Home > मॅक्स ब्लॉग्ज > सध्या कशी आहे लातूरची हवा?

सध्या कशी आहे लातूरची हवा?

सध्या कशी आहे लातूरची हवा?
X

#जोशींचीतासिका

वारे बीड जिल्ह्याचे या लेखास सर्व वाचकप्रेमींनी चांगला प्रतिसाद दिला. लेखाची दखल अनेक दिग्गजांनी घेतली. इतर जिल्ह्यातील वाचकांनी त्यांच्या जिल्ह्याबाबत लिहा, अशी प्रेमपूर्वक सूचना केली. त्या सूचनाशिरोधार्य मानून जसे शक्य होईल तसे इतर जिल्ह्यात काय वातावरण आहे हे माझ्या अल्पमतीप्रमाणे मांडणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज लातूर जिलह्यातील सध्याचे राजकीय वारे काय म्हणतात हे बघूया. या लेखात मोठे योगदान आहे ते लातूरचे प्रथितयश पत्रकार विजयकुमार स्वामी यांचे.

विजयकुमार स्वामींनी चर्चेला सुरुवात करताना भारतातील लोकसभा मतदारसंघांची रचना किती मजेशीर आहे याचे उदाहरण दिले. लातूरपासून २० किलोमीटरवर असलेले औसा हे लोकसभेसाठी उस्मानाबाद जिल्ह्याशी संलग्न आहे, तर शंभर किलोमीटरवरील नांदेड जिल्ह्यातील लोहा लातूर जिल्ह्यांशी संलग्न आहे. अर्थात आज आपण भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाचाच विचार करणार आहोत. त्यामुळे लोहा मतदार संघाविषयी या लेखात माहिती नसेल.

१. लातूर शहर मतदारसंघात देशमुखांना आव्हान देणार कोण?

१९८० सालापासून १९९५ चा अपवाद वगळता या मतदारसंघावर देशमुख कुटुंबियांचे निर्विवाद वर्चस्व रहिलेले आहे. स्व. विलासराव देशमुख आणि अमित देशमुख यांच्या कार्यशैलीत कमालीची तफावत लातूरकरांना जाणवते. सामान्य माणसात सहजतने मिसळणाऱ्या विलासरावांची सर कोणालाच येणार नाही. विलासराव विरोधकांनाही आपलेसे करणारे होते तर जवळच्या लोकांनाही अमित देशमुख आपलेसे वाटत नाहीत असे इथले स्थानिक बोलून दाखवतात. गेल्या तीन वर्षात अमित देशमुखांच्या काँग्रेसने महानगर पालिका, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्था गमावल्या आहेत.

आकडेवारीचा विचार करता २००९ साली अमित देशमुखांना ११३००६ मते मिळाली होती. २०१४ साली त्यात जवळपास सहा हजार मतांची वाढ होऊन त्यांना ११९६५६ मते त्यांना मिळाली होती. मात्र, इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि २००९ साली या मतदारसंघात क्रमांक दोनवर राहिलेल्या बसपच्या कय्युमखान पठाण यांना २३५२६ मते होती. २०१४ साली भाजपच्या शैलेश लहोटी यांना ७०१९१ मते मिळाली होती. म्हणजे २००९ ते २०१४ या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणावर जनमत अमित देशमुखांच्या विरोधात गेले आहे. स्वभाव असो की कार्यशैली लातूरमध्ये अमित देशमुखांना 'लातूरचे राहुल गांधी' असे संबोधले जात आहे.

लिंगायत, मारवाडी आणि मुस्लिम हे तीन समाज इथे सर्व राजकीय समीकरणे घडवू किंवा बिघडवू शकतात. लातूरमध्ये शिवसेनेचे काम चांगले आहे. सतत कोणते ना कोणते आंदोलन करत सेना चर्चेत असते. मात्र, सेना इथे निवडणुकीत आजवर यश मिळवू शकलेली नाही. आधी युतीमध्ये लढणाऱ्या सेना-भाजपच्या वाटण्यात हा मतदारसंघ भाजपच्या हिश्श्यात जायचा. त्यामुळे इथे सनेचे काम चांगले असूनत्यांना फायदा होत नव्हता. भाजप कार्यकर्ते सत्ता असल्यामुळे त्यांच्याच सरकारविरुद्ध आंदोलनही करू शकत नाहीत. निलंगेकर कुटुंबियांना निलंग्यापुरते रोखणाऱ्या विलासरावांच्या पश्चात संभाजी पाटील निलंगेकर लातूर जिल्ह्यात चांगले बस्तान बसवत आहेत. त्यामानाने कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी तगडी असूनही अमित देशमुख फिके वाटतात.

