Home > मॅक्स ब्लॉग्ज > चेंडू - क्रिकेटयुद्धातील गोलंदाजांचं अस्त्र...!

चेंडू - क्रिकेटयुद्धातील गोलंदाजांचं अस्त्र...!

चेंडू - क्रिकेटयुद्धातील गोलंदाजांचं अस्त्र...!
X

क्रिकेटमध्ये प्रेक्षकांना गोलंदाजीपेक्षा फलंदाजी पाहण्यात मजा येते. त्यामुळेच प्रेक्षकांच्या आवडत्या खेळाडूंच्या यादीमध्ये फलंदाज खूप असतात. त्यात क्रिकेटवेड्या भारतात तर क्रिकेटचाहते फलंदाजांसमोर लोटांगण घालतात. इथं सचिनही आठवणीत ठेवला जातो, तो त्याच्या फलंदाजीसाठी. तर कपिल देव यांच्यासारखा महान गोलंदाजही त्यांच्या विश्वचषकातील 175 धावांच्या खेळीसाठी नेहमी चर्चेत असतो.

...असा हा क्रिकेटचा गेम जिथे बॉलपेक्षा बॅटनेच अधिक भाव खाल्लाय. मात्र म्हणून बॉलचं म्हणजेच चेंडूचं महत्त्व कमी होत नाही. कारण क्रिकेटची दुसरी बाजू म्हणजेच चेंडू. याच चेंडूमुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशात वाद निर्माण झाला होता. शारजातला तो शेवटचा चेंडू सीमेपलीकडे लोटून जावेद मियाँदादनं चेतन शर्माचं सर्व करिअरच संपुष्टात आणले....असा हा चेंडू क्रिकेटयुद्धातील गोलंदाजांचं अस्त्र...!

काळानुरुप क्रिकेट बदलंय. पांढऱ्या कपड्यातलं क्रिकेट आता रंगीबेरंगी झालंय. त्याचप्रमाणं चेंडूही बदलाय. कसोटी सामन्यांचा प्रवास आज टी-20 सामन्यांपर्यंत येऊन पोहोचला. दिवस-रात्र सामने खेळवले जात आहेत. कसोटी मालिका आता रात्रीही खेळल्या जात आहेत. त्यामुळे पांढरा, लाल आणि आता गुलाबी चेंडूही तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात गोलंदाजांच्या हाती दिसून येतो. दिवस-रात्र सामन्यांसाठी पांढऱ्या रंगाचा चेंडू वापरला जातो. तर कसोटीमध्ये लाल रंगाचा चेंडू. मात्र आता रात्रीही खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये गुलाबी रंगाच्या चेंडूनं प्रवेश केला आहे.

चेंडूचा संक्षिप्त इतिहास...

- सुरूवातीला चेंडू हे लोकरीच्या गुंडाळीपासून तयार केले जात

- नंतर कोर्क या प्रकारच्या लाकडापासून ते तयार केले गेले

- चेंडूला दोऱ्यांनी घट्ट गुंडाळतात. चामड्याच्या आवरणानं झाकून विशिष्ट प्रकारची शिलाई केली जाते. आणि चेंडू झाकला जातो.

- 155.9 ते 163 ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचा चेंडू नसावा, असा साधारण नियम आहे. तर त्याचा परीघ हा 8.13 ते 9 इंच एवढा अपेक्षित आहे.

चेंडूची फॅक्टरी - भारत आणि पाकिस्तान...!

आपल्या देशातल्या मेरठसह अनेक देशांमध्ये चेंडू तयार केला जातो. मेरठमध्ये चेंडू तयार करण्याची फॅक्टरीच आहे. या ठिकाणी आजही मोठ्या प्रमाणात लाल आणि पांढऱ्या रंगाचा चेंडू तयार केला जातो. त्याला मोठी मागणी आहे.

गुलाबी चेंडूमुळे पाकिस्तानची चांदी....

क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूनं प्रवेश करताच पाकिस्तानातल्या सियालकोटमधल्या

अनेक कारखान्यांचे दिवसच बदललेत. ग्रेस ऑफ कॅम्ब्रिज ही चेंडू तयार करणारी कंपनी वर्षाला जवळपास 20 हजार गुलाबी चेंडू तयार करत आहेत.

सियालकोटमध्ये क्रीडासाहित्य 19 व्या शतकापासून तयार केलं जातं. सियालकोट दरवर्षी 90 हजार कोटी डॉलरच्या खेळ साहित्याची निर्यात करतं.

दरम्यान सियालकोटमध्ये 142 ते 163 ग्रॅम वजनाचे चेंडू बनविले जातात. ज्यांची किंमत 4 डॉलरपासून ते 25 डॉलरपर्यंत आहे. चामड्याच्या चार तुकड्यांना एकत्र करून गुलाबी चेंडू तयार केला जातो. विशेष म्हणजे इथं तयार झालेले फुटबॉलच जगातल्या मोठ्या फुटबॉल स्पर्धांमध्ये वापरले जातात.

...असा हा चेंडू. जो छातीवर किंवा डोक्यावर आदळल्यानं काही क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आहे. या घटनांनी क्रिकेटविश्व हादरले. क्रिकेट सामना सुरु असताना कुणाला चेंडू लागला, तर आताही धडकी भरते. त्यामुळे गुलाबी झालेल्या चेंडूनं यापुढं क्रिकेटमध्ये खेळभावनचे प्रेमळ रंग भरावेत, एवढीच अपेक्षा.

Updated : 25 Jan 2017 10:25 AM GMT
Next Story
Share it
Top