Home > मॅक्स ब्लॉग्ज > छत्रपती संभाजी महाराज जन्मस्थान - पुरंदर

छत्रपती संभाजी महाराज जन्मस्थान - पुरंदर

छत्रपती संभाजी महाराज जन्मस्थान - पुरंदर
X

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील हे जुळे दुर्ग, यातील पुरंदर किल्ल्याचे नाव या तालुक्याला दिले आहे. तालुक्याचे ठिकाण सासवड पासून सुमारे २० किमी अंतरावर असणारा पुरंदर किल्ला स्वराज्याचे प्रमुख शिलेदारा पैंकी एक, छत्रपती संभाजी महाराजांचे व सवाई माधवराव पेशव्यांचे जन्मस्थळ असलेला हा किल्ला समुद्र सपाटी पासून १३८५ मीटर उंचीवर असून. पुरंदर म्हणजे इंद्र होय. या पर्वतावर गौतम ऋषीच्या शापातून मुक्ती मिळविण्यासाठी इंद्राने येथे तप केले होते. म्हणून या किल्ल्याचे पर्वत रांगेस इंद्रनील असे नाव लाभले होते. या मुळेच या पर्वतास पुरंदर नाव प्राप्त झाले. अशी पुरातन आख्यायिका सांगीतली जाते. इसवी सन अकराव्या शतका पासून हा किल्ला अस्तित्वात असल्याचे संदर्भ मिळतात. यादव, निजाम, बहामनी,यांच्या राजवटी या किल्ल्याने पहिल्या. पहिल्या आदिलशहाकडे असणारा हा किल्ला येथील किल्लेदाराच्या मृत्यूने निर्माण झालेल्या वारसांच्या वादात मध्यस्ती करून त्यांना आपल्या सेवेत सामावत शिवरायांनी या किल्ला स्वराज्यात आणला. स्वराज्याचे सुरूवातीचे मनसुभे याच गडावर घडले. दिलेरखानाने पुरंदरला दिलेल्या वेढ्यात त्याचे अमिष नाकारून स्वराज्यासाठी आपली आहुती देणाऱ्या मुरारबाजीच्या रणयज्ञाचा हा साक्षीदार शौर्याची स्पुर्ती जागवित उभा आहे.

गाडी मार्ग थेट किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलेला आहे. नारायण पेठ या पायथ्याच्या गावातून पायवाटेनेही सर दरवाज्यामधून किल्यावर पोहचता येते. पुरंदरच्या पुरंदर माचीवर हे दोन्ही रस्ते पोहचतात. किल्याच्या सर दरवाज्याकडील तटबंदी काहीशी सुस्थितीत असून दक्षिण बाजुच्या महाकाळ माची व बावची माची यांची तटबंदी काळाच्या ओघात नष्ट झाली आहे. पुरंदर माचीवर पश्चिमेस पद्मावती तलाव व पूर्वेस राजळे तलाव आहेत. याच माचीवर मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा उभारण्यात आला असून बहिरव खिंडी जवळ शिवरायाचा पुतळा आहे. याच भागात पूर्वी बहिरव दरवाजा होता. माचीवर पुरंदरेश्वराचे मंदिर आहे. हा किल्ल्याचा अधिपती देव. या मंदिरास छोटासा कोट असून मंदिरा समोर नंदी मेघडंबरी आहे. मंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिरात पुरंदरेश्वर शिवलिंग व मागील बाजुस पार्वतीची मुर्ती आहे. या मंदिरा शेजारी बांधीव सुंदर आड आहे. पेशवे काळात या मंदिराचा जिर्णोधार करण्यात आला होता. या मंदिराच्या पश्चिमेस रामेश्वराचे पेशवे कालीन मंदिर आहे. किल्ल्यास जुन्याकाळी पाच दरवाजे असल्याचे सांगतात. पण आज फक्त सर दरवाज्याच अस्तित्वात आहे.

