Home > मॅक्स ब्लॉग्ज > व्यापाऱ्यांच्या वह्या आणि हनुमानाचा लंगोट

व्यापाऱ्यांच्या वह्या आणि हनुमानाचा लंगोट

व्यापाऱ्यांच्या वह्या आणि हनुमानाचा लंगोट
X

पोथीपुराणात लिहिलंय - ज्या दिवशी रावणाचा पराभव करून राम अयोध्येत आले, त्यादिवशी अयोध्या नगरी रोषणाईनं उजळून निघाली. दीपावलीचं हे पर्व अनंतकाळ साजरं केलं जाईल. याच पर्वात व्यापारी हिशेबाच्या वह्या बदलतात आणि त्या लाल रंगाच्या कपड्यात बांधल्या जातात. प्रश्न असा आहे की, रामाच्या अयोध्येत येण्याचा आणि हिशेबाच्या वह्या बदलण्याचा काय संबंध? आणि हिशेबाच्या वह्या लाल कपड्यातच का बांधल्या जातात?

तर त्याची गोष्ट अशी की, रामाच्या अयोध्येत येण्याच्या बातमीनं व्यापारी वर्गात खळबळ उडाली. म्हणू लागले, 'शेटजी, आता अवघड आहे. भरताच्या राज्यात गोष्टी निभावून गेल्या. पण राम मर्यादापुरुषोत्तम आहेत. त्यांना टॅक्सचोरी रुचणार नाही. ते आपल्या हिशेबाच्या वह्यांची चौकशी करतील आणि आपल्याला शिक्षाही होऊ शकेल.'

एक व्यापारी म्हणाला, 'आपल्या दोन नंबरचे धंदे उजेडात येतील.'

अयोध्या नगरी रामाच्या स्वागताची तयारी करत असताना व्यापारी वर्गात मात्र घबराट पसरली होती.

अयोध्येत पोहोचण्याच्या आधीच रामाला कल्पना आली होती की, तिकडं काहीतरी जुमला आहे. त्यांनी हनुमानाला बोलावून घेतलं आणि म्हणाले, 'हे बघ पवनसुता, आपण लंकेत युद्ध जिंकलं, पण अयोध्येत आपल्याला रावणापेक्षा मोठ्या शत्रूचा सामना करायचा आहे - तो म्हणजे व्यापारी वर्गाचा भ्रष्टाचार. मोठमोठ्या वीरांचा व्यापाऱ्यांसमोर निभाव लागलेला नाही. तुम्ही शक्तिमान आणि बुद्धीमान आहात. मी तुमची सक्तवसुली संचालनालयाचे (ED) संचालक म्हणून नियुक्ती करतो. तुम्ही अयोध्येत पोहोचल्यावर व्यापाऱ्यांच्या हिशेबाच्या व्यवहारांची चौकशी करा. खोट्या गोष्टी शोधून काढा आणि संबंधितांना कठोरातलं कठोर शासन करा.'

इकडं व्यापाऱ्यांच्यातही खळबळ उडाली. म्हणाले आता मरण अटळ आहे. हनुमानजींना ईडीचं संचालक नेमलंय. खूप कडक आसामी आहे. लग्न नाही. मुलंबाळं नाहीत. लाच घेणारे नाहीत.

व्यापाऱ्यांचे कायदा सल्लागार एकत्र बसून विचार करू लागले. त्यांनी ठरवलं की हिशेबाच्या वह्या बदलल्या पाहिजेत. चेंबर ऑफ कॉमर्समार्फत संपूर्ण राज्यात ऐन दिवाळीत हिशेबाच्या वह्या बदलण्याचा आदेश गेला. तरीसुद्धा व्यापारी वर्गाची धाकधूक होतीच. कारण हनुमानाला धोका देणं एवढं सोपं नव्हतं. ते बुद्धिमान होते. त्यांना कसं खुश करायचं? चर्चा सुरू झाली-

- हात गरम करून काम भागणार नाही?

- एका पैशाचा मोह नाही.

