Home > मॅक्स ब्लॉग्ज > करोनापेक्षा भयंकर विषाणूचं आव्हान…

करोनापेक्षा भयंकर विषाणूचं आव्हान…

करोनापेक्षा भयंकर विषाणूचं आव्हान…
X

शाहरूख खान या मुसलमान अभिनेत्याने करोनाच्या संकटात विविध पातळ्यांवर मोठ्या प्रमाणात मदत जाहीर केली आहे. शाहरूख खान याने आपली व्यक्तिगत मालकीची चार मजली इमारत क्वारंटाइन केंद्र बनवण्यासाठी देण्याची तयारी दर्शवली. याठिकाणी लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्यावर उपचार करता येऊ शकतील. आपल्या कंपन्यांच्या समूहातर्फे ५० हजार पीपीई (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) किट, मुंबईतील साडेपाच हजार कुटुंबांसाठी आवश्यक भोजनसामुग्री, दहा हजारलोकांसाठी तीन लाख भोजन किट, दिल्लीतील अडीच हजार रोजंदारी कर्मचा-यांसाठी किराना अशा प्रकारची मदत शाहरूख खान या मुसलमान अभिनेत्याने केली आहे.

हा परिच्छेद वाचताना थोडंसं विचित्र वाटत असेल. ते वाटणं स्वाभाविक आहे. गेल्या दोन दिवसांत मुसलमान म्हणजे या देशाचे शत्रू आहेत आणि ते या देशाच्या मुळावर उठले आहेत, असंच चित्र प्रसारमाध्यमांमधून आणि सोशल मीडियावरून निर्माण करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर चांगलं काम करणा-या मुसलमान व्यक्तिचा धर्मासह उल्लेख केला तर फारसं बिघडत नाही, असं मला वाटतं.

गेल्या दोन दिवसांत मध्यवर्ती धारेतल्या वृत्तवाहिन्या आणि काही वृत्तपत्रेही धार्मिक पद्धतीच्या अपप्रचारालाबळी पडताना दिसत आहेत. युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तानविरुद्ध जशा त्याच्या लेखण्या आणि वाणी आग ओकते तशीच आग ही मंडळी सध्या तबलीगच्या आणि त्यानिमित्ताने मुसलमानांच्या विरोधात ओकताना दिसत आहेत. तबलीग, मुसलमान हे शब्द ठळकपणे उच्चारले जात आहेत. जगभर थैमान घालणारा करोना भारतात फक्त मुसलमानांच्यामुळे पसरला अशा प्रकारचे चिचत्र निर्माण करून या देशातील अल्पसंख्य समाजाविरोधात वातावरण निर्माण करण्यात येत आहे. (या मुसलमानांच्या आधी किती हिंदू करोना घेऊन युरोप अमेरिकेतून भारतात आले त्याचीही आकडेवारी जाहीर करण्याची गरज आहे. ही मंडळी जात्याच हुशार असल्यामुळे विमानतळावर येण्यापूर्वी पॅरासीटॅमोल खाऊन आली, असं जाणकारांचं म्हणणं आहे. त्यामुळं ते विमानतळावरील फोकनाड तपासणीतून निसटले आणि नंतर करोनाबाधित म्हणून पुढं आले.)

तबलीग जमातीच्या मूर्ख आणि अर्धवट लोकांकडून जे काही घडलंय ते अक्षम्य आणि बेजबाबदारपणाचं आहे. त्याची वेगळी शिक्षा त्यांना देण्याची आवश्यकताही उरली आहे, असं वाटत नाही. कारण त्याची बाधा त्यांच्यातल्याच अनेकांना झाली आहे आणि अनेकजण अल्लाला प्यारेसुद्धा झाले आहेत. त्यांनी केलेल्या कृत्याची शिक्षा त्यांना नैसर्गिक न्यायानं मिळाली आहे. त्यांच्यामुळं देशातील करोनाबाधितांचा आणि मृतांचा आकडा दोन दिवसांत झपाट्यानं वाढला आणि करोनाचा संसर्ग पसरण्याचीही भीती निर्माण झाली. सरकारी यंत्रणेवरचा ताण वाढला. तबलीग जमातीसंदर्भात गेल्या दोन दिवसांत अनेकांनी लिहिलं आहे.