पुरंदरेश्वर मंदिराचे शेजारील चढणीच्या पायवाटेने व काही पायऱ्या चढून बालेकिल्याचे बिन्नी दरवाज्यात पोहचता येते. या दरवाज्याचे बाहेरील बाजुस हनुमान व लक्ष्मिआई याची स्थापना केलेली आहे. या दरवाज्या पुढे दोन दरवाजे लागतात. बिन्नी दरवाज्यातून कंदकड्यावर पोहोचतो या कड्यावर पाण्याचे टाके असून जवळच विरुद्ध बाजुस तटाला चोर दरवाजा आहे.

बिन्नी दरवाज्यापुढे काही पायऱ्या चढल्यावर गणेश दरवाजा आहे. याचे डावे बाजूस कोनाड्यात गणेश मुर्ती आहे. याचे पुढे एक उत्तराभिमुख दरवाजा लागतो यास निशाण दरवाज्या म्हणतात याचे शेजारी निशाण बुरुज असून त्यावर निशाण लावण्याचे जागा आहे.

येथील तटबंदी ला शेंद्रया बुरुज असून इसवी सन १३८० दरम्यान या बुरुजाचे काम करताना सारखे ढासळत होते. तेव्हा बिदरचा बादशहा महमूद याचे आदेशाने नाथनाक व देवकाई या नवविवाहित दाम्पत्यास जिवंत गाडून हा बुरुज उभारण्यात आला. आजही हा बुरुज ही करून कहाणी सांगत उभा आहे. याच्यापुढे साखरी तलाव असून पुढे हत्तीच्या मस्तका प्रमाणे बांधलेला तिहेरी हत्ती बुरुज आहे त्याचे नैऋत्य दिशेस कोकण्या बुरुज आहे.

केदार टेकडीचे दक्षिण बाजूस केदार दरवाजा आहे. केदार दरवाजा व बिन्नी दरवाजा याचे मध्ये सरळ असलेली तटबंदी आता नष्ट झाली आहे. केदार दरवाजा हा संकट काळी रसद पुरविणारा व बचावासाठी उपयोगी दरवाजा. निशाण दरवाजा ओलांडून आत गेले की समोर दिसणाऱ्या टेकडीस राजगादी म्हणतात. या टेकडीवर काही पाण्याची टाकी व अनेक जुन्या इमारतींचे भग्न अवशेष असून या ठिकाणी पूर्वी अनेक महत्वाचे वाडे होते. केदार टेकडी कडील उतारावर दारूगोळ्याचे कोठाराचे भग्न अवशेष आहेत.

राजगादीचे पश्चिमेस केदार टेकडीची चढण काही अंतरावर सुरु होते. मंदिराचे टेकडीवर जाण्यासाठी सुमारे ७० बांधीव पायरीचा मार्ग आहे. केदार टेकडी किल्ल्याचा सर्वात उंच भाग आहे. येथील अतिशय छोट्या पठारावर केदारेश्वराचे पूर्वाभिमुख मंदिर आहे. मंदिरा समोर नंदी मेघडंबरी आहे तिचे पुढील बाजुस चोथरे व एक दीपमाळ आहे. गर्भगृहात केदारेश्वराचे शिवलिंग असून मागील बाजुस इंद्र मुर्ती आहे. या किल्ल्याचे पुरंदर हे नाव इंद्राचेच एक नाव आहे. या मंदिरापासून केदारगंगा उगम पावते व सासवड जवळील सिद्धेश्वर मंदिराजवळ कऱ्हा नदीस मिळते.

