Home > मॅक्स ब्लॉग्ज > वारे बीड जिल्ह्याचे

वारे बीड जिल्ह्याचे

वारे बीड जिल्ह्याचे
X

महाराष्ट्रात आगामी विधानसभा नियोजित वेळापत्रकानुसार झाल्या तर त्याला आता दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. आज आपण बीड जिल्ह्यात सर्वांच्या सर्व म्हणजे सहा मतदार संघात काय होईल याचा विचार करू. पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सुशील कुलकर्णी यांच्यासोबत चर्चा करत असताना आज हा विषय हाताळावा वाटला. लेखाच्या सुरुवातीलाच सांगू इच्छितो की यातील काही मते त्यांची आहेत तर काही माझे अल्पमतीनुसार केलेले निरीक्षण आहे.

१. बीडमध्ये होईल तिरंगी लढत?

बीड विधानसभा मतदार संघात थोरले क्षीरसागर म्हणजेच जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यात टस्सल असेल. पण, मागच्यावेळी जयदत्त क्षीरसागर यांच्या तोंडचे पाणी पळवणारे विनायक मेटेंचा 'एम' फॅक्टर चालला तर चित्र काहीही असू शकेल. जयदत्त क्षीरसागर हे दीर्घकाळ राजकारणात आहेत. अनेक उन्हाळे-पावसाळे पाहून अनेक टक्के टोणपे त्यांनी खाल्ले आहेत. ते स्वतः राज्यात अनेकवर्षे मंत्री म्हणनूही होते. त्या उलट परिस्थिती संदीप यांची आहे. नवख्या संदीप क्षीरसागर यांच्याभोवती सध्या जे कार्यकर्ते आहेत ते तरुण आहेत, मात्र त्या कार्यकर्त्यांची प्रतिमा लाभार्थी, उडाणटप्पू तसेच परिस्थितीचे गांभीर्य नसलेली अशीच आहे. संदीप यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांची सामान्य जनतेशी नाळ जोडलेली आहे तरी त्यांचा प्रभाव शहरी भागापुरता मर्यादित आहे. ग्रामीण भागात मात्र आजही जयदत्त क्षीरसागरांना मानणारा वर्ग खूप आहे. या व्यतिरिक्त भारतभूषण क्षीरसागर यांचे धोरण अजून तरी स्पष्ट होताना दिसत नाही.२००९ च्या विधानसभेत लाखांहून अधिक मत मिळवणारे थोरले क्षीरसागर यांना विनायक मेटेंनी २०१४साली ७७,१३४ मतांवर रोखले. मेटेंना गेल्या निवडणुकीत ७१००२ मते मिळाली म्हणजे त्यांना क्षीरसागर यांच्यापेक्षा जेमतेम सहा हजार मते कमी मिळाल्याने ते पराभूत झाले. मात्र, सध्या जवळपास सर्वांनी थोरल्या क्षीरसागरांची भाजपची असलेली जवळीक गृहीत धरली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जर क्षीरसागर भाजपकडून उमेदवार असतील तर विनायक मेटे कोणती भूमिका घेतील हे सांगणे तितके अवघड नाही. मेटे अशावेळी भाजपशी असलेली युती तोडून स्वतः त्यांच्या पक्षातर्फे उभे ठाकतील. या सर्व गोष्टींचा विचार करता सध्यातरी बीडमध्ये तिरंगी लढत होईल असे वाटते.

२. संभ्रमित माजलगांव...

