Home > मॅक्स ब्लॉग्ज > ...ही तर राणेंच्या राजकारणाची इतीश्रीच!

...ही तर राणेंच्या राजकारणाची इतीश्रीच!

...ही तर राणेंच्या राजकारणाची इतीश्रीच!
X

नारायण राणे भाजपच्या वाटेवर असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

राणे स्वतः त्याचा इन्कार करीत असले तरी, "मामला गडबड है."

राणेंच्या राजकारणाची भाजपात इतिश्री होईल काय, असा प्रश्नही त्यांच्या राजकारणाचा अभ्यास करणाऱ्यांना पडला आहे. हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण मुंबईत जन्माला आलेलं हे राजकीय वादळ सिंधुदुर्गात वाढलं, विस्तारलं. जर ते विसावणार असेल तर सिंधुदुर्गातच विसावणार आहे.

राणेंच्या राजकारणाची ही इतिश्री आहे काय, या प्रश्नाचे उत्तर शोधताना आधी त्यांच्या स्वभावाचा अभ्यास करावा लागेल. कारण त्यांचं राजकारण त्यांच्या स्वभावाचा आरसा आहे. त्यामुळे त्यांचा चाहता, प्रेमी, लाभार्थी, विरोधक, द्वेष्टा या साऱ्या भूमिका बाजूला ठेवाव्या लागतील. आणि काही गोष्टी अत्यंत तटस्थपणे मान्य कराव्या लागतील.

राणे हे वादळी नेतृत्व आहे हे खरं आहे. ते "यारोंके यार" आहेत हे ही खरं आहे. ते दिलदार आहेत, उत्तम प्रशासक आहेत, कार्यकर्ता उभा करण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे हे खरं आहे. संपूर्ण महाराष्ट्र ज्या मोजक्या नेत्यांना खडानखडा माहिती आहे त्यापैकी राणे एक आहेत हे देखील खरं आहे. पण राणे उतावळे आहेत हेही खरं आहे. संयम आणि राणे यांचा दूरदूरचा संबंध नाही हे वास्तव आहे. मित्र, कार्यकर्ता आणि पोटार्थी अंकित यातला भेद राणेंना कळत नाही हे सत्य आहे. राणेंकडे कुठलीही तात्विक बैठक नाही, सत्ताकारण हेच त्यांचं तत्त्व आहे. म्हणून त्यांच्या मागेपुढे कार्यकर्त्यांचं मोहोळ दिसतं. त्यातले ८० टक्के त्यांच्या राजकारणाचे आर्थिक लाभार्थी आहेत. कोणतीही गोष्ट, व्यक्ती किंमत ठरलेली असते, ती अदा केली की कुणीही विकत मिळतं असा त्यांचा व्यापारी दृष्टिकोन आहे. वचक, दरारा आणि दहशत यातली रेषा फारच पुसट आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे राणे प्रचंड सत्ताकांक्षी आहेत. सगळा झोत आपल्याभोवती राहावा असा त्यांचा खटाटोप राहिलेला आहे. आणि त्यासाठी कुणालाही शिंगावर घेण्याची, कोणतीही जोखीम पत्करण्याची आणि कसलीही उचापत करण्याची त्यांची तयारी असते, हे सर्वाधिक जळजळीत वास्तव आहे. या सगळ्या गुणावगुणांचा त्यांच्या राजकीय भवितव्याशी काय संबंध, असा प्रश्न कुणीही विचारू शकेल. तर त्यांचा राजकीय भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य याच गुणावगुणांभोवती फिरत राहणार आहे.

राणेंचा उदय शिवसेना या राणेंच्या बेदरकारपणाशी साधर्म्य असणाऱ्या पक्षात झाला. कोणतीही जोखीम पत्करण्याच्या स्वभावातून त्यांनी सुरक्षित सरकारी नोकरी सोडली. त्यांच्या राजकीय वाढीचा झपाटा प्रचंड होता. यात त्यांचा व्यवहारीपणा, दिलदारपणा, प्रशासन याचा महत्वाचा वाटा होता. आमदारकीच्या अवघ्या नवव्या वर्षी ते मुख्यमंत्री झाले. ९९ साली सत्ता गेल्यानंतर ते विरोधी पक्षनेते झाले. विलासरावांचं सरकार पाडण्यासाठी त्यांनी केलेल्या उचापती महाराष्ट्र विसरलेला नाही. संसदीय आयुधांचा अभ्यास या गुणांच्या जोरावर त्यांनी आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडलं. पण इथून त्यांच्या अवगुणांनी त्यांचा घात करण्यास सुरुवात केली. कमालीची सत्ताकांक्षा आणि अतिआत्माविश्वासातून त्यांनी सेना फोडली. त्यांनी घेतलेली जोखीम काही अंशी यशस्वी ठरली असली तरी या जुगारात शाम सावंत हे आमदार आणि सुबोध मोहिते हे खासदार यांचा बळी गेला. केवळ उतावळेपणातून त्यांनी विलासरावांना अंगावर घेतलं. अशोक चव्हाणांना विरोध केला, काँग्रेस श्रेष्ठींच्या शिमगा केला, पृथ्वीराज चव्हाणांना शिंगावर घेतलं, निवडणुकीत महत्वाची भूमिका मिळाली नाही म्हणून वादळाची हूल देत कोकण दौरा काढला. या प्रत्येकवेळी त्यांचा दारुण पराभव झाला आहे. ते कुणालाही विकत घेऊ शकत होते, पण त्यांच्या पेक्षा अधिक देणारेही बाजारात होतेच. एकेकाळी राणेंचे बोट धरून वावरणारे विजय वडेट्टीवार, विनायक निम्हण, सदा सरवणकर ही काही मोजकी उदाहरणे.

