Home > मॅक्स ब्लॉग्ज > अहमदनगर : ‘ना’ 'त्या' चं राजकारण

अहमदनगर : ‘ना’ 'त्या' चं राजकारण

अहमदनगर : ‘ना’ त्या चं राजकारण
X

अहमदनगर महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला पाठिंबा दिला आणि राज्यात आगामी काळात सत्तेची गणितं बदलणार का? याची चर्चा सुरू झाली. मात्र, मला असं वाटतं या चर्चे अगोदर आपण या जिल्ह्याचं राजकारण समजून घ्यायला हवं.किंवा हे पहिल्यांदाच घडतंय का? हे पण जाणून घ्यायला हवं.

अहमदनगर जिल्हा म्हणजे काना, मात्रा, वेलांटी, उकार नसलेला जिल्हा. मात्र, या जिल्ह्याचे राजकारण नावाप्रमाणे इतकं साधं नाही. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा जिल्हा एकेकाळी कम्युनिष्टांचा गड समजला जायचा. आता हा जिल्हा सहकाराची पंढरी म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याने महाराष्ट्राला सहकार दिला आणि याच सहकाराला जोडून आलेलं राजकारण देखील. अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे आणि थोरात घराण्याचं मोठं नावं आहे. या दोन घराण्याबरोबरच काळे, कोल्हे, राजळे, गडाख, तनपुरे, घुले, पाचपुते असे साखर सम्राट असलेले राजकारणी आहेत. मात्र, या साखर सम्राटातील बहुतेक घराणे विखे अथवा थोरात गटाशी विभागले गेलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे राजकारण या दोन्ही घराण्याभोवती फिरत असते. अहमदनगरच्या राजकारणात पक्ष कधीच महत्वाचा नव्हता. नात्याचे राजकारण आणि पाडापाडीचे राजकारण हे या जिल्ह्यातील राजकारणाचं वैशिष्ट.

शालिनी विखे, अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष

नुकत्याच पार पडलेल्या अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला पाठींबा दिल्यानं राज्यात आगामी काळात सत्तेची गणितं बदलतील अशी चर्चा सुरु आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात अशी अभद्र युती होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २००७ साली राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या. यावेळी विखे गटाला अडीच वर्षे अध्यक्ष पद आणि विखे गटानंतर थोरात गटाला अडीच वर्षे अध्यक्ष पद असा फॉर्म्युला ठरला. मात्र, अडीच वर्षानंतर विखे गटाने थोरात गटाला अध्यक्ष पद दिलं नाही.त्यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे उमेदवार सध्याचे युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे होते. पक्षाने तांबे यांना मतदान करण्यासाठी कॉंग्रेस जिल्हा परिषद सदस्यांना व्हीप देखील बजावला होता.

मात्र, राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वत:च्या गटातील जिल्हा परिषद सदस्य तसंच विरोधी पक्षातील सदस्यांच्या मदतीने शालिनी विखे यांना निवडून आणले. त्यानंतरही त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्याचं पुढे काय झाले? त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात पक्ष निष्ठेपेक्षा पुढारी निष्ठा महत्वाची असल्याचं सिद्ध झालं.

राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, सत्यजीत तांबे

आता जर आपण अहमदनगर शहराचा विचार केला तर अहमदनगर शहरात शिवसेनेचे माजी आमदार अनिल भैय्या राठोड विरुद्ध सर्व अशी परिस्थीती सध्या आहे. कारण सध्याचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी शिवसेना वगळता भाजप आणि कॉंग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्याला आपली मुलगी दिली आहे. ज्या राष्ट्रवादीच्या आमदार संग्राम जगताप यांनी भाजपचा महापौर करण्यासाठी टेकू दिला. ते आमदार संग्राम जगताप हे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे जावई असून जगताप यांनी आपल्या सासऱ्याची या निवडणुकीत मदत केली आहे. असंच एकंदरीत बोलंलं जात आहे.