वज्रगड

वज्रगड अथवा रुद्रमाळ हा पुरंदरचा जुळा किल्ला समुद्र सपाटी पासून १३४८ मीटर उंचीवर आहे. पुरंदर व वज्रगड यांचे मध्ये भैरव खिंड आहे. पुरंदरच्या माचीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळील रस्त्याने वज्रगडावर पोहचता येते. पायथ्याचे भिवडी गावा जवळील रडतोंडीच्या घाटाने पाउल वाटेने येथे पोहचता येते. दोन्ही रस्त्याने चढून आल्यावर खडकात खोदलेल्या व बाजुला तट असलेल्या पायरी मार्गाने वज्रगडाचे महाद्वारात पोहचता येते. महाद्वारा पुढे अजून एक दरवाजा लागतो. या दरवाज्यातून आत गेल्यावर खडकाचे प्रचंड सुळके दिसतात या उंच कातळांचा उपयोग प्रस्तरारोहण प्रशिक्षणा साठी केला जातो. हा किल्ल्याचा सर्वात उंच भाग आहे. किल्ल्याचे घेऱ्यास तटबंदी असून तिला ५ बुरुज आहेत. तटबंदी मधील एका भग्न छोट्या दरवाजातून उतरून किल्ल्याचे माचीवर जाता येते. या माचीवर तीन भागात खोदलेले एक तळे असून याचे काठावर मारुती मंदिर आहे. किल्ल्यावर रुद्रेश्वर शिवमंदिर आहे. या रुद्रेश्वरावरून या किल्ल्या रुद्रमाळ हे नाव मिळाले. हा या किल्ल्याचा अधिपती देव. पुरंदर हे इंद्राचे नाव आहे व इंद्राचे शस्त्र वज्र म्हणून पुरंदर शेजारी असलेला किल्ला म्हणून त्याला वज्रगड हे नावही प्राप्त झाले आहे. या मंदिरांचे पुढे काही अंतरावर पडलेले अवशेष आहेत. या ठिकाणी काही काळ आद्यक्रांतीवीर उमाजी नाइक यांचे वास्तव्य होते. किल्ल्याचे वायव्ये कडील बुरजास जोडणारी एक उतरणारी डोंगराची सोंड आहे. या सोंडेच्या वरील तिसऱ्या टप्प्यावर उत्तानदेवाचे स्थान आहे. सोंडेच्या पायथ्याला कपिलेश्वर शिवस्थान आहे. या वरून या सोंडेस कपिलधार असे म्हणतात. वज्रगडाचे बांधकामा विषयी निश्चीत माहिती उपलब्ध नाही. पण शिवपूर्व काळापासून त्याचे उल्लेख आढळतात

मुरारबाजी देशपांडेचा पराक्रम

इसवी सन १६६५ मध्ये दिलेरखानाने पुरंदरला वेढा दिला व पुरंदर मिळविण्यासाठी त्याने प्रथम वज्रगड घेण्याचा प्रयत्न सुरु केला. वज्रगडाचे कपिलधारे वरून सैन्यासह तीन तोफा चढविण्यास सुरवात केली. वज्रगडा वरील मावळ्यांचा तीव्र प्रतिकार झेलत या तोफा वर आणल्या गेल्या. वज्रगडाचे किल्लेदार यशवंत बुवाजी प्रभु व बाबाजी बुवाजी प्रभु. यांनी वज्रगड राखण्यासाठी निकराची झुंज दिली ३० मार्च १६६५ ते १४ एप्रिल १६६५ त्यांनी किल्ला ३०० मावळ्यांचे साह्याने लढविला. तोफांचे माऱ्याने किल्ल्याचा वायव्य बुरुंज ढासळला, १४ एप्रिल १६६५ दिलेरखान बरोबरील युद्धात वज्रगड पडल. पुरंदरवर मोघलांनी हल्ला चढविला एप्रिल, मे १६६५ चे दोन महिने पुरंदर किल्ला मराठ्यांनी नेटाने लढविला. वेढा तोडण्यासाठी मुरारबाजी देशपांडेनी वेढा तोडण्यासाठी पराक्रमाची शर्थ केली. पण, मुघलांच्या हल्यात मराठ्यांचे बरेच नुकसान झाले. अखेर मुरारबाजी देशपांडे आपल्या निवडक सातशे मावळ्यासह मुघलांवर तुटून पडले. माचीवर घुसलेल्या मुघलांना उधळवून लावले. पायथ्याशी असलेल्या खानाच्या सैन्यावर तुटून पडले, दिलेरखान व मुरारबाजी याची हातघाईची लढाई झाली. दिलेरखानने मुरारबाजीना आमिष दाखवले. पण, स्वराज्य स्वाभिमानी मुरारबाजीनी पराक्रमाची शर्थ करत दिलेरखाना बरोबरील युद्धात मुरारबाजींना वीर मरण आले. तरी मराठ्यांनी पुरंदरचा लढा सुरूच ठेवला होता. अखेर शिवाजीमहाराज व जयसिंग यांच्या मधील तहात पुरंदर मुघलांना मिळाला.

