Home > मॅक्स ब्लॉग्ज > समाधान 3 – पर्दानशीन

समाधान 3 – पर्दानशीन

समाधान 3 – पर्दानशीन
X

ती यायची माझ्याकडे मागच्या वर्षीच्या नोट्स न्यायला. नेहमी नाही पण परीक्षेच्या आधी. सेमेस्टर झाली आणि ती यायची बंद झाली.

पण पुढच्या सेमेस्टर एग्जामच्या वेळी जेव्हा ती आली तेव्हा तिचं नवीन रूप पाहून मी हादरलेच!

बुरखा?? अक्षरशः नखशिखान्त काळ्या रंगात गुंडाळली होती! म्हणजे माझी अशी धारणा होती की भारतातल्या मुस्लिम स्त्रिया, ज्या बऱ्यापैकी शिकल्यात, आणि नोकरी करतात त्या बुरखा घालायचं दडपण घेत नाहीत. कारण एक तर बुरखा म्हणजे हालचाली वर अतिशय limitations येतात. शिवाय ती पूर्वी नव्हती घालत. आणि कुणाचं दडपण घेऊन ती अशी अचानक वागेल यातली ही नव्हती. नोकरी करत होती, स्वावलंबी होती. आई वडील सुद्धा बऱ्यापैकी शिकले सवरलेले होते. लग्न नव्हतं झालेलं. त्यामुळे सासू-सासरे-सासर यांचा दबाव असेल तर असंही नव्हतं. आणि आधी कधी एवढा संपर्क आला नाही पण ती धार्मिक वगैरे आहे असं मला पूर्वी ही नाही वाटलं.

बुरखा किंवा पडदा याबद्दल खरं म्हणजे प्रत्येकाचे perceptions वेगवेगळे असू शकतात. आता पुण्यातल्या पोरी नाही का नाकातोंडाला स्कार्फ़ बांधतात? तसंच हे बघून गावाकड्च्या मुलीही बांधतात. आणि काही प्रमाणात स्कार्फमुळे उन, धूळ आणि प्रदूषणापासून संरक्षण सुद्धा मिळतं. पण ती ऐच्छीक गोष्ट असते.

कुणीतरी मागे म्हणाले होते की त्या अफ़ग़ानिस्तान मधल्या बायका बुरखा नको म्हणून रिवोल्ट करतात आणि इकडे पुण्यात मात्र पोरी स्कार्फ़ बांधण्यात धन्यता मानतात.

बायकाना नक्की काय पाहिजे असतं अशा आशयाचे जोक्स नेहमी फेसबुक व्हाट्स ऍपवर फिरत असतात... खरं तर हे खूप इंडिविज्युअल आहे... पर्सनल... मला वाटतं बाईला स्वतःला काय पाहिजे हे स्वतः ठरवण्याचा अधिकार पाहिजे असतो. स्वातंत्र्य!!

मी बुरखा घालावा की नाही हा निर्णय मी स्वतः घेइन माझ्यासाठी. मी स्कार्फ़ कधी कशासाठी बांधेन हे सुद्धा मी ठरवेन. त्या वेळी माझा धर्म काय सांगतो किंवा माझ्या आजुबाजूचे लोक काय म्हणतात किंवा गेलाबाजार बाकीच्या बायका काय करतात हे मला कुणी सांगू नये. माझे निर्णय घेण्यास मी समर्थ आहे. तेवढी अक्कल मला एव्हाना आलेली आहे आणि मी माझ्यासाठी चुकीचे निर्णय घेतलेच तर त्याचे परिणाम स्वीकारण्याची माझी तयारी आहे. हेच आहे ना व्यक्तिस्वातंत्र्य?

पण मी ज्या मुलीविषयी बोलतेय तिने असा निर्णय का घेतला याचे कुतूहल होतेच मला... इतर वेळी ठीक आहे पण उन्हाळ्यात वगैरे काळा कुळकुळीत बुरखा नखशिखान्त अंगावर ओढून उन्हात चालणं माझ्या दृष्टीनं अशक्य होतं.

ही पण माझ्यासारखीच तर आहे..

मध्ये काही दिवसांपूर्वी ‘ओरहान पामुक च स्नो’ नावाचे पुस्तक वाचत होते. त्यात तुर्कस्तानात मुलींना शाळा कॉलेजात ओढणी डोक्यावरून घ्यायला बंदी केलेली असते. पण ज्या मुली लहानपणापासून अतिशय धार्मिक वातावरणात वाढल्या त्यांच्यासाठी असं वागणे म्हणजे हराम!

मग मुली चक्क शिक्षण सोडून देतात किंवा आत्महत्येचा मार्ग अवलंबतात.

बाप रे.. हे इथून वाचताना सुद्धा माझ्या अंगावर काटा आला. तिथे त्या मुलींना कोणत्या मानसिक द्वंद्वातून जावे लागत असेल?

खरच किती गुंतागुंतीच्या असतात गोष्टी..

मी माझ्या समोरच्या मुलीला विचारलं.. की का असा निर्णय घेतलास अचानक?

