Home > मॅक्स ब्लॉग्ज > आदित्योदयाने सेना नेत्यांचा अस्त! - जयंत माईणकर

आदित्योदयाने सेना नेत्यांचा अस्त! - जयंत माईणकर

आदित्योदयाने सेना नेत्यांचा अस्त! - जयंत माईणकर
X

भारतीय राजकारणातील वंशपरंपरा म्हटली की, डोळ्यासमोर सर्वप्रथम उभा राहतो नेहरू - गांधी परिवार आणि काँग्रेस!(congress) पण गंमतीची गोष्ट अशी की, काँग्रेसवर वंशपरंपरेची टीका करणाऱ्या सर्वच नेत्यांनी आपापल्या पक्षात वंशपरंपरा चालूच ठेवली. आणि वंश परंपरा सुरू ठेवण्याचं कारण अर्थात कार्यकर्त्यांचा आग्रह हेच समाज उत्तर देण्यात आलं.

समाजवादी, भाजप,(BJP) आणि प्रादेशिक पक्षांनी इतकाच कशाला काही प्रमाणात अगदी कम्युनिस्ट पक्षातही वंशपरंपरा सुरूच राहिली. संधी असूनही आणि स्वतः उच्च पदावर असूनही वंशपरंपरेपासून कटाक्षाने दूर राहणारे म्हणजे पश्चिम बंगालचे २४ वर्षे मुख्यमंत्री असलेले ज्योती बसू!

आता या वंशपरपरेच्या नामावलीत एक नवं नाव सामील झालं आहे. आदित्य उद्धव ठाकरे!(aaditya thackeray) बाळासाहेब ठाकरेंच्या आणि इतरांच्या वंशपरंपरेत एक मूलभूत फरक आहे. मुंबईच्या महापौर पदापासून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लोकसभेचे सभापती आशा पदांवर शिवसेनेची वर्णी लागली. पण बाळासाहेबांनी यापैकी कुठल्याही पदावर स्वतः न बसता आपले विश्वासू मनोहर जोशी यांची वर्णी लावली. भुजबळांनी पक्षांतराची चूक केली नसती तर त्यांनाही मुख्यमंत्री पदाचा आस्वाद घेता आला असता, असं बाळासाहेबांनीच सामनाच्या अग्रलेखात नमूद केलं होतं. पण त्यांनी ती चूक केली आणि नऊ महिन्यांसाठी नारायण राणे यांची लॉटरी लागली.

मात्र, पद स्वतःकडे न ठेवता आपल्याला हवी तशी कामं करून घेण्याची हातोटी बाळासाहेबांचीच. माझ्या हातात सरकारचा रिमोट कंट्रोल आहे. तुमची हाय कमांड तर माझा रिमोट कंट्रोल हे त्यांचं वाक्य युतीच्या पहिल्या कार्यकाळात फार गाजलं होत.

अर्थात त्यांचा गाढ विश्वास होता मनोहर जोशीं वर. मनोहर-सुधीर जोशी, प्रमोद नवलकर हे बाळासाहेबांचे बिनीचे शिलेदार! पण पदांची सर्वात जास्त बरसात झाली ती मनोहर जोशींवर. त्यांना बाळासाहेब पंत म्हणत. पण ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात शिवसेनेत राज-उद्धव चा दबदबा वाढू लागला. अर्थात राज जास्त आघाडीवर होते. तर उद्धव हात बांधून दूर उभा राहून निरीक्षण करत असायचे. पण दोघांनाही क्रियाशील राजकारणात उतरण्यापेक्षा बाळासाहेबांप्रमाणे पडद्यामागे राहून रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवण्यात स्वारस्य होतं.

आपलं एकत्र जमणार नाही याची खात्री प्रथमपासूनच दोघांनाही होती. आणि म्हणूनच दोघांनीही आपापले 'मनोहर जोशीं' शोधण्यास सुरुवात केली. उद्धव टाकरेंनी विश्वास ठेवला सुभाष देसाईंवर तर वेगळी चूल मांडलेल्या राजनी विश्वास दाखवला बाळा नांदगावकर यांच्यावर. पण हे दोघेही निवडणुकीच्या राजकारणात तयार झाले नाहीत. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेल्या या देशातील प्रत्येक राज्यात असलेले प्रादेशिक पक्ष म्हणजे त्या त्या राज्यातील शक्तीशाली राजकीय परिवार. या परिवाराच्या प्रमुखानंतर त्यांनी निवडलेल्या त्यांच्या वारसदारांना जनता स्वीकारत असते. कधी भाऊबंदकीमुळे एखादा भाऊ आपली वेगळी चूल मांडतो, इतकेच!

बाळासाहेबांनी पडद्याआड राहून रिमोट कंट्रोल द्वारे राजकारण चालविणे पसंत केले. परंतु आदित्य सक्रिय होऊ लागल्यापासूनच त्यांची निवडणूक लढण्याची चर्चा सुरू झाली होती. आज आमदार म्हणून आणि होऊ घातलेले उपमुख्यमंत्री म्हणून पक्षाचे विधिमंडळातील नेते तेच होणार आणि अर्थात पक्षाचेही नंबर दोनचे नेते तेच राहणार.

पण याचा फटका शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांना बसणार आहे. "बाळासाहेबांच्या इतकी ताकद सध्याच्या शिवसेना नेतृत्वात नाही" असं म्हटल्यामुळे आणि वयोमानपरत्वे मनोहर जोशी बाजूला पडले आहेत. मात्र, सुभाष देसाई, संजय राऊत, यासारख्या ज्येष्ठ आणि विधिमंडळ अथवा संसदेत दीर्घ काळ काम केलेल्या शिवसैनिकांचीही मक्तेदारी संपुष्टात येईल.

करण आता त्यांची जागा आदित्य आणि कदाचित पुढच्या निवडणुकीत तेजस घेईल. बाळासाहेब, उद्धव आतापर्यंत संसदेत, अथवा विधिमंडळापासून दूर राहिल्याने तिथे नेतृत्व करण्याची संधी इतरांना मिळाली. पण आता एक प्रकारे काँग्रेसच्याच धर्तीवर पक्ष प्रमुख आणि संसदीय पक्ष प्रमुख या दोन्ही पदांवर ठाकरे घरण्याचेच वर्चस्व राहील. एकूणच आदित्यो दयाने सेने नेत्यानांचा अस्त होईल असंच वाटतं.

Updated : 3 Nov 2019 7:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top