वास्तविक राणेंची कारकीर्द त्यांच्या अवगुणांमुळे उतरंडीला लागली ती २००९ साली.

सेना संपवणार, संपवणार म्हणून राणे बाता मारत होते त्या सेनेला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ३ लाखाहून अधिक मते मिळाली होती. राणेंचे पुत्र निवडून आले असले तरी भविष्यात काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज कुणाला आला नाही. त्यावेळी राष्ट्रवादीचे दीपक केसरकर, शिवसेनेचे राजन साळवी, राष्ट्रवादीचेच उदय सामंत यांना भविष्यात निवडून यायचं होतं हे लक्षात घेतलं पाहिजे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राणे अवघ्या २० हजार मतांनी निवडून आले. त्या आधी झालेल्या निवडणुकीत राणेंनी सेनेचे परशुराम उपरकर यांचं डिपॉझिट जप्त केलं होतं, यावरून ही उतरंड लक्षात यावी. याच निवडणुकीत त्यांचे होम पीच असलेल्या कणकवलीत काँग्रेसचा उमेदवार रवींद्र फाटक पराभूत झाले होते.

राणेंनी जे काही मिळवलं त्यात प्रचंड संघर्ष आहे. आणि त्यांच्या मुलांना हा वारसा आयता मिळाला आहे. त्यामुळे राणेंपेक्षा काकणभर अधिक बेदरकारपणा त्यांच्या दोन्ही चिरंजीवांत आला आहे. म्हणूनच राणेपुत्रांच्या काळात राणेंचे वैरी सर्वाधिक वाढले. भास्कर जाधव यांनी सेना सोडताना पहिला फोन राणे यांना केला होता. आणि आमदार होण्यासाठी दीपक केसरकर राणेंच्या घरी सारख्या घिरट्या घालायचे. हे जिवलगही राणेंच्या विरोधात गेले आणि २०१४ उगवलं. या वर्षात काय काय घडलं हे पुन्हा इथे सांगायची आवश्यकता नाहीच.

कोणतीही तात्विक बैठक नसणं राणेंसाठी फायदेशीर ठरलं आहे. म्हणूनच ३९ वर्ष सेनेत घालवून पूर्ण यू टर्न मारून १२ वर्ष काँग्रेसमध्ये काढू शकले. या १२ वर्षात ९ वर्ष ते मंत्री होते. म्हणजे सत्तेत होते. सत्ता गेल्यानंतर तीन वर्षे सुद्धा राणेंना विरोधकाच्या भूमिकेत पदाविना काढता आलेली नाहीत. ही सत्ताकांक्षा.

ते भाजपमध्ये गेले तर काय होईल?

देवेंद्र फडणवीस या अत्यंत ज्युनिअर नेत्याच्या हाताखाली त्यांना काम करावं लागेल. केंद्रात गेले तरी नितीन गडकरी यांच्या हाताखाली काम करावं लागेल. उद्धव आणि मोदी यांच्यात नुकतीच दिलजमाई झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची पालकमंत्रीपदे सेना सोडणार नाही. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ सेना सोडणार नाही. म्हणजे निलेश राणेंसाठी विधानसभा मतदारसंघ शोधावा लागेल. तीन विधानसभा मतदारसंघांच्या सिंधुदुर्गात दीपक केसरकर सावंतवाडीत भक्कम आहेत. कुडाळ मालवण मतदारसंघात काय स्थिती आहे, हे त्यांच्याशी खरं बोलण्याची हिम्मत असणारा त्यांचा कोणताही कार्यकर्ता नक्की सांगू शकतो. राहता राहिली एकटी कणकवली...

नितेश राणे यांनी घेतलेल्या भूमिका संघ विचारसरणीविरोधी आहेत. त्यांनाही यू टर्न घ्यावा लागेल. एकेकाळी ५० सदस्य असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत राणेंचे ४२ सदस्य होते, ते आता आता २८ झालेत.

"सेना झाली, काँग्रेस झाला, आता भाजप आणि फुडल्या वर्षी खय बसपात?" असा प्रश्न राणेंच्या कार्यकर्त्यांना लोक आताच विचारु लागले आहेत. राणेंनी विश्वासार्हता गमावली आहे. आक्रमक राणे बचावात्मक झाले आहेत. मी असे केलेच नाही, असं ते कधीही म्हणाले नाहीत. आज ते म्हणावं लागतं आहे. ५० टक्के काँग्रेसही त्यांच्या बरोबर येईल अशी स्थिती सिंधुदुर्गात नाही. मुक्त वाव देऊनही रत्नागिरीत काँग्रेसचा अवघा १ जिल्हा परिषद सदस्य आहे.

राणेंच्या नेतृत्वात काँग्रेस ठाण्यात उताणी पडली. अशी सध्याची स्थिती आहे. राणेंनी केवळ आपल्या अवगुणांनी ती ओढवून घेतली आहे. सेनेतून आलेले राणे काँग्रेसमध्ये रमू शकले नाहीत. सेनेचे राजकारण कुस्तीचा आखाडा होता आणि काँग्रेसचे राजकारण बुद्धिबळाचा पट. राणेंना कुस्ती जमली, बुद्धिबळ नाही. भाजपचे राजकारण हा पेशन्सचा डाव आहे. पेशन्स आणि राणे यांचा संबंध नाही. इथे उचापतींना संधी नाही, राज्यात पंख पसरण्याची अनुमती नाही. राज्यभर भराऱ्या मारणाऱ्या राणेंच्या वादळी राजकारणाची ती इतीश्रीच ठरणार आहे, यात काहीही शंका नाही.

  • कोकणचो दिवटो

Updated : 14 April 2017 1:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top