Home > मॅक्स ब्लॉग्ज > ही जगण्याची कला? छे...अप्पलपोटेपणा

ही जगण्याची कला? छे...अप्पलपोटेपणा

ही जगण्याची कला? छे...अप्पलपोटेपणा
X

आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी परवा नागपुरात वातानुकूलित सभागृहात धनवंतांसोबत केलेली ‘अंतरंग वार्ता’ अशीच धंदेवाईक होती. या वार्तेसाठी अडीच हजारापासून पंचेवीस हजारापर्यंत तिकीट होते. रविशंकरांनी अशा प्रवचनांचे पैसे घ्यावे की नाही? हा तसा त्यांचा खासगी प्रश्न. पण जर तुम्ही स्वत:ला संत म्हणवून घेत असाल, लाखो माणसांची तुमच्यावर श्रद्धा असेल तर पैसे घेऊन जगण्याची कला शिकविणे हा बाजारुपणा नव्हे का? मग या रविशंकरांना समाजाने संत, गुरुजी का म्हणावे? अशावेळी गाडगेबाबा प्रकर्षाने आठवतात... दुसऱ्यासाठी जगणे हीच खरी जगण्याची कला. ती गाडगेबाबांनी फार पूर्वी सांगितली. श्री श्री रविशंकर सांगतात तो अप्पलपोटेपणा आहे.

माणसाने कसे जगावे? हे सांगण्यासाठी कुणी पैसे घेत असेल तर त्याला आपण संत, श्री श्री, महाराज म्हणावे का? खचितच नाही. संत गाडगेबाबांनी मानवधर्माची दशसूत्री सांगून ठेवली आहे. त्यानुसार, अशी माणसे बाजारू असतात. आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी परवा नागपुरात वातानुकूलित सभागृहात धनवंतांसोबत केलेली ‘अंतरंग वार्ता’ अशीच धंदेवाईक होती. या वार्तेसाठी अडीच हजारापासून पंचेवीस हजारापर्यंत तिकीट होते. रविशंकरांनी अशा प्रवचनांचे पैसे घ्यावे की नाही? हा तसा त्यांचा खासगी प्रश्न. पण जर तुम्ही स्वत:ला संत म्हणवून घेत असाल, लाखो माणसांची तुमच्यावर श्रद्धा असेल तर पैसे घेऊन जगण्याची कला शिकविणे हा बाजारुपणा नव्हे का? मग या रविशंकरांना समाजाने संत, गुरुजी का म्हणावे? अशावेळी गाडगेबाबा प्रकर्षाने आठवतात...

गाडगेबाबा गावातील एखादे वर्दळीचे ठिकाण निवडायचे, ती जागा स्वत: झाडायचे आणि जमलेल्या ग्रामस्थांना माणूसपणाची शिकवण द्यायचे. त्यासाठी बाबांनी कुणाकडून असे पैसे घेतले नाहीत. कुणी दिलेच तर ते स्वत:जवळ ठेवले नाहीत. या फकिराने जगाचा संसार सुखी करण्यासाठी आपला संसार स्वत:च्या हाताने मोडून टाकला. श्री श्रींसारख्या बुवा-महाराजांना ऐश्वर्याचे आकर्षण असते. भक्तांच्या गर्दीने ते मोहरून जातात व राजकारण्यांच्या वाकण्याने दिपून जातात. गाडगेबाबांना असा कुठलाच मोह नव्हता. काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवतो म्हणून हेच श्री श्री यवतमाळात आले होते. लोकांना हात वर-खाली करायला सांगितले आणि निघून गेले. नंतर पुन्हा परतले नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्यात का? नाही. उलट पांढऱ्या फटफटीत कपाळांचा आक्रोश वाढला. या आत्महत्यांचे आज सर्वत्र काहूर माजले असताना त्याच प्रदेशात येऊन श्री श्री रविशंकर अंतरंग वार्तेसाठी लाखो रुपये उकळतात तेव्हा त्यांच्या या जगण्याच्या कलेची घृणा वाटू लागते.

गाडगेबाबांनी असा श्रद्धेचा बाजार कधी मांडला नाही. बाबांचे कुटुंब झोपडीत राहायचे, कष्टाशिवाय जगायचे नाही हा त्यांचा दंडक होता. ते मूर्तिजापूरला असतानाची ही गोष्ट, बाबांची मुलगी आलोकाबाई पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी आली होती. बाळंतपणानंतर मुलगी सासरी परत जाते तेव्हा तिला चोळी-बांगडी करावी लागते. बाबांची पत्नी कुंताबाईला तसे वाटणे स्वाभाविक होते. शेवटी ती आई होती. तिने ही गोेष्ट बाबांच्या कानावर टाकली. बाबा आलोेकाबाईला म्हणाले, ‘‘बाई गं, बाप जर एकपट साधू असेल तर मुलांनी दहापट साधू झाले पाहिजे. हीच साधूच्या कुटुंबाची परीक्षा असते. तू असं कर सासरी जाईपर्यंत शेण गोळा करून गोेवऱ्या लाव आणि ते विकून जे पैसे येतील त्यातून चोळी-बांगडी करून घे’’ हा असा विरक्त बाप. श्री श्रींच्या योगवार्तेत बापामधील ही विरक्ती असते का?

एकदा प्रवासात कुंताबाई बाबांसोबत होती. तिने प्रवासासाठी सामान घेतले. स्टेशनवर आल्यानंतर बाबांनी कुंताबाईजवळील सामान गरिबांना वाटून दिले. गाडेबाबांसारखे आपण निरिच्छ वागू शकत नाही. आपली तेवढी पात्रता नाही. पण किमान आपल्या दारात आलेल्या भिकाऱ्याला ताटातली चतकोर भाकर देण्याचे दातृत्व तरी हे श्री श्री त्यांच्या ध्यानसाधनेतून सांगतात का? बाबांनी शेकडो धर्मशाळा बांधल्या. पण, या धर्मशाळांमध्ये मुलांना कधी राहू दिले नाही. अन्नछत्रात रोेज कितीतरी अंध-अपंग जेवायचे. पण, इथेही घरच्यांना प्रवेश नव्हता. श्री श्रींनी असा अनासक्त योग कधी सांगितला नाही. दुसऱ्यासाठी जगणे हीच खरी जगण्याची कला. ती गाडगेबाबांनी फार पूर्वी सांगितली. श्री श्री रविशंकर सांगतात तो अप्पलपोटेपणा आहे.

- गजानन जानभोर

सौजन्य - दै. लोकमत

Updated : 22 Nov 2017 4:18 PM GMT
Next Story
Share it
Top