भानुदास कोतकर आमदार कर्डीले यांचे व्याही

वास्तविक पाहता या नात्यांचा कर्डिले यांना मोठा फटका बसला असून त्यांना मंत्रीपदाला मुकावं लागलं आहे. कारण राज्यमंत्रीमंडळाच्या विस्तारात भाजपच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यातून कर्डीले यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, कर्डीले यांची एक मुलगी ज्या केडगाव येथील कॉंग्रेसचे नेते भानुदास कोतकर यांच्या घरात दिली आहे. त्याच भानुदास कोतकर आणि त्यांच्या मुलांनी मिळून अशोक लांडे या व्यक्तीचा खून केल्याचं न्यायालयात सिद्ध झालं आहे. मात्र, या खटल्यात शिवाजीराव कर्डीले यांचे नाव आल्यानं त्यांचं मंत्रीपद हुकल्याचं बोलले जात आहे. पुढे या खटल्यात शिवाजीराव कर्डिले यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाही म्हणून त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली. अशा प्रकारे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षात आपली एक मुलगी देऊन सत्तेचं गणित जमवलं आहे.

थोडक्यात अहमदनगर शहरात 'मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांचे पाहुणे’ अशा पद्धतीचं राजकारण असल्यानं नागरिकांनी या नात्याच्या राजकारणापेक्षा शिवसेनेला वारंवार पसंती दिल्याचं दिसून येते. त्यामुळेच शिवसेनेचे माजी आमदार अनिल भैय्या राठोड परप्रांतीय असून देखील अहमदनगर शहरात अहमदनगरवासियांनी सलग २५ वर्षे निवडून दिलं. अनिल भैय्या राठोड यांचा २०१४ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी ३ हजार ३१७ मतांनी पराभव केला होता. त्याच संग्राम जगतापने आता भाजपला टेकू दिला आहे.

काय आहे राजकारण…?

२०१९ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची युती झाल्यास राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप विरुद्ध शिवेसेनेचे माजी आमदार अनिल भैय्या राठोड अशी लढत होण्याची शक्यता आहे. या लढतीमध्ये भाजपचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डीले अर्थात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे आपलं वजन वापरुन संग्राम जगताप यांना निवडून आणण्याची शक्यता आहे. त्यामुळेच जगताप यांनी भाजपला पाठींबा दिला असून ते भाजपच्या मदतीने दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून जाण्याची मनिषा बाळगून आहेत.

माजी आमदार अनिल राठोड आणि आमदार संंग्राम जगताप

दरम्यान आमदार जगताप यांनी शहराच्या विकासासाठी आपण भाजपला पाठींबा दिला असल्याचं सांगितले आहे. वास्तविक पाहता गेल्या चार वर्षापासून संग्राम जगताप या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत. वडील अरुण काका जगताप देखील सध्या विधानपरिषदेवर आमदार आहेत. संग्राम जगताप यांनी देखील अहमदनगर महानगरपालिकेचे दोन वेळेस महापौर पद भूषवलं आहे. त्यामुळे इतक्या वर्ष शहराची सत्ता घरात असताना देखील विकासासाठी आम्ही भाजपला पाठींबा दिला आहे. असं म्हणनं म्हणजे जगताप कुटुंबियांनी इतक्या वर्ष घरात सत्ता असून देखील नगर शहराच्या विकासासाठी काहीच केले नाही का? त्यामुळे विकासासाठी भाजपला पाठींबा दिला असं संग्राम जगताप यांचं सांगण कितीपत खरं आहे. याचा विचार करायला हवा.

शेवटी ‘नात्याचं' राजकारण असल्यामुळे निवडणुकीत एकमेकांवर नाना म्हणत नाना प्रकारची टीका करणारे ‘ना’ ‘त्यां’ ‘चे’ हे पुढारी निवडणुकीनंतर ‘नात्यानं' पुन्हा एक येतात. मात्र, जनतेशी असलेलं हे

विकासचं नात विसरतात. त्यामुळे ऐतिहासिक अहमदनगर शहराचा विकास होणार का? की ऐतिहासिक अहमदनगर शहर 'नात्याचे राजकारणाने' अशा प्रकारे बकाल झाले? असा इतिहास लिहिला जाणार? हे येणार काळच उत्तर देईल.

बाकी राजकारणात ...

मार के सच्चाई को लात सियासत में

जायज़ होती है हर बात सियासत में

Updated : 31 Dec 2018 6:54 AM GMT
Next Story
Share it
Top