Home > मॅक्स ब्लॉग्ज > रिपाईचा अभिमन्यू अवतरला......

रिपाईचा अभिमन्यू अवतरला......

रिपाईचा अभिमन्यू अवतरला......
X

इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात...पण ती एवढ्या विचित्र आणि हास्यास्पदरित्या होईल, असे कल्पनेतही नव्हते. राज्यातील रिपब्लिकन म्हणजे दलित जनतेचे एकमेव आशास्थान असल्याचा ज्यांचा अघोषित दावा आहे, त्या रामदास आठवले या नेत्याने केलेली ही नवी खेळी आहे, की बालहट्ट की तदद्न धृतराष्ट्रगीरी असा प्रश्न पडावा अशीच ही घटना आहे. त्यांनी नुकतीच रिपाईची बाल आघाडी स्थापन केली असून त्या आघाडीची सुत्रे आपल्या 11 वर्षांच्या कोवळ्या मुलाच्या हातात दिली आहेत. ज्या मुलाची अजून भारतीय नागरिकशास्त्राशी पुरती ओळखही झालेली नाही, अशा मुलाच्या हातात एखादी संघटना स्थापन करून द्यायची हा बालहट्ट आहे, आठवलेंनी चालवलेला पोरखेळ आहे की भविष्याच्या भीतीने त्यांनी आताच आपला उत्तराधिकारी घोषित करण्याची केलेली घाई आहे, याबाबत संशोधन होण्याची गरज आहे.

चक्रव्युहाबाबत अर्जूनाने आपल्या पत्नीला सांगितलेली माहिती गर्भात असणा-या त्यांच्या पुत्राने अभिमन्यूने ऐकली होती. त्याच अपू-या माहितीच्या आधारावर तो कुरूक्षेत्रात उतरला आणि पुढे काय झाले हा सारा इतिहास आपल्याला ज्ञात आहेच. म्हणजे यावरून एक गोष्ट सिद्ध होते की अपु-या माहितीच्या आधारावर कोणतेच युद्ध, कोणताच संघर्ष जिंकता येत नाही अगदी तुमचा बाप अर्जून असला तरी. त्याचप्रमाणे ज्याची अद्याप नाळही सुकलेली नसावी, किंवा दुधाचे दातही पडले नसावेत अशा आपल्या पुत्राच्या हातात एखाद्या राजकीय संघटनेची धुरा सोपवण्याच्या रामदास आठवले यांच्या या कृतीने हसावे की रडावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. बाकी काही नसले तरी रामदास आठवलेंनी किमान आपला चळवळीचा काळ आठवला तरी पुरेसे झाले असते. दलित पॅथरच्या चळवळीतील आणि नामांतराच्या लढ्यातील आक्रमक रामदास महाराष्ट्राने पाहिला आहे. किंबहूना त्याच शिदोरीच्या बळावर ते रिपाईच्या आणि राज्याच्या राजकारणात टिकून आहेत. चळवळीची तोंडओळख आणि राजकारणाचे विशेषतः राज्यातील (अप्रत्यक्ष जातींच्या) राजकारणाचे बाळकडू पाजल्याशिवाय त्यांनी आपल्या पुत्राला राजकारणात उतरवणे म्हणजे अर्जूनानेच सत्तेच्या मोहापायी, भविष्याच्या अनिश्चिततेमुळे अभिमन्युला चक्रव्युहात ढकलण्यासारखे कृत्य आहे.

कोणत्याही संघटनेचे अथवा पक्षाचे बळ हे त्यांच्या क्रियाशील कार्यकर्त्यांच्या ताकदीवर अवलंबून असते. या कार्यकर्त्यांच्या जोरावरच नेता आपला राजकीय ठसा उमटवत असतो. कार्यकर्ते जेवढे क्रियाशील आणि उपद्रवी असतील तेवढी त्यांची ताकद जास्त मानली जाते. त्यामुळे कार्यकर्त्यांचे जाळे ढिले पडून चालत नाही. रामदास आठवले या व्यक्तीला हे बरोबर जमले आहे. त्यांनी वेळोवेळी आपल्या कार्यकर्त्य़ाच्या जाळ्याची वीण सैल होणार नाही याची काळजी घेतली आहे. मात्र, कित्येकदा नेत्यांची जी गोची होते ती आठवलेंचीही झालेली दिसते. संघटनेतील सत्तापदे वाटताना मात्र या नेत्यांच्या डोळ्यावर कसली पट्टी पडते ते कळत नाही. सर्वच पक्षातील नेत्यांची ही अडचण आहे. विशेषतः आपल्या मुलाला( घराणेशाहीचा आरोप स्वीकारून)ही पदे द्यायला ही मंडळी मागेपुढे पहात नाहीत. आठवलेंचेही तेच झाले आहे का. इतक्या लहान वयात मुलाच्या खांद्यावर संघटनेची जबाबदारी टाकून त्यांना कोणती जीत अपेक्षित आहे. आपल्यानंतर राजकीय उत्तराधिकारी आपला मुलगाच असेल असे त्यांना या कृतीतून दाखवायचे आहे का ? त्यासाठी लागणारे कर्तृत्व आणि समज ही अकरा वर्षाच्या मुलामध्ये आहे, याचा कोणता साक्षात्कार त्यांना झाला की रात्रंदिवस रक्त जाळणा-या कार्यकर्त्यांना सत्तापदे तुमच्यासाठी नसतात हेच त्यांना या कृतीतून दाखवायचे होते ? रिपाईच्या सर्व संघटना एकत्र आल्या तर मी कार्यकर्त्याप्रमाणे काम करायला तयार आहे, अशी घोषणा वारंवार करणा-या आठवलेंना खरंच ते शक्य आहे का? हे यावरून स्पष्ट होते. पक्षातील दुस-या – तिस-या फळीच्या नेतृत्वाकडे कमान न सोपवता आपल्या पाळण्यातील पोरासाठी जागा निर्माण करणे हे हास्यास्पद नाही का ? काहीही असले तरी कुमार जीत आठवले हा बालवाडीतून बाहेर पडलेला मुलगा एका राजकीय पक्षाची बालआघाडी कसा सांभाळणार आहे? हे नवे राजकीय कोडे आणि आठवलेंची तथाकल्पित मुत्सदेद्गिरी लवकरच स्पष्ट होईल.

Updated : 7 Sep 2017 4:47 AM GMT
Next Story
Share it
Top