स्थानिक स्वराज्य संस्थात झालेला काँग्रेसचा पराभव हा चुकीचे उमेदवार निवडले म्हणून झाला, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. असे असेल तर हेच कार्यकर्ते आगामी निवडणुकीत अमित देशमुखांना कसे विजयी करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. भाजप शैलेश लाहोटींनाच उमेदवारी देते की कोणी नवीन चेहरा पुढे येईल यावरही बरंच काही अवलंबून असेल. भाजप इथे अजूनही ठरवू शकत नाही की देशमुखांना पाडायचे की आपला उमेदवार जिंकवायचा. सध्या तरी पूर्वपुण्याईवर आमदार असलेल्या अमित देशमुखांना पर्याय नाही असेच म्हणावे लागेल.

अमित देशमुखांचा पराभव स्वतः तेच करू शकतील. कारण त्यांचा आत्मकेंद्री स्वभाव. इथे एक छोटासाकिस्सा सांगावासा वाटतो. मागच्यावर्षी राहुल गांधी नांदेड जिल्ह्यांत गेले होते. त्यावेळी एका कार्यक्रमात काही भाषणे होणार होती. पण, वेळ कमी होता म्हणून आयोजक असलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राहुल गांधींसमोर फक्त त्यांचेच भाषण होईल असे अमित देशमुखांना सांगितले. त्यावर अमित देशमुखांनी सांगितले की त्यांच्यातर्फे धीरज देशमुख कार्यक्रमास उपस्थित राहतील. अखेर राहुल गांधींच्या दौऱ्यात अमित देशमुख अनुपस्थित राहिले अशी चर्चा त्यावेळी मतदारसंघात जोरात रंगली होती. इथे अजून एक नाव चमत्कार करू शकते ते म्हणजे म्हणजे दिलीपराव देशमुख. दिलीपरावांना मानणारा मोठा वर्ग इथे आहे. ते कशाप्रकारे आपल्या पुतण्यास साथ देतात हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.

२. काट्याची टक्कर असेल लातूर ग्रामीणमध्ये

लातूर ग्रामीण मतदारसंघात विद्यमान आमदार त्र्यंबकराव भिसे यांच्याऐवजी काँग्रेस धीरज देशमुखांना तिकीट देऊ शकते. या मतदारसंघात भाजप पुन्हा तिसऱ्यांदा रमेश कराड यांनाच उमेदवारी देईल असे वाटते. कारण ते मागच्या दोन्ही वेळेस जेमतेम दहा ते पंधरा हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले होते. वंजारी समाजाचे काही गाव त्यांना एकगठ्ठा मतदान करू शकतात ही त्यांची जमेची बाजू आहे. शिक्षणक्षेत्रात नावाजलेले विश्वनाथ कराड यांचे पुतणे असलेले रमेश कराड यांच्याबद्दल नागरिकांत चांगली आस्था आहे. मराठा समाजाचे प्राबल्य या मतदारसंघात आहे. दोनवेळा चुकलेली गाडी यंदा वैजनाथ शिंदेंनी पकडायला हवी.

गोपीनाथराव मुंडे यांनी आधी अनेकदा भाजपकडून लढण्यासाठी दिलेली ऑफर साहेबांच्या पश्चात वैजनाथ शिंदे यंदा तरी स्वीकारतील अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना आहे. गाडीचा विषय आला म्हणून एक किस्सा आठवला. काही वर्षांपूर्वी अमित देशमुखांसोबत गाडीत जाताना अर्ध्या रस्त्यात काय झाले माहिती नाही पण शिंदेंना रस्त्यात उतरवले होते, अशी चर्चा लातुरात रंगली होती. तरीही शिंदे अजूनही देशमुख घराण्याशी एकनिष्ठ आहेत हे उल्लेखनीय आहे. विलासरावांवर अतिशय असलेले प्रेम वरचढ ठरेल की शिंदे यंदा तरी काही स्ट्रॉंग भूमिका घेतात हे आगामी काळच ठरवेल. ज्यावर या मतदारसंघाची निवडणूक रंगेल. एकूणच लातूर ग्रामीणमध्ये काट्याची टक्कर होणार हे निश्चित.

३. अनेक इच्छुकांचा औसा

लोकसभेसाठी उस्मानाबाद जिल्ह्याशी संलग्न असलेले लातूरपासून जेमतेम २० किलोमीटरवर असलेल्या लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघात विलक्षण राजकीय वारे वाहत आहेत. सलग दोनदा आमदार झालेले बसवराज पाटील हेच बहुधा काँग्रेसचे भावी उमेदवार असतील. पण संभ्रमित काँग्रेस ऐनवेळी काय करेल हे सांगता येत नाही. त्यांना दोन्ही वेळेस टक्कर देणारे दिनकर मानेंना शिवसेना तिकीट देईल की नाही सांगता येत नाही. शिवसेनेकडून अजून एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे संतोष सोमवंशी.

