Home > मॅक्स ब्लॉग्ज > सरकारी दवाखाने आणि संवेदनशीलता

सरकारी दवाखाने आणि संवेदनशीलता

सरकारी दवाखाने आणि संवेदनशीलता
X

लोकांनो! डॉक्टरला मारून नेमकं सिद्ध काय करायचंय तुम्हाला?

  1. तुम्ही तुमच्या हुकूमशाहीवर डॉक्टरांकडून जास्त चांगला उपचार करून घेऊ शकता?

  1. तुम्ही तुमच्या पेशन्टबाबतीत संवेदनशील असता. तुम्हाला त्याच रक्त, उलट्या, तुटलेली हाडं, किंवा अजून एखादा मेडिकल symptom सहन होत नाही. जो डॉक्टर रोज हे पहात असतो, त्याच्या संवेदना काय मेलेल्या असतात का हो? की डॉक्टरकी सोबत असंवेदनशीलतेची डिग्री ही तुम्ही त्यांना देता?

  1. मग तुम्ही तो आजार आताच्या आता उपचाराने डॉक्टरने बरा करावा या गोष्टीवर अवलंबून रहाता. गणिताच्या जशा पायऱ्या असतात तशाच उपचाराच्याही असतात. तुम्ही आम्ही मिळून औषधउपचार करून पेशन्टची तब्बेत सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. एका मिनिटात सगळं नॉर्मल होईल अशा उपचाराच शास्त्र अजूनतरी नाहीये डॉक्टरांकडे....समजून घ्या हे....

  1. आता उरला महत्वाचा प्रश्न. तुम्हाला जस हवं तसं आणि तितकं लक्ष डॉक्टर नाही देत तुमच्या पेशन्टकडे...

मित्रहो...याच उत्तर तुमच्याकडेच आहे...

आता फक्त सरकारी दवाखान्यांबद्दल बोलू.... डॉक्टर आणि पेशंटचा सरासरी रेशो हा या ठिकाणी 1:500 असा आहे. पण तुम्हाला दवाखान्यात तितके डॉक्टर दिसतात का? नसणारच...कारण तुम्हाला फक्त तुमचा पेशन्ट आणि ड्युटीवरचा डॉक्टरच दिसत असतो.

असो....आपल्याकडे डॉक्टरांच्या जागाच भरल्या जात नाहीत. ज्याचे त्याचे आपले आपले फायदे आहेत मित्रानो. राजकारण्यांचे वेगळे. सरकारचे वेगळे. पण मग 50 डॉक्टरांचं काम एखादा डॉक्टर पूर्ण तणावाखाली रेटतो. कुणाचं काय जातंय? ना समाजाचं ना सरकारच...

थोडस खोलात शिरूया...की नेमका असला कसला ताण येतो डॉक्टरांवर?

पहिला ताण ओपीडीचा... एका वेळची ओपीडी होते 200 पेशन्टची, वेळ असतो 3 तास. एका मिनिटात एका पेशंटचं सगळं एकून, त्याला काही प्रश्न विचारून, ट्रीटमेंट लिहावी लागते, ती औषध कशी घ्यायची हे काहींना एकदा, काहींना दोनदा, कधी कधी काहींना तीनदा सांगावं लागत. ती औषध कुठं मिळणार तो रस्ता ही दाखवावा लागतो. काही चेकउप करायचं असेल तर gloves घालून पटकन चेक करून पुन्हा डोक्यात त्याच diagnosis बनवत रहावं लागत. त्याचवेळी gloves व्यवस्थित काढावे सुद्धा लागतात. कारण patient टेबल वरून उतरल्या उतरल्या विचारतो काय आहे, कधी झालय, कधी बरं होणार. सगळ्यासाठी वेळ फक्त एक मिनटं....

