Home > मॅक्स ब्लॉग्ज > सोवळ्यामागील प्रभाव

सोवळ्यामागील प्रभाव

सोवळ्यामागील प्रभाव
X

ब्राम्हण आहे असे दाखवून सोवळे नेसून केलेली फसवणूक ही तशी वरवर वाटणारी निरुपद्रवी घटना पण ती बातमी वाचून माझे लक्ष वेधले गेले. याला पहिले कारण म्हणजे आमचे पोलीस एखाद्या अशा घटनेची दखल घेण्याइतपत संवेदनक्षम कसे बनले, याचे वाटलेले आश्चर्य. दुसरे म्हणजे समाजमनावर सोवळ्याचा असलाला प्रभाव! तेल्या-तांबोळयांचे नेते म्हणविणारे व सर्वांना मान्य असलेले लोकमान्य टिळक हेही इतरांच्या हातचे खात नसत. एवढेच काय, पितृपक्षात आमच्या घरी येणारे अण्णा बामण अगर त्यांचा मुलगा आमच्या घरी कधीच जेवत नसत. आग्रह केलाच तर दूध पीत व कोरडा शिधा बांधून नेत. ते पितराबरोबर आपल्या घरी का जेवत नाहीत, असे मी एकदा आईला विचारल्याचे आठवते. "आसंल काय तरी आपल्या धर्मात लिव्हलेलं! तुला लय चौकश्या लागत्यात”. अशा अर्थाचे उत्तर दिल्याचेही आठवते.

आमच्या वस्तीतर्फे देवळात दर वर्षी पंचमी घातली जाते. घरोघर वर्गणी काढली जाई. स्वयंपाक ब्राम्हण आचारीच बनवत. पहिली पंगत गावातील ब्राह्मणांची असे. त्यांच्या बायका पुरुषांच्या पंगतीला बसत. दुसरी पंगत आमची पाटील-देशमुखांची बसे. तिसरी बारा बलुत्याची. शिल्लक राहिले तर चौथी पंगत हरिजन वाड्यातील लोकांची बसे. नाहीतर खरकटे उष्ट्यावरच त्यांची बोळवण केली जाई. आमच्या घरच्या बायका देवळात येत नसत. त्यांना चिमूट-चिमूट प्रसाद वाटत. आध्यात्मिक पुण्यात वाटेकरी केले जाई. डी.वाय.एस.पी. झाल्यावर वडिलांच्या आग्रहाखातर मी देवदर्शनाला गेलो होतो तेव्हाची ही घटना. मला गाभाऱ्यात प्रवेश नव्हता. तिथं माझ्या वर्गातील प्रभूने अभिषेक केला व मला नारळ पेढ्याचा पुडा व हार देऊ केला. मधल्या काळात मी 'सोशॉलॉजी ऑफ रिलीजन', 'सायकॉलॉजी ऑफ रिलीजन' या ग्रंथाचे वाचन केल्याने मी विवेकवाद्यांच्या गटात सामील झालो होतो. प्रसाद देताना मी त्याच्या हाताला स्पर्श होईल असा प्रयत्न केला तेव्हा त्याने हात वरवर करत वरतूनच माझ्या हातावर प्रसाद सोडला. पुढे मी त्याला विचारले की "माझा स्पर्श टाळायचा एवढा डेस्परेट प्रयत्न का केलास?" तो म्हणाला, “मी सोवळ्यात होतो. धर्मशास्त्रात तसे सांगितलंय. सोवळं नेसलं तर कुणालाही गाभाऱ्यात प्रवेश करता येईल. सोवळं स्वच्छ असल्याने पवित्र असतं” वगैरे वगैरे. खरं तर ढीगभर डाग पडलेल्या त्याच्या सोवळ्यापेक्षा माझी पँट-शर्ट अनेक पट स्वच्छ होती. पोलीस प्रशासनातील वर्णव्यवस्था स्पष्ट करण्यासाठी पुढे मी प्रकाशित केलेल्या ‘नवी दिशा - पोलीस प्रशासनाची’ या पुस्तकात हा प्रसंग लिहिला. त्यामुळे गावातील सर्व पुरोहितांनी व इतर भाविकांनी मला शत्रूपक्षाच्या यादीत टाकले. खोलेबाईंची कहाणी वाचताक्षणीच खटकली पण विचारांती लक्षात आले की माझा वर्गमित्र तसेच खोलेबाई ही तशी सामान्य माणसं.लोकमान्य टिळक, सरसंघचालक भागवत अगर मनुष्यबळविकास मंत्री सत्यपालसिंग यांच्यासारखे त्यांच्याकडे अधिकार किंवा प्रभाव नाही. ते शतकानशतके राबविल्या जाणाऱ्या वर्ण व्यवस्थेचे एक प्यादे! त्याला वर्ण अगर जात नावाची शक्ती हलवीत असते.