पुरंदर किल्ल्याचा इतिहास

पुरंदर म्हणजे इंद्र होय. या पर्वतावर गौतम ऋषीच्या शापातून मुक्ती मिळविण्यासाठी इंद्राने येथे तप केले होते. म्हणून या किल्ल्याचे पर्वत रांगेस इंद्रनील असे नाव लाभले होते. या मुळेच या पर्वतास पुरंदर नाव प्राप्त झाले.

या किल्ल्याचे इतिहासातील नोंदी यादव पुर्वा काळापासून आढळतात. या किल्यावर यादवांचे राज्य होते.

इसवी सन १३५० मध्ये बहामनी सत्तेच्या ताब्यात हा किल्ला गेला.

इसवी सन १३८० बहामनी राज्याकडून किल्ला दुरुस्ती. शेद्र्या बुरुंज उभारणीत नाकनाथ व देवकी या नवविवाहित जोडप्याचा बांधकामात गाडून बळी

इसवी सन १४८६ अहमदनगर निजामशाहीचे किल्ल्यावर राज्य

इसवी सन १५९६ निजामशाहीने मालोजीराजाना जहागिरीत किल्ला दिला

इसवी सन १६२९ किल्ला आदिलशाही कडे

इसवी सन १६४७ पुरंदरचा किल्लेदार महादजी निळकंठ यांचा मृत्यू. त्याचे मुलांमधील वादात मध्यस्ती करून शिवाजी महाराजांनी किल्ला स्वराजात आणला. स्वराज स्थापनेच्या सुरवातीच्या कालखंडात महाराजांचे वास्तव्य याच गडावर. स्वराज्याचे सुरवातीचे हालचाली येथूनच.

इसवी सन १६४८ पहिली लढाई याच किल्यावरून कूच करून लढली व बेलसर येथे विजय मिळवला.

१४ मे १६५७ राणी सईबाई याच्या पोटी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म

राणी सईबाई यांचे निधनानंतर कापूरहोळच्या धाराऊ गाडे यांनी दुधमाता बनून संभाजीना वाढविले.

इसवी सन १६६० पुरंदर वरून कूच करून पुण्यातील लालमहालात शाहिश्ते खानाची बोटे तोडली.

३० मार्च १६६५ पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाचा वेढा

१४ एप्रिल १६६५ दिलेरखान बरोबरील युद्धात वज्रगड पडला, पुरंदरावर मोघलांचा हल्ला.

एप्रिल, मे १६६५ पुरंदर किल्ला मराठ्यांनी नेटाने लढविला, वेढा तोडण्यासाठी मुरारबाजी देशपांडेंचे प्रयत्न, वेढा तोडण्यासाठी पराक्रमाची शर्थ दिलेरखाना बरोबरील युद्धात मुरारबाजींना वीर मरण. ( मुरारबाजी जन्म -१६१६, महाड ) मराठ्यांनी पुरंदरचा लढा सुरूच ठेवला.

१३ जुन १६६५ पुरंदरच्या पायथ्याशी जयसिह व शिवराय चर्चा होऊन पुरंदरचा तह. किल्ला मोघलांचे ताब्यात.

८ मार्च १६७० निळोपंत मुजुमदारांनी किल्ला स्वराजात आणला.

इसवी सन १६८९ किल्ला मुघलांकडे. औरंगजेबाने किल्लाचे नाव आझमगड ठेवले

इसवी सन १६९१ किल्ला स्वराज्यात परत

इसवी सन १७०५ किल्ला मुघलांकडे

इसवी सन १७०५ भोरचे पंत सचिवानी किल्ला मुघलांकडून परत मिळवला

इसवी सन १७०७ किल्ल्यावर छत्रपती शाहूचे वास्तव्य

इसवी सन १७१३ छत्रपती शाहू महाराजांनी साताऱ्यात बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे पदाची वस्त्र दिली, पेशवे परिवाराचा किल्ल्यावर निवास.

