डोंबिवलीतला शस्त्रास्त्र साठा – ‘कुलकर्णी’ आणि महाराष्ट्र …

2710

महाराष्ट्राच्या राजधानीजवळील डोंबविली भागात धनंजय कुलकर्णी या भाजपचा पदाधिकारी असणा-या उच्चवर्गीय कुटूंबातील व्यक्तीजवळ घातक शस्त्रांचा मोठा साठा सापडल्याची घटना नुकतीच घडली. शिवाय न्यायालयात हजर केल्यानंतर चौकशी साठी पोलीस कोठडी ऐवजी तात्काळ न्यायालयीन कोठडी देण्याचा आश्चर्यकारक प्रकारही घडला !

एखादा गुन्हा घडला की त्यातील आरोपीचा जात वा धर्म पाहून टिका करणे किंवा तो आरोपीच्या ज्या जाती धर्माचा आहे हे पाहून त्या सबंध जातीस वा धर्मास आरोपीच्या पिंज-यात उभे केले जाते आणि हे असे भाजपा या पक्षाचे समर्थक मोठ्या प्रमाणावर करताना आढऴून आले आहेत. माजी राष्ट्रपती हमिद अन्सारी, अभिनेता नसरूद्दीन शहा यांनी तर आजीबात कांहीही वावगे बोलले नसताना देखील त्यांचा जात धर्म उल्लेखून त्यांना देशद्रोही ठरवले गेले. या अशा प्रकारांना बळ देणा-या भाजप समर्थकांची डोंबिवलीतील प्रकरणात मात्र गोची झाली आहे. कारण एरवी इतरांच्या बाबत अशाच पद्धतीने विद्वेष पसरवणाचे इमानेइतबारे काम करणा-या भाजपसमर्थकांच्या लाडक्या पक्षाचा पदाधिकारी यात आरोपी आहे. त्यामुळे भाजपाच्या एकूनच राजकीय विचारधारेवर आणि आरोपीच्या कुलकर्णी आडनावावरून व त्याच्या जातीवरून सर्वत्र टिका होते आहे!

विवेकवादी विचारधारेत गुन्हेगाराच्या जातीवरून वा धर्मावरून सरसकट त्याच्या जातीच्या सर्वांना तोलू नये, हे बरोबरच आहे पण असा बचावाचा युक्तीवाद करण्याचा अधिकार भाजपच्या समर्थकांना खराच आहे काय? हा मोठा प्रश्न आहे! कारण हा अधिकार त्यांनी केंव्हाच गमावला आहे! आजपर्यंत आरोपीच्या जाती वरून वा धर्मावरून त्याला तात्काळ हिंदुद्रोही वा देशद्रोही ठरवून, त्याच्या संपुर्ण समाजाला बदनाम करण्याचे जे विद्वेषाचे वाईट वृत्तीचे बीज यांच्याकडून रोवले गेले तेच आज सर्वत्र दिसत आहे. कुलकर्णी आडनावावरून टिका होण्यास कोण कारणीभूत आहे? याचा साकल्याने विचार जे अशा टिकेने अस्वस्थ होत आहेत त्यांनी जरूर करायला हवा! शस्त्रास्र प्रकरणात कोणी इतर धर्मीय आरोपी असता तरीही त्याच्या धर्मावरून होणा-या टिकेला संयुक्तीत ठरवता येत नाही मात्र धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण खेळणा-या भाजपाला ही अपेक्षाही व्यक्त करण्याचा अधिकार नाही!

‘बहु असोत सुंदर संपन्न की महान, प्रिय अमुचा एक देश महाराष्ट्र हा’ असे वर्णन असणा-या ज्ञानोबा, नामदेव, एकनाथ, तुकाराम, शाहु, फुले, रानडे, आगरकर, गाडगेबाबा, आंबेडकर,विनोबाजी, सानेगुरूजी यांच्या महाराष्ट्रात विद्वत्तेचा आणि ज्ञानाचा दंभ मिरवणारे व स्वत:ला सुसंस्कारीत म्हणवणारे लोक गुन्हेगारी टोळीतल्या एखाद्या गुंडाप्रमाणे शस्त्रांस्त्राचा साठा करू लागले आहेत ही महाराष्ट्रासाठी अक्षरश: लाजीरवाणी बाब आहे आणि तितकीच निषेधार्हही आहे.हेच लोक या देशाला हिंदु धर्म आणि संस्कृती शिकवण्याचा मक्ता असल्याप्रमाणे वागतात आणि धार्मिकतेचे-देशभक्तीचे राजकीयदृष्ट्या स्वार्थी मापदंड निर्माण करताना दिसतात.

काश्मिरमधील भारतीय जनतेच्या हातातील ‘पत्थरांना’ पाहून त्यांना तात्काळ देशद्रोही वा आतंकवादी ठरवतात पण स्वत: मात्र चक्क शस्त्रांचा साठा करत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक दंगली घडवून राजकीय मतांची पोळी भाजण्याची ही पुर्वतयारी आहे, मग खरे आतंकी कोण हे समजायला कोणत्याही पुराव्याची गरज नाही! या अतिरेकी आणि असामाजिक तत्वांचा बंदोबस्त करण्यासाठी, अशा वृत्तीस पाठीशी घालणारे राज्यातील आणि केंद्रातील सरकार सत्तेवरून पायउतार करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील सुजाण जनतेची आहे.

महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबा यांची थोर आध्यात्मिक व वैचारिक परंपरा आहे .जिजाऊ आणि शिवराय यांची अठरापगड जातीधर्माच्या लोकांना घेऊन रयतेचे स्वराज्य निर्माण करणारी शूरांची परंपरा आहे. फुलेशाहूआंबेडकर आणि आगरकर यांची चिकित्सेची आणि विवेकवादी परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या सारख्या द्रष्ट्या नेत्याच्या कार्यकर्तृत्वातून हा महाराष्ट्र उभा आहे. याची स्पष्ट जाणीव या दांभिंक धर्मांधांना करून देण्याची कधी नव्हे इतकी निकड आज निर्माण झाली आहे.

गांधी , नेहरू आणि आंबेडकर या तिन्ही दृष्ट्या नेत्यांचा भारतीय जनतेच्या सुजाणपणा व शहाणपणा यावर पूर्ण विश्वास होता. या विश्वासाच्या बळावर भारताने मोठी झेप घेतली आहे. या विश्वासाला भारतीय जनतेनेसुद्धा कधीही तडा जाऊ दिला नाही हे आजवरचा इतिहास सांगतो. तो विश्वास पुन्हा एकदा सार्थ करण्याची जबाबदारी आता महाराष्ट्रातील जनतेची आहे. कोणत्याही धर्मातील एकोपा व खेळीमेळीत राहू इच्छिणाऱ्या , इतर धर्मियांचा आदर करणाऱ्या सुजाण लोकांना त्यांच्या धर्मांतील कट्टरतावाद्यांकडूनच सर्वात जास्त नुकसान होते हे आजच्या डोंबिवलीत जप्त केलेल्या शस्त्रास्त्र साठ्याने सिद्ध केले आहे. सर्वच बाजूच्या धर्मांध व फुटीरतावादी लोकांना सुजाण लोकांनीच भिरकावून दिलं तरच हे भीषण षडयंत्र निपटून टाकता येईल. दुसऱ्या जाती धर्मांतील लोकांबद्दल संशय, द्वेष, भीती निर्माण करणे हेच यांचे प्रमुख हत्यार असते. या उन्मादी धर्मांध लोकांची चाल आपण सुजाण नागरिकांनी वेळीच ओळखून निष्प्रभ केली पाहिजे! अन्यथा येणारा काळ अापल्याला माफ करणार नाही.

डोंबिवलीतील घटना सुंपुर्ण समाजाला चिंतन करायला लावणारी आहे. ब्राह्मण समाज म्हणजे कधी काळी भारतीय समाजातील ज्ञानी, विचारी आणि योग्य अयोग्य याचं मार्गदर्शन करणारा’ असा समज आपल्याकडे पारंपारीकपणे प्रचलित आहे, पण देशभक्तीच्या नव्याच व्याख्या करणा-या ‘अच्छे दिनांत’ ज्ञानी म्हणवल्या जाणा-या कांही ब्राह्मणांची अवस्था संघाच्या आणि भाजपाच्या दावणीला बांधलेल्या निर्बुद्ध जनावरांसारखी करून टाकली आहे, हे खूप गांभिर्यपुर्वक मांडतो आहे. सरसकटपणे संपुर्ण ब्राह्मण समाजास मी दोष देत नाही परंतु स्वत:ला अभिमानाने ब्राह्मण म्हणवून घेणारे कांही जण तर नुसते बैल नव्हे तर अगदी शहामोदींच्या तालावर नाचणारे नंदीबैल झाल्याचे मी स्वत: अनेक प्रसंगात अनुभवले आहे. कुविचाराच्या प्रादुर्भावाने दुषित झालेल्या देशातील सर्वच समाजातील कांही धर्मांधाचा मेंदू केंव्हा स्वच्छ होईल हे त्या ब्रह्मदेवालाच माहित!

राजकीय मतभेद असले तरी व्यक्तीगत संबंधात द्वेष करू नये, या मताचा असणारा मी व्यक्ती आहे. परंतु माझ्या आईवडिलांकडील एरवी प्रिय वाटणा-या नातेवाईकांत व मित्रमंडऴीत वावरताना उच्चविद्याविभुषित आणि सुसंस्कृत म्हणवून घेणा-या अनेकांना अनेक धादांत खोट्या आणि वेडगळ बाबींचे समर्थन करताना अनुभवले आहे.ज्यांना मी ज्येष्ठतेने आजोबा, काका, मामा म्हणतो त्यांनाही राजकीय विरोधकांचा मत्सर करताना ऐकलं आहे. दात ओठ खाऊन, द्वेषानं वेडं होऊन शस्त्रांत्रांचा हव्यास करत मनी हिंस्त्र होताना पाहीलंय! डोंबिवलीतले महानुभाव तर या विद्वेषी भावनेच्या हिमनगाचं निव्वळ एक टोक आहेत. अनेक मोदीभक्त संघवादी लोकांच्या मनातील हिंसेबद्दलची आत्मियता, जीव्हाळा, ओढ व आपुलकी वारंवार सोशल मेडीयावरतीही प्रदर्शित होताना अनेकांनी पाहीली आहे !

आज निवडणुकीच्या तोंडावर समाजात अशांतता व अस्थैर्य निर्माण करणाऱ्या कुटील शक्ती जागृत झाल्या आहेत. हा महाराष्ट्र वा भारतदेश ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले ‘असं म्हणणाऱ्या संत ज्ञानेश्वर ‘कुलकर्णी’ यांचा महाराष्ट्र आहे. डोंबिवलीतल्या कोण्या कुकर्मी कृत्याचा आरोप असणा-या कुलकर्ण्याचा आजीबातच नाही आणि हा महाराष्ट्र अशा दांभिकाचा कधी होणारही नाही !

राज कुलकर्णी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here