Home > मॅक्स ब्लॉग्ज > स्त्री-पुरुष समानता : का व कशासाठी?

स्त्री-पुरुष समानता : का व कशासाठी?

स्त्री-पुरुष समानता : का व कशासाठी?
X

महाराष्ट्रात कथित लैंगिक व्यभिचारासाठी तरुणीला भर गावात सर्वाच्या देखत चाबकाच्या फटक्यांची शिक्षा दिली जाते आणि कोणी हूं की चू करीत नाही. दलित तरुण कथित उच्चवर्णीय तरुणीच्या प्रेमात पडला म्हणून त्याच्या देहाची खांडोळी करण्यासही आजच्या पुरोगामी महाराष्ट्रातील एक वर्ग मागेपुढे पाहत नाही आणि राज्याच्या सर्वात धनिक प्रदेशातील स्त्री-भ्रूणहत्या काही कमी होत नाहीत. वडिलांना हुंडा देता येत नाही म्हणून शितलसारख्या तरुणी आत्महत्या करतात. हे सर्व बदलावयाचे असेल तर ते केवळ बोलकेपणा करण्याने बदलणारे नाही. त्यासाठी विचारांतच योग्य ते बदल करावे लागतील. तसे करताना आपण महिलांना काही तरी देत आहोत, या पुरुषी मानसिकतेलाच मूठमाती द्यावी लागेल. नपेक्षा ८ मार्चचा 'महिला दिन' आणि 11 एप्रिलचा 'जागतिक मातृदिन' हे नवयुगाचे 'इव्हेन्ट' तेवढे ठरतील.

आपल्या देशात स्त्री-पुरूष लोकसंख्येचं गुणोत्तर घटलं आहे म्हणजे किती तर ते हजाराला ९४० इतकं आहे. सहा वर्षांखालील वयोगटात हे प्रमाण हजाराला ९१४ इतकं खाली आलंय. एकूणात ४५ ते ४७ टक्के महिला आपल्या देशात आहेत. जवळपास ५० टक्केच! या पार्श्वभूमीवर आपल्या देशातल्या महिलांना ‘स्वतंत्र’ नव्हे तर ‘सह’ म्हणजे पुरूषांच्या बरोबरीचं स्थान देण्याची आवश्यकता आहे. देशातल्या महिला सामाजिक, आर्थिक दृष्ट्या सक्षम, स्वावलंबी, आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत, ही अपेक्षा रास्तच आहे. त्यासाठी त्यांचं व्यक्तीस्वातंत्र्य जपणं, जोपासणं योग्यच आहे. भारतीय राज्य घटनेनं सामाजिक समतेबरोबरच स्त्री-पुरूष समानतेच्या मूल्याचा पुरस्कार केला आहे. हे समानतेचं मूल्य भारतीय समाजाच्या मनीमानसी रुजवणं, ही खरं तर आजची गरज आहे. तथापि, महिलांच्या मनात स्त्री समानतेचं मूल्य रुजणं, ही त्याहून महत्त्वाची गोष्ट आहे.

जातीधर्माच्या पलिकडं जाऊन महिलांच्या मनात अन्य जातीय, अन्य धर्मीय महिलांविषयी सह-संवेदना जागृत होणं, ही अत्यंत आवश्यक बाब आहे. लोकल ट्रेनचं उदाहरण घ्या ना. एखादी महिला कुटुंबासोबत जनरल डब्यात चढली, तर पटकन उभं राहून जागा देण्याचं सौजन्य पुरूष सहप्रवासी दाखवतात. पण अशीच एखादी ज्येष्ठ किंवा गर्भवती महिलांच्या डब्यात चढली तरी तिला जागा मिळेलच, याची शाश्वती नाही. उलट ‘कशाला गर्दीच्या वेळी प्रवास करायचा अशा वयात! (किंवा अवस्थेत)’ असेच उद्गार कानी पडतात. दुसरं उदाहरण म्हणजे साताऱ्याच्या आशा शिंदे या तरुणीचं. आंतरजातीय विवाह करणाऱ्या आशाला तिच्या बापानंच ‘ऑनर किलींग’च्या गोंडस नावाखाली ठार मारलं; तर तिची आई, आजी तिच्या मातीलाही गेल्या नाहीत. उलट ‘मारलं ते बरंच केलं!’ असे उद्गार काढले. पोटच्या मेलेल्या मुलीविषयी आपली संवेदना जात्यंधतेपोटी इतकी बोथट होत असेल, तर इतर महिलांविषयी काही बोलायलाच नको. या जातीगत संवेदनांतून किमान महिलांनी बाहेर पडलं पाहिजे, अशी माझी माफक अपेक्षा आहे. महिलांमध्ये तरी अभिजन, बहुजन, मागास, इतर मागास, आदिवासी, अल्पसंख्याक, हायर इन्कम ग्रुप, मिडल इन्कम ग्रुप अथवा लोअर इन्कम ग्रुप अशी वर्गवारी, स्टेटस डिस्ट्रीब्युशन व्हायला नकोय. ‘महिलांचे प्रश्न आणि त्यांची सोडवणूक’ या एकाच मुद्यावर त्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि तोच त्यांचा अंतिम अजेंडा असला पाहिजे.