मुस्लिम समाजातील लोकांनीही लिहिलं आहे. वृत्तवाहिन्यांवरून अनेक मुस्लिम विचारवंतांनी त्यांचा समाचार घेतला आहे. तबलीग जमातीत जाऊन आलेल्या माझ्या गावातील एक-दोघांना मी मागे माझ्या पद्धतीने झापलेसुद्धा आहे. तबलीगचे लोक मूर्ख असतात, लोचटासारखे येऊन बसतात आणि नमाज पढण्यावरून डोके खातात असं माझ्या नोकरी, व्यवसाय करणा-या मुस्लिम मित्रांनी मला अनेकदा सांगितलं आहे. आजच्या काळात कामधंदे सोडून धर्माच्या नावानं बोंबलत हिंडणारा कुणीही कुठल्याही धर्माचा असला तरी त्याचं समर्थन होऊ शकत नाही. त्यामुळं तबलीग हे प्रकरण भंपक आहे, याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही. खरंतर गावोगावच्या शहाण्या मुसलमानांनी यापुढं एकत्र येऊन तबलीग जमातीच्या लोकांना गावात येऊ द्यायचं नाही, असा निर्णय घ्यायला हवा. कारण त्यांच्यामुळं सध्या सबंध देशातल्या मुस्लिमांची जी बदनामी झाली आहे, ती यापूर्वी कधीच झाली नसेल.

आणखी एक गोष्ट. तबलीग जमातीच्या वसई, औरंगाबाद येथील इज्तेमांना महाराष्ट्रात परवानगी नाकारली. दिल्लीत ती परवानगी कशी काय दिली, असं आजसुद्धा प्रमुख मराठी, हिंदी वृत्तवाहिन्यांवरून विचारलं जात होतं. हे विचारणारे खरंच अज्ञानी होते की सगळं माहीत असूनही जाणीवपूर्वक ते विचारत होते हे कळत नाही. कारण दिल्लीत निजामुद्दीन येथे असा कोणताही इज्तेमा नव्हता. तिथं बारा महिने चोवीस तास दररोज दीडदोन हजार लोक येत आणि जात असतात. पंतप्रधान मोदी यांनी जनता कर्फ्यू घोषित केली त्या दिवसापर्यंत लोक केंद्रामध्ये येत जात होते. जनता कर्फ्यूच्या घोषणेच्या दिवसापासून केंद्रात नव्याने प्रवेश बंद करण्यात आले. तेथील लोकांना घरी पाठवण्यास सुरुवात झाली. परंतु २१ मार्चपासूनच काही मार्गांवरील रेल्वे गाड्या बंद होऊ लागल्या.

दरम्यान दिल्ली आणि जवळपासच्या दीड हजार लोकांना घरी पाठवले. त्यानंतरही एक हजार लोक शिल्लक राहिले होते. मोदींच्या आधी दिल्ली सरकारनं दिल्लीत २२ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत टाळेबंदी जाहीर केल्यामुळे खासगी वाहन मिळणेही बंद झाले. त्यामुळे लोक तिथे अडकून पडले. ते लोक तिथं जमा झालेले नव्हते, तर अडकून पडलेले होते. परंतु त्याआधीच अनेक लोकांची आवक जावक असल्यामुळे तेथील लोकांना करोनाची लागण झाली आणि असे काही लोक गावी निघून गेले होते. याठिकाणी परदेशातील अडीचशेवर लोक होते. या लोकांना देशात प्रवेश देताना केंद्रसरकारच्या यंत्रणेकडून आरोग्य तपासणीसंदर्भात हलगर्जी झाल्याची शंका आहे. त्यासंदर्भात नीट खुलासा होण्याची आवश्यकता आहे म्हणजे नेमके दोषी कोण आहे ते समोर येऊ शकेल. सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे आठवडाभर निजामुद्दीन येथील स्थानिक पोलिस, प्रशासनाशी तबलीगच्या लोकांचा पत्रव्यवहार सुरू होता परंतु दिल्ली सरकारला त्याची खबरबात नव्हती. केंद्राच्या नियंत्रणाखालील पोलिस आणि राज्य सरकार यांच्यातील विसंवादाचे हे प्रकरण आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे.