तीन तास ओपडी नंतर तुमच्या राउंडला ही अशीच काही परिस्थिती, वेळ एक तास. त्यात किमान 50 पेशंटचे रक्त काढणे. चुकून जरी एकाला दोन वेळा सुई घुसवावी लागली तरी नातेवाईक असतोच खुन्नस द्यायला. त्यात एखादा येतो पांढरे कपडे घालून दहाबारा त्याच्या सारखे घेऊन. सांगून जातो लक्ष द्या. साहेबांचा पेशन्ट आहे. इथे आधीच कामाने वैतगलेलो असतो. त्यात असे लोक भेटतात. काय म्हणता? काय काम असतात? सलाईन लावणे, लघवीची नळी लावणे, ड्रेसिंग, शस्त्रक्रीया झालेल्या बाळंतिणीचे कधी कधी संडासही काढावे लागते. नोट्स टाकणे. खरंतर पुस्तक होईल या सगळ्या कामाच्या नोंदनीवर. पण, डॉक्टरला कामाचा त्रास नसतो. पण ते त्या वेळेत फटाफट उरकाव लागत. झपाटायला होत रोज. काम व्यवस्थित नाही झालं तर तो तर वेगळाच विषय. सिनिअरच्या ओरड्यापेक्षा पेशन्टला होणारा त्रास नको असतो कुठल्याही डॉक्टरला. या सगळ्याचा ताण असतो एका डॉक्टरला...

आता ऑपरेशन थिएटर... ओटीच्या सहवासात 3/4 /5/6/7 तास....काही नेम नाही. पायाची, डोक्याची चाळण होते. समोर जिवंत शरीर असतं. थरथरून नाही चालत. बाहेर उद्याच करा ऑपरेशन म्हणून रांग लागलेली असते वशील्यांची. दुसऱ्या दिवसाच्या ऑपरेशन्सचं कॉऑर्डिनेशन. त्यावर सिनिअर्सशी चर्चा असं रोज नियमित सुरू असतं.

या सगळ्यांनन्तर डॉक्टरला update रहावच लागत. रोज नव्याने औषध येतात. उपचार पद्धती बदलते. डिग्री घेतली म्हणजे अभ्यास संपला नाही. आम्ही जरासं जरी गडबडलो की गुगलवरचं अर्धवट ज्ञान देताच की तुम्ही डॉक्टरांना.."काय येत नाही या डॉक्टरला...दुसऱ्याकडे दाखवू" हे तर मुद्दाम सांगून जाता. म्हणून अपडेट राहण्यासाठी रोज वाचवही लागत डॉक्टरला.

प्रत्येक व्यवसायाची कामं ठरलेली असतात. तशीच डॉक्टरांचीही. पण, त्या त्या क्षणी ते काम लगेचच करावं लागतं. इतक्या पेशंटला त्या त्या क्षणी ट्रिट करताना डॉक्टरांची संख्या पुरत नाही.

बर हे सगळं फक्त एक दिवस नसतं. रोज नित्यनियमाने हेच आणि हेच असतं. एकामागून एक पेशन्ट येतच रहात आणि तुम्हाला वाटत साला डॉक्टर माझ्या पेशन्टकड बघतच नाही. माज चढलाय. डॉक्टर झाला म्हणून फार शहाणा झालाय काय. कसकाय डॉक्टर ड्युटीवर नाही? कुठं गेला काम सोडून?

Attention हवंय ना तुम्हाला?

सांगा ना मग सरकारला! आम्ही तर सांगून थकलो. सांगा आता तुम्हीच. भरा म्हणा, जागा सगळ्या सरकारी दवाखान्यातील. घ्या म्हणा, मेडिकलची एमपीएससी दरवर्षी... दहा वर्ष झाली या परीक्षा घेऊन. भरभरून दिसू देत की डॉक्टर सरकारी दवाखान्यात. डॉक्टरसुद्धा बेरोजगार होऊ शकतो. मग सगळ्या जागा भरल्या की ऐकतो तास तास भर तुमचं सगळं.

चहाचा कप हातात घेऊन डॉक्टरांच्या संपाच्या बातम्या बघत."काय नाटक चाललंय डॉक्टरांचं हे म्हणन सोपयं". पण डॉक्टरच्या आयुष्यातली ती वर्ष काढणं तितकंच अवघड आहे. वेळीच समजून घ्या.

असो...लोकांना जशी चांगल्या समजूतदार डॉक्टरची गरज असते तशी डॉक्टरलाही समजुदार पेशंटची गरज असते. मारणं हा कधीच यावरचा उपाय होऊ शकत नाही.

ता.क. - मेडिकल परीक्षा, पीजी, खासगी प्रॅक्टीसचे प्रॉब्लेम्स यावर बोलू पुन्हा कधीतरी. ही वाट दूर जाते. कारण पृथ्वी गोल आहे आणि डॉक्टरांचा विषय खोल आहे

डॉ चारुशीला जाधव ( एमबीबीएस एमडी )

( लेखिका सध्या भोपाळच्या चिरायू मेडिकल कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. )

Updated : 21 March 2017 7:24 AM GMT
Next Story
Share it
Top