Home > मॅक्स ब्लॉग्ज > आपण कष्टकऱ्यांचा वाटा विसरलो आहोत का?

आपण कष्टकऱ्यांचा वाटा विसरलो आहोत का?

आपण कष्टकऱ्यांचा वाटा विसरलो आहोत का?
X

गेल्या काही दिवसात कष्टकऱ्यांची जी काही जीवघेणी फरपट होत आहे. त्यातून समाज म्हणून या कष्टकरी वर्गाविषयी हवी तशी संवेदनशीलता उर्वरित समाजात दिसून आली नाही. या संवेदनशीलतेच्या अभावाचं मुळ म्हणजे आपल्याकडं असलेला Dignity of Labour चा प्रचंड अभाव. कोणतंही कष्टाचं काम हे हलके काम आहे. हे आपल्या मनात इतके खोलवर रुजले आहे की, अनेकदा प्रयत्न करूनही आपण श्रमाला आणि श्रमिकाला प्रतिष्ठा देण्याबाबत कमी पडतो. म्हणून आता समाज म्हणून आपल्याला कष्टाला प्रतिष्ठा देण्यासाठी कष्ट उचलावे लागणार आहेत.

मुख्य म्हणजे आपली जी भावी पिढी आहे. या पिढीमध्ये लहानपणापासूनच श्रमप्रतिष्ठा रुजवावी लागेल. माझ्या वाचनात आलेली दोन पुस्तके यासाठी मला महत्त्वाची वाटतात. पहिले पुस्तक म्हणजे कांचा इलाया यांनी लिहिलेलं Turning the pot, tilling the land: Dignity of labour in our times. तर दुसरे पुस्तक म्हणजे अनिल अवचट यांनी लिहिलेलं पुण्याची अपूर्वाई.

कांचा इलाया यांनी खास मुलांसाठी पुस्तक लिहिले आहे. आपल्याकडे बऱ्याचदा कुठले आंदोलन होत असताना निषेध म्हणून बूटपॉलिश वगैरे करण्याचा प्रकार केला जातो.

हा प्रकार घडताना आपल्याला काहीच वावगे वाटत नाही. कारण बूटपॉलिश हे अत्यंत खालच्या दर्जाचे काम आहे. हे आपण मान्य केलेले असते. हे सगळंच आपल्या मुलांवर आणि आपल्यावर ही परिणाम करणार असतं. म्हणून चपला बूट बनवणे आणि दुरुस्त करण्याचं काम असेल, मातीची भांडी बनवण्याचे काम असेल, केस कापण्याचे काम असेल, गाई-म्हशी पाळण्याचे काम असेल, कपडे शिवण्याचे काम असेल, शेतीचं काम असेल अशी ही अनेक कष्टाची कामे खरंतर Skilful Work आहेत.

त्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे. पण बलुतेदारीच्या जन्माधिष्ठित पद्धतीने या कष्टकऱ्यांचे शोषण तर झालेच, सोबतच त्यांची काम हलकी असण्याची संस्कृती रूढ झाली.

कांचा यांनी आपल्या पुस्तकात अशा वेगवेगळ्या व्यवसायामागची क्रिएटिव्हिटी उलगडून दाखवत पारंपरिक समज खोडून काढला आहे. आणि आपल्या अर्थव्यवस्थेत या कष्टकऱ्यांचे स्थान किती महत्त्वाचे आहे हेही सांगितले आहे. तर अनिल अवचट यांनी त्यांच्या पुस्तकात पुण्याची एक वेगळी बाजू मांडली आहे. पेठांचे पुणे, डेक्कन जिमखाना, कोथरूड हा पश्चिम पुण्याचा भाग हेच नेहमी आपल्यावर पुण्याचे वैशिष्ट्य म्हणून ठसले आहे. पण याही पलीकडे पुण्यामध्ये कष्टकऱ्यांचा एक मोठा वर्ग आहे.

खरं तर महात्मा फुलेंनी पुण्याच्या याच पूर्व भागाचे प्रतिनिधित्व केले. अवचटांनी हे पुस्तक अर्पण करताना म्हटलंय की 'पुण्यातल्या तमाम बकाल वस्त्यांना जिथे राहतात खरेखुरे पुणेकर'. पितळेवर अफलातून काम करणारे ओतारी, बोहरी आळीतले धारवाले, नेहरू चौकातले भडभुंजे, जुन्या दुर्मिळ वस्तू दुरुस्त करून जुन्या बाजारात विकणारे कारागीर, लाकडावर कोरीव काम करणारे सुतार असं पुण्यातलं कष्टकऱ्यांच्या एक वेगळे जग या पुण्याच्या अपूर्वाईतून अवचटांनी मांडलं आहे.

मानवी आयुष्य सुकर करण्यामध्ये आणि जगाच्या उभारणीत डॉक्टर, इंजीनियर, संशोधक, शिक्षक, राजकारणी, लेखक आणि सर्व क्षेत्रातील तज्ञ यांचा जितका वाटा आहे तितकाच वाटा या सर्व कष्टकऱ्यांचा आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे.

सार्वत्रिक अस्वस्थता संपवण्यासाठी, रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी, जग खरोखर सुखी आणि सुंदर बनवण्यासाठी हे करणे गरजेचे आहे.

अभिजित कांबळे यांच्या फेसबूक वरुन साभार

Updated : 18 May 2020 9:00 AM GMT
Next Story
Share it
Top