खोलेबाईंच्या व माझ्यासह इतरांच्या वर्तनामागे असलेली वर्ण व जात ही शक्ती आधुनिक काळात जिवंत का राहिली व तिचे पुनर्जीवन होताना का दिसतंय याचा विचार या निमित्ताने व्हायला पाहिजे. माझ्यासह इतरांना वाईट वाटले कारण खोलेबाईच्या वर्तनाने आमचे सामाजिक स्थान दुय्यम ठरले गेले तर सोवळे नेसून फसविणाऱ्या महिलेने खोलेबाईंच्या धर्माधिष्ठित उच्चपणा व प्रतिष्ठेला धक्का पोहचवला. पण हे सर्व कुठून आले? श्री भगवतगीतेपासून मनुस्मृतीपर्यंतची सर्व धर्मशास्त्रे अभ्यासा! खोलेबाईंच्या वर्तनाला त्यात पूर्ण आधार आहे व मान्यताही आहे. परमेश्वराने भूतलावर तीन प्रकारचे प्राकृतिक गुण असलेली माणसे निर्माण केली. खोलेबाईंच्या पूर्वजांच्या वाट्याला सत्वगुण आले होते. फसवणूक करणाऱ्या यादव बाईंकडे रजगुण आहेत व शूद्राकडे तमगुण दिलेत. प्रत्येकाने काय खावे, काय ल्यावे, स्वत:चे नाव काय ठेवावे, विधी धर्मकांडे कोणती करावीत, कामे कोणती करावीत हे ठरवून दिलेले आहे. त्यात बदल करण्याचा कुणालाच अधिकार नाही. तसा प्रयत्न केला तर सरळ नरकाकडे रवानगी ठरलेली! आणि असे गुण वाट्याला येण्याचे कारण म्हणजे तुम्ही पूर्वजन्मी केलेले पुण्य किंवा पाप. एकतर या जन्मात वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे केले तर पुढचा जन्म वरच्या वर्णात मिळतो किंवा जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होऊन मोक्ष मिळतो.

सोशॉलाजी, सायकॉलाजी व पॉलिटीक्स ऑफ रिलीजन या ग्रंथात वाचलेले हे सर्व आठवल्यावर खोलेबाईंच्याबद्दल माझा विचार बदलला. बराचसा सहानुभूतीपूर्वक बनला. या प्रकरणामुळे ब्राम्हण विरुध्द इतर असे चित्र उभे करण्यात काहीजण यशस्वी झाले. खरेतर अशा वर्तनाची योग्य चिकित्सा करण्याचे ज्ञान मला महात्मा फुले व खोलेबाईंच्याच जातीचे श्री नरहर कुरंदकर यांच्या साहित्याच्या वाचनाने झाले. कुरुंदकरांच्या विचाराचे असंख्य ब्राह्मण लोक माझे मित्र आहेत. उच्चनीच्चतेची दरी संपली पाहिजे अशी अनेकांची इच्छा आहे. व या प्रश्नाचे उत्तर जाती निर्मूलनामध्ये आहे असे अनेकांना वाटते. मला वाटते आपण तिथेच चुकत आहोत. जाती अद्याप जिवंत का राहिल्या? याचा शोध घेतला पाहिजे. जातीभेदाचे उत्तर निव्वळ जातीमध्ये नाही तर ते जातीच्या बाहेर आहे अशी माझी ठाम धारणा आहे. खोलेबाईंच्या व माझ्या वर्तनाचे उत्तर नक्की कोठे आहे याचाच शोध घेण्याचे काम आम्ही नवी दिशा अकॅडमीमध्ये करीत आहोत व ते नक्कीच सापडेल.

Updated : 14 Sep 2017 8:46 AM GMT
Next Story
Share it
Top