Home > मॅक्स ब्लॉग्ज > राण्यांनो, ह्या काय चल्लाहा...

राण्यांनो, ह्या काय चल्लाहा...

राण्यांनो, ह्या काय चल्लाहा...
X

नारायण राणे नेहमी एक किस्सा सांगतात... “मी कोकणातला आहे, कोकणात लोक त्याच झाडाला दगड मारतात. ज्या झाडाला आंबे असतात. माझ्याबद्दल नेहमी अफवा आणि वेगवेगळ्या बातम्या उठतात, त्याचं कारण हेच आहे. माझ्याबाबतीततल्या बातम्यांनी यांना टीआरपी मिळतो आणि रिकामटेकड्या राजकारण्यांना चघळायला विषय…” खरं आहे, नारायण राणे या नावाचा करिष्माच एवढा आहे की, त्यांच्याबाबतच्या कोणत्याही वदंतेची बातमी आणि मग चर्चा होते. आताची चर्चा आहे ती राणे भाजपात जाणार का याची? ते मुख्यमंत्र्यांसोबत अहमदाबादेत शहांना भेटले की नाही याची? राणे नक्कीच शहांना भेटले असणार मुख्यमंत्र्यांनी नाकारले तरीही. कारण राणेंची काँग्रेसमध्ये होत असलेली घालमेल कधीही लपून राहिलेली नाही. पण प्रश्न आहे राणे भाजपात गेले तर त्यांना काय मिळणार? आणि जर ते आश्वासन लवकर पूर्ण झाले नाही तर राणे आपल्या वर्तनात बदल करणार का? कारण...

आजमितीला नारायण राणे यांच्यासारखा नेता काँग्रेसमध्ये नाही, हे नारायण राणे स्वतःच अगदी काँग्रेसच्या कार्यालयात बसून सांगतात. त्यांच्यात तेवढी धमक आहे. ही धमक आजची नाही, तर जेव्हा जेव्हा त्यांना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली तेव्हा तेव्हा त्यांनी ती दाखवून दिलीय. मात्र, नारायण राणे यांचे हे वागणे म्हणजे धमक मानायची की आत्मघातकीपणा हे सुद्धा काळाने वारंवार दाखवून दिले आहे.

शिवसेनेत वाढलेले नारायण राणे यांची कार्यशैली ही शिवसेना स्टाईलच राहिली. ते काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतरही त्यांच्या वागण्यात कधीही काँग्रेस कल्चर जाणवलं नाही. शिवसेना सोडल्यानंतर राणे यांचा मालवणातील बंगला जाळण्याची घटना असो की त्यांच्यावर लावण्यात आलेले खूनाचे आरोप असोत, राणे डगमगले नाही. राणेंच्या जागी दुसरा कोणी नेता असता तर शिवसैनिकांनी त्याचे काय केले असते याची कल्पना भुजबळांच्या जाण्यानंतरच्या घटनाक्रमावरून करता येते. शिवसेनेत घुसमट (?) झालेले राणे काँग्रेसमध्ये दाखल झाले तेच महत्त्वाकांक्षेने... काँग्रेसचा पुढील मुख्यमंत्री आपणच असणार याची जणू त्यांना खात्रीच होती. मात्र, विलासरावांच्या राजीनाम्यानंतर केवळ आपणच आहोत या थाटात बंगल्यावर त्यांनी ज्याप्रकारे आपला गोतावळा आणि समर्थक बोलावले होते, ते पाहता त्यांचा आत्मविश्वास किती तगडा आहे हे दिसत होते. पण त्यांना काँग्रेस पुरती कळली नव्हती, (ती आजही कितपत कळली आहे हे त्यांनाच ठाऊक.) हे मात्र त्यानंतरच्या घटनांवरून दिसून आले. काँग्रेसमध्ये शिजवणाऱ्याला सर्वात आधी वाढण्याची पद्धतच नाही, उलट चौकीदाराला आधी चवीसीठी बोलावले जाण्याची शक्यता जास्त असते. बरं आपल्या पानात आधी वाढले नाही, आणि दुस-याच्या पानात वाढले तर लहान मुले ज्या पद्धतीने वाढणाऱ्याचा उद्धार करतात. त्याला लाखोली वाहतात. तोच प्रकार राणेंनी केला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, अहमद पटेल यांचा थेट दाऊदशी संबंध जोडायलाही त्यांनी कमी केले नाही. हीच त्यांची वृत्ती त्यांच्या काँग्रेसमधील वाटचालीतला मोठा अडसर ठरली आणि ठरतेय. त्यावेळी शांतपणे त्यांनी अशोक चव्हाणांना स्वीकारले असते तर नंतरच्या काळात कदाचित राणे मुख्यमंत्री झालेले पहायला मिळालेले असते. पण भिडण्याची वृत्ती आणि अनाठायी धाडस न दाखवतील तर ते राणे कसले? काँग्रेसमध्ये निष्ठावान आणि निरूपद्रवी व्यक्तीला पदे मिळतात हे खरे तर आतापर्यंतच्या इतिहासावरून सिद्ध झालेले उघड गुपित आहे. नारायण राणेंनी नेमकी हीच चूक वांरवार केली. त्यामुळे त्यांना शक्य असूनही पदे मिळाली नाहीत. पक्षश्रेष्ठींच्या गुडबूकमध्ये राणे आणि कुटूंबिय कधीच नव्हते ते त्यांच्या वाचाळपणामुळेच. राणेंचे दिल्ली दरबारी वजन असेल तरी त्याला फारसा अर्थ नव्हता. कारण गांधी परिवाराचे त्यांच्याबद्दल चांगले मत नव्हते याचाच फायदा भ्रष्टाचाराचे आरोप लागूनही अशोक चव्हाणांनी उचलला. चव्हाण हे राहूलच्या यंग ब्रिगेडमध्ये असल्याने त्यांना पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी बसता आले. त्याचाही राणेंना स्वाभाविक राग आला, त्यामुळे ते आणि त्यांचे पुत्र नेहमीप्रमाणे पक्षविरोधी, धोरणांविरोधी आणि नेत्यांविरोधात बोलले. नेहमीप्रमाणेच त्याची दखल कोणी घेतली नाही.