इथली जनता संभ्रमित आहे कारण इथे जी कोणी व्यक्ती निवडणून येते ती आतममग्न होते. कायम आतममग्न नेते लादल्या गेलेल्या वंचित मतदार संघ म्हणून माजलगावकडे बघितले जाते. सोळंके कुटुंबीयांचा प्रभाव यावर प्रामुख्याने राहिलेला आहे. मात्र १९९५ पासूनचा इतिहास बघता आजवर बाजीराव जगताप असोत की प्रकाश सोळंके, होके-पाटील कुटुंबीय असो की डक घराणे किंवा आता आर.टी. देशमुख प्रत्येकाने आपापल्या पुढच्या पिढीला प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसतात. आमच्या भागात एक म्हण आहे 'बापानंतर पोऱ्या आला, खुट्ट्या जागी खुट्टा आला'. ही म्हण इथे तंतोतंत लागू होते. बाजीराव जगताप १९९५ साली निवडून आल्यावर 'माझा मोहन-माझा मोहन' करत बसले आणि स्वतःच्या साखर कारखाना निर्मितीच्या मागे लागले त्यामुळे दीर्घकाळच्या राजकरणात ते आपली 'बाजी' गमावून बसले. जगतापांना ना राजकारणात ठाण मांडता आले ना ते कारखाना यशस्वीपणे चालवू शकले. त्यामानाने प्रकाश सोळंके ज्यांना प्रकाशदादा म्हणून इथली जनता ओळखते ते चांगल्यापैकी यशस्वी झाले. पण, पुन्हा प्रकाशदादा नव्या पिढीचे बस्तान बसावे म्हणून प्रयत्नशील झाले. त्याचाच फायदा उचलत आर.टी.देशमुख यांच्यारूपाने एक 'व्यापारी' माणूस आमदार झाला. जनतेला वाटले आता तरीबदल होईल पण कसले काय ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणे आर.टी. देशमुखांनी लय गमावली आणि आता तीन वर्षांनंतर त्यांनाच स्वतःच्या विजयाबद्दल शंका येऊ लागली आहे असे म्हणावे लागेल. कारण गेल्यावर्षी एका जाहीर कार्यक्रमात देशमुख आणि सोळंके एकाच मंचावर असताना आपल्या भाषणात म्हणाले होते की "पुढच्यावेळी प्रकाशदादा किंवा मीच तुमचा आमदार असेल." थोडक्यात माजलगावमध्ये संभ्रमित जनतेसोबत नेते देखील संभ्रमित आहेत.

३. गेवराईत असेल नातेवाईकांचा संघर्ष

या मतदार संघात पंडित विरुद्ध पंडित सोबत पंडित विरुद्ध पवार असा संघर्ष दिसतो. पंडित आणि पवार कुटुंबीय हे जवळचे नातेवाईक आहेत पण त्यांच्यातून विस्तव जात नाही. काही गुन्हे शिवाजीराव पंडित आणि अमरसिंह पंडित यांच्यावर दाखल आहेत. मात्र त्याचवेळी लक्ष्मण पवार यांचे भाऊ बाळराजे पवार यांच्यावर देखील गुन्हेगारीचे आरोप केले जात आहेत. इथल्या जनतेची सहानुभूती सध्यातरी पवार कुटुंबियांना मिळताना दिसते. या आधी अमरसिंह पंडित यांच्या बैठकीत 'मुजरा' करणाऱ्या कार्यकर्त्याला स्थान होते तर बदामराव पंडितांच्या अवतीभोवती 'होयबा' लोकांचा गराडा असायचा. याला छेद देत बदलाचे वारे ओळखत लक्ष्मण पवारांनी सामान्य कार्यकर्त्यांना कामे तर दिलीच दिली शिवाय त्यांच्या बैठकीत मानाचे स्थान दिले. त्यामुळे पवारांना मानणारा मोठा वर्ग निर्माण झाला आहे. जातीय समीकरण बदलली आणि बदामरावांना मानणारा वंजारी समाज जर एक गट्ठ्याने एकवटला तर पवारां समोरआव्हान निर्माण होऊ शकते. मात्र, सध्यातरी अमरसिंह पंडित आगामी काळात लक्ष्मण पवारांसमोर काही आव्हान निर्माण करू शकतील अशी परिस्थिती नाही.इथे अजून एक गोष्ट लक्षात घेतले पाहिजे कि ना. पंकजा मुंडे ह्या बीड जिल्ह्यात असल्या की केजच्या आमदार प्रा. संगीता ठोंबरे, माजलगावचे आमदार आर.टी.देशमुख, कधीकधी आष्टीचे आमदार भीमरावधोंडे ना. पंकजा मुंडेंच्या मागे सावलीसारखी फिरत असतात. मात्र, गेवराईचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांना क्वचितच कोणी पंकजांसोबत जिल्ह्यात बघितले असेल. तसे पाहता पंकजा मुंडेंना जिल्ह्यातील आमदारांनी त्यांच्या ऐकण्यात असावे असे वाटते. पण, सध्या लक्ष्मण पवार यांनी स्वतःचे एकस्थान गेवराईत निर्माण केले आहे ते त्यांच्या सूत्रबद्ध नियोजनाने. कामाशिवाय कधीही चर्चेत नसणारे लक्ष्मण पवार हे महिन्यातले अधिकाधिक दिवस त्यांच्याच मतदार संघात लोकांत फिरतात. लोकांच्या समस्या सोडवणे हे त्यांचे प्रमुख बलस्थान आहे. या मतदार संघात असलेल्या बोगस रेशन दुकानदारांचे कर्दनकाळ म्हणून त्यांनी स्वतःचे स्थान जनतेच्या मनात निर्माण केले आहे. त्यामुळे भाजपने त्यांचे तिकीटजरी कापले तरी लक्ष्मण पवार यांचा खुंटा बळकट आहे. इथे भाजपला पवारांची अधिक गरज आहे;पवारांना भाजपची नाही.