आजच्या काळातही महिलांची सनातन मानसिकता हाही चिंतेचा विषय आहे. घराण्याला वारस हवा या भूमिकेतून स्त्री-भ्रूण हत्या घडविण्यात पुरूषांच्या बरोबरीनं किंवा त्यांना भरीस पाडणारी ही घरातली महिला असते, यापेक्षा दुर्दैव दुसरे कोणते? सासू-सूनेमधील विसंवाद हा बऱ्याच ठिकाणी न्यूक्लिअर फॅमिलीला जन्म देण्यात कळीची भूमिका बजावतो, हेही वास्तव आहे. त्यामुळं महिलांमध्ये कौटुंबिक पातळीपासून सुसंवादाची प्रस्थापना होणं, ही अत्यावश्यक बाब आहे. त्यातून बऱ्याचशा प्रश्नांचे निकाल कुटुंबाच्या स्तरावरच लागतील. सामाजिक पातळीवरच्या सुसंवादाची ही सुरुवात असेल.

आज प्रसारमाध्यमांतल्या मार्केट-धार्जिण्या जाहिरातींच्या भडीमारानं भौतिकवादी, चंगळवादी दृष्टीकोन रुजण्याला खतपाणी मिळतंय. स्त्रियांच्या संदर्भात पूर्णतः शरीर पातळीवरचे थेट संदेश जाहिरातींमधून दिले-घेतले जात आहेत. पुरूषांना आकर्षित करण्यासाठी (बरेचदा सिड्युस करण्यासाठी!) हे असं करणं खूप आवश्यक आहे, असा संदेश महिलांसाठी प्रस्तुत केला जातो. त्याच वेळी पुरूषांमध्येही स्त्रियांकडे उपभोग्य वस्तू (कमॉडिटी) म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन रुजतो.

खरं तर स्त्री-पुरूष शरीर रचना ही प्रजोत्पादनासाठीची एक अतिशय सुंदर अशी नैसर्गिक निर्मिती (क्रिएशन) आहे. स्त्री-पुरूषांच्या प्रेमळ साहचर्यातूनच सृजनाचा आविष्कार होऊ शकतो, हा संदेश निसर्गानंच दिलाय. त्यासाठी त्यांचा एकमेकांकडं पाहण्याचा दृष्टीकोन निकोप आणि आदराचा असला पाहिजे. स्त्री-पुरूषांमध्ये शरीर आकर्षणाच्या पलिकडं जाऊन मैत्रीची, सामाजिक सहजीवनाची निखळ भावना निर्माण झाली पाहिजे. एकमेकांच्या शारिरीक मर्यादा, क्षमता यांची जाणीव विकसित झाली पाहिजे. आपापसांतील भिन्नता सुसंवादाचे पूल बांधून संपवून टाकून, तिचं सक्षमतेत रुपांतर करण्याची आवश्यकता आहे. पण नेमक्या याच गोष्टीला आजच्या जीवनशैलीमध्ये फाटा दिला जातोय. स्त्री-पुरूष सहशिक्षणातून, सहजीवनातून, सहवासातून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुसंवादातून बदलत्या जगाचा आणि जगण्याचा संदर्भ अधिक खुलेपणानं लावता येणं, चर्चिला जाणं शक्य आहे...स्वतंत्र ध्रुवीकरणातून नव्हे!