इसवी सन १७२७ चिमाजी अप्पांनी किल्ल्यावर मराठ्यांची टांकसाळ सुरु केली.

इसवी सन १७६४ गडकरी अत्र्यान विरुद्ध जुन्या गडकऱ्यांचे बंड. मजूर म्हणून किल्ल्यात प्रवेश, गवतात लपविलेल्या तलवारींनी हल्ला. गडावर कब्जा.

इसवी सन १७७४ नारायणराव पेशव्यांच्या गरोदर पत्नी गडावर निवासास, १८ एप्रिल १७७४ सवाई माधवरावांचा जन्म, वयाचे ४० व्या दिवशी पेशवे पदाची वस्त्र, पेशवाईचा कारभार गडावरून.

इसवी सन १८१८ गड इंग्रजांचे ताब्यात

इसवी सन १९६१ गडावर लष्करी प्रशिक्षणाची अकादमी भारत सरकारने सुरु केली. तत्कालीन संरक्षण मंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांचे हस्ते उद्घाटन.

१९ एप्रिल १९७० मुरारबाजी पुतळ्याचे अनावरण

इसवी सन १९७९ किल्ल्यावरील लष्करी प्रशिक्षणाची अकादमी भारत सरकारने हलवली.

पुरंदर व वज्रगडा वरील पुष्प वैभव

राम-रावण यांच्या लंके मधील युद्धात मुर्चित पडलेल्या लक्ष्मणाला सावध करण्यासाठी लागणारी संजीवनी वनस्पतीसाठी हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून नेला. या पर्वतातील भाग म्हणजे हा इंद्रनील पर्वत, इंद्रनील म्हणजेच पुरंदर असे वर्णन संत नामदेवांनी केलेले आहे. पुरंदर-वज्रगड येथील औषधी वनस्पती व पुष्प वैभवासाठी प्रसिद्ध आहेत. पुरंदरचे भोगोलिक स्थान त्याची उंची, माती,पावसाचे प्रमाण यामुळे हवामानाची वेगळी देण या पर्वतास लाभली आहे. पुरंदर वज्रगडाचे डोंगर माथे पावसाळ्यामध्ये गवताने झाकलेले असतात. या डोंगर माथ्यावर मोठे झाडे झुडपे वाढू शकत नाहीत. त्यामुळे जास्त पावसात मोठ्या उंचीवर वाढणाऱ्या खुरट्या वनस्पतींची जैवविविधता येथे आढळते. सह्याद्री मधील कळसुबाई, हिमालयातील काही भाग व अफगाणीस्तान दक्षिणेतील अण्णामलाई येथील भागात आढळणाऱ्या काही वनस्पती येथे आढळतात. तर काही दुर्मिळ वनस्पती याच किल्ल्यावर आढळतात.

इसवी सन १९४५ मध्ये इंग्रज प्रशिक्षक फादर संतापो यांनी आपल्या पुरंदर येथील वास्तव्यात येथील वनस्पती व फुलांचा अभ्यास केला. त्यांनी आपल्या 'फ्लोरा ऑफ पुरंदर' या पुस्तकात येथील सुमारे ६०० वन्य वनस्पतींची नोंद केली आहे. पावसाला सुरु झाल्यावर येथील पुष्प वैभव आकारू लागते. ऑगस्ट, सप्टेबर, ऑक्टोबर महिन्यात हा परिसर आपल्या पुष्प वैभवाने नटू लागतो. प्रत्येक महिन्यात वेगळेच पुष्प वैभव जन्म घेते, अगदी मार्च महिन्यात सुद्धा येथील काही फुले फुलतात.

इतिहासाचे कडू गोड आठवणी, जागवत निसर्ग वैभव अंगावर लेवून हे जुळे दुर्ग स्वराजाचा स्वाभिमान जागवत ताठ मानेने उभे आहेत, त्याच्या पुढे नतमस्तक होण्यासाठी एकदातरी येथे यावेच.

गणेश टाक.

महाद्वार मार्ग, जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२३०३

email - [email protected]

web - www.jejuri.net

Updated : 14 May 2022 5:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top