काय शक्य होते ?

2014 लोकसभेतील पराभवानंतर राज्यातील विधानसभांच्या निवडणूकांची कमान राणेंच्या हातात देणे पक्षाला शक्य होते. कारण पृथ्वीराज चव्हाणांवर आमदार नाराज होते. माणिकरावांचा कधीच करिष्मा नव्हता आणि अशोकरावांवर आरोपांची मालिका सुरू होती. पण तेव्हाही थयथयाट केल्याने त्यांना या प्रक्रियेतून बाजूला व्हावं लागलं. त्याचा पक्षाला आणि त्यांना पराभवाच्या रूपात फटका सहन करावा लागला. कोकणातल्या जनतेमधील त्यांच्या लाडक्या दादांची क्रेझ संपत असताना त्यांच्या मुलांनी केलेली दादागिरी जास्त समोर येत गेली. त्याचा फटका खासदारकीत निलेशला तर आमदारकीत त्यांना स्वतःला भोगावा लागला. त्याचीच पुनरावृत्ती मुंबईतल्या पराभवाने केली. ही जागा पडणार आहे हे माहीत असूनही त्यांनी ती लढवली आणि नेहमीप्रमाणे पक्षाच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर खापर फोडले. त्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाकडे मोर्चा वळवला पण तिथेही हुलकावणीच. विधानपरिषदेत गटनेतेपदी त्यांची वर्णी लागली असती तरी परिषदेतील चित्र वेगळे दिसले असते पण तिथेही त्यांच्यापेक्षा ज्युनिअर शरद रणपिसेंना संधी देवून राणेंना पक्षाने आपली रणनिती आणि त्यांची जागा दाखवून दिली. केवळ निष्ठा याच निकषावर राणेंना वारंवार धूळ खावी लागली आणि निष्ठावान होणे आपल्या रक्तात नाही हे राणे आणि त्यांचे पुत्र दाखवत राहिले.

चिवडा आणि राणे

नारायण राणे, हे एकदा मुख्यमंत्री आणि त्यानंतरच्या काळात महसूलमंत्री, उद्योगमंत्री या पदांवर कार्यरत राहिलेले जाणकार मंत्री आहेत. त्यांनी प्रशासनावर घेतलेली पकड अन्य क्वचितच एखाद्या मंत्र्याला मिळवता आली असेल. त्याचे कारण आहे राणेंचा त्य़ा त्या खात्याचा आणि कायद्यांचा अभ्यास. राणे सभागृहात आणि मंत्रालयात सचिवांना कायदे समजावून सांगत आणि काम कसे कायद्यात बसवता येते हे सुद्धा. राणे यांच्यात एक मुत्सद्दी लोकसंग्रह असलेला नेता आहे. त्यांच्यात अभ्यासू आणि धाडसी नेता आहे. पण त्यांच्या ठायी असलेली अस्थिरता आणि शिघ्रकोपीपणा त्यांना कधीही पुन्हा अधिकारपदापर्यंत पोहोचू देत नाही. त्यांचा आमदार पुत्र नितेश याने नुकतेच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हण यांना चिवड्याचा एक बॉक्स पाठवून दिला आणि पदं वाटता येत नसतील तर निदान चिवडा तरी वाटा असा सल्ला दिला होता. वास्तविक या साऱ्या प्रकारात राणेंच्या राजकारणाचा चिवडा कधी झाला हे त्यांच्या लक्षातही आले नसेल.

  • सुरेश ठमके

Updated : 14 April 2017 11:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top