरकारचे धोरण, योजना असोत की विरोधकांची टीका सर्वत्र जेटली दिसायचे!! राफेलचा व्यवहार असो, तेलाच्या भडकलेल्या किंमती असोत अथवा जीएसटीमधील क्लिष्टता असो.. जनतेला समजेल इतके सोपे करून सांगण्याची विलक्षण हातोटी त्यांच्यात होती. मग, यावेळी ते मोदींचे 'संकटमोचक' ठरत. सगळा देश मोदी-मोदी करत असताना मोदींचे खास असलेले जेटली २०१४ ची निवडणूक अमृतसरमधून हरले होते. तेव्हा ते कमालीचे दु:खी होते. विरोधक आणि पक्षातील नावडत्या गटाने त्यांच्यावर टीकाही केली होती. पण मोदींनी त्यांना मंत्री केले. जाणकार असे म्हणतात, ते मंत्रिमंडळ जेटली यांच्याच सल्ल्याने झाले होते.

संवादातील माधुर्य आणि मोकळेपणा हा, जेटलींचा विशेष गुण. पत्रकार व जेटली यांच्यातील संवाद अत्यंत सलोख्याचा असे. बरेच पत्रकार त्यांच्या इंग्लिश शब्दाचा नेमका अर्थ शोधत. त्यांनी उच्चारलेला शब्द कैकदा कायदा किवा कॉर्पोरेट या शब्दावलीतील पाहुणा असे. विविध छटा त्याला असत.

कधी चालत - बोलत तर कधी थेट पत्रकार परिषद घेऊन ते भूमिका मांडत. त्यामुळे ते खूपदा टीकेचे लक्ष्य ठरत. भाषा जगण्याचा आत्मा आहे, शब्द जपून वापरा, अशी तंबी त्यांनी सर्वांदेखत अनेकांना दिली. इंग्रजी, हिंदी, पंजाबी, सिंधी, हरियाणवी, भोजपुरी आणि काही प्रमाणात संस्कृत भाषा त्यांना मुखोद्गत होत्या. तरीही ते हिंदीतून अलवार इंग्लिशमध्ये प्रवेश करत. मोदी सरकार आले तेव्हा मंत्रिमंडळातील निर्णयांसाठी पत्रकार परिषद होत असे. जेटली हमखास इंग्लिशमधून बोलणार असे ठरले होते. दोन परिषदा झाल्यावर सर्वांनी हिंदीतून पत्रकार परिषद घ्यावी, असे फर्मान निघाले. तेव्हा, जेटली अर्थविषयक हिंदी शब्द शोधून-शोधून आणीत.

अभाविपची अनेक आंदोलने त्यांनी जम्मूत केली. ते तेव्हा परिषदेचे अखिल भारतीय सचिव होते. जम्मू-कश्मीरमध्ये कलम 370 व 35 ए काढून टाकण्याची त्यांची विद्यार्थी दशेपासून मागणी होती. योगायोग पाहा, जेटली हे काँग्रेसचे दिग्‍गज नेते गिरधारीलाल डोगरा यांचे जावई होते. एक दिवस जम्मूत 370 विरुद्ध आंदोलन करताना जेटली यांना डोगरा यांनी पहिले होते. त्यानंतर अनेक वर्षांनी डोगरा यांचे जेटली जावई झाले. भाजपचे दिग्गज नेते आकाशातील तारे निखळावेत तसे लोप पावत आहेत. जम्मू-काश्मीरमधून 370 कलम काढून टाकण्याचा ध्यास घेतलेले सुषमा स्वराज आणि अरुण जेटली हे दोन्ही नेते 370 वगळल्यानंतर आपल्यातून गेले. एक ध्यासपर्व लोपले. भाजपच्या आभाळातील अरुणाचा अस्त झाला.

रघुनाथ पांडे

कार्यकारी संपादक, एएम न्यूज

Updated : 24 Aug 2019 2:28 PM GMT
Next Story
Share it
Top