Home > मॅक्स ब्लॉग्ज > जातपात, धर्माचा विचार न करता मदतीला धावणारे शब्बीरभाई

जातपात, धर्माचा विचार न करता मदतीला धावणारे शब्बीरभाई

जातपात, धर्माचा विचार न करता मदतीला धावणारे शब्बीरभाई
X

सध्या देशात सीएए आणि एनआरसीवरुन जोरदार वाद सुरू आहे. मुस्लिम समाजात अस्वस्थतेची भावना निर्माण झालीये. पण अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत इथले शब्बीरभाई पठाण हे मात्र कोणताही धार्मिक भेदभाव न करता ३० वर्षांपासून अनेकांना मदत करतायत. ज्येष्ठ नागरिक, भूमिहीन लोक, महिला यांची शासकीय कार्यालयात कागदपत्रांवरुन अडवणूक होत असते.

पण त्यांची अडवणूक होऊ नये यासाठी त्यांना मदत म्हणून करण्यासाठी ते कर्जतमध्ये शब्बीरभाई पठाण ३० वर्षांपासून मदत केंद्र चालवतात. आजपर्यंत हजारो महिला वृद्ध भूमिहीन यांना त्यांनी मदत करून शासकीय कामं करून दिली आहेत, अनेकांना त्यांची हक्काची पेन्शन मिळवून दिलीये. ज्येष्ठ महिला नागरिकांची संघटना करून त्यांच्यासाठी आधार म्हणून शब्बीर भाई गेली ३५ वर्षे काम करत आहेत.

शब्बीरभाई हे सरकारच्या सामान्यांसाठीच्या विविध योजनांचा लाभ सामान्यांना मिळेल यासाठी त्यांना मदत करतात. गरीब, विधवा, परित्यक्ता महिलांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनाही भाग पाडण्याचं काम ते करतात. शब्बीर भाई हे स्वत:चा चरितार्थ चालवण्यासाठी लग्नांमध्ये बँड वाजवण्याचं काम करतात, त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून ते इतरांना मदत करतात. ते ही सर्व मदत विनामोबदला करत असतात.

हे ही वाचा...

याचबरोबर कर्ज तालुक्यात दारुबंदीसाठी अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनातही शब्बीरभाई यांनी भाग घेतलाय. तर भ्रष्टाचारविरोधात आंदोलनातही ते कायम पुढे असतात. शब्बीरभाई यांनी आतापर्यंत आसपासच्या परिसरातील तब्बल १९ हजारांच्यावर लोकांची मदत केलीये. शब्बीरभाईंना जेव्हा आम्ही विचारलं की हे सर्व सामाजिक काम करण्यासाठीची प्रेरणा तुम्हाला कशी मिळते, तर त्यांचं साधं सरळ उत्तर होतं ते म्हणजे मदत केल्यानंतर मिळणारं समाधान...

शब्बीरभाई म्हणतात जेव्हा सामान्यांचं काम होतं तेव्हा ते जे आशिर्वाद देतात तीच आपली कमाई...सरकारी कामांमध्ये अधिकाऱ्यांकडून कायमच अडवणूक होत असते, पण या अधिकाऱ्यांना योग्य ती कागदपत्रं देऊन आणि वेळ पडल्यास आंदोलन करुन सामान्यांची कामं करण्यास त्यांना भाग पाडावं लागतं असंही शब्बीर भाई सांगतात.

मुस्लिम समाजात आजही मोठ्या प्रमाणात निरक्षऱता आहे, यावर बोलताना शब्बीरभाई म्हणतात की मुस्लिम समाज अजून खरंच मागास राहिलाय, पण केवळ मुस्लिम समाजाच्या भल्यासाठी काम न करता आपण अठरापगड जातींमधील लोकांच्या मदतीसाठी काम करत असल्याचं ते ठामपणे सांगतात. खरा भारत कुठे आहे असा सवाल जर कुणी विचारला तर तो भारत शब्बीरभाईंसारख्या व्यक्तींच्या कामात आहे हे नक्कीच त्यांचं काम पाहून सांगता येईल.

Updated : 14 Jan 2020 8:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top