राष्ट्रवादीची नगरपालिका असलेल्या औसा भागात राष्ट्रवादी काँग्रेस कमजोर आहे. भाजपकडून पाशा पटेल इच्छूक असले तरी त्यांना मोठ्या प्रमाणावर पक्षांतर्गत विरोध आहे. संभाजी पाटील निलंगेकर यांचे भाऊ अरविंद पाटील हे देखील भाजपचे संभाव्य उमेदवार असू शकतात. काहींच्या मते दिनकर माने भाजकडूनही यंदा उभे राहू शकतात. थोडक्यात औसा मतदार संघात हौश्या-नवश्या-गवश्या अशा अनेक इच्छूकांनी आतापासूनच कंबर कसली आहे.

४. निलंग्यात असेल परंपरागत कौटुंबिक संघर्ष

१९९९ पासून या मतदारसंघातील नागरिकांनी आळीपाळीने काका-पुतण्यांना विजयी केले आहे. १९९९ साली शिवाजीराव पाटील आमदार झाले. त्यांनतर २००४ मध्ये संभाजी पाटील विधानसभेत गेले. पुढे २००९ साली पुन्हा शिवाजीराव आमदार झाले तर गेल्यावेळी म्हणजे २०१४ मध्ये पुन्हा संभाजी पाटील आमदार झाले. यंदाही काँग्रेसकडून सध्यातरी शिवाजीरावांनाच पसंती असेल तर भाजपकडून मंत्री असलेले संभाजी पाटील ह्यांनाच तिकीट मिळेल असे वातावरण आजमितीला आहे. इथे तिसरा पर्याय समोर येण्याची शक्यता धूसर आहे. थोडक्यात निलंग्यात परंपरागत कौटुंबिक संघर्षच असेल असे चित्र सध्यातरी आहे.

मात्र, यंदा संभाजी पाटलांचे पारडे जड असेल कारण राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. तसेच संभाजी पाटील निलंगेकरांनी कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभारलेली आहे. पण, मूड बदलाचे पाईक असलेले औसेकर काहीही करू शकतात त्यामुळे मुरब्बी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याही अपेक्षा आजही पल्लवित आहेत.

५. धर्मगुरूंच्या मतावर अवलंबून असलेले अहमदपूर

लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या अहमदपूरमध्ये लिंगायत समाजाचे प्रमुख धर्मगुरू ज्याला विजयाचा आशीर्वाद देतील तीच व्यक्ती आजवर विजयी होत आली आहे. १९९९ साली आमदार झालेले विनायकराव जाधव-पाटील हे २०१४ साली अपक्ष (भाजप सहयोगी) म्हणून निवडून आले होते. इथे शिवसेनेचे म्हणावे असे काम नाही. राष्ट्रवादी काँग्रेस माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नावाचा विचार अहमदपूर मतदार संघात करू शकते. जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आगामी निवडणुकीत आघाडी झाली तर शरद पवार अहमदपूरची जागा राष्ट्रवादीकडे मागून घेतील. भाजप यंदाही विनायकराव जाधव यांनाच सहकार्य करेल असे इथल्या स्थानिकांचे सध्याचे मत आहे. १९९० साली काँग्रेसचे बाळासाहेब जाधव हे आमदार झाले होते. त्यानंतर इथे आजवर काँग्रेसला यश मिळालेले नाही. एकेकाळी या मतदारसंघावर चांगलीच पकड असलेल्या शेतकरी कामगार पक्षाची ताकद इथे जवळपास नामशेष झाली आहे.

६. बहुरंगी उदगीर

उदगीर हा मतदारसंघ राखीव आहे. इथे बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघाप्रमाणे काही विशिष्ट घराणे महत्त्वाची भूमिका बजावतील. भाजपकडून विद्यमान आमदार सुधाकर भालेराव यांनाच पसंती असेल असे स्थानिकांचे म्हणणे आहे. १९६२ सालापासूनच इतिहास बघता १९७८, १९८० आणि १९८५ साली काँग्रेसचे बाळासाहेब जाधव सलग तीन वेळेस विजयी झाले होते. जाधव वगळता आजवर कोणालाही ही करामत इथे करता आलेली नाही. जाधव यांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची भालेराव यांना यंदा नामी संधी आहे. त्यांना आव्हान असेल ते काँग्रेसच्या उषा कांबळे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे यांचे. मागच्या वर्षी झालेल्या उदगीर नगर परिषद निवडणुकीत भाजपला १६ तर काँग्रेसला १३ जागा मिळाल्या होत्या. त्याचवेळी एमआयएमचे सहा नगरसेवक निवडून आले होते. तेव्हा जर एमआयएमने इथे उमेदवार दिला आणि मुस्लिम मते एकगठ्ठा त्या उमेदवाराला पडली तर तो उमेदवार जिंकेल की नाही हे सांगणे अवघड आहे. पण तोच उमेदवार अनेकांचा स्वप्नभंग करू शकतो.

लवकरच भेटू पुढच्या भागात, तेव्हा तपासू परभणी किंवा नांदेड जिल्ह्यातले राजकीय तपमान.

अनिरुद्ध जोशी, परळी वैजनाथ

चलभाष क्रमांक : 8983555657

Updated : 9 Jan 2018 5:26 PM GMT
Next Story
Share it
Top