ती म्हणाली मी दीक्षा घेतली.. मला पटलं म्हणून घेतली. आमचे गुरूजी सुद्धा एमएससी बॉटनी आहेत.. त्यानी समजावून सांगितलं.. ते सुद्धा खूप वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे आहेत. (मी मनातल्या मनात.. बाप रे बुरखा पांघरण्यात पण वैज्ञानिक दृष्टिकोण असतो??) ते म्हणाले की मुली आजकाल स्कार्फ वगैरे बांधतातच ना? मग ते काय fashion म्हणून? तुम्हाला पटते ना की याची गरज आहे.. बुरखा सुद्धा त्यासारखाच आहे ना.. फ़क्त आपल्या धर्माने सांगितला म्हणून तो वाईट होतो का? तसं जर असेल तर ते चुकीचं आहे..बरोबर ना?

मी मान डोलवाली..

पण यात कम्फ़र्टेबल वाटतं का.. कायमच घालायचा ना आता? हालचालींवर restrictions नाहीत का येत?

"आता सवय झाली.. म्हणजे पाहिले थोड़े दिवस ज़रा त्रास झाला.. पण मग सवय होऊन गेली"

मी मनातल्या मनात म्हटलं की, हो.. तुरुंगात रहायची सुद्धा सवय होते माणसाला.. त्या Shwashank रिडेम्पशनमध्ये नाही का 50 वर्षानंतर तो म्हातारा तुरुंगातून बाहेर पडतो पैरोल वर.. आणि बाहेरच्या जगाशी मिळवून न घेता आल्याने आत्महत्या करतो! सवय तर तुरुंगात रहायची सुद्धा होते!

एक शक्यता अशी होती की हिचं लग्न व्हायचं होतं अजून..मुलीचं वय वाढत जाईल तसं लग्न जमण्यातल्या अडचणी वाढत जातात. आणि मग ती मुलगी आणि तिचे पालक हतबल, निराश होत जातात. आणि अशा वेळी सोशल burdens पेलवत नाहीत. त्यांना विरोध करण्याएवढं मानसिक बळ नसतं.. आणि मग शरणागती पत्करली जाते. समाजाला आपण जास्तीत जास्त चांगल्या कशा दिसू याकडे जास्त लक्ष दिलं जातं.. मी अशा केसेस पाहिलेल्या आहेत.. या माझ्या समोरच्या मुलीचं असच काहीसं झालं असेल का??

खरच माणूस तितके पेर्सेप्शन्स असतात नाही? ही मुलगी ही म्हणाली की तिला समाधान वाटतं तिच्या धर्मानुसार वागण्यात.. विलास सारंग यांच्या एन्कीच्या राज्यातला हमीद नमाज पठण करताना नेमका हिच्यासारख्याच हालचाली करत असेल नाही? hypnotise झाल्यासारखा.. मला उगीचच असं का वाटलं असावे?

पण हिने हे व्रत आयुष्यभरासाठी घेतलं होतं.. माझ्या दृष्टीने ही खायची गोष्ट नव्हती.

माझी एक मुस्लिम रूम मेट होती.. खूप सूंदर होती दिसायला. ती म्हणायची की तिलाही बुरखा मनापासून आवडतो..

कारण याच्या आत सुरक्षित वाटतं.. लोकांच्या घाणेरडया नजरा नाहीत पडत आपल्यावर.. बुरख्यातल्या बाईकडे शक्यतो कुणी पाहत नाहीत.. मी तिला म्हटलं होतं की हो.. बरोबर आहे.. तुरुंगात डांबून ठेवलं की तरीही सुरक्षित वाटू शकतं काही लोकांना..

आणि 'लोकांच्या वाईट नजरा' बाईच्या सुंदर चेहऱ्यावर पडू नयेत म्हणून त्या चेहर्याला असं तुरुंगात डांबून ठेवायचं यात मला काही लॉजिक दिसत नाहीत. वाईट त्यांच्या नजरा आहेत ना.. त्या टाका ना तुरुंगात. सुंदर गोष्टीला बांधून ठेवणे हा अन्याय आहे.. हा धर्म असेल तर तो न्याय्य नाहिये!

मला त्या एमएससी बॉटनी झालेल्या गुरुजींचे ही नवल वाटत होते.. बुद्धी अशी कशी वापरतात लोक.. स्वतःला पटलेल्या विचारांसाठी कसेही लॉजिक तयार करू शकतात.. आणि ते असे दुसऱ्या लोकांच्या गळी उतरवतात.

पण एखाद्याला एखादे लॉजिक पटले तर ते चुकीचं कसं काय आहे हे त्याला पटवून सांगणे अशक्य होऊन बसतं. शिवाय मला जे वाटतं ते तिला वाटावच असं नाहिये. तिच्या दृष्टीने माझं तर्कशास्त्रच चुकीचं असू शकतं.. माझ्या दृष्टीने चुकीची गोष्ट तिच्या दृष्टीने बरोबर असू शकते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणते की तिला समाधान मिळतं. तर तिने काय केलं पाहिजे हे मी कोण ठरवणार? तिलाही बुरखामय तुरुंगात स्वतःला कोंडून घेण्याचं व्यक्तिस्वातंत्र्य आहेच की!! आणि त्या गुरूजी सारख़े असे बुद्धिमान लोक वाढत जातील तेवढे दृष्टिकोणातले फरक रुन्दावतील.. शेवटी एन्ट्रापी वाढत जाणे हा तर निसर्गाचा नियम आहे. अर्थात disorderedness.! आपण कितीही आर्डर मेन्टेन करायचा प्रयत्न केला तरी निसर्गनियमाच्या पुढे जाऊ शकत नाही!

Updated : 10 Feb 2017 5:04 AM GMT
Next Story
Share it
Top