४. केजचे त्रांगडे

प्रा. संगीता ठोंबरे ह्या सध्या मतदार संघात चांगले काम करत आहेत. मात्र जिल्ह्यातील भाजप नेतृत्वालात्यांनी काही कालावधीपूर्वी केंद्रात मोदींशी भेटलेल्या गाठीभेटी खटकल्या होत्या अशी चर्चा केज मतदारसंघात जोरात होती. इतकेच काय तर त्यानंतर जवळपास महिनाभर संगीता ठोंबरे आणि पंकजा मुंडेयांच्यात अबोला होता; तेव्हा महत्प्रयासाने ठोंबरे यांनी पंकजा यांची समजूत काढली असे काहीजण कुजबुजत असतात.

केज मतदार संघ राखीव आहे. त्यामुळे इथले स्थानिक नेते आमदार बनवण्यात मोठी भूमिका बजावतात. उदाहरणार्थ रमेश आडसकर, राजकिशोर मोदी, लोमटे कंपनी हे केज मतदार संघाचे किंगमेकर आहेत. इथेएक चमत्कारिक व्यक्ती आहे जी या सर्वांना एकत्र आणू शकते ते म्हणजे नंदकिशोर मुंदडा. अफलातून सामाजिक कार्य करून सामान्य कार्यकर्त्यांशी असलेली घट्ट नाळ त्यांच्या सूनबाई नमिता मुंदडा यांना विजयी करण्यासाठी पुरेशी आहे. सर्व समाजाच्या नेत्यांना एकत्र आणत नंदकिशोर मुंदडा हे त्यांचा मुलगा अक्षय आणि नमिता यांचे राजकीय बस्तान बसवू शकतात. गेल्यावेळी मुंदडा पित्यापुत्रांची लय हरवली होती मात्र आता चित्र थोडे वेगळे आहे. अक्षयचे वडिलांसोबत चांगले सूर जुळत आहेत. इथे अजून एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे ती म्हणजे बीडमध्ये जसे जयदत्त क्षीरसागर अस्वस्थ आहेत तसेच अंबेजोगाईचे मुंदडा कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत. गेल्या काही महिन्यात अजित पवारबीड जिल्हा दौऱ्यात असताना कुठेही जयदत्त क्षीरसागर आणि अक्षय मुंदडा त्यांच्यासोबत दिसत नाहीत. त्यामुळे अक्षय यांच्या पत्नी असलेल्या नमितांना भाजपकडून उमेदवारी मिळू शकते. जर असे झाले तर ठोंबरे ह्यांचे तिकीट कापले जाईल आणि इथे एक नवीन समीकरण उदयास येईल.जर भाजपने मुंदडा यांना उमेदवारी दिली नाही आणि राष्ट्रवादीनेही इतर कोणाचा विचार केला तरीहीमुंदडा कुटुंबीयांकडे एक पर्याय उपलब्ध आहे. तो पर्याय म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कारण राजठाकरे आणि अक्षय मुंदडा यांचे चांगले संबंध आहेत; अर्थात हि शक्यता धूसर आहे. त्यामुळे या मतदारसंघात सगळ्याच पक्षांसाठी त्रांगडे झाले आहे.