स्त्रियांचा विकास तर झालाच आहे. पण सर्वांगीण नाही. समाजाचा काही वर्ग खूप पुढे निघून गेला आहे. परंतु, काही वर्ग मागेच आहे. त्याचा विकास झाला नाही. अजूनही अनेक स्त्रिया अशिक्ष‍ित, अंधश्रद्धा, पतीची मारहाण, हुंडा अशा अनेक गोष्टींच्या बंधनात अडकलेल्या आहेत. त्यांना परिवर्तनाची दिशा मिळालीच नाहीये. अनेक मातांचा दिवस कोंबडं आरवण्याच्या आधी सुरू होतो आणि रात्रीच्या किर्र्रर्र काळोखात संपतो. अजूनही त्या दोन वेळेची भूक भागवण्यासाठी 'ठेविले अनंते तैसिची राहावे' असे म्हणत नवऱ्याची मारहाण सहन करण्यात अख्खं आयुष्य घालवत असतात. पण या आरशाची एक बाजू फारच सुंदर आहे तर दुसरी तेवढीच कुरूप. एखादं दिवशी दहा मिनिटं थांबून जर विचार केला तर आपल्याला आत्मग्लानीच येईल आणि कळेल की आपण फक्त आपलाच विचार केला आहे. दुसरीचा नाही. जर याची परिभाषा विकास असेल तर तो फक्त स्व:विकासच आहे.

बदलत्या परिस्थितीत मात्र स्त्रीची भूमिका बदलली आहे. ती मुलगी, सून, पत्नी, माता या भूमिकांव्यतिरिक्त अधिकारी, वैज्ञानिक, शिक्षक, कर्मचारी, मालक, अशा अनेक रूपांनी आहे. तिच्या जीवनाला अनेक पैलू लाभले आहेत. आणि त्यांना अधिक चमक तिने आपल्या कर्तृत्वाने दिली आहे. आपल्या बुद्धीला, आत्मसन्मानाला तिने नवीन दिशा दिली आहे. आजच्या जगात असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे स्त्री नाही. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या पुढे आहे. या सर्व गोष्टींचा विचार केला तर असे वाटते की, स्त्रियांनाही काही जागा मिळाली आहे. पण ती आजही खऱ्या अर्थाने पुरुषांसारखी स्वतंत्र झाली नाहीय. माझ्या मते अजून स्त्रियांना बरेच प्रयत्न करायचे आहेत.

स्त्रियांनी आई झाल्यावर अगदी लहानपणापासूनच आपल्या मुलांना वाढवतांना मुलगा/मुलगी असा भेद खेळणी वा घरातील कामे यात करू नये. मुलांवर स्त्री ही एक व्यक्ती आहे, असे बिंबवून तिचा आदर करण्याचे संस्कार करायला हवेत. मुलींना मुलांसारखेच स्वसंरक्षणाचे बाळकडू पाजायला हवे. मुलांना 'तू बायल्या सारखा का वागतो? हातात बांगड्या भरल्या आहेस का? मुलीसारखा मळूमुळू काय रडतोस?' अशाप्रकारचे स्त्रीला कमी लेखणारे, दुय्यम समजणारे आणि भेदभाव कारणारे संस्कार करू नयेत. वयात येणाऱ्या मुलामुलींना योग्य शब्दात शास्त्रीय माहिती दिली तर मुले, मुलींकडे फक्त शारीरिक दृष्टीने बघणार नाहीत. शारीरिक बदल ही एक नैसर्गिक घटना आहे आहे असे समजून एकमेकांकडे निकोप दृष्टीने पाहायला शिकतील. घरातील मुलींना त्यांच्या आवडीचे शिक्षण दिले पाहिजे. शिवाय त्यांना शारीरिक सामर्थ्य कमावण्यासाठी, स्वत:चे संरक्षण स्वत:ला करता यावे यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे. शाळेमध्ये आठवडय़ातील काही तास मुलामुलींसाठी पाककलेचे दिले पाहिजेत. रोजच्या आहारातील खाद्यपदार्थ सर्व विद्यार्थ्यांना करता आलेच पाहिजेत. हा विषय सक्तीचा असावा. सायकल किंवा स्कूटर चालवणे, पोहणे ही कौशल्ये शाळेतच विकसित व्हावीत. त्यात मुलगा-मुलगी असा फरक केला जाऊ नये. मुलीचा व्यक्तिमत्त्व विकास झाला की तिला आपोआप समाज आदराने वागवेल. मुलाला लहानपणीच जर घरातील कामे करण्याची सवय लावली तर त्याची पुरुषी वर्चस्वाची मानसिकता आपोआप कमी होईल. अशाप्रकारे जर घरातच मुलामुलींना समान वागणूक देऊन वाढवले तर पुढच्या पिढीत बलात्काराचे प्रमाण नक्की कमी होईल. आणि 'भारतात महिला शांततेने का जगू शकत नाही', असा हाताश प्रश्न विचारण्याची वेळ उच्च न्यायालयावर येणार नाही.

- जगदीश काबरे

(लेखक शिक्षक असून लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत करण्यासाठी विविध सामाजिक चळवळीत सक्रीय आहेत.)

Updated : 27 April 2017 1:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top