Home > मॅक्स ब्लॉग्ज > 9/11: वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ला आणि वृत्त निवेदकाची भूमिका निभावणारे सागर गोखले

9/11: वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ला आणि वृत्त निवेदकाची भूमिका निभावणारे सागर गोखले

9/11: वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ला आणि वृत्त निवेदकाची भूमिका निभावणारे सागर गोखले
X

मला एकदम एकोणीस वर्षांपूर्वीचा दिवस आठवला. ईटीव्हीमधला. संध्याकाळी सात वाजता महाराष्ट्र माझा हे बुलेटिन संपवून मी स्टुडिओच्या बाहेर आलो होतो. आणि लगेच मला ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी पुन्हा स्टुडिओत पिटाळण्यात आलं.

“अरे! अमेरिकेवर हल्ला झालाय. आपल्याला लाइव्ह करायचंय.”

ईटीव्ही काही चोवीस तास बातम्या दाखवणारी वृत्तवाहिनी नव्हती. पण अमेरिकेवरच्या हल्ल्यामुळे सिरियल्स आणि इतर कार्यक्रम रद्द करून आता फक्त हीच बातमी दाखवायचा निर्णय घेण्यात आला.

मी स्टुडिओत गेलो. पण दोन प्रश्न होते. लाइव्ह ठीक आहे. पण व्हिज्युअल्स कुठेत ? आणि बोलायचंय काय ?

सीएनएनची दृश्यं आम्ही जशीच्या तशी दाखवायला सुरवात केली होती. समोरच्या मॉनिटरवर मलाही ती दृश्यं दिसत होती. चार पाच वाक्य लिहिलेला एक कागद कुणीतरी माझ्या हातात आणून दिला आणि मी ती वाक्य वाचायला सुरवात केली.

‘काही मिनिटांपूर्वी अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर एक विमान येऊन धडकलंय आणि वर्ल्ड ट्रेंड सेंटरनं पेट घेतलाय. हा अपघात आहे का? घातपाताचं कृत्य ते समजू शकलेलं नाही. अमेरिकेची आणखी तीन विमान बेपत्ता आहेत’, अशी माहिती परत परत सांगेपर्यंत आणखी एक दोन कागद हातात आले. त्यावर एक-दोनच वाक्य. बरं, समोरच्या मॉनिटरचा आवाज आम्हाला ऐकू येत नव्हता. त्यामुळे तिथे दिसणारा बारीक मजकूर वाचून तो मराठीत भाषांतर करायला सुरवात केली.

काही वेळात आणखी एक विमान वर्ल्ड ट्रेड सेंटरवर कोसळलं. आता कुणी लिहिलेला कागद हातात आणून देत नव्हतं. तर चक्क टेलिप्रॉम्पटरवरचे पीटीआयचे इंग्रजीतले टेक फाडून तेच पुढ्यात आणून ठेवले जात होते.

करा वाचता वाचता भाषांतर आणि द्या माहिती. बरं तेच तेच किती वेळा सांगणार ?

डाव्या बाजूला पीटीआच्या कागदांची चळत वाढायला लागली. अर्ध्या पाऊण तासानंतर माझ्या मदतीला कौमुदी वाळिंबेला पाठवण्यात आलं. त्यानंतरचे दीड दोन तास आम्ही खिंड लढवली. पीटीआयच्या बातम्यांचं आम्ही तिथल्या तिथे भाषांतर करत होतो. तर कधी शीतयुद्ध, अमेरिकेने जोपासलेला दहशतवाद असे भौगोलिक आणि ऐतिहासिक संदर्भ देत होतो.

हे सगळं सुरू असताना अचानक माझ्या डाव्या खांद्याला आणि मानेला प्रचंड आग व्हायला लागली. खाज सुटायला लागली आणि काही मिनिटांत संपूर्ण शरीरभरच पुरळ उठलं. वेदना असह्य व्हायला लागल्या. दीड दोन तासांनी स्टडिओबाहेर आलो. आदल्या दिवशी खालेल्या सामोशाची ती अ‍ॅलर्जी होती असं नंतर डॉक्टरांनी सांगितलं.

ईटीव्हीच्या त्या वार्तांकनाची आणि आमच्या निवेदनाची अनेक लोकांनी नंतरही आठवण काढली. काही ज्येष्ठ पत्रकारांनी मौलिक सूचनाही केल्या.

पुढचा महिनाभर ईटीव्हीनं या विषयावर विशेष बातमीपत्र सुरू ठेवलं. मेघराज पाटील त्या बातमीपत्राचा प्रोड्युसर होता. त्यावेळी ‘द हिंदू’ आणि इतर वृत्तपत्रांतून काढलेल्या नोटसची मदत anchoring script करताना झाली. बातमीपत्र लवकर संपत असेल तर समारोपाची कॉमेंट करतानाही त्या उपयोगी पडल्या.

त्यावेळी ईटीव्हीत असलेले अनेकजण आता मराठी आणि हिंदी वृत्तवाहिन्यांमध्ये मोठ्या पदांवर काम करत आहेत. मेघराज सध्या एबीपी माझामध्ये डिजिटल मीडियाचा प्रमुख आहे. कौमुदी सध्या अमेरिकेत असते. मला खात्री आहे. तिने ग्राऊंड झीरोला नक्की भेट दिली असेल.

पत्रकारितेची कोणतीही डीग्री नसताना आणि पत्रकारितेचा अनुभव नसताना ईटीव्ही ला वृत्तनिवेदक म्हणून काम सुरू करून जेमतेम जेमतेम सव्वा वर्ष झालं होतं. अशावेळी नाइन इलेव्हन चा लाइफ टाईम अनुभव खूप शिकवून गेला. बातमीची जाण, संदर्भांचं महत्त्व, इंग्रजीची गरज, शारिरीक तंदुरुस्ती आणि मनाचं संतुलन याचं महत्त्व कळलं.

अँकरिंगची संधी, माधुरी गुंटी, मृदुला जोशी, मिलिंद भागवत, मकरंद माळवे, स्वाती कुलकर्णी अशा निवेदकांची उत्तम टीम, हैदराबादचे दिवस आणि अनेक अविस्मरणीय आठवणी ईटीव्हीनं दिल्या..

Updated : 11 Sep 2020 4:43 PM GMT
Next Story
Share it
Top