५. अस्थिर आष्टी

एक दुर्लक्षित मतदार संघ म्हणून आष्टी मतदार संघाची ओळख बीड जिल्ह्यात आहे. एकेकाळी भाजपात असलेले सुरेश धस राष्ट्रवादीकडून मंत्री झाले त्यानंतर आता पुन्हा ते भाजपच्या वाटेवर आहेत. राजकारण किती विचित्र असते बघा. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लढणारे सुरेश धस हे गोपीनाथराव मुंडेंच्या विरोधात उभे होते. त्या निवडणुकीत पराभव झाल्यावर धस यांना आष्टी विधानसभा निवडणुकीत भीमराव धोंडे यांच्या विरोधात पराभव पत्करावा लागला होता. आज तेच सुरेश धस भाजपत प्रवेश मिळावा म्हणून पंकजा मुंडेंना गळ घालत आहेत. इतकेच काय युद्धात गमावलेली बीड जिल्हा परिषद सुरेश धस यांनी तहात बाबांची उपकाराची जाण ठेऊन त्यांच्या कन्येच्या हाती सुपूर्द करून पापक्षालन करण्याचा प्रयत्न केलेला सर्वांनी बघितला. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांना अस्वस्थ वाटू लागले नाही तर नवलच. धस + भाजप समीकरणानंतर आजबे कुटुंबीय राष्ट्रवादीत डेरेदाखल झाले आहेत.कधीकाळी दरेकरांचे विश्वासू कार्यकर्ते असलेले धस नंतर नेतृत्व म्हणून आष्टीतून पुढे आले; अगदी तसेच सध्या सुरेश धस यांचे विश्वासू कार्यकर्ते आणि जवळचे नातेवाई सतीश शिंदे हे काय भूमिका घेतात हे ही पाहणे औत्सुक्याचे आहे. कारण सतीश शिंदे यांच्या पत्नी नीता शिंदे यांनी सुरेश धस यांच्या पत्नी संगीता धस यांना जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवाचा धक्का दिलेला आहे. त्यावेळी शिंदे भाजपत होते तर धस राष्ट्रवादीत. थोडक्यात काय तर मराठा, माळी, वंजारी समाजाचे प्राबल्य असलेल्या आष्टीत धस, धोंडे, आजबे, दरेकर, शिंदे आदी मंडळी आपापल्यापरीने जोर लावत आहेत. त्यामुळे सध्यातरी आष्टी अस्थिरच आहे.

६. ब्लॉकबस्टर परळी वैजनाथ

राज्यात यंदा सर्वांचे लक्ष असलेल्या मोजक्या मतदार संघातही परळी वैजनाथ मतदार संघाचे नाव वरच्या क्रमांकावर घ्यावे लागेल. सध्या राज्य भाजपच्या कोअर कमिटीत महत्त्वाचे स्थान असलेल्या राज्याच्या मंत्री ना. पंकजा मुंडे यांना कडवे आव्हान असेल ते राज्याचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांचे. यंदा काय होईल या आधी आपण २००९ व २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या इतिहासाबद्दल थोडे बोलू. २००९ साली धनंजय ह्यांना डावलून पंकजा यांना आमदारकीचे तिकीट भाजपने दिले होते. तेव्हा पंकजा यांना ९६९२२ मते मिळाली होती तर प्रा. टी.पी. मुंडे यांना ६०१६० मते मिळाली होती. टक्केवारीच्या भाषेत बोलायचे तर एकूण झालेल्या मतदानापैकी पंकजा यांना ५७.६० टक्के तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या प्रा. मुंडे यांना सुमारे ३६ टक्के मते मिळाली होती. तेव्हा पंकजा मुंडेंच्या विजयासाठी गोपीनाथराव मुंडे, धनंजय मुंडे यांनी प्रचार केला होता. त्यानंतर गोपीनाथराव मुंडेंच्या अकाली निधनानंतर २०१४ साली झालेल्या निवडणुकीत पंकजा विरुद्ध धनंजय असा सामना झाला. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना ९६९०४ मतांसह ४९.६० टक्के लोकांनी साथ दिली तर धनंजय मुंडे यांना ३६.३० टक्के म्हणजेच एकूण झालेल्या मतदानापैकी ७१००९ मते मिळाली. याचवेळी प्रा. मुंडे यांना १४९४६ मते मिळाली. २००९ आणि २०१४ ची आकडेवारी बघता पंकजा यांना मिळालेली मते जरी कायम वाटत असली तरी त्यांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत आठ टक्क्यांची लक्षणीय घट झाली होती. याचवेळी झालेल्या उपनिवडणूक बीड लोकसभा मतदार संघात जगात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा पराक्रम प्रीतम मुंडेंनी केला होता. इथे उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्रात गोपीनाथराव मुंडेंच्या निधनानंतर अनेकांना सहानुभूती लाभली मात्र त्याचवेळी पंकजा मुंडेंच्या मतांमध्ये झालेली आठ टक्क्यांची घट यावर भाजपने 'चिंतन' केली असेल तर ठीक आहे. स्व. गोपीनाथराव मुंडे आणि स्व. प्रमोद महाजन या जोडगोळीची राजकीय घुटी धनंजय यांना बाळकडू स्वरूपात मिळाली. आता त्यात स्वतःच्या बुद्धिमत्तेने आणि मेहनतीने धनंजय हे स्वतःचे वेगळे बस्तान बसवत आहेत. दीड दशकापूर्वी लोकांच्यालेखी काहीसे अपरिपक्व असलेले धनंजय आता चांगलेच मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. ह्याचाच परिपाक म्हणून बारामतीकरांनी त्यांना राज्याच्या वरच्या सभागृहाचे विरोधी पक्षनेते पद दिले. गेल्या तीन वर्षात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांत धनंजय यांनी पंकजा यांना मात दिली आहे. परळी नगर परिषद असो की पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद प्रत्येक ठिकाणी धनंजय मुंडे सरस ठरत आहेत. टीकाकारांना दशकापूर्वी ज्यांचे भय वाटायचे ते आता स्वतःहून धनंजय यांना सल्ला देताना दिसतात. धनंजय मुंडे देखील आनंदाने शक्य त्या सुधारणा करताना दिसतात. गोपीनाथराव मुंडे यांच्या काळात भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांपेक्षा या मतदार संघातील लोकांचा विश्वास साहेबांवर अधिक होता. तेच सूत्र जर कायम ठेवले गेले तर मात्र पंकजा मुंडे ह्या धनंजय मुंडेंना आव्हान निर्माण करू शकतात. जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे कमी उमेदवार निवडून आले असले तरी पंकजांनी आपल्या जादूच्या कांडीने तिथे सत्ता काबीज केलेली विसरून चालणार नाही.

