Home > मॅक्स ब्लॉग्ज > ही माझी शिवसेना आहे का ?

ही माझी शिवसेना आहे का ?

ही माझी शिवसेना आहे का ?
X

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी नुकत्याच निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी सोयीचं राजकारण केलं. जे एकमेकांना पाण्यात पाहात होते,ती नेते मंडळी सत्तेसाठी एकत्र आली. सर्व महाराष्ट्रात हेच चित्र होतं. यामुळे सर्वच पक्षांचे सच्चे कार्यकर्ते (जर उरले असतील तर) नाराज झाले असतील.

मी आता कार्यकर्ता नसलो तरी शिवसेनेचा चाहता नक्कीच आहे. जॉब आणि करिअरसाठी (म्हणजे पोटापाण्यासाठी) संभाजीनगर सोडून आता 14 वर्ष होत आली. पण संभाजीनगरमधल्या शिवसेनेसाठी माझा अजूनही सॉफ्ट कॉर्नर आहे. संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या देवयानी डोणगावकर निवडून आल्या. मात्र यामुळे माझ्यातल्या शिवसैनिकाला वेदना झाला. कारण देवयानी डोणगावकर या गंगापूर तालुक्यातले मूळचे काँग्रेस नेते कृष्णा डोणगावकर यांच्या पत्नी. माझं मूळ गावही गंगापूर तालुक्यात असल्यामुळे हा ब्लॉग प्रपंच.

कृष्णा डोणगावकर यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. 1990 पूर्वी डोणगावकर घराण्याची गंगापूर तालुक्यावर हुकूमत होती. पण शिवसेनेनं या घराण्याची राजकीय धुळधाण केली. 1990च्या विधानसभा निवडणुकीत गंगापूर तालुक्यात शिवसैनिक सायकलवरून प्रचार करत होते. गंगापूरहून शिवसैनिक सायकलवर खुलताबादपर्यंत जावून प्रचार करायचे. शिवसेनेचे नवखे उमेदवार कैलास पाटलांनी अशोक पाटील डोणगावकरांचा पराभव केला. तो पराभव काँग्रेसचा नव्हे तर डोणगावकर घराण्य़ाचा होता. शिवसैनिक असल्यामुळे ज्यांचे ऊस कारखान्यात नेले नाही त्यांचा तो विजय होता. सिंचनाच्या सोयी नसल्यामुळे कायम दुष्काळ पाहणा-या जनतेचा तो विजय होता. मात्र कैलास पाटील यांनी छगन भुजबळांसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश करून माती खाल्ली होती. त्यानंतर कैलास पाटील यांच्या अंगावर काही विजयाचा गुलाल पडला नाही. 1990 नंतर गंगापूर तालुक्यानं झेडपी,पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेला साथ दिली. सामान्य घरातल्या शिवसैनिकांनी बलाढ्य काँग्रेसी नेत्यांशी लढा देऊन त्यांना घरी बसवलं होतं. तीच काँग्रेसी मंडळी आता शिवसेनेत आली आहेत. म्हणजे ज्यांना शिवसैनिकांनी संपवलं त्यांचं पुनर्वसन शिवसेनेच्या नेत्यांनी केलं, असं म्हणण्याची आता वेळ आली आहे.

राहायला संभाजीनगरला असलो तरी गंगापूर तालुक्यातल्या आमच्या सोलेगाव या मूळगावी लहाणपणी जायचोच. आता प्रमाण थोडं कमी झालं आहे. मात्र लहाणपणी गावाला गेल्यावर माझे काका अंकुश तात्या यांच्याशी राजकीय भांडण व्हायचच. हे मी तुम्हाला 1990च्या काळातलं म्हणजेच 27 वर्षांपूर्वीचं सांगत आहे. काकांना सगळेच तात्या म्हणतात. तात्या आता ह.भ.प.ही झाले आहेत. तर असे हे आमचे तात्या हार्डकोअर काँग्रेसी. मी काकांना जेव्हापासून पाहतोय, तेव्हापासून ते एकतर सरपंच किंवा ग्राम पंचायत सदस्य. पण तात्या, मला असं वाटतं मी लहाणपणी उगीचच तुमच्याशी भांडत होतो. तुम्ही ज्या काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला ती मंडळी आता शिवसेनेत आली आहेत. आणि ज्या काँग्रेसींची मला घृणा वाटायची ते शिवसेनेच्या नेत्यांच्या गळ्यात गळे घालत आहेत. तात्या आता, राजकारण जाऊ द्या चुलीत. आपण आपली नाती जपूया. तशी ती जपलेली पण आहेतच. पण राजकारणाशी आपल्या सारख्या सामान्यांचं नातं नाही, हे आता कळून चुकलं.

Updated : 25 March 2017 8:20 AM GMT
Next Story
Share it
Top