- ते नसतील घेत, पण मेमसाब?

- त्यांना मेमसाब नाही. साहेबांनी मॅरेज नाही केलं. जवानी लढाईमध्ये खर्च केली.

- काही वेगळे शौक असतील? दारू आणि बाकीचे?

- बालब्राह्मचारी आहेत. कॉलगर्लला मार खाऊन यावं लागेल. संयमी एकदम.

- मग काय करायचं?

- तुम्हीच सांगा, काय करायचं?

एका शहाण्या वकीलानं सल्ला दिला- बघा, माणूस जितका मोठा तितकी त्याला चापलुसी आवडत असते. हनुमानाची कुठं संपत्ती नाही. ते शरीरावर शेंदूर फासतात आणि लाल लंगोट बांधतात. ते सर्वहारा आहेत आणि सर्वाहारांचे नेते. त्यांना खुश करणं सोपं आहे. व्यापाऱ्यांनी हिशेबाच्या वह्या लाल रंगाच्या कपड्यात बांधून ठेवाव्यात. रातोरात वह्या बदलल्या आणि त्या लाल रंगाच्या कापडात बांधल्या गेल्या.

अयोध्या रोषणाईनं झगमगून निघाली. राम-सीता-लक्ष्मण याना पंचारतीनं ओवळलं गेलं. व्यापारी वर्गानंही जोरदार स्वागत केलं. त्यांनी हनुमानाभोवती गर्दी करून त्यांचा जयजयकार केला.

दुसऱ्या दिवशी हनुमान काही पोलिसांना घेऊन अयोध्येच्या बाजारपेठेत पोहोचले. पहिल्या व्यापाऱ्याजवळ गेले. हिशेबाच्या वह्या दाखवण्याचा हुकूम केला. व्यापाऱ्यानं लाल कापडात गुंडाळलेल्या वह्या समोर ठेवल्या. हनुमानाने पाहिलं - वह्या गुंडाळलेलं कापड आणि आपला लंगोट एकाच रंगाचा आहे. खुश झाले. म्हणाले, 'माझ्या लंगोटाच्या कापडात हिशेबाच्या वह्या बांधता?'

व्यापारी म्हणाला, 'हो. हे शक्ती आणि बुद्धीच्या देवा, आम्ही तुमचे भक्त आहे. तुमची पूजा करतो. तुमचे निशाण हेच आमचे निशाण मानतो.

हनुमानाला भरून आलं...

व्यापारी म्हणाला, 'वह्या सोडू? हिशेब तपासा.'

हनुमान म्हणाले, 'राहू दे. माझा भक्त बेईमान असू शकत नाही.'

हनुमान जिथं गेले तिथं त्यांना लाल लंगोटाच्या कापडात वह्या गुंडाळलेल्या दिसल्या. एकदम खुश झाले. त्यांनी कुणाच्याही हेशेबाची तपासणी केली नाही. प्रभू रामचंद्राना रिपोर्ट दिला की, अयोध्येतील व्यापारी इमानदार आहेत. सगळे हिशेब चोख आहेत.

हनुमान जगातले पाहिले साम्यवादी होते. ते कष्टकरी श्रमिकांचे नेते होते. त्यांचाच लाल रंग साम्यवाद्यांनी घेतलाय. पण, आपल्या लंगोटानं धनिक लोक हिशेबाच्या वह्या बांधणार नाहीत, यासाठी कष्टकरी श्रमिकांच्या नेत्यानं सावध राहिलं पाहिजे.

हरिशंकर परसाई

साभार, अनुवाद : विजय चोरमारे, वरिष्ठ सहाय्यक संपादक, महाराष्ट्र टाईम्स

(अनुवादकाची टिपणी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लाल रंगात अर्थसंकल्प सादर केला याच्याशी या कथेचा संबंध नाही. परसाई यांनी खूप वर्षांपूर्वी हे लेखन केले आहे.)

Updated : 8 July 2019 5:39 AM GMT
Next Story
Share it
Top