कोणत्याही निवडणुकीत संघटन बांधणी मोलाची भूमिका बजावत असते. आज त्याचाच पुरेपूर वापर करत संघाने भाजपला दिल्लीत सत्ता मिळवून दिली आहे. परळीत तोच पॅटर्न धनंजय मुंडे राबवताना दिसतात. धनंजय मुंडे जरी भाजपतून राष्ट्रवादीत गेले असले तरी आधी शिकलेले नियोजन आज त्यांना कामी येत आहे. परळी वैजनाथ नगर परिषद निवडणुकीतील एक छोटा किस्सा इथे सांगावासा वाटतो. माजी नगराध्यक्षा असलेल्या वृद्ध नेत्या आपल्या सुनेसाठी वार्डात चार-चार वेळेस फिरताना सर्वांनी बघितल्या. आधी त्यांनी फिरण्यासाठी तब्येतीमुळे टाळाटाळ केली पण धनंजय मुंडे यांनी त्यांना मतदारांच्या वारंवार भेटींचे महत्त्व पटवून दिले परिणामी भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या अनेक जागी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले.

सोशल मीडियाच्या बाबतीतही धनंजय मुंडेंची टीम स्थानिक पातळीवर पंकजा मुंडेंच्या टीमपेक्षा सरस आहे. केंद्रात किंवा राज्यात भाजप जो पॅटर्न राबवते अगदी तसेच निवडणूक तंत्र धनंजय मुंडे सध्यातरी वापरताना दिसत आहेत. दुसरीकडे संघटना या विषयी पंकजा मुंडेंच्या भाजपविषयी एका वाक्यात सांगायचे तर "पंकजा मुंडेंचे हेलिकॉप्टर परळीतून उडाले कि मतदार संघातील भाजप उडते." पंकजा मुंडे ह्या चांगले काम करून इथे विजयी होऊ शकतात पण त्यांच्या अवतीभवती असलेले तेच तेच कार्यकर्ते त्यांना भंडावून सोडतात, मग ती परळी असो कि बीड, औरंगाबाद असो कि मुंबई. सध्यातरी पंकजा मुंडेंना सतत वेढणारे कार्यकर्ते हे त्यांच्या आणि सामान्य मतदार यांच्यातला मोठा अडसर ठरत आहेत. आगामी काळात दोघेही भाऊबहीण पूर्ण जोर लावतील हे निश्चित. राजकारणात काहीही होऊ शकते तरी एक टूम कोणाच्या सुपीक डोक्यातून निघाली माहिती नाही. पण, मतदार संघात २०१९ साली धनंजय मुंडे भाजपकडून आमदार असतील आणि पंकजा मुंडे केंद्रात जातील अशी जोरदार चर्चा अधूनमधून कानावर पडत असते. सध्यातरी असे होणे दुरापास्त वाटते. बाकी काही असले तरी सामान्य जनतेच्या प्रगतीसाठी धनंजय-पंकजा हे दोन्ही तरुण नेतृत्व उत्तरोत्तर दमदार होणे आवश्यक असेल.

अनिरुद्ध जोशी, परळी वैजनाथ

८९८३५५५६५७

Updated : 7 Jan 2018 2:53 PM GMT
Next Story
Share it
Top