मुस्लिम समाजातील एका मूर्ख समुदायाकडून घडलेल्या चुकीमुळे संपूर्ण मुस्लिम समाजाला खिंडीत गाठण्याची संधीच काही घटकांना मिळाली. दुर्दैव हेच की, करोनाच्या विषाणूने जात-धर्म-पंथ-लिंग असे सगळे भेद मिटवून टाकून सगळ्या जगाला एका क्षुद्र पातळीवर आणून ठेवले आहे. तरीसुद्धा धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण करणा-या इथल्या काही घटकांच्या डोक्यातला जाती-धर्माचा विषाणू काही मरत नाही. तबलीगचे निमित्त साधून त्यांनी मुस्लिम समाजाशी संबंधित असलेले जुने पुराणे व्हिडिओ पुढे आणले आणि याच काळात हे लोक कसे करोना पसरवण्याचा उद्योग करीत आहेत, असे चित्र निर्माण केले. हे सगळे व्हिडिओ खरे असले तरी ते काही वर्षांपूर्वीचे आहेत. मुस्लिमांतील काही घटकांमध्ये जेवतानाच्या त्यांच्या त्यांच्या म्हणून काही प्रथा आहेत, त्या प्रथांच्या खोलात शिरण्याचे कारण नाही. अशा प्रथांचे हे व्हिडिओ आहेत. अनेक नामवंत संस्थांच्या फॅक्ट चेक करणा-या यंत्रणांनी त्यातील सत्य समोर आणले असून यातला एकही व्हिडिओ सद्यकाळातला आणि करोनाच्या प्रसारासाठी घृणास्पद कृत्य करणारा नाही हे स्पष्ट झाले आहे. परंतु एवढ्या संकटाच्या काळातही लोकांना हे अशा अपप्रचाराचे सुचते कसे याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. करोनाचा विषाणू काही महिन्यांनी आटोक्यात येईल. परंतु या विकृतांच्या डोक्यातला, मनातला हा विद्वेषाचा विषाणू कसा मरणार हा देशापुढचा गंभीर प्रश्न आहे.

एवढं सगळं लिहिल्यानंतरही कुठलीतरी गल्लीबोळातली घटना सांगून त्यावर तुमचं म्हणणं काय, असा प्रश्न विचारणारे कुणी व्हायरस पुढं येणारच नाहीत असं नाही. हॉस्पिटलमध्ये चाळे करणारांबदद्ल का काही बोलत नाही असंही कुणी विचारेल. सध्याच्या काळात समाजाला, कायदा-सुव्यवस्थेला,आरोग्य व्यवस्थेला अडचणीचे ठरणारे कुणाचेही कृत्य निषेधार्हच आहे. ते करणारे कुणी तबलीगी मुसलमान असोत, नमाजीसाठी एकत्र येण्याची झुंडशाही करणारे बाकीचे मुसलमान असोत, मंदिरात गर्दी करणारे, बंदी असताना रथोत्सव करणारे हिंदू असोत किंवा चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जमा होणारे ख्रिश्चन असोत..... हे सगळे एकाच लायकीचे आहेत. करोनाच्या काळात कुणी मस्ती केली तर करोनाच त्यांना बघून घेईल, बाकीच्यांनी फार काळजी करण्याचे कारण नाही.

तुम्ही घरीच राहा.... सुरक्षित राहा !

विजय चोरमारे, वरिष्ठ सहाय्यक संपादक, महाराष्ट्र टाईम्स

Updated : 5 April 2020 3:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top